विद्युत आग ही बहुतेक वेळा ओव्हरलोड, सैल जोडणी (Loose Connections), चुकीची कारागिरी किंवा चुकीच्या डिझाइनमुळे होते असे मानले जाते. मात्र प्रत्यक्षात आणखी एक महत्त्वाचे आणि अनेकदा दुर्लक्षित राहणारे कारण म्हणजे प्राणी, पक्षी आणि पर्यावरणीय घटकांमुळे होणारे अतिक्रमण. विद्युत आगीस प्राणी किंवा पक्षी मुद्दाम कारणीभूत ठरत नाहीत, मात्र त्यांच्या नैसर्गिक सवयी विद्युतदृष्ट्या धोकादायक परिस्थिती निर्माण करतात.
उंदीर, घुशी, खार यांसारखे कुरतडणारे प्राणी (Rodents) वायरच्या इन्सुलेशनला कुरतडतात. एकदा इन्सुलेशन खराब झाले की वाहकाद्वारे (Conductor) प्रवाह जाण्याचा ठरलेला विद्युत प्रवाहाचा मार्ग बाधित होतो. परिणामी विद्युत गळती (Leakage Current), ठिणगी (Arcing), स्थानिक तापमान वाढ (Localized Heating) आणि अखेरीस आग लागण्याची शक्यता निर्माण होते. अशी हानी बहुतेक वेळा फॉल्स सिलिंगच्या वर, केबल ट्रेंचमध्ये किंवा पॅनल्समध्ये होते आणि शॉर्ट सर्किट किंवा आग लागेपर्यंत लक्षात येत नाही. पक्षी हे एक गंभीर धोका निर्माण करतात.
बाहेरील एसी युनिट्स, पॅनल्स, खांबावरील ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशन, टेरेसवरील इंस्टॉलेशन्स, ट्रान्समिशन लाईन्स आणि बाह्य दिवे (Outdoor Luminaires) यांत पक्षी घरटी बांधतात. त्यासाठी कोरडे गवत, काड्या, पिसे, कापड, प्लास्टिक यांचा उपयोग करतात. ही घरट्यांची सामग्री अत्यंत ज्वलनशील असते. ही सामग्री जर लाईव्ह टर्मिनल्स किंवा तापलेल्या घटकांच्या संपर्कात आली तर ती सहज पेटते. जगभरातील अनेक बाह्य विद्युत आगींचे मूळ पॅनल्स किंवा ट्रान्सफॉर्मरमध्ये असलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये आढळले आहे. कावळे अनेकदा लोखंडी तारांचा किंवा स्क्रॅपचा वापर करून स्टील टॉवर्सवर इन्सुलेटरजवळ घरटी बांधतात. यामुळे लाईव्ह लाईन आणि स्टिल स्ट्रक्चर्स- जी अर्थ केलेली असते, यांच्यात अंतर भरून दोष (Fault) निर्माण होतो. मोठ्या पक्ष्यांची विष्ठा (Droppings) प्रवाही (Conductive) असल्याने तीही दोष निर्माण करते.
साप, बेडूक, पाल यांसारखे सरपटणारे प्राणी (Reptiles) देखील विशेषतः बाहेरील, तळघरातील आणि औद्योगिक विद्युत पॅनल्समध्ये शिरतात. त्यांच्या शरीरामुळे लाईव्ह वाहकांमध्ये किंवा लाईव्ह भाग आणि अर्थ यांच्यात थेट संपर्क होतो. यामुळे अचानक शॉर्ट सर्किट, तीव्र ठिणगी आणि कधी कधी आग लागते. अशा घटना सबस्टेशन, पंप हाऊस, सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आणि मोकळ्या औद्योगिक परिसरात सामान्यपणे आढळतात. मोठे प्राणी आणि पक्षी यांत्रिक स्वरूपाचे नुकसानही करतात. माकडे, मांजरे किंवा मोठे पक्षी केबल्स ओढतात, ग्लॅंड्स सैल करतात, टर्मिनेशन्स हलवतात किंवा बाह्य वस्तूंचे नुकसान करतात. कालांतराने यामुळे जोडणी सैल होणे, कंपनांमुळे बिघाड आणि तापमान वाढ यांसारख्या स्थिती निर्माण होतात. आधीच्या लेखांमध्ये अशा पद्धीतीमुळे होणारी विद्युत आगीची प्रमुख कारणे म्हणून स्पष्ट केल्या आहेत.
जंगलाजवळील बाह्य सबस्टेशनमध्ये मोठे माकड (Baboon) मोठ्या प्रमाणात गोंधळ घालू शकतात. ते संरचनेवर बसल्यावर त्यांची शेपटी लाईव्ह लाईनला स्पर्श करून ट्रिपिंग किंवा ठिणगी निर्माण करू शकते. अशा घटना अनेक वेळा झाल्या आहेत. हे धोके निवासी आणि औद्योगिक दोन्ही ठिकाणी अस्तित्वात असतात. घरांमध्ये उंदीर फॅालसिलींगवरील वायरिंगचे नुकसान करतात. तर पक्षी सर्व्हिस कनेक्शनजवळ आणि मशीनजवळ घरटी बांधतात. औद्योगिक वसाहतीत सबस्टेशन, केबल ट्रेंच, बाह्य पॅनल्स आणि ट्रान्सफॉर्मर यार्ड विशेषतः प्राण्यांपासून असुरक्षित असतात.
या दोषांचे सर्वांत धोकादायक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अचानक समस्या उद्भवणे. सर्व काही व्यवस्थित दिसत असताना एका क्षणात विद्दयूत प्रणाली निकामी होऊ शकते. पर्यावरणीय अतिक्रमण (Environmental Intrusion) हेदेखील विद्युत आगीचे एक महत्त्वाचे, पण अनेकदा दुर्लक्षित कारण आहे. पावसाचे पाणी, आर्द्रता, धूळ, रासायनिक वायू, खारट हवा (विशेषतः समुद्रकिनारी भागात), चिखल किंवा पूरस्थिती यांमुळे विद्युत उपकरणांमध्ये गंज (Corrosion), इन्सुलेशन कमकुवत होणे आणि विद्युत प्रवाहाचा मार्ग बिघडणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. ओलावा किंवा धूळ टर्मिनल्समध्ये साचल्यास ठिणगी (Arcing), स्थानिक तापमान वाढ (Localized Heating) आणि इन्सुलेशन ब्रेकडाउन होऊ शकतो.
बाह्य पॅनल्स योग्य IP संरक्षणाशिवाय बसवले असल्यास पाणी आत शिरून शॉर्ट सर्किट आणि आग लागू शकते. त्यामुळे पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेऊन योग्य एनक्लोजर, सीलिंग, व्हेंटिलेशन आणि नियमित तपासणी करणे अत्यावश्यक आहे. अशा आगी टाळण्यासाठी डिझाइन, इंस्टॉलेशन आणि देखभाल या सर्व टप्प्यांवर पर्यावरणीय व जैविक घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. पॅनल्स नीट सील करणे, रॉडेंट-रेझिस्टंट केबल्स वापरणे, आवश्यक ठिकाणी मेटल कंड्युट्स, जाळ्या (Mesh Screens), बर्ड गार्ड्स, सीलबंद केबल एंट्रीज आणि योग्य ग्लॅंड प्लेट्स वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
नियमित तपासणी, स्वच्छता, कीटकनियंत्रण (Pest Control) आणि घरटी काढून टाकणे ही नियमित देखभालीचा भाग असली पाहिजेत. विद्युत आग प्रतिबंध म्हणजे केवळ लोड कॅल्क्युलेशन किंवा संरक्षण उपकरणांपुरते मर्यादित नाही. प्रत्यक्ष परिस्थितीचा अंदाज घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्राणी, पक्षी आणि पर्यावरण हे बाह्य घटक असले तरी ते अनावश्यक ट्रिपिंग आणि विद्युत आगीच्या धोक्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास कोणत्याही विद्युत प्रणालीत एक लपलेली, पण गंभीर कमकुवत बाजू निर्माण होते.
(लेखक वीजविषयक सल्लागार आहेत.)
ajitnkulkarni@yahoo.com
