ओव्हरलोडिंग हे विद्युत आगीचे एक अतिशय सामान्य, पण अनेकदा गैरसमज होणारे कारण आहे. शॉर्ट सर्किटप्रमाणे ओव्हरलोडिंगमध्ये मोठा आवाज, ठिणग्या किंवा त्वरित ट्रिपिंग सहसा होत नाही. त्यामुळे ते लक्षात येत नाही. मात्र दुर्लक्ष केल्यास ते ‘शांतपणे घात करणारे’ ठरू शकते. ओव्हरलोडिंग हळूहळू वाढते आणि कालांतराने संपूर्ण विद्युत यंत्रणा कमकुवत करत जाऊन आग लागण्यास कारणीभूत ठरते.

प्रत्येक विद्युत वायर, केबल, सॉकेट आणि उपकरण विशिष्ट प्रवाह (current) सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेले असते. ही मर्यादा कंडक्टरचा आकार, इन्सुलेशनचा प्रकार, बसविण्याची पद्धत आणि आजूबाजूचे तापमान यावर आधारित असते. जेव्हा जोडलेला विद्युत भार (load) या डिझाइन क्षमतेपेक्षा जास्त होतो, तेव्हा सर्किटमधून अधिक विद्युत प्रवाह (current) वाहू लागतो. या अवस्थेला ओव्हरलोडिंग म्हणतात.

ओव्हरलोडिंग प्रामुख्याने तेव्हा होते- जेव्हा सर्किटच्या क्षमतेपेक्षा जास्त लोड जोडला जातो. उदाहरणार्थ, एअर कंडिशनरला आवश्यकतेपेक्षा कमी क्षमतेच्या वायर वर जोडल्यास त्या वायर ओव्हरलोड होऊन तापू लागतात, गरम होतात. त्याचप्रमाणे एकाच सॉकेटवर हीटर, गिझर, मायक्रोवेव्ह यांसारखी उपकरणे कधी कधी चालविली जातात. घरामध्ये नवीन उपकरणे जोडली जातात, पण वायरिंग किंवा संरक्षण यंत्रणा वाढीव ( upgrade) केली जात नाही. उद्योगांमध्ये एखाद्या मोटर किंवा यंत्रासाठी टाकलेली केबल नंतर अतिरिक्त लोडसाठी वापरली गेली तर केबल ओव्हरलोड होते. घरांमध्ये इंटीरियर करताना अतिरिक्त एसी किंवा लाइटस् वा इतर लोड जोडल्याने मूळ वायरिंग ओव्हरलोड होते आणि गरम होऊ लागते.

अनेक घरांमध्ये व कार्यालयांमध्ये ओव्हरलोडिंग अप्रत्यक्षरीत्या होते. एक्स्टेन्शन बोर्ड, मल्टीप्लग आणि तात्पुरत्या जोडण्यांमुळे एकाच सॉकेटमधून अनेक उपकरणांना वीज घेतली जाते. सोयीचे वाटले तरी ही पद्धत सर्किटच्या सुरक्षित मर्यादेपलीकडे जाते.

योग्य प्रकारे निवडलेली आणि नीट मेंटेन केलेली सुरक्षा देणारी साधने- जसे की एमसीबी (mcb), फ्यूजेस वा इतर स्विचगिअर – ओव्हरलोडिंग झाल्यास वीजपुरवठा खंडित करण्यासाठी असतात. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ही संरक्षण साधने चुकीच्या रेटिंगची असतात, बायपास केलेली असतात, जास्त रेटिंगची बसवलेली असतात किंवा योग्य देखभाल नसते. अशा वेळी सर्किट मध्ये सतत जास्त करंट वाहत राहतो.

दीर्घकाळ ओव्हरलोडिंग झाल्यामुळे वायर, केबल, टर्मिनल्स, सॉकेट्स आणि उपकरणांचे अंतर्गत भाग हळूहळू गरम होत जातात. इन्सुलेशन कमकुवत होते, ठिसूळ बनते आणि अखेरीस बिघडते (fails). एकदा इन्सुलेशन खराब झाले की अगदी लहान कारणानेही पेट घेऊ शकते. अशा गरम वायर किंवा ठिणग्यांचा संपर्क कापड, कापूस, वायू (gas) इत्यादी ज्वलनशील पदार्थांशी आल्यास आग लागते.

म्हणून ओव्हरलोडिंगकडे ‘तात्पुरती सोय’ किंवा किरकोळ बाब म्हणून पाहू नये. डिझाइन करताना, बदल करताना किंवा लोड वाढविताना याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. दुर्लक्ष केल्यास हे प्राणघातक अपघातात बदलू शकते. ओव्हरलोडिंग ही हळूहळू होणारी हानी आहे, जी विद्युत आगीची पार्श्वभूमी तयार करते.

पुढील लेखात आपण ओव्हरहीटिंग या विषयावर चर्चा करू- जे ओव्हरलोडिंग नसतानाही होऊ शकते आणि अनेकदा आग लागेपर्यंत पूर्णपणे लक्षात येत नाही. नेहमी जोडलेला लोड तपासा, सर्किट ओव्हरलोड होऊ देऊ नका.

ajitnkulkarni@yahoo.com