घर, कार्यालये, दुकाने, रुग्णालये आणि उद्योगांमध्ये पॉवर सॉकेट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्याच वेळी हे घटक विद्युत स्थापनेतील सर्वांत दुर्लक्षित आणि सर्वाधिक धोकादायक पॉइंट्सपैकी एक आहेत. चुकीची निवड, गैरवापर किंवा ओव्हरलोडिंगमुळे अनेक विद्युत आगी सॉकेट्स, एक्स्टेन्शन कॉर्ड्स आणि मल्टी-प्लग बोर्ड्सपासून सुरू होतात.
निवासी इमारतींमध्ये सॉकेट्सचा वापर पंखे, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, हीटर्स, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि एसीसाठी केला जातो. कार्यालये व व्यावसायिक ठिकाणी संगणक, प्रिंटर्स, सर्व्हर्स, पॅन्ट्री उपकरणे आणि एअर कंडिशनिंग युनिट्स यांना वीजपुरवठा केला जातो. उद्योगांमध्ये पोर्टेबल टूल्स, वेल्डिंग मशीन, पंप्स आणि तात्पुरती उपकरणे यासाठी सॉकेट्स वापरले जातात. या प्रत्येक वापरासाठी योग्य करंट रेटिंगचे सॉकेट आवश्यक असते, परंतु अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते.
सॉकेट्स ६ अँप, १० अँप, १६ अँप तसेच औद्योगिक वापरासाठी अधिक रेटिंगमध्ये तयार केली जातात. हे रेटिंग सॉकेट किती करंट सुरक्षितपणे आणि सलग वाहू शकते हे दर्शवते. हे रेटिंग जोडलेल्या लोडवर, उपकरणाच्या प्रकारावर आणि वापराच्या कालावधीवर आधारित असते. कमी रेटिंगचे सॉकेट जास्त लोडच्या उपकरणासाठी वापरल्यास आतल्या संपर्कांमध्ये उष्णता वाढते, इन्सुलेशन खराब होते, स्पार्किंग होते आणि आग लागण्याचा धोका निर्माण होतो.
ISI मार्क असलेली सॉकेट्स, प्लग टॉप्स आणि अॅक्सेसरीज वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ISI मार्किंगमुळे संपर्क दाब (contact pressure), गुणवत्ता, इन्सुलेशनची क्षमता आणि उष्णता सहनशीलता यासाठी भारतीय मानकांचे पालन झाल्याची खात्री मिळते. नॉन-स्टँडर्ड सॉकेट्समध्ये आतले स्प्रिंग्स कमजोर असतात व संपर्क पृष्ठभाग खराब असतात. वापरामुळे हे सैल होतात आणि सामान्य लोडवरही उच्च रेसिस्टन्समुळे उष्णता निर्माण होते.
एक अतिशय धोकादायक आणि सामान्यतः आढळणारी पद्धत म्हणजे योग्य प्लग टॉप न वापरता थेट वायर सॉकेटमध्ये घालणे. अशा जोडण्यांना यांत्रिक मजबुती नसते, संपर्क असमान असतो आणि वायरींचे भाग उघडे राहतात. लोड आल्यावर या सैल संपर्कांमुळे उष्णता आणि स्पार्किंग निर्माण होते. अशा छोट्या व तात्पुरत्या जोडण्यांमधून आगी सुरू होतात.
दोन-पिन प्लगचा वापर हा आणखी एक गंभीर मुद्दा आहे. तिसरा पिन अर्थिंगसाठी असतो, जो शॉक संरक्षणासोबतच अग्निसुरक्षेसाठीही अत्यावश्यक आहे. अर्थिंग नसल्यास लीकेज करंट सुरक्षितपणे जमिनीत जाऊ शकत नाही आणि संरक्षण उपकरणे योग्यरीत्या कार्य करत नाहीत. त्यामुळे उपकरणांच्या बॉडीमध्ये व सॉकेट संपर्कांमध्ये उष्णता साचते आणि आग लागण्याचा धोका वाढतो.
सॉकेट्स MCB, RCCB आणि काही ठिकाणी AFDD यांसारख्या संरक्षण उपकरणांसोबत कार्य करण्यासाठी डिझाइन केलेले असतात. MCB ओव्हरलोड व शॉर्ट सर्किटपासून संरक्षण करते, RCCB लीकेज करंट व विद्युत शॉकपासून संरक्षण करते, तर AFDD धोकादायक आर्किंग स्थिती ओळखते. मात्र कमी रेटिंगचे सॉकेट, खराब संपर्क किंवा चुकीचा वापर असल्यास कोणतेही संरक्षण उपकरण त्याला सरंक्षण देवू शकत नाही.
एक्स्टेन्शन कॉर्ड्स आणि मल्टी-प्लग बोर्ड्सचा गैरवापर केल्यास धोका अनेक पटींनी वाढतो. अनेक घरे व कार्यालये योग्य फिक्स्ड सॉकेट्स बसवण्याऐवजी एक्स्टेन्शन बोर्ड्सचा कायमस्वरूपी वापर करतात. एका सॉकेटमधून अनेक उपकरणे जोडल्याने सॉकेट, आतली वायरिंग, एक्स्टेन्शन कॉर्ड आणि प्लग टॉप सर्वच ओव्हरलोड होतात. बहुतेक एक्स्टेन्शन कॉर्ड्स सतत जास्त करंट व दीर्घकालीन वापरासाठी डिझाइन केलेले नसतात.
स्वस्त व निकृष्ट दर्जाच्या एक्स्टेन्शन बोर्ड्समध्ये कमी क्रॉस-सेक्शनल वायर, खराब संपर्क आणि अपुरी इन्सुलेशन असते. हीटर्स, केटल्स, मायक्रोवेव्ह ओव्हन किंवा एसीसारखी जास्त लोडची उपकरणे जोडल्यास वेगाने उष्णता वाढते. प्लग वितळणे, सॉकेट काळवंडणे आणि धुरकट आग लागणे हे अशा परिस्थितीत सामान्य परिणाम असतात.
एक्स्टेन्शन कॉर्ड्स आणि मल्टी-प्लग्स कार्पेटखाली, फर्निचरखाली, वर्कस्टेशनखाली किंवा पडदे व लाकडी पृष्ठभागाजवळ ठेवणे हा आणखी एक धोका आहे. उष्णता अडकते, वायुवीजन होत नाही आणि इन्सुलेशन जलद खराब होते. हे तात्पुरते मानले जात असल्यामुळे त्यांची तपासणी क्वचितच केली जाते, त्यामुळे ते ‘सायलेंट फायर हॅझर्ड’ ठरतात.
पॉवर सॉकेट्स, एक्स्टेन्शन कॉर्ड्स आणि मल्टी-प्लग बोर्ड्स हे लहान घटक वाटत असले तरी ते संपूर्ण विद्युत प्रणालीतील सर्वाधिक ताण सहन करणारे पॉइंट्स आहेत. योग्य रेटिंगची निवड, स्टँडर्ड अॅक्सेसरीजचा वापर, योग्य अर्थिंग, तात्पुरत्या वायरिंग टाळणे आणि एक्स्टेन्शन कॉर्ड्सवर कठोर नियंत्रण हे विद्युत आग टाळण्यासाठी अत्यावश्यक आहे.
पुढील लेखात आपण आणखी एका सामान्य पण दुर्लक्षित विषयावर लक्ष केंद्रित करू- सैल जोडणी आणि खराब टर्मिनेशन्स, आणि कसे लहान कामातील दोष गंभीर अग्नि दुर्घटनांना कारणीभूत ठरतात. लहान मुद्दा, मोठा धोका.
ajitnkulkarni@yahoo.com
(लेखक वीजविषयक सल्लागार आहेत.)
