घराची खरी गरज मनालाच अधिक असते. म्हणूनच मन प्रसन्न राहण्यासाठी घरदेखील प्रसन्न असलं पाहिजे. जसं आपलं मन सुंदर असतं तसंच घरसुद्धा सुंदर असलं आणि दिसलं पाहिजे. आपल्या घराच्या अंतरंगावरून आपल्या अंतर्मनाची ओळख होत असते. आपल्या घराच्या अंतरंगाचं रूप आपल्या अंतर्मनांचा आरसा असतो. आपल्या सजवलेल्या घरामुळे आपलं व्यक्तिमत्त्वदेखील खुलून येत असतं. यामुळे सौंदर्याचा साक्षात्कार केवळ घरातच होतो असं नाही तर अंतर्मनातही होत असतो. आपण ज्या वातावरणात वावरतो त्या वातावरणाचा आपल्यावर कमी-अधिक प्रमाणात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. हा होणारा परिणाम आपल्याला नेहमीच चांगला हवा असतो. त्यासाठीच आपल्या सभोवतालचं आणि मुख्य म्हणजे आपल्या घरातलं वातावरण चांगलं ठेवावं लागतं.

ल हानपणापासूनच ‘घर’ या विषयीची अनेक गाणी, गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. मग तो चॉकलेटचा सोनेरी चमचमता बंगला असेल किंवा चिऊताईच्या घराची गोष्ट असेल. अगदी लहानपणापासूनच आपल्या मनात घर करून राहिलेल्या ‘घर’ या संज्ञेशी आपलं एक प्रकारे निराळंच नातं निर्माण झालेलं असतं. सतत कानावर पडणाऱ्या ‘घर’ या शब्दाचं एक प्रचंड आकर्षण आपल्याला वाटत असतं. घरातलं मन आणि मनातलं घर यांचं नातं अगदी दूध-पाण्यासारखं असतं. सहजासहजी ते वेगळं करता येत नाही.
आपल्याला घराची आवश्यकता केवळ निवाऱ्यासाठी मूलभूत गरज भागवणे अशी नसून, त्याची खरी गरज मनासाठी अधिक असते. आपल्या शरीरासाठी तो केवळ निवारा असतो तर मनासाठी मात्र खूप काही असतं. आपल्या घरात आपण अनुभवलेला प्रत्येक क्षण आपल्यासाठी विलक्षण असतो. आपण जे काही अनुभवत असतो त्यांचा आपल्या मानसिकतेवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम नेहमी होत असतो. आपण आणि आपलं अंतर्मनदेखील याचा प्रत्यय घेत असतं. शरीरानं आपण जेव्हा घरापासून दूर असतो तेव्हा ws06अनेकदा मनानं मात्र घरात असतो, मनानं घरापासून दूर गेलेलो नसतो. हे आपल्या मनाचं आपल्या घराशी असलेलं अतूट नातं आपल्याला गृहसजावटीच्या कामात समजून घेणं म्हणूनच आवश्यक असतं.
घराची खरी गरज मनालाच अधिक असते. म्हणूनच मन प्रसन्न राहण्यासाठी घरदेखील प्रसन्न असलं पाहिजे. जसं आपलं मन सुंदर असतं तसंच घरसुद्धा सुंदर असलं आणि दिसलं पाहिजे. आपल्या घराच्या अंतरंगावरून आपल्या अंतर्मनाची ओळख होत असते. आपल्या घराच्या अंतरंगाचं रूप आपल्या अंतर्मनांचा आरसा असतो. आपल्या सजवलेल्या घरामुळे आपलं व्यक्तिमत्त्वदेखील खुलून येत असतं. यामुळे सौंदर्याचा साक्षात्कार केवळ घरातच होतो असं नाही तर अंतर्मनातही होत असतो. आपण ज्या वातावरणात वावरतो त्या वातावरणाचा आपल्यावर कमी-अधिक प्रमाणात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. हा होणारा परिणाम आपल्याला नेहमीच चांगला हवा असतो. त्यासाठीच आपल्या सभोवतालचं आणि मुख्य म्हणजे आपल्या घरातलं वातावरण चांगलं ठेवावं लागतं.
गृहसजावट करण्यासाठी आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते घरातील पोटमाळ्यापर्यंत प्रत्येक वस्तूंचा अभ्यासपूर्वक विचार केला पाहिजे. प्रत्येक वस्तूची निवड अतिशय कलात्मक रीतीने केली पाहिजे. निवड करण्यासाठी आवश्यकतेपेक्षा थोडा अधिक वेळ खर्च झाला तरीही हरकत नसते. अनेकदा आपल्या दैनंदिन कामात बारीकसारीक बाबींचा आपल्याला विसर पडतो अथवा वेळेअभावी आपण अशा बाबींकडे दुर्लक्ष करतो. केवळ वस्तूंची निवड करण्यासाठी का होईना आपण स्वतंत्र वेळ काढून बाजारात फेरफटका मारून मगच निर्णय घेतला पाहिजे.
अनुकरणप्रिय असणारं आपलं मन अनेकदा कोणा एखाद्याकडे काही बघितलं की त्याचा शोध सुरू करत असतं. आपल्याही घरात ती वस्तू आणण्याचा आग्रह आपलं मन करतं. सौंदर्यासाठी अशा वस्तूचा जरूर विचार करायला हरकत नसते. परंतु ती वस्तू आपल्या घरात कोठे, कशी ठेवावी याचा आपला विचार होतोच असं नाही. मनाच्या आग्रहामुळे आणलेल्या वस्तूची जागा मग ठरत नाही. किंवा जागा निश्चित झाली तरीही त्या जागेवर ती शोभून दिसत नाही. अशा वेळी गरज भासते ती व्यावसायिक अंतर्गत संरचनाकाराची आणि त्याच्या गुणानुभवाची. तोच आपल्या घरात सौंदर्याचा साक्षात्कार घडवून आणू शकतो.
बदलत जाणारे जीवनमान आणि काळाची गरज म्हणून जीवनपद्धतीतदेखील आमूलाग्र बदल घडत गेले आहेत. घराच्या बाबतीत केवळ विविधता हवी म्हणून गृहसजावट असा माफक दृष्टिकोन राहिला नसून तो खूपच व्यापक झाला आहे. याच दृष्टिकोनातून आपल्या घरातील वास्तव्याचे अविस्मरणीय क्षण आपण सर्वजण अनुभवायला लागलो आहोत. घराची जागा ज्या भौगोलिक परिसरात आहे त्या ठिकाणी उपलब्ध असलेली साधनसामग्री सजावटीच्या कामासाठी वापरात आणणे केव्हाही उपयुक्त ठरतं. बाजारात रोजच नवनवीन वस्तू उपलब्ध होत असतात. यात काही वेळा नव्याजुन्याचा मेळ घालून एखादी सुंदर अशी संरचना साकारता येऊ  शकते. हल्ली विविध ठिकाणच्या प्रसिद्ध वस्तूंच्या निवडीतून घराची सजावट केल्याचे दिसून येतं. खऱ्या अर्थाने राजेशाही थाटाचे स्वरूप अशा सजावटीमधून प्राप्त केलं जाऊ  शकतं. या कामात इंटिरियर डिझायनरने केलेलं काम अधिक उठावदार असतं आणि म्हणूनच अशी गृहसजावट लक्षवेधी असते.
प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा संबंध त्या व्यक्तीच्या घरासाठी बनवलेल्या अंतर्गत संरचनेशी असतो. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वानुसार घराची अंतर्गत संरचना ठरत असते. त्यामध्ये त्या व्यक्तीच्या अपेक्षा, गरजा, आवडीनिवडी, अंगभूत कलागुण, छंद, वैचारिक क्षमता, सामजिक स्थान, व्यावसायिक संबंध, कौटुंबिक आकार, शैक्षणिक पात्रता, आर्थिक कुवत तसेच याव्यतिरिक्त इतर सर्व लौकिक आणि अलौकिक गुण या सर्व बाबींवर घराची बाह्य तसेच अंतर्गत संरचना आणि सजावट करण्याचं ठरवावं लागतं. एखाद्या घराची अंतर्गत संरचना संबंधित कुटुंबीयांच्या प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व खुलवत असते. अशा प्रकारे सजवलेलं घर एकूणच वातावरणात ऐट आणू शकतं.  
आपल्या अंतर्मनाला आश्वस्त करणारी संरचना साकारताना अनेक विषयांचा आपण अभ्यासपूर्वक विचार करणं गरजेचं असतं. आपण कितीही म्हटलं तरीही निसर्गापासून फार काळ दूर राहू शकत नाही. निसर्गाचं सौंदर्य आपल्या अंतर्मनाला सततच आनंद देत असतं. आपलं घर कुठेही असलं तरीही आपलं अंतर्मन नैसर्गिकरीत्या निसर्गाच्या जवळ जाऊ  पाहात असतं. निसर्गातलं जे जे काही आपण पाहतो ते ते आपल्याला भावणारं असतं. विशेषत: निसर्गातल्या रंगांनी एक प्रकारे आपल्यावर जादूच केलेली असते. याचा विचार करून आपल्या घराच्या अंतर्गत सजावटीसाठी हरित आणि नैसर्गिक संरचना साकारणंदेखील सुखद अनुभव देणारं असतं.
अनेकदा गृहसजावट करताना केवळ खूप फर्निचर, अनेकविध रंगांचा वापर, भरपूर मोठी झगमगाट करणारी प्रकाशयोजना, नवनवीन सजावटीच्या किमती वस्तू यांचा वापर केला म्हणजे सुंदर गृहसजावट केली असं नाही. आत्मिक आनंद देऊ  शकणारं केलेलं कामच आपण प्राधान्यक्रमानं स्वीकारलं पाहिजे. त्यासाठी कोणत्या प्रकारे ते केलं आहे त्यापेक्षाही कसं केलं आहे याला अधिक महत्त्व असतं. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून संरचनेला महत्त्व देऊन केलेली गृहसजावटच केवळ घरासाठी लागलेली प्रत्येकाची घरघर संपवू शकते.        
शैलेश कुलकर्णी -sfoursolutions1985@gmail.com  
इंटिरीअर डिझायनर