|| तन्मयी तुळशीदास बेहेरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकणात शेतातले पहिले पीक घरी येते तेच तोरणामध्ये लावण्याची प्रथा आहे. आम्हीही काकाच्या शेतातले नुकतेच आलेले भात आमच्या तोरणात लावले. पावसाळा संपून हिरवाईने नटलेला फळा फुलांनी बहरून गेलेल्या निसर्गाने आपल्या सहस्रा हातांनी झेंडू, शेवंती, जास्वंद जणू आम्हाला बहाल केले. नकळत महानोरांच्या ‘या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतूनी चैतन्य ल्यावे’ या ओळी ओठांवर आल्या. बाबांच्या लाडक्या पायरी आंब्याचे टहाळेसुद्धा दाराला लावले. या दसऱ्याला सगळ घरंच आपलं होत. एकमेकांची मस्करी करत, चहाचे कप रिचवत, रात्र जागवत लांबच लांब तोरण आम्ही तयार केले. ते तोरण दाराला घराला लावले, रांगोळ्या काढल्या, फुलांची सजावट केली. आमचे घर आता प्रसन्न वाटू लागले, जणू आनंदाने हसू लागले.          

तसं सणांमध्ये गणेशोत्सव आणि दिवाळीचा रुबाबच वेगळा, पण दसरा एकच दिवस- कधी येतो आणि कधी जातो समजतच नाही. म्हणजे मोठ्या सुट्ट्या नाहीत, फराळ  नाही की नातेवाईकांकडे जाणंयेणंही नाही. आधीचे नऊ दिवस गरब्याचे गेलेले असतात त्यातच येऊ घातलेल्या किंवा आलेल्या सहामाही परीक्षा वीट आणतात. म्हणून का कुणास ठाऊक, पण मला तर लहानपणापासून ते इंजिनीयरिंगच्या परीक्षेपर्यंत दसऱ्याच्या, श्रीखंडपुरी खाऊन पेंगुळल्या डोळ्यांनी पुस्तक उघडलेल्याच्या आठवणीच जास्त आहेत. तरी या वर्षीचा दसरा वेगळा होता. कधी नव्हे ती जोडून सुट्टी आल्यामुळे या वर्षी आम्ही भावंडांनी एकत्र गावाला जाऊन मूळ घरात दसरा साजरा करायचं ठरवलं.

गावातलं घर, तिथलं ते तुळशीवृंदावन, सारवलेलं अंगण, लाकडाचा झोपाळा, कौलारू माडी, मागच्या पडवीतून अंगणातील विहीर आणि या वास्तूला जोडून आलेल्या असंख्य आठवणी. लहानपणीच्या, आजी-आजोबांच्या, भावंडांच्या प्रत्येकाच्या आपापल्या आठवणी. आपल्या मूळ गावची पाळंमुळं घट्ट धरून ठेवणाऱ्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात आमच्या ‘वरद’ या घराच्यासुद्धा अनेक आठवणींनी माझ्या मनात घर केलं आहे. आंब्या-फणसावर ताव मारल्याच्या, आजोबांच्या मांडीवर बसून मालवणी गोष्टी ऐकण्याच्या, आजीच्या हातची माशाची कढी आणि आंबोळ्या खाल्ल्याच्या, मे महिन्यात लाइट गेल्यावर काजव्यांचे लक्ष लक्ष दिवे पाहिल्याच्या, दुपारी परसात बसल्यावर पिवळाधम्मक नागोबा आणि मुंगुसाची लढाई बघताना घाबरल्याच्या, नारळाच्या झाडाला दृष्ट लागू नये म्हणून आजोबा त्याला चप्पल बांधायचे त्याच्या! उन्हाळ्यात सगळे दिवस जांभळे केलेल्या जांभळाच्या झाडाच्या, गुलाबी थंडीत पहाटे पहाटे दिसलेल्या मोराच्या आणि बाबांच्या वाढदिवशी दशावताराचे प्रयोग घराच्या अंगणात केला तेव्हा गाव लोटलं होतं तेव्हाच्या अशा किती तरी आठवणी…

मला  हे जाणवलं  की, आपण आत कुठे तरी फक्त या वास्तूमुळे जोडले गेलो आहोत आपल्या गावाशी आणि त्यामुळे एकमेकांशी… आपल्याकडे स्वत:चा असा वारसा आहे, स्वत:ची अशी संस्कृती आहे, इतिहास आहे, हे जोडलेपण  या वास्तूने, या घराने दिलं. एक समृद्ध बालपण दिलं, आपली माणसं दिली, मातीची ओढ दिली, आपल्या कुटुंबासोबत निवांत क्षणही दिले. अर्थात प्रत्येकाचे आठवणींचे संदर्भ वेगळे असले तरी जिव्हाळा तोच असतो, त्यामुळे ओढही तीच. जशी दिवाळी, जसा गुढीपाडवा तसंच दसऱ्याच्या निमित्ताने ही एक संधीच आपल्याला मिळते का हो आपल्या घराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची.

भिंतीवर जमा झालेली कोळिष्टके काढताना आई-बाबांचा घराची रचना पारंपरिक ठेवण्याचा आग्रह आठवला. त्यांनी इथेच तयार होणारे जांभे दगड घराच्या भिंती बांधण्यासाठी वापरले. आता घरात राहताना जांभ्या दगडांचा गारवा चित्त आणि गात्रं शांत करत होता. परसदारातल्या सागवानाचे घरासाठी केलेले वासे साफ करताना त्यांच्या मजबुतीचा अंदाज येत होता. फरशी पुसताना पायाभरणीचा छोटेखानी समारंभ आठवला. चूल सारवताना आजीचे भाकऱ्या थापतानाचे हात आठवले. या चुलीत काजू भाजले जायचे, सुके बांगडे भाजल्याचा असा काही घमघमाट सुटायचा, की जीव नुसता वेडापिसा होऊन जायचा. जुना लाकडी झोपाळा अजूनही आजोबांच्या नामस्मरणाच्या तालात झुलतोय अस वाटू लागलं आणि घरासोबतची जिव्हाळ्याची वीण अजून अजून घट्ट होत गेली.

कोकणात शेतातले पहिले पीक घरी येते तेच तोरणामध्ये लावण्याची प्रथा आहे. आम्हीही काकाच्या शेतातले नुकतेच आलेले भात आमच्या तोरणात लावले. पावसाळा संपून हिरवाईने नटलेला फळा फुलांनी बहरून गेलेल्या निसर्गाने आपल्या सहस्रा हातांनी झेंडू, शेवंती, जास्वंद जणू आम्हाला बहाल केले. नकळत महानोरांच्या ‘या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतूनी चैतन्य ल्यावे’ या ओळी ओठांवर आल्या. बाबांच्या लाडक्या पायरी आंब्याचे टहाळेसुद्धा दाराला लावले. या दसऱ्याला सगळ घरंच आपलं होत. एकमेकांची मस्करी करत, चहाचे कप रिचवत, रात्र जागवत लांबच लांब तोरण आम्ही तयार केले. ते तोरण दाराला घराला लावले, रांगोळ्या काढल्या, फुलांची सजावट केली. आमचे घर आता प्रसन्न वाटू लागले, जणू आनंदाने हसू लागले.

पहाटे सरस्वती पूजनासाठी पाटीवर एक अंकाची सुबक सरस्वती काढली. तिच्यासमोर बाबांच्या नाटकाच्या संहिता, त्यांची पुस्तके पंक्तीत रचली आणि अभिमानाने आमचा ऊर भरून आला.

इंजिनीअरिंगला असताना दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे खांडवनवमीला वर्कशॉपमध्ये अवजारांचे पूजन आम्ही करायचो, कारण अर्जुनाने अज्ञातवास संपल्यावर शमीच्या वृक्षावर लपवून ठेवलेल्या शस्त्रांचे पूजन दसऱ्याच्या दिवशी केले. म्हणूनच इथे आजोबांनी धरलेला नांगर पूजेला होता. कोणे एके काळी हा नांगर त्यांच्या लाडक्या मोतिया बैलाला जुंपला होता. त्या मोतिया बैलाबद्दलचे कृतार्थ भावही त्या वेळी दाटून आले. सोबत कृषी संस्कृतीशी जोडलेली नाळ परत एकदा आम्हाला जाणवली.

शेतात पहिल्या पिकलेल्या भाताची खीर नैवेद्याला ठेवून वास्तुदेवतेला गाºहाण घातलं. ‘बा देवा म्हाराजा, आमची सेवा चाकरी गोड मानून घे रे महाराजाऽऽऽ सर्वांचं भलं कर, कल्याण कर आणि यश दे रे म्हाराजाऽऽऽ’ अशी आरोळी फोडली आणि डोळे मिटले तेव्हा जणू सगळे पूर्वज डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत आहेत असा भास झाला.

संध्याकाळी देवळात आपट्याची पानं देऊन सोने लुटायचा कार्यक्रम झाला. अख्खे गाव गोळा झाले. जुन्या ओळखीचे गावकरी भेटले, नवीन ओळखी झाल्या. मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन गावच्या नदीवर एक फेरफटका मारून आलो. दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. दसऱ्याच्या दिवशी कोणतीही गोष्ट केल्याने समृद्धी येते म्हणतात. दसऱ्याच्या निमित्ताने या वर्षी आम्ही प्रेमाने आणि आनंदाने समृद्ध झालो.

हे  साध्या पद्धतीने स्वत:च्या बागेतल्या फुलापानांनी साजरे केलेले दसऱ्याचे सीमोल्लंघन कायम आठवणीत राहील. इथे शहराप्रमाणे झगमगाट नाही. सोन्याची, वाहनांची खरेदी नाही. इथे फक्त होते घर… मायेची पाखर घालणारे… सतत आमची वाट पाहत असलेले. परत कधी येणार विचारणारे…

परतायची वेळ जवळ आली. जड अंत:करणाने वाट पाहणारे घर मागे ठेवून  आठवणींची पुंजी घेऊन आम्ही निघालो… पुन्हा परतण्यासाठी!

tanmayibehere@gmail.com

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First crop in the field in konkan ganeshotsav and diwali are the only festivals akp
First published on: 14-10-2021 at 02:17 IST