फोल्डिंग खुर्ची

एके काळी नव्वद टक्के  लोक सिंगल रूम, डबल रूममध्ये आपला संसार थाटून राहत.

|| मोहन गद्रे

एके काळी नव्वद टक्के  लोक सिंगल रूम, डबल रूममध्ये आपला संसार थाटून राहत. त्यांच्याठी फोल्डिंगचं फर्निचर म्हणजे मोठं वरदानच असायचं. कुठलीही वस्तू फोल्डिंग असल्यास त्याला अधिक पसंती. एक खोली नेहमीच हॉल कम डायनिंग कम बेडरूम अशी वेळेनुसार बदलत जात असे. त्यामुळे फोल्डिंग खुर्ची बहुतेक प्रत्येक घरात आपलं स्थान राखून असायची. दोन लाकडी फोल्डिंग खुर्च्या, कपाट आणि भिंतीच्या मध्ये फटीत सारल्या किंवा अन्य कुठे फटीत सारल्या की जागा अगदी ऐसपैस मोकळी व्हायची.

एके काळी भारतातील कोणाच्या तरी  मालकीच्या असलेल्या, परंतु सध्या परदेशातील रेस्टॉरंटबाहेर मांडून ठेवलेल्या एका लोखंडी खुर्चीचा फोटो समाजमाध्यमातून प्रसिद्ध होताच, भारतामध्ये तो मोठा चर्चेचा विषय ठरला. त्या खुर्चीवरून बरीच चर्चा रंगली; पण  मला आठवण झाली अशा धातूच्या फोल्डिंग खुर्चीच्याही अगोदर आणि नंतर लोखंडी बरोबरच एके काळी  सर्वत्र वापरात असलेल्या, पण आता एक अ‍ॅन्टिक वस्तू अशी शोभू शकेल अशा लाकडाच्या फोल्डिंग खुर्चीची.

एके काळी नव्वद टक्के  लोक सिंगल रूम, डबल रूममध्ये आपला संसार थाटून राहत. त्यांच्याठी फोल्डिंगचं फर्निचर म्हणजे मोठं वरदानच असायचं. कुठलीही वस्तू फोल्डिंग असल्यास त्याला अधिक पसंती. एक खोली नेहमीच हॉल कम डायनिंग कम बेडरूम अशी वेळेनुसार बदलत जात असे. त्यामुळे फोल्डिंग खुर्ची बहुतेक प्रत्येक घरात आपलं स्थान राखून असायची. दोन लाकडी फोल्डिंग खुर्च्या, कपाट आणि भिंतीच्या मध्ये फटीत सारल्या किंवा अन्य कुठे फटीत सारल्या की जागा अगदी ऐसपैस मोकळी व्हायची. वजनाला हलक्या, पण मजबूत लाकडापासून बनवलेल्या या खुच्र्यांची बैठक पुढच्या बाजूला थोडीशी रुंद आणि गोलसर वळणाची आणि मागच्या बाजूला थोडी निमुळती होत गेलेली, बसल्यावर पाठ टेकायला मागे साधारण नऊ इंच रुंदीची किंचित खोलगट लाकडी आडवी पट्टी आणि खुर्चीला पिवळट चॉकलेट रंगाचं पॉलिश. तिच्या पाठपट्टीवर मधोमध ती बनविणाऱ्या कंपनीचं नाव छापलेलं असायचं. अशा खुच्र्यांसाठी रेक्स कंपनी नावाजलेली होती. एखाद्या हॉलमध्ये गेले की, अशा असंख्य फोल्डिंग खुर्च्या एखाद्या भिंतीशी आडव्या घालून त्याच्या उंच थप्प्या मारून ठेवलेल्या पाहायला मिळायच्या. त्या हॉलमध्ये मांडताना आणि काम झाल्यावर उचलताना, फाट्फाट् असा आवाज हॉलभर घुमायचा. या लाकडी खुच्र्यांवर बसलेल्या प्रतिष्ठित पाहुणेमंडळींच्या भारी नसण्याना या खुच्र्यांच्या बैठकीतील खिळ्यांनी आपला प्रसाद दिलेला आहे.

भरजरी शालू, काठी धोतर, नाही तर गॅबरडीनची पॅन्ट असो, सगळ्यांना तिने आपला प्रसाद दिलेला आहे. त्यात आपपरभाव नाही. लाकूड जसजसं महाग आणि दुर्मीळ होऊ लागलं तसं लोखंड आणि प्लॅस्टिकने त्याची जागा घेतली. रेक्स कंपनीच्या लाकडी फोल्डिंग खुच्र्यांच्या जागी रॉयल कंपनीच्या

लोखंडी फोल्डिंग खुर्च्या दिसू लागल्या आणि त्याही बाद होऊन एकात एक बसणाऱ्या रंगीत प्लॅस्टिक खुच्र्यांची चलती सुरू झाली.

काय सांगावं, उद्या परदेशातील एखाद्या रेस्टॉरंटमध्ये भारतीय बनावटीच्या अशा लाकडी फोल्डिंग खुर्चीवर बसून परदेशी माणूस बीअरचे घुटके घेतोय असे चित्रही दिसू शकेल! पाठीवर अंधूक अक्षर कुठल्या तरी संस्थेची किंवा मंडपवाल्याची असतील!  तशी शोधक नजर ठेवली पाहिजे.

gadrekaka@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Folding chair folding furniture akp

ताज्या बातम्या