काही दिवसांतच घरोघरी लाडक्या गणेशाचे आगमन होणार आहे. त्यामुळे पुढचे दहा दिवस आरत्या आणि झांजाच्या नादात दुमदुमणार आहेत. आरती नंतर दिला जाणारा प्रसाद, घराची साफ-सफाई या सर्व गोष्टींचे तुमचे नियोजनदेखील झाले असेल. पण मुख्य अडचण असते ती गणपती भोवतीच्या सजावटीची. ही आरास साधीच ठेवायची की अधिक उठावदार करायची की सात्विक टच तिला दयायचा, असे अनेक प्रश्न निर्माण होत असतात. आणि ती ती घरे आपापल्या वृत्तीनुसार पर्याय शोधत असतात. थर्माकोलवर बंदी आणल्यापासून घरोघरीदेखील पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करून किंवा इकोफ्रेंडली घटकांचा अवलंब करून सजावट केली जाते. शिवाय या सजावटीसाठी मुबलक पर्याय बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

यात अलीकडचा लोकप्रिय प्रकार म्हणजे छोट्या आकारापासून ते मोठ्या आकारातील गोलाकार गालीचे. यात लोकर, व्हेलवेट, जरीची किनार असलेले चमचमणारे असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे गालीचे मूर्तीखाली आणि मूर्तीच्या समोरदेखील छान दिसतात. यात बशी किंवा त्यापेक्षा थोडे मोठ्या आकारातील गालीचे समईखाली ठेवल्यास सजावट आणखी आकर्षक दिसते. शिवाय ते भरगच्च स्वरूपाचे असल्यामुळे वेगळी रांगोळी काढायचीदेखील गरज राहत नाही.

बऱ्याच घरांमध्ये मूर्तीची स्थापना ही चौरंगावर किंवा काहीशा उंचीवर असलेले आसन हे ठरलेले असते. त्यामुळे मूर्तीच्या सभोवताली आरास करावी लागते. अशावेळी घरात खास जपून ठेवलेली तांब्या-पितळेची भांडी किंवा चांदीची वाट्या-भांडी बाहेर काढली जातात. या वाट्यांमध्ये पाणी भरून त्यावर शेवंती-अष्टरची विविध रंगातील फुले ठेवून त्यामध्ये पणत्या ठेवल्यास आणि त्या अध्ये-मध्ये उदबत्ती व धूप पेटवून ठेवल्यास खूप सात्विक असा लुक मिळतो. आणि अशा वातावरणात जेव्हा हात जोडून गणरायाला नमस्कार करतो, तेव्हा नमस्कार करणाऱ्याला एक वेगळीच शांती आणि समाधान लाभते.

तर काहींना आपले आराध्य आणि गणेशाची एकत्र सांगड घालायची असते. जसे श्री स्वामी समर्थांची, विठ्ठलाची, दत्तगुरूंची, ज्ञानेश्वरांची प्रतिमा आणि त्या बाजूला त्यांचे एखादे घोष वाक्य ‘भिऊ नकोस…’ किंवा एखादा अभंग अथवा वक्रतुंडासारखा श्लोक रेखीवपणे चित्तारलेला असतो. हे असे पडदे मूर्तीच्या मागच्या बाजूस लावता येतात. सजावटीमध्ये हे पडदे उठून दिसतात, कारण त्या पडद्यांवर गडद आणि फिकट रंगसंगतीचा नेमका वापर केला असतो. अगदीच उदाहरण द्यायचे झाले तर काळ्या रंगावर पिवळ्या रंगातील विठ्ठलाची प्रतिमा रेखाटलेली असते किंवा याउलट ही असू शकते.

प्रत्यक्ष मूर्तीभोवती आरास न करता मागच्या बाजूस सजावट करणे, हा ट्रेण्ड गेल्या काही वर्षांत प्रचंड लोकप्रिय झाला आहे. यासाठी घरात असणाऱ्या ठेवणीतल्या ओढण्या किंवा जरीच्या अथवा पार्टी वेअर किंवा पारंपरिक काठ पदराच्या साड्यांचा वापर करता येऊ शकतो. आपल्या आवडीनुसार साडीची निवड करून त्यावर केळीची पाने-पिनांनी अडकवून अथवा फुलांच्या माळा, मग त्या खऱ्या फुलांच्या असो वा कृत्रिम. या माळा सोडल्यास आणि त्याभोवती लायटिंग केल्यास एक वेगळीच परिणामकारकता साधता येते.

या व्यतिरिक्त दोन किंवा तीन साडीच्या अथवा ओढणीच्या निऱ्या करून आकर्षक संगती साधत त्यापासून पडदे तयार करून देखील सजावट करता येते. अलीकडे बाजारात झालर असलेले पडदेदेखील सजावटीसाठी उपलब्ध असतात. याच जोडीला सध्या सजावटीसाठी लोकप्रिय असणारा प्रकार म्हणजे मोठ्या ‘लटकन माळा’. वेगवेगळ्या आकारातील आणि रंगातील फुले-पाने, अष्टविनायकाच्या प्रतिमा, दीपमाला, छोट्या छोट्या घंटा आणि त्यामध्ये बसविलेले छोटे घुंगरू असे तऱ्हेतऱ्हेचे प्रकार यामध्ये पाहायला मिळतात. अर्थात हे लटकन फक्त मागचीच नाही, तर सभोवतालची जागा सुशोभित करण्याच्या दृष्टीनेदेखील उपयोगी पडतात.

सजावटीसाठी बाजारात विविध रेडीमेड पर्याय उपलब्ध असले तरीही झेंडूची फुले आजही तितकीच भाव खाऊन आहेत. पिवळ्या आणि भगव्या रंगात मिळणारी ही फुले त्यांच्यात असलेल्या भरगच्चपणामुळे, थोड्याशा फुलांतदेखील आकर्षक सजावट करता येते. शिवाय ऐन सणासुदीच्या काळात यांचे भावदेखील फारसे गगनाला भिडत नाही. आणि चार-पाच दिवस सहज टवटवीत राहतात. अशी ही फुले अथवा त्यांच्या पाकळ्या वापरून रांगोळी किंवा सभोवतालीदेखील सजावट करता येते. सजावट कोणतीही असो ती खऱ्या अर्थाने आकर्षक ठरते, ती सभोवताली केलेल्या लायटिंगमुळे. आजकाल आकर्षक रंग-संगतीच्या लायटिंग बरोबर फोकस मारणारे दिवे विशेष लोकप्रिय ठरत आहे. कारण मूर्तीच्या सभोवताली फारशी सजावट नसली, तरीही थेट मूर्तीच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या फोकसमुळे ती मूर्ती उठून दिसते.

झगमगाट आणि दिखावा हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना जरी प्रिय असला, तरी घरोघरी विराजमान होणााऱ्या गणपतीची स्थापना आजही तितक्याच परंपरागत स्वरुपात होत असते. सजावटीसाठी आधुनिक पर्यायांचा जरी वापर होत असला तरीही या सणाचे मांगल्य जपताना त्यामधल्या सत्विकतेला प्राधान्य दिले जात आहे, हेही नसे थोडके.