मेघना जोशी

घराच्या कोपऱ्यात निजलेल्या म्हातारीच्या मनात आनंदाचे तरंग उमटतात, तिचे डोळे उत्साहानं लुकलुकतात. त्याच उत्साहाचं आणि  चैतन्याचं वहन माझ्या खोल्याखोल्यांमध्ये होतं. माझ्या मनात नकळत निर्माण झालेल्या चिंतेची पानगळ होऊन तिला शाश्वत सकारात्मकतेचे नवीन धुमारे फुटण्याचा तोच हा दिवस.

the rise of smart homes modern apartments in pune
ग्राहकांच्या पसंतीचे स्मार्ट पुणे
redevelopment process of housing societies
विचारपूर्वक पुनर्विकास
what made us happy in 2024 Review of 2024 Year year 2024 year ender 2024
सरणारे वर्ष मी…
balcony for relaxing place near the balcony flats with balcony
बाल्कनीजवळची जागा…
importance of Public notice given in the newspaper
वृत्तपत्रात दिलेली जाहीर नोटीस आणि तिचे महत्त्व
Fire Safety Responsibility Kalyan West Vortex Fire
आपल्या अग्निसुरक्षेची जबाबदारी आपलीच!
House Prices Indian Real Estate Property
घरांच्या किमती वाढतायत…
impact of redevelopment on surrounding area
एकाचा पुनर्विकास दुसऱ्याला त्रास..
home decoration on diwali diwali decoration ideas diwali decoration ideas for home
घर सजवण्याची वेळ झाली…

‘‘घरी मिटल्या वेलींवरील कळय़ा।

  फुलांच्या झडल्या पाकळय़ा।

  उपविनचा गेला बहर सर्व ओसरुनी। कोषांतच पडली फूलपांखरे सर्व मरुनी॥’’  कवी अनिलांनी केलेलं शिशिराचं हे वर्णन थोडय़ा फार प्रमाणात सगळीकडे आढळतं. आमच्या कोकणात कोणताच ऋतू एवढा टोकाचा नसतो, त्यामुळे ‘सृष्टीवरी अवकळा’ अगदी टोकाची जाणवत नाही आम्हाला. पण माझ्यात वास करणाऱ्या सजीवांच्या वागण्यात शिशिरातली थोडीशी अवकळा, उत्साहातली थोडीशी घट, मनात थोडीथोडी दाटणारी नकारात्मकता जाणवतेच मला. मला जशा स्वत:च्या भावना असतात तशा भावना समजून घेण्याचीही ताकद माझ्यात आहेच. म्हणून हार किंवा जीत काहीही होऊ  दे कोणालाही पहिली आठवण येते ती माझीच.

 अरे.. तुम्हाला काही संदर्भ लागत नाहीय का? कसा लागणार? माझी ओळख करून द्यायचीच राहिली बघा. मी आहे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील एका खेडय़ातील टुमदार वास्तू. तुम्हाला हे माहीत आहे का काही कल्पना नाही मला, पण प्रत्येक ऋतूचे चटके म्हणा किंवा प्रसन्नता म्हणा मला जाणवत असतेच. ग्रीष्माचा चटका मला लागतो तसाच वर्षेची झड सहन करावीच लागते. लपून राहताच येत नाही कोठे. नाही.. नाही.. तक्रार नाहीय ही माझी. उलट प्रत्येक ऋतूमधील हे अनुभव माझं वास्तूतून मठीत परिवर्तन करत असतं. ‘जगभ्रमंती करून आलेलं माझं कुणी लेकरू सहज म्हणून जातं, जगात केवढय़ाही सोयी असूदेत स्वत:च्या मठीएवढं सुख कुठेही नाही.’ या एका वाक्यानं मला माझ्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. आजकाल शहराकडे धाव घेणारा तरुण आणि गावागावातील माझ्यासारख्या मठींमधील चंदेरी केसांची तरुणाई पाहून माझ्या मनालाही कधीतरी शिशिर छळतो. ‘झाडांची गळली पात, लता भयभीत, कंठातच  थिजले कोकिळमिनचे गीत।’ अशी कवी अनिलांनी वरील कवितेत वर्णन केल्याप्रमाणे माझीही काही काळ अवस्था होते, पण चैत्राची चाहूल लागते आणि निरुत्साहाची ही पानगळ थांबतेच. लेकी-सुना पाडव्यासाठी गावात येतात. भाद्रपदात घरोघरी साजऱ्या होणाऱ्या गणपती उत्सवाची नांदी पाडव्याच्या दिवशी गुढीपूजनाने केली जाते, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सडा, सारवण, रांगोळय़ा, नैवेदद्ययाची तयारी यांची गजबज वाढते.

घराघरांत पाट मांडून त्यावर उंचच उंच चिवारीच्या काठीवर गुढी उभारली जाते. मी काही मान वर करून पाहू शकत नाही, पण त्या उंचीची जाणीव होतेच ना मला. त्या काठीसारखी माझीही मान ताठ होते आणि  गुढीवर डोलणाऱ्या हारातील चाफ्याच्या फुलाचं आणि आंब्याच्या डहाळीचं चैतन्य आणि मांगल्य माझ्याही मनात अलगद उतरतं. मालवणमधील दांडीसारख्या समुद्रकिनाऱ्यांवरच्या भागांत गुढीसाठी चिवारीची काठी आणणं हाही एक उत्सव असतो. समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या घरांमध्ये गुढीची काठी उभी राहण्यापूर्वी ती सागराच्या निळाईमध्ये न्हाऊन येते. समुद्रात नाहता नाहता मुलांना उंचीवरून विस्तीर्णता पाहण्याची संधी देते. काठीवर उंच जात मुलं धाडसाचा खेळ खेळतात त्यात निखळ स्पर्धा असतेच तशी भविष्यातील विस्तीर्ण अवकाशाची जाणीवही! सागरात सवंगडय़ानी काठी घट्ट रोवून धरली तरच उंचच उंच मजल मारता येते, ही एकजुटीची भावना नकळत समजते. तीच एकजूट तिची घसरण न होता म्हणजेच काठी  जमिनीवर न टेकता माझ्यापर्यंत आणली जाते. त्यावर नवीकोरी साडी दिवसभर डौलाने फडकत असते. त्यावरील चांदीच्या किंवा  तांब्याच्या गडूतून  सकारात्मकतेच्या किरणांचं प्ररावर्तन दिवसभर होत असतं. याच परावर्तित किरणांनी न्हायलेली गाठल्यांची माळ म्हणजे साखरेची माळ संध्याकाळी कुडुमकुडुम करून खाताना सकाळी खाल्लेल्या कडुलिंबाच्या पानांच्या चटणीचा कडवटपणा कधीच विसरला जातो. आणि नववर्षांच्या स्वागताला गोड वाणीने माझे सर्व सदस्य तयार होतात.

प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच. तसा म्हापण या गावी होणारी जत्रा हा गुढीपाडव्याच्या घरगुती रुपाला थोडासा अपवाद. यादिवशी म्हापण मध्ये माझ्या दारात गुढय़ा उभारल्या जातात. देवघरात नैवेद्याची ताटे सजतात, पण बरोबरच सातेरीच्या देवळामध्ये नवीन पिकलेल्या वायंगणी म्हणजे उन्हाळी भाताचा नैवेद्य शिजवून गावाच्या चारी वेशींवर पोहोचवला जातो. त्यानंतर घराघरांत पाडवा साजरा होतो. काय म्हणता, यात माझं म्हणजे घराचं महत्त्व कमी होतं असं वाटत नाही का मला. छे हो, अजिबात नाही; उलट गावातील घरांची एकी असेल तर सण उत्सवांना रंग चढतो. माझा कोपरा न् कोपरा उत्साहाने उजळून येतो. कोकणची स्वर्गीयता आणखी खुलून दिसते.

आजकाल जवळजवळ सर्वच ठिकाणी सायंकाळी नववर्ष शोभायात्रेचं आयोजन केलं जातं. त्यात पारंपरिक  पोषाखात नटलेल्या लेकी-सुना, लेक-जावई. फेटे, तलवारी, मशाली, ढोल, घोडे, उंट यांमुळे आपल्या संस्कृतीचं होणारं वहन पाहताना माझं मनही निवांत होतं. घराच्या कोपऱ्यात निजलेल्या म्हातारीच्या मनात आनंदाचे तरंग उमटतात, तिचे डोळे उत्साहानं लुकलुकतात. त्याच उत्साहाचं आणि  चैतन्याचं  वहन माझ्या खोल्याखोल्यांमध्ये होतं. माझ्या मनात नकळत निर्माण झालेल्या चिंतेची पानगळ होऊन तिला शाश्वत सकारात्मकतेचे नवीन धुमारे फुटण्याचा तोच हा दिवस.

Story img Loader