- मंजू याज्ञिक
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा शुभारंभ मानला जाणारा सण असून, तो नव्या सुरुवातीचे, समृद्धीचे आणि सकारात्मक बदलांचे प्रतीक आहे. सांस्कृतिक महत्त्वाबरोबरच या सणाला रिअल इस्टेट क्षेत्रातही विशेष स्थान आहे, विशेषतः महाराष्ट्रात. विकासक, घरखरेदीदार आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी गुढीपाडवा हा अनेकदा गृहनिर्माण बाजाराला प्रोत्साहन देणारा ठरतो, जो पुढील काही महिन्यांतील मागणी आणि विक्री यात सकारात्मक भर घालतो.
भारतातील रिअल इस्टेट क्षेत्र हे सांस्कृतिक आणि भावनिक घटकांशी घट्ट जोडलेले आहे. सण-उत्सवांचा ग्राहकांच्या मनावर एक पारंपरिक पगडा आहे. गुढीपाडवा हा नव्या वर्षाचा प्रारंभ मानला जात असल्यामुळे घर खरेदीसारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा अत्यंत शुभ काळ मानला जातो. अनेक कुटुंबे या दिवशी मालमत्ता खरेदी पूर्ण करण्यास प्राधान्य देतात, कारण त्यामुळे समृद्धी, स्थैर्य आणि दीर्घकालीन सुरक्षितता लाभते, असा त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे या काळात चौकशी, साइट व्हिजिट्स आणि बुकिंग्समध्ये लक्षणीय वाढ दिसून येते.
गुढीपाडव्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तो आर्थिक वर्षाच्या सुरुवातीशी साधारणपणे जुळून येतो. या काळात लोक आपले गुंतवणूक निर्णय, बचत आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांचे पुनर्मूल्यांकन करतात. रिअल इस्टेट हे अजूनही भावनिक मूल्य आणि दीर्घकालीन परतावा देणारे एक महत्त्वाचे गुंतवणूक साधन मानले जाते. त्यामुळे शुभ मुहूर्त आणि आर्थिक नियोजन यांचा संगम अनेकांना त्यांच्या प्रलंबित निर्णयांना अंतिम रूप देण्यासाठी प्रोत्साहित करतो.
गुढीपाडवा सारख्या सणांच्या काळात ग्राहकांचा प्रतिसाद वाढतो, त्यामुळे विकासक विशेष योजना, सवलती, सायीस्कर हप्त पद्धत आणि इतर आकर्षक लाभ जाहीर करतात. या उपक्रमांमुळे नवीन ग्राहक आकर्षित होतात तसेच आधीपासून विचार करत असलेल्या ग्राहकांना निर्णय घेण्यास चालना मिळते.
या सणाशी संबंधित आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन प्रकल्पांचे उद्घाटन. अनेक विकासक गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन प्रकल्प जाहीर करतात किंवा नोंदणी सुरू करतात. सणासुदीच्या सकारात्मक वातावरणात ग्राहकांची वाढलेली रुची या प्रकल्पांना सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळवून देते. घरखरेदीदारांसाठीही हा काळ विविध पर्यायांचा शोध घेण्यासाठी अनुकूल असतो.
सणाचा आनंददायी माहोल स्वतःच बाजारपेठेला चालना देतो. या काळात कुटुंबांमध्ये गुंतवणूक, जीवनशैली सुधारणा आणि भविष्यातील नियोजन यावर चर्चा सुरू असते. स्थिर आणि सुरक्षित भविष्याची कल्पना करताना घर खरेदी ही एक महत्त्वाची गरज म्हणून समोर येते. त्यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढतो आणि मोठ्या गुंतवणुकीचे निर्णय घेण्यास ते प्रवृत्त होतात. मुंबई, ठाणे, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये गुढीपाडवा आणि रिअल इस्टेट बाजार यांचा संबंध विशेषतः ठळकपणे दिसून येतो. या काळात ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात चौकशी आणि नोंदणी होतात. परिणामी, बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
घरखरेदीदारांसाठी या काळात मालमत्ता खरेदी करणे केवळ परंपरेशी निगडीत नसून आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरते. सणासुदीच्या सवलती, सोयीस्कर हप्ते योजना आणि आकर्षक कर्ज सुविधा यामुळे खरेदी अधिक सोपी होते. अनेक बँका आणि वित्तीय संस्था या काळात विशेष कर्ज योजना देतात, ज्यामुळे गुंतवणुकीस पोषक वातावरण तयार होते. त्याचबरोबर, गुढीपाडवा हा संपूर्ण वर्षातील रिअल इस्टेट बाजाराच्या दिशेचा संकेत देणारा महत्त्वाचा टप्पा ठरतो. या काळातील चांगला प्रतिसाद विकासकांना नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आणि बांधकाम गती वाढवण्यासाठी प्रोत्साहित करतो.
अलीकडच्या काळात घरखरेदीदार अधिक सजग झाले आहेत. ते घराचे ठिकाण, कनेक्टिव्हिटी, सुविधा, विकासकाची विश्वासार्हता आणि दीर्घकालीन मूल्य यांचा सखोल विचार करून निर्णय घेतात. तरीसुद्धा, गुढीपाडव्यासारख्या सणांचा त्यांच्या मानसिकतेवर प्रभाव कायम आहे आणि अनेकदा हाच क्षण अंतिम निर्णय घेण्यास प्रवृत्त करतो. एकंदरीत, गुढीपाडवा हा केवळ नववर्षाचा प्रारंभ नसून परंपरा, आकांक्षा आणि संधी यांचा संगम आहे. रिअल इस्टेट क्षेत्रासाठी हा सण वर्षातील पहिली मोठी संधी असते, जो ग्राहकांची मानसिकता, विकासकांची धोरणे आणि बाजाराची गती निश्चित करतो.
(लेखिका नाहर ग्रुपच्या उपाध्यक्ष आणि NAREDCO, महाराष्ट्रच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.)
