- डॉ. योगिनी सातारकर- पांडे
‘वास्तू’ हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. आपण राहतो ती वास्तू म्हणजे आपल्या अस्तित्वाची जणू खूणच! आपला शारीर वावर त्या चार भिंतींत असतो हे खरंच… पण माणूस म्हणून त्याही पलीकडे आपल्याला भावनिक ओलावा आणि मानसिक सुरक्षितता देणारा आणि आपल्या माणसांची सोबत असणारा अधिवास म्हणजे वास्तू! आपण वागतो, बोलतो, विचार करतो त्या त्या गोष्टींना वास्तू बळ देते. ‘वास्तु तथास्तु म्हणते’, असं म्हटलं जातं आणि म्हणूनच ज्या वास्तूत आपण राहतो त्या वास्तूत प्रसन्न, आशादायी, ऊर्जादायी वाटावं; आणि निराशा, अकार्यक्षमता, साशंकता यांचं मळभ दूर व्हावं म्हणून मांगल्याचं प्रतीक असणारी गुढी परंपरेनुसार उभारली जाते. ही गुढी संपूर्ण घराला मांगल्य, चैतन्य प्रदान करते.
धार्मिक अर्थ असणारी पारंपरिक गुढी ही श्रद्धेची गोष्ट आहे. गुढी उभारली जाते त्यात पाटावर गुढी म्हणजे काठी, त्यावर साडी बांधून, कलश ठेवून कडुनिंबाचा डगळा, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्याला हळदीकुंकू वाहिले जाते. पाडव्यापासून सुरू होणारे नवे वर्ष वास्तूसाठी आणि घरातील सर्व लोकांसाठी भरभराटीचे असो, अशी प्रार्थना केली जाते. प्रथा, परंपरा, प्रतिमा, प्रतीके यांत पिढी दर पिढी भर पडत गेली आहे. आणि काळानुरू त्यात बदलही झालेले आहेत. समकाळात तर्काला महत्त्व देणार्या, टेक्नो सॅव्ही असणार्या आणि एआय वापरणार्या या जेन झीपासून ते त्याही पुढील अल्फा आणि बीटा जनरेशनसाठी वास्तू आणि गुढीचा अन्वयार्थ आपण लावला पाहिजे.
‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’च्या थियरीनुसार, जे आपलं मन आकर्षित करतं ते ते आपल्यापर्यंत येण्याचे मार्ग खुले होत जातात. निसर्ग म्हणा, आदिशक्ती म्हणा, देव म्हणा की सृष्टीचं हे चक्र… अव्याहतपणे किती एक हजार वर्षे चालवणारी अदृश्य शक्ती म्हणा… ती हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचविण्यात सहाय्यभूत होते. हे असं होत असावं यावर आपलाही कळत – नकळत विश्वास असतो की! त्यामुळेच प्रचंड वेग असणार्या या व्यामिश्र भवतालात हिंसा अनिश्चितता आणि एकाकीपणा वाढत असते.
संपर्काच्या बहुविध साधनांच्या उपलब्धतेत संप्रेषणाचा होत असणारा र्हास, मूल्यांची होणारी पडझड, बहुआवाजी कोलाहलात क्षीण होत चाललेला आतला आवाज, लोप पावत असणारी वाचन संस्कृती, समाजमाध्यमांवरून सतत होत असणारा माहितीचा प्रस्फोट… सत्य- असत्याची धूसर होत जाणारी सीमारेषा आणि अधिकाधिक व्यक्तीकेंद्री होत जाणारा काळ या पार्श्वभूमीवर जगण्याचा समतोल साधायचा असतो.
आपल्या आतल्या माणूसपणाला उजाळा देण्यासाठी कलशातील यशश्री, पुष्पहारातील मांगल्य, काठीचे सामर्थ्य, पाटाचे स्थैर्य, सुपारीचा संकल्प, कडुनिंबाचे आरोग्य, साडीचे वैभव आणि गाठीचे माधुर्य स्मरत पुस्तकांची, मूल्यांची, विवेकनिष्ठतेची, शांततेची… आणि विचारांची गुढी उभारणे म्हणजेच आपल्या वास्तूत एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून आणि समाजातील महत्त्वाचा घटक म्हणून आपले शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक अस्तित्व अधिक आशयसंपन्न करायचा असतो. त्यासाठी नवीन वर्षात सकारात्मकता आणि ऊर्जा अधोरेखित करणे म्हणजेच गुढी उभारण्याची प्रथाच तर आहे!
satarkarpandeyogini@gmail.com
