अंतर्गत संरचना आणि सजावट करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृतीची जपणूक केल्याचं बहुतेक वेळा दिसून येतं. पाश्चात्त्यांचं कितीही प्रमाणात अंधानुकरण केवळ अत्याधुनिकीकरणाच्या हेतूनं केलं गेलं तरीही भारतीय संस्कृतीचा विसर पडल्याचं जाणवत नाही. याचा प्रत्यय अनेक ठिकाणी आपल्याला ऐतिहासिक वास्तूंच्या रूपाने येत असतो.
हस्तकला ही त्यापैकीच एक. अनादी काळापासून या हस्तकलेच्या माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीचं एक प्रकारे जतनच करत आलो आहोत. अगदी हजारो वर्षांपूर्वी या हस्तकलेचं महत्त्व किती होतं याची साक्ष आजही मोठमोठय़ा पाषाणांवर केलेल्या शिल्पकलाकृती देत आहेत.
कोणतीही कला मग ती चित्रकला, नाटय़कला, नृत्यकला, शिल्पकला, हस्तकला असेल तरीही त्या कलेद्वारे एक प्रकारे आपण आपल्या मनातले विचार प्रकट करत असतो. आपलं अंतर्मन एका निराळ्या प्रकारे व्यक्तच होत असतं. तयार केल्या जाणाऱ्या अथवा साकारल्या जाणाऱ्या कलाकृतीतून विविध भाव प्रकट केले जात असतात. प्रत्येक कलेचा थेट संबंध आपल्या भावभावनांशी येत असतो. कलाकृती साकारणाऱ्या कलाकाराचं एक प्रकारे ते स्वागतच असतं आणि त्यामुळेच त्याचं सर्वत्र स्वागतच होतं.
प्रत्येक कलाकाराचं व्यक्ती म्हणून कलेच्या माध्यमातून व्यक्त होणं नेहमीच निराळं असतं. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती आणि अर्थातच तितक्या अभिव्यक्ती. केवळ याच कारणामुळे एका व्यक्तीच्या कलाविष्काराची तुलना दुसऱ्या कलाकाराशी होऊ शकत नाही. एका कलाकारानं साकारलेली कलाकृती तंतोतंत दुसरी व्यक्ती साकारू शकेलच, असं नाही. यातच प्रत्येक कलाकाराचं आणि त्याच्या सौंदर्यदृष्टीचं कसब दिसून येत असतं.
हस्तकला हेदेखील एक अशीच कला असल्याचं आपल्याला दिसून येतं. हस्तकलेच्या माध्यमातून बनवलेली एखदी कलाकृती पुन्हा हुबेहूब जशीच्या तशी त्याच कलाकाराच्या हातून साकारली जाईलच, असं खात्रीलायक म्हणता येणार नाही. एखादी मूर्ती, चित्रं, हस्तकलेतील लहान सहान अनेकविध वस्तू, या त्यामुळे प्रत्येक ठिकाणी निरनिराळ्या रूपात आपल्याला पाहायला मिळतात.
अंतर्गत संरचना आणि सजावट करताना अनेकदा एखाद्या ठिकाणी पाहिलेली आणि आपल्या मनात भरलेली एखादी हस्तकलेची वस्तू आपल्याला आपल्या घरासाठी मिळेल का, याचा शोध घ्यायचा आपण ठरवलं, तर बहुधा प्रयत्न निष्फळ ठरतील. कदाचित अशी एखादी वस्तू मिळेलदेखील. परंतु ती आपण बघितली तशीच, त्याच आकारात, त्याच रंगाची, त्यांच्या संरचनेतही तंतोतंत साम्य असणारी अशीच असेल असं नाही.
प्राचीन काळातल्या गुहांमधून साकारलेल्या पाषाणांमधून कोरीव काम करून साकारलेल्या अनेक प्रकारच्या शिल्पकलाकृती आजही भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवत आहेत. याचीच प्रेरणा घेऊन; परंतु अतिशय लहान आकाराच्या शिल्प कलाकृतींचा वापर अंतर्गत संरचना आणि सजावट करण्यासाठी उपयोगात आपण आणू शकतो.
भारतातच विविध प्रांतांमध्ये त्या निरनिराळ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने शिल्पकला, चित्रकला, मूर्तिकला, हस्तकला अशा अनेक कलाविष्कारांचं दर्शन आपल्याला घडतं. या बनवण्यासाठी अधिक तर निसर्गनिर्मित वस्तूंचा वापर केल्याचं दिसून येतं. अर्थात हल्ली बाजारात काही कृत्रिम वस्तूंच्या साहाय्याने बनवलेल्या वस्तूदेखील उपलब्ध आहेत.
अंतर्गत संरचना आणि सजावटीमध्ये हँडीक्राफ्टचं महत्त्वदेखील इतर सजावटीच्या वस्तूंइतकेच आहे. आपल्या कौटुंबिक गरजा जशा महत्त्वाच्या असतात तद्वतच काहीवेळा या हँडीक्राफ्ट वस्तू निवडणं उपयुक्त ठरतं. आपल्या घरात याद्वारे एक प्रकारे आपल्या संस्कृतीचं दर्शनच आपण घडवू शकतो. या वस्तूंची निवड करणं हे जेवढं महत्त्वाचं असतं तेवढंच या वस्तूंची एकूणच रचना, जागा, ठिकाण हेदेखील अभ्यासपूर्वक करणं गरजेचं असतं.
गृहसजावटीच्या कामात अगदी मुख्य प्रवेशद्वारापासून घरात इतरत्र अनेक ठिकाणी निरनिराळ्या अशा स्वरूपातल्या विविध हस्तकलाकृतींचा वापर करून अंतर्गत संरचना आणि सजावट करता येऊ शकते. काहीवेळा काही ठिकाणी अर्धाकृती तर काही पूर्णाकृतीची निवड आणि मांडणी करता येते. यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू, लाकूड निरनिराळ्या धातूंच्या वापरातून बनवलेल्या, निरनिराळ्या दगडांचा वापर करून साकारलेल्या, अगदी काही तर टाकाऊमधून टिकाऊ स्वरूपाच्या वस्तूंचा अंतर्भाव असतो.
आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर निरनिराळ्या धातूंपासून साकारलेल्या या हँडीक्राफ्टच्या वस्तू आपण लावू शकतो. अथवा याच प्रवेशद्वाराशेजारील एखाद्या भिंतीवरदेखील अर्धाकृती अथवा पूर्णाकृती असलेल्या तसेच पाठीकडची बाजू सपाट असलेल्या मूर्ती अथवा इतरही काही कलाकृती बसवून घेऊ शकतो. घरात प्रवेश करताक्षणी नजरेस वेधक ठरणाऱ्या भिंतीवरदेखील अशाच प्रकारे या हँडीक्राफ्टचा वापर करून सजावट करता येऊ शकते. विशेषत: बैठकीच्या खोलीत रिकामे राहणारे काही कोपरे अथवा काही जागा यांचा कल्पकतेनं वापर करून भरून काढता येतात. काही वेळा बैठकीच्या खोलीत बनवलं गेलेलं एखादं फर्निचर केवळ निरनिराळ्या आकारमानातल्या आणि विविध प्रकारच्या हस्तकलाकृतींची मांडणी करण्यासाठीच असेल तर ते एकूणच त्या बैठकीच्या खोलीच्या सौंदर्यात भर पाडू शकतं. अर्थातच दर्शनी भागात अशा प्रकारच्या संरचनेमुळे त्या घरातल्या व्यक्तींच्या एकूणच सौंदर्यदृष्टीची ओळख घरी येणाऱ्यांना होऊ शकते. या व्यतिरिक्त शयनगृह हेदेखील एक असं दालन आहे की ज्या ठिकाणी हँडीक्राफ्टचा वापर करून अत्यंत निराळ्या प्रकारची वातावरण निर्मिती करता येऊ शकते.
या हस्तकलाकृतींमध्ये इतके असंख्य प्रकार उपलब्ध असतात की, ज्यामुळे आपल्याला संभ्रम निर्माण होतो. विशेषत: मूर्तीरूपात जे काही उपलब्ध असतं त्यापैकी आपण नेमकी निवड कशाची करायची हेच काहीवेळा उमगत नाही. सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, मानसिक आणि आर्थिक पातळीवर आपल्या मनाला जे पटण्यासारखं तसेच परवडण्यासारखं आहे तेच निवडावं. संस्कृतीचं दर्शन होईल, धार्मिक भावना जपल्या जातील, सामाजकि परिवर्तन घडू शकेल, मानसिक उन्नती होणार असेल आणि आर्थिक ताण जाणवणार नसेल असंच काहीसं निवडावं.
हल्ली बाजारात सर्वत्र पाहायला मिळणाऱ्या हँडीक्राफ्ट वस्तूंमध्ये, प्लास्टर ऑफ पॅरीस, लाकूड, दगड आणि निरनिराळे धातू यांचा वापर अधिक प्रकारे आणि मोठय़ा प्रमाणात केला जात असल्याचे दिसून येतं. यामध्ये काही प्रमाणात कापड आणि काचेचा वापर करून बनवलेल्या हँडीक्राफ्ट वस्तू आढळतात.
अंतर्गत संरचना आणि सजावट म्हटलं की विविध प्रकारच्या वस्तूंची निवड करावी लागते. या निवड प्रक्रियेत प्रत्येक वस्तूच्या रंगात, प्रकारात, आकारात, संरचनेत, वस्तूंच्या बाह्य़ स्वरूपात परस्परांमध्ये किती अशा कशाप्रकारे साधम्र्य आहे हे पाहणं अनिवार्य असतं. प्रत्येक दोन वस्तूंचा परस्परांशी असणारा नातेसंबंध महत्त्वाचा असतो, नव्हे तर तो निर्माण करायचा असतो. अनेकदा हे नातेसंबंध निर्माण करण्याचं काम या हँडीक्राफ्टच्या साहाय्यानं करता येऊ शकतं. याच्या निवडीतून आणि कल्पकतेनं केलेल्या मांडणीमुळे एका निराळ्या प्रकाराच्या वातावरणाची निर्मिती करता येऊ शकते.
या हँडीक्राफ्टमध्ये पक्षी, प्राणी, काही ऐतिहासिक वैशिष्टय़पूर्ण वस्तू, विविध वयोगटातल्या निरनिराळ्या जाती-पंथातल्या व्यक्ती, लहान मूल त्याच्या आईसोबत, शेतात काम करणारा शेतकरी,
झोपडीबाहेर बांधलेली गाय, मोळी विकणारा, लाकूडतोडय़ा, बैलगाडी, विहिरीवरची मोट, शाळेत जाणारा विद्यार्थी, खेडूत स्त्री, राजकीय नेता, स्वातंत्र्य चळवळीतल्या अनेक व्यक्ती, संत- महात्मे, सैनिक,  नर्तिका, नाच करणारं जोडपं, प्रेमीयुगुल, पुराणपुरुष अशा अनेकविध कलाकृतींचं दर्शन आपण बाजारात फेरफटका मारला तर होत असतं. यामध्ये आपल्याला काय सुचतं, रूचतं आणि पचतं, परवडतं याचा विचार करून आपण निवड करावी. या बाबतीत ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं असंच धोरण अंगीकारलं जातं आणि काही अंशी ते योग्यही आहे.
या हँडीक्राफ्टमध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक लहान लहान वस्तू आपल्या गृहसजावटीच्या कामात मोलाची भूमिका बजावू शकतात. हे समजून घेणं आवश्यक आहे. गृहसजावटीसाठी केवळ वारेमाप खर्च करून महागडय़ा वस्तूंचा वापर मोठय़ा प्रमाणात केला तरच ते काम चांगलं झाल्याचं समजलं जातं असं अजिबात नाही. हँडीक्राफ्टसारख्या लहान लहान वस्तूदेखील आपल्या घरात एकूणच सौंदर्याचा साक्षात्कार घडवू शकतात.
आपल्या गृहसजावटीविषयी विचार करत असताना आपण विशेष जागरू असतो. निवड केलेल्या वस्तूंच्या टिकाऊपणाबद्दल आणि अर्थातच निवडलेली वस्तू अधिक काळ टिकली तसेच त्यामुळे अधिक काळ ती वस्तू घरात टिकून राहिल्याची प्रचिती यावी या दृष्टिकोनातून आपण वस्तूंची निवड करत असतो. निवड केलेल्या वस्तूचा रंग, संरचना, एकूणच सजावट, आकार, प्रकार, पोत, त्यावरील नक्षीकाम, कोरिवकाम, कलाकृती, दृश्यस्वरूप सर्वच निरंतर टिकावं अशीच माफक अपेक्षा आपली असते आणि ती स्वाभाविकही आहे. कारण ती वस्तू खरेदी करताना आपण पै पै जमवलेले पैसे मोजलेले असतात आणि त्याचमुळे ती घरी आणल्यानंतरही त्या वस्तूची आपण अधिक काळजीदेखील घेत असतो.
हँडीक्राफ्टसारख्या अगदी निराळ्या प्रकारच्या गृहसजावटीच्या वस्तूचं महत्त्व अंतर्गत संरचना आणि सजावट या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण आहे. या वस्तूंची निवड आपल्याला एका निराळ्या स्वरूपाच्या सौंदर्याविष्काराची प्रचिती देत असते. या सौंदर्याचा शोध घेण्याची जागा म्हणजे आपलं घर आणि त्याची अनुभूती देणारी अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे हँडीक्राफ्ट.
(लेखक महावीर इन्स्टिटय़ूटचे प्राचार्य आहेत)