आब आणि रुबाब राखलेली टुमदार हवेली!

आता जसे एकाच ठिकाणी आयुष्यभर नोकरी करीत राहणे कमीपणाचे मानले जाते, तसेच एकाच ठिकाणी राहणेही. बाकी वडिलोपार्जित घराचा अभिमान वगैरे असतो, नाही असे नाही, पण तो काही दिवसांपुरता.

आता जसे एकाच ठिकाणी आयुष्यभर नोकरी करीत राहणे कमीपणाचे मानले जाते, तसेच एकाच ठिकाणी राहणेही. बाकी वडिलोपार्जित घराचा अभिमान वगैरे असतो, नाही असे नाही, पण तो काही दिवसांपुरता. सणावाराला आणि सुट्टीत हवापालट करण्यासाठी. मात्र, चार दिवस सरल्यावर पुन्हा जो तो आपापल्या दिशेने उडून जातो आणि वडिलोपार्जित घर एखाद्या ज्येष्ठ वारसदाराच्या सोबतीने आपले वय वाढवीत राहते. गावाकडची काही घरे तर अशीच वर्षांनुवर्षे एकटेपणाने दरवाजाला बाहेरून कुलुप लावून बंद स्वरूपात उभी राहतात आणि यथावकाश जीर्ण होत मृत्यूपंथाला लागतात. काही घरांना नवी सोबतही मिळते, पण सारे आयुष्य शहरात नोकरी केलेले चाकरमानी निवृत्तीनंतर गावाकडे स्थिरावताना तेथील घराचा चेहरामोहराही बदलून टाकतात. जुन्या वास्तूवर अद्ययावत सुविधांचा लेप चढवितात. काही ठिकाणी जुन्या घरांना चक्क मूठमाती दिली जाऊन त्याचा जीर्णोद्धार केला जातो. गावातल्या हवेत शहरी जीवनशैलीत जगण्याच्या अट्टहासातून हे केले जाते. काही सुदैवी घरे मात्र बदलत्या जमान्यातही शाश्वत मूल्यांप्रमाणे आपला पूर्वीचा आब आणि रूबाब कायम राखून असतात. विभक्त कुटुंब पद्धतीच्या कम्पार्टमेंटवजा अपार्टमेंट संस्कृतीतही आलिशान हवेल्यांची आठवण करून देतात. बदलापूर गावातील गोरे कुटुंबियांचे घर असेच आहे. एक टुमदार हवेली असे या घराचे वर्णन करता येईल.
कामानी टय़ूब्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक एम.के. गोरे, साकीब गोरे आणि त्यांचे इतर तीन भाऊ सहकुटुंब या घरात एकत्र राहतात. गेल्या शतकात म्हणजे १९०७ मध्ये हे घर बांधले. गोरे कुटुंबियांचे पूर्वज बदलापूरमधील लाकडाचे बडे व्यापारी. त्यामुळे त्यांच्या घरात उत्तम प्रकारच्या लाकडाचा वापर प्रकर्षांने नजरेत भरतो. घराच्या सर्व चौकटी, पिलर्स, दरवाजे आणि आढय़े साग तसेच शिसम लाकडाचे आहेत. कौलारू घराला लाकडी माळा आहे. मातीच्या भिंतींना चुन्याचा घट्ट मुलामा आहे. प्रवेशद्वारी विस्तीर्ण बैठक, त्याला लागूनच दिवाणखाणा. आताच्या सदनिकेच्या भाषेत सांगायचे झाले तर सात बेडरुम्स, दोन किचन, एक हॉल असे हे घर. सध्या या घरात २१ जण राहतात. प्रत्येक कुटुंबासाठी स्वतंत्र बेडरुम आहे. त्यामुळे एकत्र राहतानाही प्रत्येकाला प्रायव्हसी जपण्याचे स्वातंत्र्य आणि स्पेस आहे. मात्र, या सातपैकी सहा बेडरुम्सचे दरवाजे दिवाणखान्यातच उघडतात.  दिवाणखान्यात घरातील वडिलधारी मंडळी असतात. बाहेर पडताना किंवा घरात येताना त्यांची सहजपणे भेट घडावी, त्यांची विचारपूस करता यावी, हा त्यामागचा हेतू. संपूर्ण दिवसभर घरातील प्रत्येक व्यक्ती आपआपल्या वेळापत्रकानुसार नोकरी-व्यवसायाला जाणार, पण संध्याकाळी मात्र दिवाणखान्यात एका टेबलावर जेवणार. एकमेकांशी संवाद साधणार.
आता कोणतीही वास्तू १५ ते २० वर्षांची झाली की त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची भाषा सुरू होते. गोरे कुटुंबियांच्या या घराने आयुष्याची शंभरी पार केली आहे. अर्थात, या वास्तूत काळानुरूप काही बदल केले गेले. उदाहरणार्थ- जुन्या शहाबादी लाद्या बदलून मार्बल बसविण्यात आले. मात्र अशा प्रकारच्या किरकोळ दुरूस्त्या आणि बदलांव्यतिरिक्त ही जुनी वास्तू पूर्वीच्याच दिमाखात आताही उभी आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील झपाटय़ाने वाढणाऱ्या बदलापूरमध्ये ‘गुजरा हुआ जमाना’ अशा स्वरुपाच्या ठेवीत गावातील या घराचा समावेश आहे. रेल्वे स्थानकाचे नाव बदलापूर असले तरी मूळ गाव नदीपल्याड चार किलोमीटर अंतरावर आहे. वाढत्या शहरीकरणाने बदलापूर गावातही शिरकाव केला आहे. गावातही मोठमोठय़ा बहुमजली इमारती बांधल्या जात आहेत. काळानुरूप बदलायचे म्हटले तर आता या जुन्या घराच्या जागी पाच-सात मजली भव्य इमारत उभी राहू शकते. मात्र गोरे कुटुंबियांनी अजून तरी तो मोह टाळला आहे. सध्या २१ जणांचे गोरे कुटुंब या गोजिरवाण्या घरातन नांदते. जाड भिंतीमुळे बाहेरील तापमानापेक्षा घरातील हवा थंड असते. त्यामुळे पंखा अथवा ए.सी.शिवाय आपण आत आरामात बसू शकतो. बाहेरूनही या हवेतीलच्या भव्यपणाची जाणीव होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Haveli of gaore family at badlapur

ताज्या बातम्या