गौरव मुठे

जुलै ते सप्टेंबर २०२१ दरम्यान देशातील सात प्रमुख शहरांमध्ये ६२ हजार घरांची विक्री झाली. गेल्या काही दिवसांत बँकांकडून सण-उत्सवांची भेट म्हणून गृहकर्जावरील व्याजदरात कपात करण्यात आली असून कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क न आकारण्याचे बँकांकडून जाहीर करण्यात येत आहे. परिणामी घरांची मागणी पुन्हा वाढली आहे

देशभरात लसीकरणाला गती मिळाली आहे. अर्थव्यवस्था पुन्हा एकदा वेग धरू लागली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक पुन्हा एकदा बहरू लागले आहेत. गेल्या काही वर्षांपासून अडचणीत असलेल्या गृहनिर्माण क्षेत्राला ‘अच्छे दिन’ येण्याची आशा निर्माण झाली आहे.

सध्या बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलत योजना जाहीर केल्या जात आहे. बँकांनीदेखील गृहनिर्माण क्षेत्राला मदतीचा हात देऊ  करत गृहकर्जाचे व्याजदर कमालीचे खाली आणले आहेत. उत्सवी हंगाम बघता खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँका ६.५. ते ६.७ टक्के इतक्या नीचांकी दराने गृहकर्ज उपलब्ध करून देत आहेत. याची फलश्रुती म्हणजे घरांची मागणी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. करोनाकाळात स्वत:च्या मालकीच्या घरांचे महत्तव वाढले आहे. त्यामुळे स्वत:चे घर घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.

करोना महामारीमुळे थांबलेले जनजीवन पूर्वपदावर येत असताना गेल्या काही वर्षांपासून अडचणीत असलेल्या गृहनिर्माण क्षेत्रासाठी आशादायक चित्र दिसू लागले आहे. जुलै ते सप्टेंबर २०२१ दरम्यान देशातील सात प्रमुख शहरांमध्ये ६२ हजार घरांची विक्री झाली. गेल्या काही दिवसांत बँकांकडून सण-उत्सवांची भेट म्हणून गृहकर्जावरील व्याजदरात कपात करण्यात आली असून कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क न आकारण्याचे बँकांकडून जाहीर करण्यात येत आहे. याचबरोबर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांची भरती वाढल्यामुळे घरांची मागणी पुन्हा वाढली आहे, असा दावा मालमत्ता सल्लागार कंपनी ‘अ‍ॅनारॉक’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालाने केला आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत २९ हजार ५२० घरांची विक्री झाली होती आणि मागील तिमाहीत २४ हजार ५६० घरांची विक्री करण्यात आली. ‘अ‍ॅनारॉक’ने देशातील सात प्रमुख शहरांचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), पुणे, दिल्ली-एनसीआर, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. या शहरांत घरांच्या किमती तीन टक्कय़ांनी वाढल्या आहेत. २०२१ मध्ये तिसऱ्या तिमाहीत सरासरी पाच हजार ७६० रुपये प्रति चौरस फूट दर आकारण्यात आला, तर तो गेल्या वर्षी याच तिमाहीत हा दर सरासरी पाच हजार ६०० रुपये प्रति चौरस फूट होता.

‘माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात वाढलेल्या भरतीमुळे सात प्रमुख शहरांमध्ये घरांच्या मागणीला मोठय़ा प्रमाणावर चालना मिळाली आहे,’ मालमत्ता सल्लागार कंपनी अ‍ॅनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले, ‘करोनामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात वाढलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीमुळे घरांची मागणी आणि मोठय़ा आकाराच्या घरांच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वेगवान लसीकरण मोहिमेमुळे संभाव्य ग्राहक नवीन घरे पाहण्यासाठी बाहेर पडत असून प्रकल्पस्थळांना त्यांच्या वाढलेल्या भेटी हे दाखवून देते,’ असेही ते म्हणाले.

मालमत्ता सल्लागार कंपनी ‘नाईटफ्रँक’च्या अहवालानुसार, ५० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या घरांच्या विक्रीत तिसऱ्या तिमाहीत ३५ टक्कय़ांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात ती ३२ टक्के होती. घर खरेदीदार चांगल्या सुविधांसह मोठय़ा घरात जाण्यास अधिक उत्सुक असल्याचे यावरून स्पष्ट होते. मात्र ५० लाख रुपयांहून कमी किमती असलेल्या घरांची मागणी गेल्या वर्षीच्या ४५ टक्कय़ांच्या वृद्धिदरावरून यंदा कमी होत ४३ टक्कय़ांवर उतरली आहे. करोनाची सर्वाधिक झळ अल्प उत्पन्न गटात मोडणाऱ्या व्यक्तींना बसल्याने त्या वर्गातील ग्राहकांची क्रयशक्ती घटली आहे. अर्थात त्यांचे घरांचे स्वप्नही दुरावले आहे. 

अ‍ॅनारॉकच्या आकडेवारीनुसार, मुंबई महानगर परिसरात घरांच्या विक्रीत जुलै-सप्टेंबर दरम्यान दुपटीने वाढ झाली असून २० हजार ९६५ घरांची विक्री झाली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत नऊ हजार २०० एवढीच होती. गृहनिर्माण क्षेत्रासाठी महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या पुण्यामध्ये घरांची विक्री १०० टक्कय़ांनी वाढली आहे. यंदाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत पुण्यात नऊ हजार ७०५ घरांची विक्री झाली. गेल्यावर्षी याच काळात फक्त चार हजार ८५० घरे विकली गेली होती.

दिल्ली-एनसीआरमध्ये घरांची विक्री जुलै-सप्टेंबर २०२१ मध्ये ९७ टक्कय़ांनी वाढून दहा हजार २२० वर पोहोचली. वर्षभरापूर्वी पाच हजार २०० घरांची विक्री झाली होती. हैदराबादमधील घरांची विक्री गेल्या तिमाहीच्या तुलनेत चौपट झाली आहे. गेल्या वर्षी १ हजार ६५० घरांची विक्री झाली होती. यंदा ती सहा हजार ७३५ घपर्यंत पोहोचली आहे. बेंगळूरुमध्ये घरांची विक्री ५८ टक्कय़ांनी वाढून आठ हजार ५५० झाली आहे, तर चेन्नईमध्ये याच कालावधीत तीन हजार ४०५ घरांच्या विक्रीची नोंद झाली.

सणासुदीत घ्या घरखरेदीचा फायदा..

खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सण-उत्सवांची भेट म्हणून गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. शिवाय कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क न आकारण्याचे देखील बँकांकडून जाहीर केले गेले आहे. मात्र ही गृहकर्ज सवलत उत्सवी काळापुरतीच मर्यादित राहणार असल्यामुळे ग्राहकांना घाई करावी लागणार आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने गृहकर्जावरील व्याजदर ६.७० टक्कय़ांपर्यंत खाली आणला आहे. गृहकर्जाची कितीही मोठी रक्कम असली तरी ती ६.७० टक्के इतक्या कमी व्याजदराने उपलब्ध केली जाणार आहे. सवलतीच्या व्याजदराने गृहकर्ज देण्याची ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे. पहिला टप्पा १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरदरम्यान चालवला जाईल, तर दुसरा टप्पा १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचबरोबर पंजाब नॅशनल बँकेने देखील उत्सवकाळात रेपो दराशी निगडित कर्जाच्या दरात पाव टक्का कपात केली आहे. आता व्याजदर ६.८० टक्कय़ांवरून कमी होत ६.५५ टक्कय़ांवर आला आहे. नवीन दर १७ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. पतविषयक पूर्वेतिहास चांगला राखणाऱ्यांना त्यांच्या प्रामाणिकपणा आणि शिस्तीचे बक्षीस म्हणजे उत्तम पतगुणांक (क्रेडिट स्कोअर) मिळविता येतो. अशा ७०० पेक्षा अधिक पतगुणांक असलेल्या ग्राहकांसाठी बँकांकडून वाढीव सवलतीत कर्ज मिळविणे या ग्राहकांना शक्य होणार आहे.