प्राची पाठक

स्वयंपाकघर आवरायला काढणं ही एक अतिशय वेळखाऊ आणि किचकट गोष्ट असते. असं म्हणतात की, घरातल्या यच्चयावत सर्व खोल्या चटकन आवरून होऊ शकतात. पण स्वयंपाकघर आवरायला काढणं म्हणजे जिकिरीचं काम. या भीतीमुळेच जिथे आपण रोज अन्न शिजवतो, अन्न साठवतो, तिथे खोलात जाऊन नीट साफसफाई होत नाही. अजून तरी भारतात अनेक घरांमध्ये स्वयंपाकघरात अन्न केवळ साठवलं जात नाही तर शिजतंसुद्धा! जेव्हा स्वयंपाकघराचा आकार घरातल्या बाथरूम्सपेक्षाही कमी कमी होऊ लागला, तेव्हा गमतीत असं म्हटलं जायला लागलं की, ‘इथे अन्न बाहेरून आणून केवळ जरा वेळ साठवून ठेवायचे आहे. ते बनवत थोडीच बसायचं आहे?’ म्हणून तर त्यांचे आकार लहान लहान होत गेलेले दिसतात. स्वयंपाकघरात लहानसा पंखा बसवायची साधीशी सोयदेखील अनेक बिल्डर्स देतच नाहीत. घामाच्या धारांनी हैराण होऊन जाल तुम्ही. गॅसला वारा लागून तो विझू नाही म्हणून स्वयंपाकघरात पंख्याची सोय नाही, याही युक्तिवादाला तसा अर्थ नाही. नीट काळजी घेऊन स्वयंपाक करणारी व्यक्ती घामाने भिजणार नाही, ज्योत विझणार नाही, अशी तजवीज करता येतेच. मोठी, मोकळी, हवेशीर आणि ऐसपस स्वयंपाकघरे आता नवीन बांधकामांत क्वचितच पाहायला मिळतात. हे सर्व मुद्दे महत्त्वाचे आहेतच, पण त्यात बसणाऱ्या अथवा न बसणाऱ्या स्वयंपाकघरांची एकूणच अवस्था मात्र घरोघरी अगदी सारखीच होऊन गेलेली असते.

ट्रॉली हा एक गेल्या तीस-चाळीस वर्षांमध्ये भारतीय स्वयंपाकघरात जोरदारपणे समाविष्ट झालेला भाग आहे. त्यांची उपयुक्तता आहेच. कमीतकमी जागेत जास्त सामान त्यायोगे बसू शकते. ते झाकलेलेदेखील राहू शकते. त्याने एक छान लुक स्वयंपाकघराला येऊ शकतो. पण त्या ट्रॉलींमुळे आणि त्यांच्या वेगवेगळ्या बंदिस्त मॉडेल्समुळे ती जागा कोंदट, कुबट होऊन गेलेली दिसते. पूर्वी लोक कडाप्प्याच्या कप्प्यांमध्ये डबेडुबे मोकळेढाकळे ठेवत असत. त्यावर वरचेवर धूळ बसत असे. ट्रॉलीमुळे ती धूळ आवरणे सोपे गेले. पण कुबट अंधाऱ्या जागा जास्त तयार झाल्या. ज्या ट्रॉलीज पूर्णत: बाहेर काढता येत नाहीत, तिथे नीट आवरता न आल्याने आणि एकुणातच स्वयंपाकघर आवरणं सोपं नसल्याने तिथे घाण साचतच जाते. आतपर्यंत हात पोहोचत नाही. फरशी आणि ट्रॉलीचे समोरचे पार्टिशन यात काही जागा असेल तर घर झाडताना, घरात वावरताना अनेक लहान-मोठय़ा खाली पडलेल्या वस्तू, धान्य, दाणे वगरे सहज पायाने, कुंच्याने ट्रॉलीखाली सरकले जातात. ते परत लगेचच बाहेर काढता येतातच असं नाही. जेव्हा नंतर कधी साफसफाई मोहीम काढली जाते तेव्हा त्या ट्रॉलीखालची जागा साफ केली जाते. तोवर ती घाण तिथे साचत जाते. कुंच्याच्या काडय़ा वगरेसुद्धा इथे सरकून पडून राहतात. ट्रॉलीला आतून जाळी नसेल तर लहान वाटय़ा, छोटी झाकणं, लहान चमचे ट्रॉलीत खालच्या ट्रॉलीवर अथवा तिथल्या खालच्या किंवा मागच्या भागात पडून राहतात. त्यांच्या आजूबाजूलादेखील घाण साचत राहते. काही तेलकट वस्तू ट्रॉलीत ठेवल्या असतील तर त्यांचे डाग तिथे त्या जाळीला, तारेला पडून वाढत जातात. त्यावर धूळ चिकटत जाते. ती वरचेवर साफ होतेच असं नाही.

घरोघरच्या ट्रॉल्यांचे हॅन्डल्स बघा. अतिशय कळकट अशा झालेल्या असतात त्या. त्यांच्या मागचे प्लायदेखील असेच बोटांचे ठसे, तेलकट डाग, पीठ वगरे मिरवत असते. त्यावर थरावर थर साचत जातात. कितीही भारी मटेरिअलची ट्रॉली बनवून घेतली तरी त्यांचे समोरील प्लाय कालांतराने तिरपेतारपे होते. त्यावर डाग पडलेले असतील तर ते आणखीनच ओंगळवाणे दिसते. त्याच्या चारी बाजूंनी धूळ आणि सांडलेले पाणी, इतर ज्युसेस, मिक्सरमधून ओसंडून बाहेर उडालेले थेंब अशी मॉडर्न आर्ट त्यावर तयार झालेली असते. ते डाग वेळच्या वेळी पुसले नाहीत तर तिथे बुरशीदेखील वाढायला लागते. धूळ जाऊन चिकटते. त्यात ट्रॉलीचे स्टील जॉइंट्स खिळखिळे होऊ लागतात. साफसफाई करतानादेखील काही तोडफोड होऊ शकते. दारं लावली तरी आपोआप उघडी पडायला लागतात. त्यांचे सांधे निखळतात. ट्रॉली एकसमान लेव्हलला राहत नाहीत. त्यांचे समोरचे हॅन्डल्स या गडबडीत तुटले, निखळले तर आणखीनच गबाळं चित्र तयार होतं. अनेकदा ट्रॉलीच्या दारांना आतून डस्टबिन्स अडकवायची सोय असते. सार्वजनिक जागी लोक कसे कुठेही थुंकून ठेवतात, अगदी तसेच ओघळ या कोपऱ्यात आलेले असतात. कचरा फेकताना, टाकताना तो सांडतो आणि डाग आणि नकोसे वास त्या कोपऱ्यात येत राहतात. पावसाळ्यात तर आणखीनच कुबट कोपरे तयार होतात. या भागातली भिंत, ट्रॉलीचे हॅन्डल्स, त्यांची दारं, त्यांचे डिझाइन्स हे सर्व वेगवेगळ्या ठश्यांनी भरून गेलेलं असतं. त्यांची नीट साफसफाई होतेच असं नाही.

एकदा केवळ ट्रॉली आणि तिचे दर्शनी भाग, ट्रॉली आणि तिचे आतले भाग अशी साफसफाई मोहीम राबवायला हवी आहे. त्यात आत आत ढकलून दिलेलं सामान काढून टाकायची वेळ आलीये, हे स्वत:ला बजावलं पाहिजे. किंवा ते नीट स्वच्छ करून त्या सामानाचा वापर वाढेल, अशी तरी सोय केली पाहिजे. ट्रॉली दुरुस्ती आधी करून घेऊन मग साफसफाई करणं जास्त सोयीचं ठरू शकेल. खूप कप्पे एकदम आवरणं शक्य नसल्याने रोज दोन दोन कप्पे असंही प्लॅनिंग करता येईल. पण ते कप्पे नीट म्हणजे अगदी थ्री डायमेन्शनल नीट साफ केले पाहिजेत. केवळ वरवरची आणि समोरची स्वच्छता काहीच कामाची नाही.

सुरुवात तर करा..

prachi333@hotmail.com