राजा राजवाडय़ात राहतो. तिथे लक्ष्मी नांदत असते. त्यामुळे त्याला कोणतेही दुख नसते, अशा भावनेतून ‘राजाला रोजच दिवाळी’ असा शब्दप्रयोग भाषेत रूढ झाला आहे. खरी गोष्ट म्हणजे घर गरिबाचं असो की श्रीमंताचं, रोजच्या प्रपंचाचे व्याप कुणालाच चुकत नाहीत. त्यातून सवड काढून थोडा जल्लोष करावा म्हणून सण आले असणार. त्यात दिवाळी म्हणजे सणांचा राजाच. नवरात्रोत्सव नऊ दिवस (नऊ रात्री) चालत असला तरी वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सहा दिवसांत समाजातील प्रत्येक घर आणि प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्य कुठे ना कुठे सामील करून घेतला जातो. शेतकरी, व्यापारी, नोकरदार, भाऊ, बहीण, पती, पत्नी, सगळेजण. दिवाळी प्रत्येक प्रांतात साजरी होते. तिला भाषेचे कुंपण नाही. प्रत्येक प्रांतातल्या घरात या वेळी दिव्यांची आरास, गोडधोडाची रेलचेल आणि फटाक्यांची आतषबाजी होते. नव्या घरात वास्तुप्रवेशाचे सोहळे होतात. घरात नव्या वस्तू, वाहने येतात. िभती नवे रंग पाहतात. माणसांच्या अंगावर नवे कपडे झळकतात.
‘खजांची’ सिनेमातल्या एका गाण्यात ही सगळी धमाल यथार्थ वर्णिली आहे,
‘आयी दीवाली आयी
कैसे उजाले लायी
घर घर खुशियों के दीप जले.’
राजेंद्र कृष्ण यांनी या गाण्यात अस्सल दिवाळीचं वर्णन करताना घराच्या कोनाडय़ात विराजित झालेल्या पणत्यांच्या दीपमाला, अंगणात फुलबाज्या पेटवणारी लहान मुलं याचं वर्णन करताना कवीला तारुण्यसुलभ प्रेमभावनेचा विसर पडत नाही. शेवटच्या कडव्यात एक मत्रीण दुसऱ्या मत्रिणीला सांगते की दिवाळी रोज रोज येत नाही. चल, आजच बलमाला उर्फ सजणाला विचारून फैसला करून टाकू-     
‘रोज रोज कब आती हैं
ये उजालों की बहारें
आ री सखी, आ री सखी
आज रात सखी बालम से
दिल जीते या हारे.’
आणि मराठीत तर विविध प्रतिभावंतांनी आपापल्या शैलीत शब्दांची आरास करून वेळोवेळी दिवाळी उभी केली आहे. आता मराठीचिये नगरी जिथे रोज लहान मुले आपापल्या शाळा आणि क्लासेसच्या जटिल वेळापत्रकातून संध्याकाळी देवघरासमोर बसून शुभं करोती म्हणायला वेळ काढू शकतील किंवा त्यांना
‘दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना
शुभं करोति म्हणा मुलांनो शुभं करोति म्हणा’
असे संस्कार देण्याइतकी पालकांना देखील सवड लाभत असेल का, हे सांगणे कठीण आहे. पण दिवाळीत मात्र प्रत्येक मराठी घर कसे दिसते तर गदिमांच्या गाण्यातल्या घरासारखे..
‘उघडले एक चंदनी दार
उजेड दिसतो आत केशरी सोन्याचा संसार.’
दिवाळीत अवतरणारा आनंदसोहळा घराघरात पंक्तिप्रपंच करणार नाही हे सांगताना यशवंत देव म्हणतात,
‘दिवाळी येणार, अंगण सजणार,
आनंद फुलणार घरोघरी
आमच्या घरी अन् तुमच्या घरी.’
दिवाळीसंगे सुट्टीचा आनंद, दिव्यांची आरास, आकाशकंदील, सनईचे सूर, अभ्यंगस्नान, गोडधोड फराळ, नवे कोरे कपडे, अत्तरांचा घमघमाट, फटाक्यांची आतषबाजी या सगळ्या ऐहिक गोष्टी झाल्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिवाभावाची माणसे एकत्र येतील, साहचर्याचा आनंद लुटतील, हे महत्त्वाचे..
‘ताईभाऊ जमतील, गप्पागाणी करतील
प्रेमाच्या झरतील वर्षांझरी
आमच्या घरी अन् तुमच्या घरी.’
पी. सावळाराम यांच्या गीतातले नायिकेचे सासरघर कसे आहे पहा. ती बिचारी
‘आली दिवाळी आली दिवाळी
घर घर उजळित मानवतेचे तेजाच्या पाउली’
म्हणत दिवाळीचे स्वागत करते. पण तिला त्याच वेळी भावाची आठवण येते आणि ती उदास होऊन आकाशीच्या चंद्रालाच साकडे घालते, की तूच माझा भाऊ हो,
‘होऊन बंधू ये रे चंद्रा
दीपांच्या राऊळी’
कारण
‘भावाविण हा दिन सोन्याचा
आज उदासीन या बहिणीचा.’
चिमुकल्या भावंडांचा भाऊबीज हा अगदी मजेदार लाडका सण. नवे कपडे आणि टोपी घालून पाटावर बसणारा पिटुकला भाऊ, त्याला चुकतमाकत ओवाळणारी परकर-पोलक्यातली तायडी, नाही तर फ्रॉक घातलेली चिमुरडी आणि आई-बाबांनी दिलेली ओवाळणीची रक्कम बाळमुठीतून मोठय़ा जड मनाने तिला बहाल करणे.. हे प्रत्येक घराच्या िभतींनी पाहिलेले असते. ओवाळून झाल्यावर आई-बाबांची नजर चुकवून लाडीगोडी करीत ओवाळणीतले थोडे पसे परत मागणारा भावडय़ा मोठेपणी तिच्यासाठी तितक्याच दिलदारीने पदरमोड करतो आणि दर दिवाळीत तिच्याकडून ओवाळून घेण्याची वाट पाहतो. लहानपणी वचावचा भांडणारी भावंडं मोठेपणी दिवाळीतच हळवी होतात. लहानपणी भावाला ओवाळताना
‘गुणी माझा भाऊ याला गं काय मागू
हात जोडोनिया देवाजीला सांगू
औक्ष माझं गहू दे त्याच्या पाया
ओवाळिते मी लाडक्या भाऊराया’
म्हणणारी बहीण लग्न करून सासरी जाते. तिथल्या दिवाळीत सहभागी होते. पण भाऊबीजेला भाऊ येतो तेव्हा कवी संजीव यांच्या गीतातली सासुरवाशीण खरी आनंदाने फुलून येते. कारण
‘माया माहेराची पृथ्वीमोलाची
साक्ष याला बाई, चंद्रसूर्याची’
अशी तिची भावना असते. प्रत्यक्ष सोन्याच्या ताटात निरांजन आणि औक्षणाचे साहित्य घेऊन त्याला ती ओवाळीत नसली तरी आविर्भाव तोच असतो,
‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळते भाऊराया रे
वेडय़ा बहिणीची वेडी माया रे..’
आणि प्रियकराला भेटायला नि त्याच्याशी स्वत:ला जन्मजन्मांतरीच्या नात्यात बांधून घ्यायला आतुर झालेल्या अभिसारिकेच्या भावना देखील दिवाळी जाणते. साजण घरी येतो तेव्हा मधुसूदन कालेलकरांच्या प्रियेला वाटते,
‘आली माझ्या घरी ही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली.’  
मुकुंद घरी येतो. गोकुळ हरपून जाते. अभ्यंगस्नान होते. नक्षत्रांचे दागिने घेऊन रात्र अंगणात उतरते आणि डोळ्यात स्वप्नांचे दीप उजळतात. हीच तिची दिवाळी असते.
‘संगे होता हरी, जाहले बावरी
मी अभिसारिका ही निराळी
आली माझ्या घरी ही दिवाळी.’
आणि पाडव्याच्या दिवशी ‘माझे घर’ चित्रपटातल्या नवविवाहितांच्या घरचा आनंदसोहळा काही वेगळाच असतो.
‘आज उगवला दिन सोन्याचा हितगुज येई ओठी
पतीदेवाला पूजायाला भावफुलांची दाटी
दिवाळीत या मंगलसूत्रा शोभा येईल कंठी’
असे म्हणत ती देवघरापुढे चंदनी पाट मांडते नि त्यावर पतीला बसवून प्रेमाने ओवाळते. रवींद्र भटांनी ते वर्णन पुढील ओळीत कसे केले आहे ते पाहा,
‘तुझियासाठी देवापुढती तबक सजविले राया
पाट चंदनी समोर मांडून तुझीच होईन छाया
तुझ्या पूजनी सार्थ वाटती युगायुगांची नाती.’
आणि एखाद्या घरात साजण साजणीची ताटातूट झाली असेल तर तिथल्या अश्रूंचे वर्णन करण्यासाठी बॉलीवुडचा रुपेरी पडदाच हवा असं पटकन मनात येईल. कारण प्रेम, प्रेमभंग, त्यातून मोडून पडलेली माणसं, खचलेली घरे आणि पुन्हा नव्या उभारीने बांधलेली घरे हा आपल्याकडे – फडके युगाच्या समाप्तीनंतर – खास बॉलीवुडच्या अखत्यारित राहिलेला विषय. पण मुकेशच्या
‘एक वह भी दीवाली थी,
एक यह भी दीवाली है
उजडा हुआ गुलशन है
रोता हुआ माली है,’
या ऑल टाईम हिट गाण्याप्रमाणे मराठीत ‘चकवा’ चित्रपटात एक गाणं आहे आणि ते गाण्याइतकीच स्वत:मध्ये कविता बाळगून आहे. संदीप खरे यांच्या या ओळी पाहा,
‘जिथवर पणती, तिथवर गणती,
थांग तमाचा नाही गं,
अजून उजाडत नाही गं..’
हे संपूर्ण गाणे अनेकांनी नक्कीच ऐकलेले असेल. ऐन दिवाळीत आपल्या घरात एकाकी व्यक्तीची तनहाई आपल्याला मुकेशच्या ‘एक यह वह भी दीवाली थी’ची याद करून देते. पण दर्दी लोकांना विचारलंत तर ते मुकेशच्या गाण्याच्या आणखीन काही वष्रे मागे जातात नि ‘रतन’ सिनेमातल्या झोहराबाईने गायलेल्या ‘आयी दीवाली’ची आठवण करून देतात. दीनानाथ मधोक यांनी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द अतोनात सोपे आणि अनलंकृत आहेत. त्यामुळे चाल अवघड असली तरी एकदोनदा गाणं ऐकल्यावर शब्द डोक्यात नक्की बसतात.
‘आयी दीवाली, आयी दीवाली, आयी दीवाली,
दीपकसंग नाचे पतंगा
मं किसके संग नाचूं बता जा,’
असं विचारून ही विरहिणी नायिका म्हणते,
‘किसको गुमान था, वो दिन यूं गुजर जाएंगे
और एक बार जाके वो फिर लौटके ना आएंगे
बिछडे हुये साथी जरा आ
मं किसके संग नाचूं बता जा.’
पण बॉलीवुडच्या रुपेरी पडद्याला दु:ख फार वेळ सहन होत नाही. बिछडलेले जीव एकत्र येतात. ‘होम डिलिव्हरी’ या खटय़ाळ आणि खेळकर सिनेमात वैशाली सामंत आणि सुनिधी चौहानसह उदित नारायण वगरे गायकांनी गायलेलं एक गाणं आहे. आपल्या घरात दिवाळीचं असंच नाचत बागडत स्वागत करावं असं कुठल्या तरुण व्यक्तीला वाटणार नाही?
‘मेरे तुम्हारे सबके लिये हॅपी दीवाली  
सारे सितारें उसके लिये हॅपी दीवाली,’
भाषाशुद्धी वगरे विचार काही क्षण विसरून या गाण्याची मौज लुटायला हवी –
‘आज जहां भी तुम रहो,
साथ हमारे अब कहो
– से हॅपी दीवाली    
आज मिले तुमसे कोई
उसे तुम भी बडे दिल से मिलो
– से हॅपी दीवाली
मेरे तुम्हारे सबके लिये
हॅपी दीवाली, हॅपी दीवाली, हॅपी दीवाली.’      
आणि ज्या घरात वडीलधाऱ्या माणसाची अनुपस्थिती असेल त्या घरात शिस्त अंमळ सलच असते. त्या घरात दिवाळीचं स्वागत जरा जास्तच धामधुमीत नि उछलकूद स्टायलीत होणार नाही तर काय. गोिवदा, जूही आणि मंडळीच्या ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’ या बेलगाम विनोदी सिनेमात कशाबशा मार्गावर येणाऱ्या उनाड जोडप्यांच्या घरातली दिवाळी अशीच नटखट खटय़ाळ शैलीत साजरी केली जाते. उदित नारायण, अलका याज्ञिक, केतकी दवे आदि गायकांनी केलेलं हे स्वागत पाहा –
‘ओ मेरे साजना, फटाकडा फूटनेवाला है, दे ताली
आयी है दीवाली सुनो जी घरवाली.’
प्रापंचिक दु:खे, कटकटी रोजच असतात. रडणे, करवादणे कोणाला चुकले आहे? पण यंदाच्या दिवाळीत आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक दिवाळीत तुम्हाला-आम्हाला काही क्षण ती दु:खे विसरण्याचे …

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत