‘क्रॅस्युला’च्या विविध जाती कुंडीत वेगवेगळ्या ठिकाणी, कोपऱ्यात वाढवल्या तर त्याच्या तजेलदार, जाड, रसरशीत पानांमुळे हॉल भरल्यासारखा दिसेल. या जातीतल्या झाडांना पाणी पण खूप कमी लागतं, आठ-आठ दिवस कॅस्युला पाण्याशिवाय सहजी जगू शकतं.
हल्लीचे अनेक हाऊसिंग कॉम्प्लेक्स कमीत कमी ८-१० मजली असल्यामुळे घरात विशेषत: हॉलमध्ये भरपूर उजेड, सूर्यप्रकाश आणि वारं असतं. या गोष्टी लक्षात ठेवूनच हॉल डेकोरेशनसाठी योग्य गोष्टींची निवड करावी लागल्यामुळे बऱ्याच मर्यादा येतात. त्यामुळे हॉलमधली बरीच जागा मोकळी राहते. पण ‘क्रॅस्युला’च्या विविध जाती कुंडीत वेगवेगळ्या ठिकाणी, कोपऱ्यात वाढवल्या तर त्याच्या तजेलदार, जाड, रसरशीत पानांमुळे हॉल भरल्यासारखा दिसेल. या जातीतल्या झाडांना पाणी पण खूप कमी लागतं, आठ-आठ दिवस कॅस्युला पाण्याशिवाय सहजी जगू शकतं.
‘बेबी नेकलेस’ म्हणजे ‘क्रॅस्युला परफोरॅटा’ किंवा ‘रूपेस्ट्रीस’ हे कॅस्युलाची जात अतिशय मोहक दिसते. याचं बारीक खोड पसरत वाढतं, त्यांच्या पेरांवर विरुद्ध बाजूला एकेक त्रिकोणी फिकट पिवळी हिरवी पानं येतात. एकावर एक असलेल्या पेरांवरची पानं एकमेकांशी काटकोनात आणि जवळजवळ वाढतात. खोड बारीक असल्यामुळे ही पानं खोडात ओवल्यासारखी दिसतात. फांद्या जेव्हा बारीक असतात तेव्हा तर पानांची रचना ‘बेबी नेकलेस’सारखी दिसते. त्यामुळेच कुंडीमध्ये छोटं झाड लावलं तरी ते मोहक दिसतं आणि फांद्या फुटून त्यावर आलेल्या पानांमुळे हॉलच्या खिडकीला ‘हूक’ लावू त्याच्या हँगिंग बास्केट्स वाढवल्या तर हॉलमधल्या प्रकाशाची तिव्रताही कमी होईल. बास्केट्समध्ये फांद्या लांब पसरतात. पण त्या जास्त लांब झाल्या की त्यांचं सौंदर्य कमी होतं, म्हणून फांदीच्या टोकाकडचा शेंडा खुडून तो दुसऱ्या कुंडीत लावा, म्हणजे नवीन झाड वाढायला लागेल. ते तुम्हाला ‘प्रेझेंट’ म्हणून दुसऱ्यांनाही देता येईल.
‘रॅटल स्नेक’ ही क्रॅस्युलाची जात खरोखरच मोहात पाडणारी आहे. यात, खोडावर पानं- इतकी जवळजवळ आणि दाट-घट्ट वाढतात की हे झाड वरून पाहिलं तर अनेक ‘रॅटल स्नेक’च्या शेपटय़ा एकत्र वाढत असल्याचा भास होतो. म्हणून ‘रॅटल स्नेक’ची कुंडी हॉलमध्ये उंचीवर न ठेवता जमिनीवर ठेवावी. कुंडीखाली एखादी ताटली ठेवावी, म्हणजे पाणी जमिनीवर पडणार नाही किंवा दुसऱ्या मोठय़ा कुंडीतही कुंडी ठेवावी. याही प्रकाराला पाणी अगदीच कमी लागतं.
हॉलमध्ये सूर्यप्रकाश खूप येत असेल तर ‘कॅम्प फायर’ या क्रॅस्युलाच्या प्रकाराची निवड करावी. फांद्या असलेल्या खोडावर पोपटी कोवळी पानं येतात. पानं जसजशी वाढत जातात आणि त्यांना जसजसा जास्त सूर्यप्रकाश मिळत जातो. तसा पानांचा रंग पिवळसर नारिंगी, लालसर होतो आणि टोकाकडे रंग गडद होतात. तेव्हा एखाद्या शांत होत असलेल्या होकोटीत निखारे धगधगत असल्याचा भास होतो. हे झाड सावलीत वाढवलं तर पानांचा रंग हिरव्या सफरचंदासारखा होतो. पानांचा रंग सूर्यप्रकाशात आणि सावलीत पालटत असल्यामुळे एकच झाड वेगवेगळे असल्यासारखे दिसते. याचे खोड पसरणारे आहे, एका खोडातून दुसरे पसरणारे खोड उगवते आणि झाड वाढत जाते. खोडाची आणि त्यावरची पानांची रचना यामुळे कुंडीत छोटी चटई पसरल्यासारखी दिसते. खोडाच्या मातीजवळच्या भागावर छोटी मुलं फुटतात. ती कुंडीतल्या मातीत वाढतात आणि काही दिवसातच कुंडी पूर्ण भरून जाते, अशी कुंडी ‘हँगिंग बास्केट’ म्हणूनही खिडकीच्या फ्रेमवर टांगता येते. खोडाचा शेंडा किंवा एखादी फांदी तोडून दुसऱ्या कुंडीत लावली तरी त्यापासून नवीन झाड तयार होते.
‘जडे प्लॅन्ट’ ह क्रॅस्युलाचा सर्वात लोकप्रिय प्रकार. ही जात आपल्या घरात लावली आणि दुसऱ्यांना भेट म्हणून दिली तर मालकाचं सर्व ‘शुभ’ होतं असा समज होता म्हणून या प्रकाराला पूर्वी पुष्कळ मागणी होती. खरं तर हा प्रकार सहसा मरत नाही, शिवाय याचं खोड जाड पण लवचिक असल्यामुळे ‘बोनसाय’ करण्यासाठी ‘जडे प्लॅन्ट’ प्रकार जास्त वापरतात. याचे खोड जाडजूड असून, त्यावर असलेल्या गोलाकार रेघांची मांडणी हत्तीच्या काडतीची आठवण करून देते. त्यामुळे झाडाचे खोड ‘अकाली वृद्ध’ झाल्यासारखे वाटते. पण फांद्यांचे शेंडे खुडले तर झुडुपासारखा आकार येतो. खोड लोंबत वाढत असल्यामुळे आणि त्यावरच्या हिरव्यागार, जाड, रसरशीत पानांमुळे कुंडीतून हिरवा धबधबा वाहत असल्याचा भास होतो. म्हणून याची कुंडी हॉलमध्ये थोडय़ा उंचीवर ठेवली तर झाड पूर्ण वाढलं की त्याचं सौंदर्य वेगळेच दिसते. कुंडी झाडाने पूर्ण भरून गेली, तर दुसऱ्या मोठय़ा कुंडीत झाड लावावे. त्याअगोदर झाडाला पाणी अजिबात घालू नये. कुंडीतली माती पूर्ण कोरडी झाली की कुंडी उलटी करून झाड अलगद काढून घ्यावे. मुळाभोवतालची माती पूर्णपणे काढून टाकावी.
नवीन कुंडीत थोडी माती, भरपूर जाड व बारीक वाढू किंवा छोटे दगड टाकून त्यात हे झाड लावावे. झाडाची मुळं कुजली असतील तर ती काढून टाकावीत आणि त्या जागी थोडे ‘फंजीसाईड’ लावावे म्हणजे झाडावर रोग, बुरशी येणार नाही. नवीन कुंडीत झाड लावल्यावर त्याला एक आठवडा पाणी घालू नये. नंतर अगदी थोडे थोडे पाणी एक दिवसाआड घालावे. म्हणजे मुळं कुजणारं नाहीत. जास्त पाणी झाल्यास झाड मरते.
‘मॉर्गन्स ब्युटी’ ही क्रॅस्युलाची संकरित जात अलीकडच्या काळात जास्त लोकप्रिय झाली आहे. खोडावर निळसर छटा असलेल्या रसरशीत पानांची रचना अध्र्या पॅगोडावर कोरीव नक्षीकाम केल्यासारखी दिसल्यामुळे क्रॅस्युलाचा हा प्रकार हॉलची शोभा नक्कीच वाढवेल यात शंकाच नाही. हा प्रकार वाढवताना कुंडीत जाड वाळू आणि छोटे-छोटे टाकल्यास झाड चांगले वाढते. भरपूर वारं असलं तरी झाडाची वाढ जोमाने होते. पानं तपकिरी किंवा पांढरी पडली किंवा अती मऊ झाली तर झाडाला जास्त पाणी दिले गेले आहे, असे समजावे. अशा वेळेस, कुंडीतली माती पूर्ण वाळल्याशिवाय पाणी घालू नये. पाणी खूप कमी पडले तर झाडाची वाढोंबते, पानं गळून पडतात किंवा पानांवर तपकिरी डाग पडतात.
याशिवाय ‘जड प्लॅन्ट’चे ‘चायनीज’ म्हणजे ‘सिल्व्हर जडे’सारखे काही प्रकार, वॉच-चेन क्रॅस्युला, स्कारलेट पेंट ब्रश क्रॅस्युला असे अनेक प्रकार लोकप्रिय आहेत.
क्रॅस्युलाच्या सगळ्याच प्रकारांना पाणी अतिशय कमी लागतं. द्रव खतंसुद्धा महिन्यातून एकदा एक चमचा कुंडीत घातलं तरी झाडाच्या वाढीसाठी पुरेसं होतं. पानाचा देठाकडचा थोडा भाग कापून कुंडीत लावला तरी त्याला फूट येते, शिवाय झाडाचा शेंडा खुडला तरी त्यापासून नवीन झाड येते. फारशी काळजी घ्यावी लागत नसूनसुद्धा क्रॅस्युलाच्या पानांच्या आकारामुळे आणि खोडाकरच्या रचनेमुळे क्रॅस्युलाचे प्रकार हॉलची शोभा वाढवतील आणि घरात येणाऱ्या सूर्यप्रकाशाची तिव्रता कमी करतील.