चिऊचं घर : घर माणसाळलं…

घर म्हटलं म्हणजे िभती आल्याच.. दगड विटांच्या, सिमेंटच्या, हौसेने प्लॅस्टर ऑफ पॅरिसने सजवलेल्या किंवा अगदी साध्या कुडाच्या, मातीने िलपलेल्या! काही घरांमध्ये मात्र िभतींचं खास महत्त्व असतं…

घर म्हटलं म्हणजे भिंती आल्याच.. दगड विटांच्या, सिमेंटच्या, हौसेने प्लॅस्टर ऑफ पॅरिसने सजवलेल्या किंवा अगदी साध्या कुडाच्या, मातीने िलपलेल्या! काही घरांमध्ये मात्र भिंतींचं खास महत्त्व असतं..
आमच्या शेजारच्या घरी या दिवाळीत पाडव्याला एक कुटुंब नव्याने राहायला आलं. नवं कोरं घर घेतलेलं. विशेष काही सजावट नाही, फक्त जरुरीपुरतं सामान. हे कुटुंब राहायला आलं आहे हे कळलं त्यांनी केलेल्या छोटय़ाशाच पूजेने. आई-वडील आणि मुलगी या तिघांनी मिळून हळदी-कुंकवात रंगलेले आपल्या हातांचे ठसे घरभर उमटवले. आईने आणि लेकीने मिळून दारावर स्वस्तिक रेखलं आणि वडिलांनी लेकीच्या मदतीने दाराशेजारच्या भिंतीवर नावाची पाटी लावली. त्यांच्या घराकडे पाहिलं आणि माझ्या नव्या घरात मला परक्यासारखं का वाटतं याचा उलगडा झाला.
घर ‘माझं’ केलं
माझ्या नव्या घरात राहायला येऊन मला चांगलं दीड र्वष झालं आहे. साधारण नव्या घरांना असतो तसा फिक्कट पांढरा रंग. मोजकंच फíनचर. भरपूर पुस्तकं, संगीत, छायाचित्र यांचा संग्रह. माझी स्वतंत्र खोली, स्वत: जातीने लक्ष घालून आखून घेतलेलं स्वयंपाकघर. सगळं अगदी मनासारखं होऊनही हे घर मला परकंच वाटत राहिलं. शेजारच्यांचा गृहप्रवेश पाहिला आणि मी घर आपलंसं करायला सुरुवात केली.
माझ्या जुन्या घरात वेगवेगळ्या भिंतींवर काही ना काही खडूने लिहिलेलं असायचं. काही विशिष्ट भिंतींवर खडूने काहीही लिहायची मला आणि घरच्या सगळ्यांनाच पूर्ण मुभा होती. माझ्या कामाच्या टेबलावरच्या भिंतीवर खडूने कामाच्या याद्या, महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक, आठवणीने करायच्या गोष्टी असा सगळा प्रपंच लिहिलेला असायचा. स्वयंपाकघरात एक काळा फळाच बसवलेला होता. फ्रीजशेजारीच असल्याने त्यावर स्वयंपाकघरातले हिशेब, संपलेल्या गोष्टींची यादी, नव्याने आलेल्या बिलांचे तपशील आणि घरातल्या इतरांसाठीचे काही विशेष निरोप असल्या गोष्टी लिहिलेल्या असायच्या. या सगळ्यांची सुरुवात माझ्या आईने केली. नववी-दहावीत अभ्यास सोपा व्हावा याकरता तिने माझ्या सहज नजरेला पडतील अशी अभ्यासाची कात्रणं घरभर चिटकवली होती. गणिताची सूत्रं, विज्ञानातले सिद्धान्त, इतिहासाच्या सनावळ्या, तहांचे मुद्दे, कवितेच्या ओळी. .काय काय होतं त्या घरात.
बाजारात जाऊन तातडीने दोन काळे कुळकुळीत फळे आणि निळ्या, गुलाबी रंगाच्या खडूच्या पेटय़ा घेऊन आलो. नव्या घरातही माझ्या कामाच्या स्वतंत्र खोलीत आता भिंतीवर मजकूर आला आहे. स्वयंपाकघरात फळा लागला आहे. बठकीच्या खोलीतली एक मोठ्ठी अखंड भिंत आमच्या घरी येणाऱ्या बच्चेकंपनीकरता ठेवली आहे. त्या भिंतीवरही लवकरच काही रेघोटय़ा चित्रविचित्र आकार, आई, बाबा, घर, डोंगर; त्यामागून उगवणारा सूर्य आणि डोंगरावरून वाहत खाली येणारी नदी असं काही दिसायला लागेल आणि घर ‘माझं’ होईल.
मुझे रंग दे..
घर रंगवण्याच्या काही जणांच्या कल्पना विशेष असतात. मला स्वत:ला गडद, शांत रंगांसोबतच पिवळा, भगवा, हिरवा असे तजेलदार रंग आवडतात. मात्र माझ्या मित्र-मत्रिणींनी घरांच्या रंगकामांत काही भन्नाट वैविध्य आणायचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षांपासून घरात एखादी भिंत लक्षवेधी करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतो. माझ्या एका वयाने मोठय़ा असणाऱ्या मत्रिणीने एक भिंत चक्क गेरूने रंगवली. या दिवाळीत तिने भरपूर गेरू विकत घेतला, पाण्यात कालवला आणि ब्रशने रंग दिल्याप्रमाणे घराची एक भिंत चक्क त्यानेच रंगवली. आमच्यासकट तिच्या घरच्यांनीही तिला वेडय़ात काढलं, मात्र गेरू वाळल्यावर मात्र ही भिंत खूपच छान वाटते आहे. रंगाच्या फटकाऱ्यांचा पॅटर्न, नसíगक लाल-तपकिरी शांत रंग, आणि गेरूचा विशिष्ट वास यामुळे ही भिंत एक कौतुकाचा विषय झाली आहे. हं, हा रंग कपडय़ांना लागू नये म्हणून तिने त्या भिंतीलगत असलेला बांबूचा सोफासेट अर्धा-एक इंच पुढे ओढून ठेवला आहे इतकंच!
दुसऱ्या घराची तऱ्हा आणखीनच निराळी. त्या घरात बठकीच्या खोलीची एक भिंत मजेशीर आहे. माझ्या एका मित्राचं हे घर. बाबा होऊन या मित्राला एक र्वष झालं. त्याच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला घरी आलेल्या जवळच्या सगळ्या पाहुण्यांसाठी एक गंमत होती. दोन थाळ्यांमध्ये हळद, कुंकू, बुक्का, गुलाल यांचे ओले रंग ठेवले होते. आपल्याला आवडेल त्या रंगात हाताचे पंजे माखायचे आणि भिंतीवर छाप उठवायचा. सगळ्या प-पाहुण्यांनी छाप उठवल्यावर ती भिंत रंगीबेरंगी हातांच्या पॅटर्नसनी भरून गेली. मग मित्र, त्याची बायको आणि सोबत चिमुरडय़ा त्याच्या मुलाने रंगांनी हात माखले आणि आम्हा सगळ्यांच्या छापांमध्ये त्यांच्या हातांचे ठसे उमटवले. ही कल्पना, आणि ती भिंत मला भारीच भावली आहे. आम्हा सगळ्यांच्या अस्तित्वाची, त्या कुटुंबाच्या आनंदात सामील झाल्याची, त्या समारंभाची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या चिमुकल्या एक वर्षांच्या हातांनी सजलेली ही भिंत आहे.
थोडी नीळ टाकून, किंवा कधी बाजारातून आणलेले रंग टाकून, भिंतींची चुना-सफेदी करण्यासाठी वापरतात त्या चुन्याने मी अनेकदा भिंती रंगवल्या आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात मी एक चमत्कारिक प्रयोग करून पाहणार आहे. हळद, कुंकू आणि आमच्या वसाहतीतल्या पळस-पिचकारीच्या फुलांपासून मिळवलेल्या रंगांचा वापर करायचा विचार करतो आहे. फिक्कट पिवळा, लाल आणि फुलांपासून मिळवलेल्या शेंदरी रंगांची फिक्कट झाक असलेले हे नसíगक रंग कसे दिसतील याचाच विचार करत मी उन्हाळ्याची वाट पाहतो आहे.
िभत? माझा कॅनव्हास!
माझी मावसबहीण आणि तिच्या वर्गातल्या काही मित्र-मत्रिणींनी आपल्या कला महाविद्यालयात केलेले प्रयोग घरी करायला सुरुवात केली. कॅनव्हास ताणून त्यावर चित्र करण्यापेक्षा, घरातल्या भिंतीवरच थेट चित्र चितारली तर? या कल्पनेने भारावून जाऊन यातल्या कित्येकांनी आपल्या घरातल्या भिंतींना सजवलेलं आहे. कोणतं चित्र काढायचं हे निश्चित झालं म्हणजे भिंतीवर त्याचं आरेखन करून, बाजारातून योग्य ते रंग आणून थेटं भिंतीवरच एक उत्तम चित्र काढायचं. साध्या सोप्या फुलांपासून अतिशय गुंतागुंतीच्या निसर्गचित्र, अमूर्त चित्रांपर्यंत अनेक गोष्टी यांच्या घरातल्या भिंतींवर साकारलेल्या आहेत. फोटोग्राफीमध्ये नपुण्य मिळवलेली सायली म्हणाली, ‘महाविद्यालयात शिकताना अनेक कल्पना डोक्यात येतात. प्रयोग करून पाहावे वाटतात. मग आपल्याच घरी ते का करून पाहू नयेत? मला वारली चित्रकलेतले सोपे, तरी एक्सप्रेसिव्ह पॅटर्न आवडतात तेव्हा आमच्या फ्लॅटसमोरच्या जिन्यात मी ते रंगवलं. दाराभोवती अष्टविनायक काढले. मामाच्या घरी एका पक्ष्याचं चित्र पुस्तकात पाहून काढलं. एक नवा अनुभव मिळतो.’
स्वत: नृत्यविशारद असलेल्या नेहाचा अनुभव निराळाच आहे. ती म्हणते ‘मला आवडलेल्या कविता मी दारामागे लिहून ठेवते. भिंतींवर जेव्हा सुचतील तेव्हा खडू, पेन्सिल, पेनाने रेखाटनं करून ठेवते. मात्र खरा उपयोग झाला तो माझ्या क्लासकरता. घरीच, माझ्या खोलीला लागून असलेल्या बाल्कनीत मी मुलींना नृत्य शिकवते. तिथल्या भिंतीवर मी जटाधारी शंकराची एक प्रतीकात्मक-आकृती रेखाटली आहे, तेव्हा आम्हा नर्तकांसाठीचं श्रद्धा प्रेरणास्थान आमच्या डोळ्यापुढे राहतं कायम.’
मला स्वत:ला निसर्ग छायाचित्रणाची आवड असल्याने माझ्या घरात अनेक सुरेख छायाचित्रं आहेत. काही मी स्वत: काढलेली, काही नामवंत छायाचित्रकारांची, तर काही जुन्या लोकांनी काढलेली पक्ष्यांची, झाडांची रंगीत रेखाचित्रं आहेत. मला स्वत:ला ठाण्याच्या माझ्या घरी लावलेलं, मुंबईत काढलेलं, रोहित पक्ष्यांच्या थव्याचं छायाचित्र आवडतं. हे भलमोठ्ठं, तब्बल चार फूट लांबी-रुंदीचं छायाचित्र घरी येणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतं. बठकीच्या खोलीतच, अभ्यासिका असलेल्या कोपऱ्यात जॉन गुल्ड या ब्रिटिश पक्षीतज्ज्ञ आणि पक्षी-चित्रकाराने एकोणिसाव्या शतकात काढलेल्या भारतीय पक्ष्यांच्या रंगीत रेखाचित्रांच्या काही प्रती लावलेल्या आहेत. या रेखाचित्रांमधली अचूकता, प्रमाणबद्धता, रंगांचा, रंगछटांचा अचूक वापर हे सारं थक्क करणारं आहे. माझ्या घरातल्या भिंतींवरच्या कामाच्या, नीरस नोंदींना ही चित्र छेद देतात.  घरातल्या भिंती आपल्या घराला एक व्यक्तिमत्त्व नक्कीच देतात. घरातल्या भिंतींकडे एकदा पाहिलं की घरातल्या व्यक्तींच्या आवडीनिवडींचा अंदाज घेता येतो. भिंतींवर काही अजब प्रकार केले असतील तर मात्र त्या घराची, त्यातल्या माणसांची खूप सहज ओळख होते. मला असं वाटतं की या अवकाशामध्ये भिंती जसं घराला एक अस्तित्व देतात, तसंच त्या चार भिंतीमधल्या अवकाशातली माणसं भिंतींवर काही कल्पक घडवून, त्यावर आपली छाप पाडून त्या अवकाशाला एक घर म्हणून ओळख देतात. पाहा एकदा आपल्या घरातल्या भिंतींकडे, म्हणजे तुम्हालाच कळेल की हे घर खरंच तुमचं आहे का?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: House of huminity

ताज्या बातम्या