राग‘रंग’

मुख्य रंग व त्यांचे गुणधर्म यांचा कळत-नकळत मनावर व शरीरावर (प्रकृतीवर) काय परिणाम होण्याची शक्यता आहे, हे पाहणे मनोरंजक ठरावे.


मुख्य रंग व त्यांचे गुणधर्म यांचा कळत-नकळत मनावर व शरीरावर (प्रकृतीवर) काय परिणाम होण्याची शक्यता आहे, हे पाहणे मनोरंजक ठरावे.
आपल्या दैनंदिन जीवनात या रंगांचं स्थान इतकं महत्त्वाचं असूनही ते कुणालाही पूर्णपणे न समजलेलं असंच आहे.
मानवानं रात्रीच्या अंधाराचं, चंद्राच्या मंद व शांत प्रकाशाचं गडद निळ्या रंगाशी असलेलं नातं जाणलं. सर्व चराचराचं रूप उजळून स्वच्छ करणाऱ्या सकाळच्या सूर्याच्या प्रकाशाचं पिवळेपण त्याला जाणवलं. त्या प्रकाशाचं संधी प्रकाशाची असलेलं नातं वेगळं करतानाच त्याचे तांबडेपणही जाणवलं. झाडाझुडपांचा हिरवा रंग, नदीच्या पाण्याचं संथ निळेपण, समुद्राच्या निळ्या-हिरव्या पाण्याच्या पसाऱ्याचा अफाटपणा असे वेगवेगळे वृत्तीविशेष त्याने सात रंगांतून जाणून घेतले. या सात रंगांच्या वेगवेगळ्या मिश्रणातून नवनवीन वृत्तीविशेष त्याने घडविले.
या रंगपरीक्षेत प्रत्येक रंगाचे रचनात्मक निदर्शक स्वरूप तसेच राहते. आपण निळा रंग शांततेचा, समाधानाचा निदर्शक मानतो. एखाद्या व्यक्तीला तो आवडतो किंवा आवडतही नाही. हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. त्यामुळेच या रंगांचे कार्यक्षेत्र व्यक्तीगणिक बदलत असते. अन्य रंगांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती असते. याचाच अभ्यास रंगपरीक्षेत प्रामुख्याने केला आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीप्रमाणे रंग निवडते. आवडणारे रंग प्रथम व न आवडणारे रंग क्रमाक्रमाने नंतर येतात. पहिले दोन रंग व्यक्तीची निश्चित पसंती दर्शवितात. पाच व सहा क्रमांकांवरील रंग पसंती अगर ना पसंतीही दर्शवीत नाहीत. शेवटचे सात व आठ क्रमांकांचे रंग मुळीच नको असलेले असतात.
या निदान परीक्षेत चिन्हांचा वापर करण्यात आला आहे. सर्वात जास्त आवडणारा रंग अधिक चिन्हाने (+), त्यापेक्षा थोडे कमी पसंतीचे रंग गुणिले चिन्हाने (x), तटस्थ रंग बरोबर चिन्हाने (=) व मुळीच न आवडणारे रंग उणे (-) दर्शविले जातात.
डॉ. लुशर यांनी चार मुख्य रंग व चार पूरक रंग मानले आहेत. इतक्या प्रदीर्घ काळानंतरही या रंगांचे स्थान अबाधित राहिले आहे. रंगांचं हे स्थान दैनंदिन जीवनात इतकं महत्त्वाचं परंतु कुणालाही पूर्णपणे न समजलेलं असंच आहे.
मुख्य रंग १) निळा, २) हिरवा, ३) तांबडा व ४) पिवळा असे आहेत.
पूरक रंग १) जांभळा, २) तपकिरी, ३) काळा व ४) राखी. असे असून यातला काळा म्हणजे रंगाचा अभाव आणि कारवी म्हणजे तटस्थ, असे त्यांचे वर्णन करता येईल. तपकिरी म्हणजे काळ्या व तांबडय़ा रंगांचे मिश्रण असल्यामुळे निर्जीव वाटणारा रंग आहे. या तीन रंगांची जास्त आवड असलेली व्यक्ती बहुतेक वेळा आयुष्याविषयी नकारात्मक भूमिका घेऊन वागताना दिसते.
पांढरा रंग काळ्या रंगाच्या विरुद्ध रंग. म्हणजेच काळोखातून प्रकाशाकडे नेणारा मुख्य व पूरक रंगांची तीव्रता आटोक्यात ठेवणारा सर्व रंगांचा गुरू आहे.
मुख्य रंग व त्यांचे गुणधर्म यांचा कळत नकळत मनावर व त्यामुळे शरीरावर (प्रकृतीवर) काय परिणाम होण्याची शक्यता आहे हे पाहणे मनोरंजक ठरते.
१) निळा : शांततेचा निदर्शक, निष्क्रिय, हळवा, स्वयंकेंद्रित, ऐक्य, शांतता, समाधान यावर प्रभाव. विशेषत: या रंगाचा मध्यवर्ती मज्जातंतूजालावर सांत्वनपर परिणाम होतो. नाडीचे ठोके, श्वासोच्छ्वासाचा वेग, रक्तदाब या गोष्टी मंदावतात, त्याबरोबर शरीरातील स्वसंरक्षणात्मक क्रियापद्धती थकलेल्या शरीराला पुन्हा उत्तेजित करतात. थकवा अगर आजारात या रंगांची विशेष गरज भासते.
२) हिरवा : स्वयंकेंद्रित, न बदलणारा, आरंभभाव व चिकाटी, हट्टीपणा, स्वाभिमान यावर प्रभाव असणारा रंग आहे. हा रंग इच्छाशक्तीच्या लवचीकपणाचा निदर्शक समजला जातो. दृढनिश्चय, सातत्य यांचा प्रभाव. या रंगाची चव तुरट भावना गर्वाची असते. या रंगाचे पचनक्रियेच्या स्नायूंवर विशेष नियंत्रण असते.
३) तांबडा : आक्रमक, गतिमान, तीव्र इच्छा, अफाट चेतनाशक्ती, उत्साही शारीरिक स्थितीचा निदर्शक. नाडीचे ठोके रक्तदाब श्वासोच्छ्वासाचा वेग या रंगामुळे वाढतो. जीवनावश्यक शक्ती, ग्रंथी, नसा यांचे चलनवलन म्हणजे तांबडा रंग, दुर्दम्य महत्त्वाकांक्षेची पेटती ज्योत, उत्साही, आशावादी स्वभाव, पौरुष यांचे प्रतीकात्मक अनुभवाचे गाठोडे, त्याबद्दल वाढणारी तीव्रता आणि जीवन समृद्धी यांच्या प्राप्तीसाठी स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास असणाऱ्या व्यक्ती हा रंग प्रथम क्रमांकाने निवडतात, ४) पिवळा : स्वयंस्फूर्त, कल्पक, योजक. या रंगाचा मुख्य उपयोग आनंद व उत्साहात्मक वातावरणनिर्मितीसाठी होतो. तांबडा रंग वजनदार म्हणून चेतनात्मक बदल घडवून आणतो. पिवळा हा हलका-फुलका व जास्त प्रकाशमय वाटतो. याचा परिणाम सौम्य उत्तेजनात होतो. या रंगामुळेही रक्तदाब, नाडीचे ठोके व श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो, पण थोडय़ाच वेळात सर्व गोष्टी आटोक्यात येतात.
या रंगांचे प्रकाशमानता, अर्निबध व्यापकता आणि मानसिक विश्रांती हे गुणधर्म वाखाणण्यासारखे आहेत.
रंगपरीक्षेत वरील रंग पहिल्या व सांघिक स्वरूपात असणे योग्य व महत्त्वाचे आहे. व्यक्तीच्या रंग परीक्षेत अशा क्रमांकाने रंग आल्यास त्या व्यक्तीच्या हातून होणारे काम हे उत्कृष्ट दर्जाचेच होईल याची खात्री बाळगण्यास हरकत नाही.
प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव विशेष असतो. तो तिला कार्य करण्यास प्रवृत्त करतो. पिवळा रंग प्रथम क्रमांकाने निवडणारी व्यक्ती काम करण्यातून आनंद महत्त्वाची मानते, तांबडा रंग निवडणारी व्यक्ती अवघड गोष्ट करण्यापासून आनंदाचा उपयोग घेते, तर हिरव्या रंगाची निवड करणारी व्यक्ती स्वत:चे महत्त्व व लोकप्रियता वाढविण्याच्या इच्छेने काम करते.
डॉ. लुशर यांचा ‘कलर टेस्ट’ ग्रंथ वास्तविक मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरांना उपयुक्त असून, वरील रंगांच्या सान्निध्यात (मिश्रणात) इतरही रंग आल्यास त्याचे परिणाम विशद केले आहेत. आपल्या वास्तूला कोणता रंग कोणत्या खोलीला द्यावा याबाबत योग्य मार्गदर्शन वरील रंगांच्या स्पष्टीकरणातून सर्वसामान्य वाचकांना मिळेल, अशी आशा वाटते. आज कॉम्प्युटरमुळे या रंगांच्या छटा उपलब्ध झाल्या आहेत. तेव्हा रंगांचा वापर करताना रंग हे दुधारी शस्त्र आहे हे लक्षात घेऊन रंगांचा योग्य वापर केल्यास सुख-शांतीचा निश्चित चांगला अनुभव प्रत्येकाला येईल. आवडणारे रंग गडद नसावेत. सौम्य छटा असावी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: House painting

ताज्या बातम्या