देखभाल शुल्कात वाढ सोसायटीचेच हित

जीवाशी खेळणारे धोके टाळायचे असतील, पाणी व वीज बचत करायची असल्यास, भविष्यासाठी तरतूद व आजची बचत करायची असल्यास, अशा प्रत्येक कामासाठी ‘निधी’ जमविला पाहिजे.

जीवाशी खेळणारे धोके टाळायचे असतील, पाणी व वीज बचत करायची असल्यास, भविष्यासाठी तरतूद व आजची बचत करायची असल्यास, अशा प्रत्येक कामासाठी ‘निधी’ जमविला पाहिजे.  त्यासाठी देखभाल शुल्क जरी काही प्रमाणात वाढले तरी ते वेळीच स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे.
इमारत ही अनेक कुटुंबांना एकत्र राहण्यासाठी बांधली जाते. विकासकाला ती इमारत त्यात राहणाऱ्या प्रत्येक रहिवाशाकडे त्याचा ताबा द्यावयाचा असतो व प्रत्येकाने त्या इमारतीची आवर्जून व काळजीने लक्ष पुरविले पाहिजे, असे हे समीकरण व इमारत-रहिवशांचे संबंध इमारतीच्या संकल्पनेच्या वेळेसच ठरविले गेले आहे. त्यात कुणीही फेरफार किंवा बदल करू शकत नाही. इमारतींचा कारभार चालण्यासाठी कायद्याचा आधार ‘उपविधी’मुळे प्राप्त होत असतो व त्यानुसार प्रत्येक गोष्ट व्हायलाच पाहिजे असा हा सरकारी अधिनियमच आहे व त्या नियमामध्येच ‘देखभाल शुल्क’ प्रत्येक रहिवाशास सोसायटीला देणे बंधनकारक केले आहे. त्यातूनच ‘कमी देखभाल शुल्क घेणारी सोसायटी सर्वात चांगली’ अशी एक गैरसमजूत आज सर्वत्र चांगल्याच प्रकारे रूढ झाली आहे. त्याचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न..
आपण आपला स्वत:चा विचार जेव्हा करतो त्यावेळेस आपले शिक्षण, लग्न, घर, मुलांचे शिक्षण, त्यांची लग्ने इ. अनेक कारणांसाठी पैशाची बचत भविष्यकाळासाठी प्रत्येकजण करीत असतो. बरोबर त्याचप्रमाणे आपण राहत असलेल्या इमारतीसाठीसुद्धा भविष्यात त्यात सुधारणा; दुरुस्ती, नूतनीकरण इ.साठी पैशाची आवश्यकता भासते.  प्रत्येक महिन्याची वीज, पाणी बिले भरणे, स्वच्छतेचा खर्च, सुरक्षेचा खर्च इ. बरोबरच अशा बऱ्याच बाबी आहेत ज्यासाठी येणाऱ्या काही वर्षांत खूप मोठा खर्च अपेक्षित असतो व तो नुसता इमारतदेखभाल निधी व सिंकिंग फंडाचा निधी दर महिना जमवून पुरा होऊ शकत नाही म्हणून भविष्यासाठी व इमारतीच्या मजबुतीसाठी देखभाल शुल्कात वाड करणे गरजेचे असू शकते. अशा खर्चिक बाबीवर टाकू या एक नजर.
१)     रिप्लॅस्टींग (Re-Plastering)
२)     रिपेन्टिंग (Re-Painting)
३)     गच्चीची गळती (Terrace-Leakaqes)
४)     पिण्याच्या लोखंडी पाईपलाईन्स व किचन, शौचालये-बाथरूमच्या पाईपलाइन्स.
५) वरील बाजूच्या पाण्याच्या टाक्या (OHWT)
६) इमारतीमधील आर.सी.सी. (RCC) भागांची दुरुस्ती
७) इमारतीतील इतर पाणीगळती.
८)    स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसा सुचविलेल्या दुरुस्ती व दोषनिवारण.
वरील सर्वच कामे ही इमारतीच्या मजबुतीकरणासाठी वेळच्या वेळी करणे गरजेचे असते व ती सर्वच     खर्चिक असल्याने पैशाची तरतूद पहिल्यापासून करणे भाग पडते. असे केल्याने कोणत्याही सभासदावर एकरकमी देयाचा भार पडत नाही तसेच देखभालशुल्कात वरील कामांसाठी वाढ केल्याने ती प्राथमिक स्वरूपाची व कमी असल्याने ती सर्वाना देणे जास्त सोयीस्कर ठरू शकते.
वरील सर्व कामे ही इमारतीच्या देखभालीसाठी करावी लागतात, पण त्याचरोबर सरकारच्या जनजागृती मोहीमा व नैसर्गिक ऊर्जेचा वापर व्हावा यासाठीसुद्धा प्रत्येक सोसायटींनी पुढाकार घेतलाच पाहिजे. त्याकरिता करावयाच्या कामांसाठीसुद्धा ‘निधी’ची आवश्यकता असते. अशा कामांवर टाकूया एक नजर.
१)    जमिनीतील पाणी वापरण्यासाठी प्रत्येक सोसायटीत ‘बोअरवेल’ असली पाहिजे.
२)    ‘बोअरवेल’मध्ये गच्चीचे व प्लॉटचे पाणी मुरविण्यासाठी व आपल्या जमिनीची जलधारण क्षमता वाढविण्यासाठी ‘रेन वॉटर हारवेस्टिंग’ प्रकल्प राबविला पाहिजे. येणाऱ्या काळाची ही पहिली गरज आहे.
३)    सौर ऊर्जेचा वापर करून ‘वीजबचत’ करण्याकरिता ती यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे.
४)     हवेचा वेग आपल्या जागेत चांगला असल्यास ‘पवनचक्की’चा उपयोग करून त्याचा ‘वीज’ म्हणून वापर केला पाहिजे.
५)    आकाशातून कोसळणाऱ्या वीजेपासून आपल्या इमारतीचे संरक्षणाकरिता भूतार (Lighting) वीजरोधक यंत्रणा असणे जरूरीचे आहे.
वरील प्रत्येक बाबींची पूर्तता करण्यासाठी तसेच त्यांच्या मांडणीसाठी  (Installation) पहिल्यांदा जास्त रक्कम लागत असते म्हणून टप्प्याटप्प्याने पैशांची तरतूद करून ती कामे करून घेणे जास्त सोयीस्कर होऊ शकते. स्वत:ची पाणी व वीजबचत करण्यासाठी वरील प्रत्येक गोष्ट भविष्यात केल्याशिवाय इतर कोणताही पर्यायसुद्धा तरी शिल्लक नाही. कधी-कधी नाईलाजानेसुद्धा काही निर्णय स्वीकारल्याने भविष्यात त्याचा निश्चितच फायदा होत असतो. पण खरंच देखभाल शुल्क वाढीला लगेचच मंजुरी मिळते का? हा साधा विषय जरी निघाला तरी त्यावर आक्षेप घेतले जातात, वादविवाद होतात, भांडणे होतात. प्रसंगी हा सर्व तमाशा होत असताना ज्या इमारतीची भिस्त ज्या रहिवशांवर असते, ती इमारत मात्र कमकुवत होत असते, दुरुस्ती नसल्याने अशक्त होत जाते याकडे सर्रास दुर्लक्ष होत राहिल्याने अशा इमारती कोसळण्याची शक्यता जास्त असते.
असे हे जीवाशी खेळणारे धोके टाळायचे असतील, पाणी व वीज बचत खरंच करायची असल्यास, भविष्यासाठी तरतूद व आजची बचत करायची असल्यास, तिच्या प्रत्येक कामासाठी ‘निधी’ जमविला पाहिजे. जर त्यासाठी देखभाल शुल्क जरी काही प्रमाणात वाढले असले तरी ते वेळीच स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. इमारत ही प्रत्येक रहिवाशीच अमानत आहे, तिचे रक्षण करणे हे प्रत्येक रहिवाशाचे आद्य कर्तव्य आहे.
बऱ्याच रहिवाशांना वर उल्लेखिलेल्या सर्वच कामांबद्दल माहिती असतेच असे नाही, पण प्रत्येक गोष्टीवर विचार करण्यासाठी व त्यावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी सर्वाचेच एकमत व्हायलाच पाहिजे. ‘उद्याचा विचार आज केला तर त्याचे भले होत असते’ असे म्हणतात. पण त्याची सत्यता पटविण्यासाठीची सुरूवात आपल्यापासून व्हावी हीच हा लेख लिहिण्यामागची आजची अपेक्षा व उद्याची आशा आहे. गरज आहे फक्त पैशाची, त्याकरिता सोसायटीने देखभाल शुल्क वाढविल्याशिवाय काही होणे शक्य नाही हेच खरे!

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Housing societies maintenance charges increased