आमच्या एका परिचिताला त्यांच्या घरी मंगलकार्य असल्यानं इंटिरिअर डिझायनिंग करून घ्यायचं होतं. मात्र, त्यांच्या घरातल्या एका कॉलमला तडे गेले होते आणि त्यांच्या गृहसंकुलाने नुकत्याच केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर संपूर्ण इमारतीचं दुरुस्तीचं काम केल्याशिवाय इंटिरिअर डिझायनिंग करू नये असा सल्ला त्यांना मिळाला होता आणि तो योग्यही होता. परंतु घरातल्या कार्यामुळे फार काही मोठं नाही, तरी थोडीशी डागडुजी आणि कोणत्याही स्ट्रक्चरल भागाला धक्का न पोहोचवता थोडंसं नूतनीकरण करायची त्यांची इच्छा होती. त्यांनी याविषयी मला विचारलं असता, मी त्यांच्या घराची आणि इमारतीची पाहणी केल्यावर असं लक्षात आलं की, सर्वच मजल्यांवरच्या त्याच एका कॉलमला तडे गेले आहेत. आता एकएक शक्यता कमी करून या आजाराचं नेमकं कारण शोधायचं होतं, अर्थात डॉक्टरांप्रमाणे आजाराचं निदान करायचं होतं. काम खराब असल्यामुळे जर हे तडे गेले असतील, तर एकाच कॉलमचं काम खराब का केलं जाईल? इमारतीचं वय वाढल्यामुळे जर हा दोष निर्माण झाला असेल, तर एकाच कॉलममध्ये तो कसा निर्माण होईल? अशी विविध कारणं तपासल्यानंतर एक शक्यता अशी लक्षात आली की, इमारत ज्या जमिनीवर उभी असते त्या संपूर्ण प्लॉटखाली एकसारखे माती आणि दगडाचे थर नसतात.
जर त्या कॉलमखाली चिकणमातीची जमीन असेल, तर अशा जमिनीची पाणी झिरपण्याची किंवा मुरलेलं पाणी बाहेर पडायची क्षमता (Permeability) खूपच कमी असल्यानं अशा जमिनीत काही वर्षांनी पाणी कमी झाल्यावर ती बसते. त्यामुळे या एका विशिष्ट कॉलमखाली जर अशी जमीन असेल, किंवा हा कॉलम अधिक वजन पेलणारा कॉलम असेल, तर अशावेळी इमारतीतल्या वेगवेगळ्या कॉलमखाली असलेला पाया हा वेगवेगळ्या प्रमाणात कमी-अधिकपणे खाली बसू शकतो. असं जर घडलं, तर मग तो अधिक खाली खेचला गेल्यामुळे त्याच्या काँक्रीटवर अधिक ताण पडून तडे जाऊ शकतात. या कारणानंतर त्या दिशेनं त्यांना तपास आणि काही चाचण्या करायला सांगितल्या, म्हणजे त्यानुसार त्यांना उपाय सुचवता येईल. या विशिष्ट उदाहरणाचा उल्लेख करण्यामागचा हेतू असा होता की, ‘कोणताही एक नियम न पाळणं’ हा एकमेव नियम निसर्ग पाळत असल्यानं जमीन वरून एकसारखी दिसली, तरी तिच्या आत वेगवेगळे थर असू शकतात- भरावाची माती, मऊ चिकणमाती, वाळू किंवा काही ठिकाणी खडक आणि हे थर काही मीटर अंतरावरही बदलू शकतात. त्यामुळेच अभियंते कोणतेही अंदाज न बांधता याविषयीचा तपशील समजून घेण्याकरता जमिनीत प्रत्यक्ष बोअरहोल खोदून याबाबतचा तपशील जमा करतात.
बोअरहोल म्हणजे नेमकं काय?
सोप्या भाषेत सांगायचं तर, बोअरहोल म्हणजे जमिनीत खोलवर केलेली एक खिडकी, ज्यातून अभियंते आतले थर पाहतात आणि या थरांविषयी समजून घेतात. या प्रक्रियेत यंत्राच्या मदतीने जमिनीत खोदकाम करून वेगवेगळ्या खोलीवरून माती-खडकांचे नमुने घेतले जातात. या नमुन्यांच्या निरीक्षणांमधून आणि त्यावर आवश्यक त्या चाचण्याकरून या थरांचे विविध गुणधर्म, त्यांची वजन पेलायची ताकद, पाणी वाहून नेण्याची क्षमता वगैरे अशा अनेक बाबींबद्दल जाणून घेतलं जातं.
एकच बोअरहोल पुरेसा असतो का? आणि किती खोलपर्यंत खोदकाम करावं?
इथेच सर्वात मोठा गैरसमज होतो. एकच बोअरहोल इमारतीच्या संपूर्ण प्लॉटचं प्रतिनिधित्व करत नाही. कारण जमिनीचे थर काही मीटर अंतरावर बदलू शकतात. एका कोपऱ्यात मऊ माती, तर दुसऱ्या ठिकाणी घट्ट थर असू शकतो. म्हणूनच कॉलम मर्यादेबाहेर खाली बसू नयेत, यासाठी बोअरहोलची संख्या आणि ठिकाणं इमारतीच्या आराखड्यानुसार आणि विविध कॉलमवर येणाऱ्या वजनांनुसार ठरवली जातात आणि आवश्यक त्या प्रकारचा पाया, त्याचा आकार आणि त्याची खोली ठरवली जाते. इमारत फार उंच नसेल, आणि आवश्यक खडक खूप खोलवर नसेल, तर प्रत्येक कॉलमला स्वतंत्र पाया दिला जातो, तर उंच इमारतींसाठी बहुतेकवेळा खोलवर जाणारा ‘पाइल’ या प्रकारचा पाया दिला जातो. इमारतीत तळघर असेल, तर तिथे अधिकचं वजन पेलण्याकरता आणि इमारत असंतुलितपणे खचू नये, याकरता Raft or Mat Foundation अर्थात, इमारतीच्या क्षेत्रफळावर एखाद्या चटईप्रमाणे अंथरलेला आणि अनेक कॉलम्सकरता एकच असलेला असा पाया घातला जातो.
बोअरहोल तपासणी न केल्यास कोणता धोका संभवतो?
जर बोअरहोल योग्य प्रकारे घेतले नाहीत, तर पायाची रचना चुकीची ठरू शकते. इमारतीत खचू (settlement) शकते, बीम-कॉलमना तडे जाऊ शकतात, तळघरात पाणी साठू शकतं. म्हणजेच, जमिनीच्यावर इमारतीत दिसणारी समस्या ही अनेकदा जमिनीखालच्या अपुऱ्या तपासणीचा परिणाम असू शकतो.
सामान्य नागरिकांनी काय लक्षात ठेवावं?
‘मातीची तपासणी झाली आहे,’ एवढं ऐकून समाधान मानू नका
किती बोअरहोल घेतले? किती खोल? हे विचारणं योग्य आहे, तेव्हा याबाबत जाणून घ्या
सुरक्षित बांधकामासाठी जमिनीची तपासणी ही औपचारिकता नसून गरज आहे
बोअरहोलचं खोदकाम करताना प्रत्यक्षात ते कसं केलं जातं? नमुने कसे घेतले जातात? आणि सर्वात महत्त्वाचं-जमीन त्या वेळी अभियंत्यांना काय “सांगते”? याविषयी आपण पुढील भागात पाहूया.
(भू-तांत्रिक अभियंता, संशोधक आणि सल्लागार)
anaokarm@yahoo.co.in
