जुन्या घरातून नव्या घरात जाणं आपल्याला नवीन नाही. जुने वाडे पडतात, नवे टॉवर्स उभे राहतात. बदल, परिवर्तन हा जिवंत असण्याचा नियम आहे. जे बदलत नाहीत ते मागे पडतात किंवा नष्ट होतात. बांधलेले घर केव्हा तरी जुने होणार असते आणि पडणार असते. डागडुजी करून त्याचे पडणे थोडे लांबणीवर टाकता येते. पण टाळता येत नाही. नवे घर उभे राहते तेव्हा जुन्या घरातील काही लोक तिथंच राहतात, कुणी दूर निघून जातात.
‘वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृहणाति नरोपराणि
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही,’
या श्लोकाबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. जीर्ण झालेली वस्त्रं बदलावीत तद्वत आत्मा आपला देह बदलतो. त्या आत्म्याला देहाचा मोह होणं नसíगक आहे. तितकेच जुने घर पडताना त्या वास्तूशी निगडित असलेल्या आठवणींनी व्याकूळ होणेदेखील नसíगक आहे आणि दोन्ही गोष्टींचे अटळ असणेदेखील.
पण घर म्हणजे नुसती दगडाविटांची बनलेली नि सामानसुमान भरलेली रचना नसते. घरात माणसं असतात. त्या माणसांनी स्वत:साठी स्वीकारलेल्या संस्कृती, अस्मिता असतात. केशवसुतांनी एका कवितेत आवर्जून सांगितले होते की गोिवदाग्रजांनी
‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळून किंवा पुरून टाका
सडत न एक्या ठायी ठाका, सावध, ऐका पुढच्या हाका,’
तेव्हा त्यांना जुन्या घरातले बरेच काही खटकले असेल. जसे ‘पण लक्षात कोण घेतो?’ लिहिणाऱ्या ह. ना. आपटय़ांना बोचत असेल. ज्या काळात आपल्याकडे मुलीच्या जन्माने मातापितरे आनंदी न होता खिन्न होत किंवा पुढे काय होणार या विचारांनी खचून जात- त्या घरांची वर्णने शरच्चंद्रांच्याही अनेक कथांमध्ये नि कादंबऱ्यांमध्ये ठायीठायी दिसतात. ही जुनी घरे सोडून आपण नव्या घरांत जावे, नवमत आपलेसे करावे अशी या आणि इतर अनेक साहित्यिकांची तळमळ होती. शांता शेळके यांचा ‘ आही चुकी’ नावाचा एक लेख आहे. एका प्रवासात त्यांना ही हिन्दी भाषक मुलगी भेटते. ओळख होते. नाव विचारल्यावर ती आपलं नाव ‘आही चुकी’ सांगते. नाव अगदी अनोळखी म्हटल्यावर लेखिका मुग्ध्यात पडते. हे पाहून ती निरागस मुलगी म्हणते की मी आईवडिलांना नको होते. त्यांना मुलगा हवा होता, पण मी जन्मले. तेव्हा त्यांचा नाईलाज झाला. मी येऊन चुकले. म्हणून त्यांनी माझं नाव ‘आही चुकी’ ठेवलं- येऊन चुकलेली ‘आही चुकी’. या हजार कवितांमध्ये मावणार नाही असं कारुण्य या निरागस उत्तरात व्यक्त झालं आहे.
सावत्र आई लहानग्यांवर प्रेम करीत नाही असा एक ढोबळ समज आहे. पण अशा नको असताना पोटी आलेल्या मुलींवर तरी आईबाप किती प्रेम करीत असतील, कुणास ठाऊक. मेहमूदच्या ‘मस्ताना’ सिनेमात छोटय़ा ताराला आईचं प्रेम मिळत नाही तेव्हा ती म्हणते,
‘मैंने मां को देखा है, मां का प्यार नहीं देखा,
मंने फूल तो देखे हैं, फूलों का हार नहीं देखा.’
पाठय़पुस्तकात प्रेमळ आईची वर्णने वाचताना अशा मुलींना घरातली आई आठवत असेल. रात्री भीती वाटली, उगीचच एकाकी वाटलं तरी पूर्वी चटकन आईच्या कुशीत शिरणे शक्यदेखील नसेल. विशेषत: एक किंवा अनेक मुलींच्या पाठीवर मुलगा झाला असेल नि तो आईच्या कुशीत सारखा विराजित असेल तर-
‘वैसे तो घर में मां की तसवीर है
लेकिन मेरी कब ऐसी तकदीर है
कभी जो घबराउं, गले से लग जाउं
अगर ना नींद आये तो लोरी वह गाये
मेरा मन जिसका प्यासा है
वह लाड दुलार नहीं देखा
मंने मां को देखा है, मां का प्यार नहीं देखा.’
पण प्रेमाला वंचित झाली तरी ती केव्हा तरी खऱ्या आरशात पाहते व तिचे तिला जाणवते की घरातली माणसं मला जितकी वाईट समजतात, तितकी मी वाईट नाही.
 ‘एका तळय़ात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक.’
या पिलाला प्रेम करून घेण्याचीच नव्हे, तर प्रेम करायचीदेखील इच्छा असते. या पिलांच्या आया दुष्ट नव्हत्या. कधीतरी त्यांनीदेखील मुलीचा जन्म काय याची झलक चाखलेली होती. पण पोटी आलेली पोर वाढवायची कशी, उजवायची कशी या चिंतेनं त्याही पोखरल्या होत्या. पोटी मुलगी आली म्हणून जुनाट घरात बिऱ्हाड केलेल्या एकत्र कुटुंबकबिल्यातल्या सख्ख्या, चुलत सासवांनी, नणंदांनी, जावांनी तिला घालूनपाडून टोमणे मारले होते.
अगदी जुने वाडे बघतो तेव्हा मनात विचार येतो, की या वाडय़ातल्या िभतींनी अशी किती बोलणी ऐकली असतील आणि पदराखाली नवजात मुलगी घेऊन ती एकाकी सून घराच्या कुठल्या कोपऱ्यात हुंदके लपवीत दिवस ढकलीत असेल. या पोरीसाठी जगायचं, फारच असह्य झालं तर पोरीला कुशीत घेऊन परसातल्या आडाचा तळ जवळ करायचा असा अघोरी पण कितीजणींनी केला असेल.
हुंडा न घेता एखादा धनाढय़ विद्रूप म्हातारा कोवळय़ा मुलीला बायको म्हणून पदरात घ्यायला सरसावला नि मुलीचे अगतिक आईबाप त्या सोयरिकीला राजी झाले तर त्या कोवळय़ा मुलींनी मनातल्या मनात आक्रोश केले असतील,
‘झाले का हो डोईजड मी अशा कोवळय़ा वयात
नुकतंच पहिलं पाऊल पडलं तरुणपणात.’
‘संगीत शारदा’मध्ये गो. ब. देवलांची नायिका ‘माया जळली का? तिळही ममता नाही का? आली पोटी पोर एकटी, तीही विकता का?’ या पदात हीच कैफियत सांगून गेली.
सासरी जाताना अशा मुलीला मागे वळून पाहावंसं का वाटावं? आणि पुढे तरी आशेनं बघावं असं काय असेल? पण पाठीमागे तिची असहाय आई कुढत असेल,
‘आई होऊन चुकले का मी?
पोर पोटची देत ना ओळख,
आईपणाला मुकले का मी?’
असंच काहीबाही तिच्या मनात येत असेल. पुरेशा संवादाअभावी दोघींमध्ये पूल असे उभेच राहात नसतील. घरांच्या िभतींआड चार शब्द बोलण्याइतका आसरा देण्यासाठी जागा नसेल तेव्हा या आया आणि मुली, माहेरवाशिणी आणि सासुरवाशिणी कुठे मन मोकळे करीत असतील. आईचं अगतिक घर आणि सासूचं आगपाखड करणारं घर यात कुठल्याच वास्तूचा आधार नसलेल्या या आयाबायांनी चातुर्मासातल्या कहाण्यांमधून वर्णिलेल्या काल्पनिक सुखांचे आधार शोधले असतील. भक्तांची दुखे आणि अडचणी जाणून घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी रात्री आकाशातून विहार करणारे शंकर-पार्वती आणि इतर देवता त्यांना आपले सगे वाटले असतील. माहेर नसलेल्या पोरक्या सासुरवाशिणीसाठी नुसत्या प्रार्थनेवर ‘औट घटकेचं माहेर’ उभारणारा नि तिच्या नवऱ्याची खातिरदारी करणारा भगवान शंकर आणि पार्वती यांच्यातच त्यांनी आईबाप शोधले असतील.
पण काळ कुणासाठी थांबत नाही, थांबला नाही. स्त्रीशिक्षण नावाचं वादळ आलं नि घराघरांत शिरलं. घराघरांतल्या सांदीकोपऱ्यात शिरून सापडले तेवढे जुने विचार या वादळाने आपल्या झोतात उचलले नि दूर नेऊन टाकले. मुली शिकू लागल्या. त्यांची पिढी संसाराला लागली तेव्हा जुन्या घरांच्या आजवर बंद असलेल्या खिडक्या उघडल्या. नवीन खेळकर हवा घरात शिरली. जुन्या विचारांची कोळीष्टके झटकली. मुलाच्या जन्माइतकाच मुलीच्या जन्माचादेखील आनंदसोहळा होऊ लागला.
‘गोजिरवाणी जशी वासरे
प्रेमळ माझी गुणी लेकरे
स्वर्ग अवतरे घरात माझ्या
आनंदाचे पडती सडे..’
असा आनंद मुलीच्या जन्मानंतरदेखील आईला व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळू लागले. मुलगी जन्मल्यावर
‘मेरे घर आयी एक नन्ही परी
चांदनी के हसीन रथपे सवार’
असे तिच्या ओठांवर येऊ लागले नि नव्या घरांमध्ये आई आणि मुलगी मुक्तपणे श्वास घेऊ लागल्या, हसू खिदळू लागल्या. ‘देह चंदनाची काठी झिजे ज्यांची लेकीसाठी’ अशा बापाच्या वाढदिवसानिमित्त आनंदाचे भरते आल्यावर मुली म्हणू लागल्या-
‘सोडा आता उपवास, लेक झाली मिळवती
घ्या हो घास माझे हाती वर्षांच्या या दिवाळीला.’
पण अजून हे सुख आसपासच्या प्रत्येक आईला, प्रत्येक मुलीला लाभले नाही याची छळवादी जाणीव अस्वस्थ करते. चोरून सोनोग्राफी करणाऱ्यांची, स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्यांची बरीच घरे अजून बुलंद आहेत. ती सगळी पडतील, नवी घरे बांधली जातील आणि प्रत्येक आई, प्रत्येक मुलगी आणि प्रत्येक सून नव्या हवेशीर घरात राहायला जातील तेव्हा त्या आया, मुली, सुनांइतकाच मलादेखील आनंद होईल.