टॉयलेटचं अंतरंग
आजच्या गतिमान आणि आधुनिक युगात घरातील टॉयलेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चाळ आणि वाडा संस्कृतीमध्ये टॉयलेटचं स्थान घराबाहेर असायचं. आधुनिकीकरणात मात्र या टॉयलेटनं घराच्या आतच जागा मिळवली. साधारणपणे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात घराची संकल्पना जसजशी बदलत गेली तसतसे आपल्या एकूणच जीवनशैलीत आणि पर्यायानं घराच्या अंतर्रचनेत ते बदल दिसून येऊ लागले. बदलत जाणारं राहणीमान, पाश्चात्त्य संस्कृतीचं अनुकरण, वाढत जाणाऱ्या गरजा आणि अपेक्षा यामुळे आपली संस्कृतीच बदलत गेली. पूर्वी टॉयलेट घरात आतल्या बाजूला असणं निषिद्ध मानलं जात होतं. परंतु आपण काळाची गरज आणि जागेचा अभाव यामुळे ते आत आणलं.
सुरुवातीला टॉयलेटची दोन भागांत आपण विभागणी करत होतो, संडास आणि बाथरूम. पण कालांतरानं वाढत्या गरजांमुळे आणि जागेअभावी त्यालाही आपण कंबाईन केलं. त्यामुळे संडास आणि बाथरूम स्वतंत्र न राहता ते सामयिक झालं. अर्थात, आजही काही घरांमध्ये त्याची स्वतंत्र रचना केलेली दिसते. परंतु नवीन घरांच्या रचनांमध्ये मात्र कॉमन टॉयलेटचीच सुविधा उपलब्ध केलेली दिसून येते.
आपल्या घरातील इतर रूम्सच्या तुलनेनं सर्वात कमी वापरल्या जाणाऱ्या टॉयलेट्स काही वेळा काही प्रमाणात इंटिरिअरच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षित राहिल्याचं दिसून येतं. घरातील प्रत्येक व्यक्तीला दिवसातून काही वेळ रोजच निरनिराळय़ा कारणासाठी वापराव्या लागणाऱ्या या टॉयलेटचं अंतरंग इंटिरिअरच्या दृष्टीनं किती आवश्यक आणि महत्त्वाचं आहे हे समजून घ्यायला हवं.
दिवसाची सुरुवात घरामध्ये टॉयलेटपासूनच होते. ज्या तोंड धुण्यापासून-दात घासण्यापासून होते त्या जागेचा सुखद अनुभव आपल्याला येणं आणि तेदेखील सकाळी उठल्याबरोबर प्रसन्न, वातावरणाचा आनंद मिळणं महत्त्वाचं आहे. दिवसाची सुरुवातच मन प्रफुल्लित करणारी असली तर संपूर्ण दिवसदेखील सुखद अनुभव देत राहणाराच असणार आहे. सकाळी सकाळी तयार होणाऱ्या या पॉझिटिव्ह एनर्जीज आपल्या दिवसभर केवळ पॉझिटिव्ह अनुभवच देणार आहेत आणि त्यासाठीच हे पॉझिटिव्ह थॉट्स टॉयलेटच्या संदर्भातले.
हल्लीच्या ऐटबाज जीवनात इंटिरिअर डिझाइनिंगला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वन रूम किचनचा फ्लॅट असेल किंवा वन बेडरूम, हॉल, किचन असा असेल तरी ही साधारणपणे सामयिक एकाच टॉयलेटची सुविधा त्या फ्लॅटच्या रचनेमध्ये अढळून येते. आणि अनेकदा त्या टॉयलेटची जागा दोन्ही-तिन्ही रूम्सना जोडणाऱ्या पॅसेजच्या जोडीला निश्चित केलेली असते. दोन, अडीच अथवा तीन बेडरूम हॉल, किचन असं स्वरूप असणाऱ्या फ्लॅटमध्ये मात्र एक कॉमन टॉयलेट आणि एखाद्या बेडरूमला अथवा एकापेक्षा जास्त बेडरूम्सला अटॅच्ड टॉयलेट असतं. अर्थातच संपूर्ण फ्लॅटच्या एकूण आकारमानावर तसेच घराची रचना साकारणाऱ्या रचनाकारावर ते अवलंबून असतं.
घरात टॉयलेट्स किती असाव्यात याहीपेक्षा त्या कशा असाव्यात हे पाहणं, ठरवणं आणि त्या तशाच असणं अधिक महत्त्वाचं आहे. त्या कितीही असल्या तरी त्यांच्या वापरामध्ये विशेष फरक असा काही पडतोच असं नाही.
घराचं आकारमान मोठं असल्यास त्या घरातल्या टॉयलेट्स या काही वेळा मोठय़ा रूमच्या आकाराच्याच असतात. अर्थात तशा जरी त्या नसल्या तरीही त्यांना मोठं भासवणं त्याबरोबर उपलब्ध जागेचा अधिकाधिक उपयोग करून वापरण्याजोगी इंटिरिअरच्या दृष्टिकोनातून संरचना करणं शक्य होऊ शकतं.
वापर : टॉयलेटचा वापर कोण आणि किती वेळा करणार याहीपेक्षा तो कसा करणार हे त्याच्या अंतर्गत रचनेच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. वापर करणारी व्यक्ती वयोवृद्ध असेल तर त्यांच्या सांधेदुखी, गुडघेदुखीचा विचार करून त्या व्यक्तींना कमी त्रासात ते कसं वापरता येऊ शकेल हे पाहणं आवश्यक ठरतं.
उपयोग : वापराच्या दृष्टिकोनातून टॉयलेटचा उपयोग कशासाठी आणि कशा प्रकारे होणार आहे हे समजून घेणं महत्त्वाचं असतं. जसं तोंड धुणं, प्रात:र्विधी, अंघोळ, केवळ हात-पाय धुणं, कपडे धुणं, वॉशिंग मशिन ठेवून त्याचा वापर करणं, या सर्व बाबींचा विचार होणं अंतर्गत रचना करण्यापूर्वी ठरवणं आवश्यक असतं.
फ्लोअरिंग : फ्लोअरिंगसाठी मटेरिअल निवडताना आपण टॉयलेटमधील पाण्याचा सततचा होणारा वापर, घ्यावयाची विशेष काळजी, त्याचा उपयोग समजन घ्यावं लागतं. फ्लोअरिंगच्या अगोदर आवश्यक प्लंबिंग तसेच ड्रेनेजसाठी कराव्या लागणाऱ्या पाइपलाइन्सचा आराखडा तयार करून मगच काम करणं योग्य ठरतं. त्याचबरोबर वॉटर प्रुफिंगचे कामही फ्लोअरिंगचे काम सुरू करण्यापूर्वी करणं अत्यंत जरुरीचं असतं. फ्लोअरिंगसाठी नॅचरल स्टोन अथवा अँटी स्कीड सिरॅमिक टाइल्स वापरता येऊ शकतात. एकूणच टॉयलेटच्या आकारमानानुसार आणि आपल्या बजेटप्रमाणे मटेरिअलची निवड करता येऊ शकते. काही वेळा ड्राय आणि वेट एरिया अशा दोन भिन्न भागांत टॉयलेटची विभागणी केली असेल तर दोन भिन्न मटेरिअल्सची निवड करून केलेला वापरसुद्धा सौंदर्यात भर घाल शकतो.
वॉल्स : टॉयलेटच्या उंचीचा विचार करून किमान सात फुटांपर्यंत वॉल्सवर डॅडो बसवण्याची पद्धत प्रचलित आहे. यामध्ये डॅडोसाठी कन्व्हेन्शनल टाइल्स वापरण्याऐवजी आर्टिफिशिअल स्टोन्स, ग्लास टाइल्स, सिरॅमिक म्युरल यापैकी काहीही निवडलं आणि एकाच वॉलवर केवळ ते वापरलं तर जरा हटके लूक देता येऊ शकतो. त्या अगोदर फ्लोअरिंगप्रमाणेच प्लंबिंगसाठी कन्सिल कराव्या लागणाऱ्या पाइपलाइनचं काम अगोदर पूर्ण करून घ्यावं लागतं.
सॅनेटरीवेअर : टॉयलेटचा वापर कोण आणि कसा करू शकणार आहे यावर सॅनेटरीवेअरची निवड अवलंबून असते. वॉटर क्लोसेटच्या बाबतीत याचा विचार प्राधान्यानं करावा लागतो. इंडियन टाइप, अँग्लो इंडियन, ओरिसा, युरोपियन अशा अनेकविध प्रकारांतून एकाची निवड आपल्याला करावी लागते. वयोवृद्धांसाठी युरोपियन क्लोसेट सुखावह असतो. अर्थातच इतरांनी आपल्या पसंतीनुसार निवड करून त्याची जागा त्याच्या वापरानुसार ठरवायची असते. क्लोसेटच्या भोवतालची जागा किती असावी? इंडियन पॅन बसवण्यासाठी संकन स्लँब घेतला गेला आहे का? का त्यासाठी स्वतंत्र रेझ्ड प्लॅटफॉर्म बनवावा लागेल? अँग्लो इंडियन अथवा युरोपियन क्लोसेट बसवण्याची जागा निश्चित करताना टॉयलेटचा दरवाजा उघडताना तो अडचणीचा तर ठरणार नाही ना? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं निवड करताना शोधावी लागतात. सॅनेटरी वेअर्समध्ये टॉयलेटच्या आत वॉश बेसिन बसवणं गरजेचं असतं. दोन निरनिराळय़ा ब्रॅन्डच्या आयटमची निवड केली तर त्याच्या रंगाच्या साधम्र्याचा प्रश्न निर्माण होतो. हल्ली टफन्ड ग्लासमध्ये बनवलेल्या वॉश बेसिनची पसंती अधिक केली जाते. अशा वेळी हुबेहुब मॅचिंग करण्याची आवश्यकताच राहात नाही. वॉश बेसिन बसवतानादेखील त्याची जागा आणि दरवाजाची होणारी मुव्हमेंट त्याचप्रमाणे त्याची फ्लोअरिंगपासूनची अत्यंत महत्त्वाची असते. वापर करणाऱ्या व्यक्तींना सोयीस्कररीत्या त्याचा वापर करणं सहज सुलभ झालं पाहिजे.
अॅक्सेसरीज : टॉवेल रॉड, ड्राय इनरवेअर्स हँगर्स, सोप डीश, टिश्यू पेपर होल्डर, डस्टबीन, हॉट अॅन्ड कोल्ड वॉटर टॅप्स, ओवर हेड शॉवर अथवा टेलिफोन शॉवर, टमरेल टॅप, अंघोळीसाठी लहान स्टुल, वॉश बेसिनच्या वर मिरर कॅबिनेट, ड्राय आणि वेट/ शॉवर एरिया- यांच्यामध्ये टॉयलेट मोठे असेल तर ग्लास पार्टिशन अथवा पी.व्ही.सी. कर्टन अशा विविध अॅक्सेसरीजची निवड डिझाइनिंगच्या दृष्टिकोनातून करावी लागते. हल्ली बाजारात भरपूर व्हरायटीज यामध्ये मिळतात.
डोअर फ्रेम व डोअर : सततच्या पाण्याच्या वापरामुळे तसेच हवामानातील होणाऱ्या बदलांमुळे डोअरफ्रेम व डोअर याच्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही आणि भविष्यकाळात त्याची दुरुस्ती किंवा त्याची रिप्लेसमेंट करावी लागणार नाही अशाच स्वरूपाचं मटेरिअल वापरणं उपयोगाचं ठरतं. याचा विचार करून त्याची निवड करावी. यासाठी डोअर फ्रेम बनवताना लाकूड न वापरता एम. एस. फ्रेम्स अथवा कडाप्पा, ग्रानाइट यांसारखे नॅचरल स्टोन्सचा उपयोग करावा. आणि डोअर पीव्हीसी मटेरिअलमध्ये बनवावं.
बॉयलर : गरम पाण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीनं बॉयलर बसवणं टॉयलेटमध्ये गरजेचं असतं. दोन अथवा दोनापेक्षा जास्त टॉयलेट्स जवळजवळ असतील तर एकच कॉमन बॉयलर पुरेसा ठरतो.
व्हेंटिलेशन : टॉयलेटच्या आकारमानामुळे तसेच येथे होणाऱ्या गरम पाण्याच्या वापरामुळे त्या एरियाचं तापमान हे नेहमीच जास्त असतं. व्हेंटिलेशनच्या दृष्टिकोनातून एक्झॉस्ट फॅन त्या ठिकाणी टॉयलेटच्या व्हेंटिलेटरवर बसवणं गरजेचं असतं.
एकूणच टॉयलेटच्या अंतर्गत रचनेसंबंधीचा विषय तसा खूप व्यापक आहे. वस्तूंची निवड करत असताना, त्यांचे रंग, परस्परांचं साधम्र्य, वस्तूंचे एकमेकांशी निगडित होणारे वापर, टिकाऊपणा, त्यांचा मेन्टेनन्स, संपूर्ण टॉयलेटची कलरस्कीम, उपलब्ध नैसर्गिक हवा आणि प्रकाश, आकारमानानुसार सॅनेटरीवेअर्सची निवड, बाथ टबची व्यवस्था, स्वतंत्र शॉवर एरिया, ड्राय एरिया-वेट एरिया, वॉश बेसिनच्या जवळ अथवा वरील भिंतीवर मिरर कॅबिनेट, क्लिनिंग सोप तसेच इतर मटेरिअल ठेवण्याची सोय अशा अनेक बाबींचा अभ्यासपूर्ण विचार करावा लागतो.
वयोवृद्धांच्या टॉयलेटमध्ये त्यांना कराव्या लागणाऱ्या हालचालींचा विचार करून विशेषत: वॉटर क्लोसेटच्या जवळील भिंतीवर अथवा अन्यत्र गरजेनुसार प्रोजेक्टेड पाइप्स बसवून घेतले तर ते आधार म्हणून त्यांना वापरता येऊ शकतात.
असं म्हटलं जातं की माणसाची ओळख तो वापरत असलेल्या त्याच्या पादत्राणावरून होते तसंच घराची ओळख त्या घरातलं टॉयलेट कसं आहे यावरून होत असते.