scorecardresearch

गुंतवणूकदार हादेखील प्रवर्तकच ठरतो का ?

एखाद्या प्रकल्पातील गुंतवणूकदार हा त्या प्रकल्पा संदर्भात प्रवर्तक (प्रमोटर) समजला जाऊ शकतो का? हा महत्त्वाचा प्रश्न महारेरा प्राधिकरणापुढे एका प्रकरणात उद्भवला.

गुंतवणूकदार हादेखील प्रवर्तकच ठरतो का ?
प्रतिनिधिक छायाचित्र

ॲड. तन्मय केतकर
बांधकाम व्यवसाय आणि बांधकाम क्षेत्र हे तसे क्लिष्ट क्षेत्र आहे. एखाद्या बांधकाम प्रकल्पात विशेषत: आकाराने मोठय़ा बांधकाम प्रकल्पात अनेक व्यक्ती, संस्था सामील असू शकतात आणि त्या त्या व्यक्ती किंवा संस्थांचे अधिकारदेखील विभिन्न असू शकतात. एखाद्या प्रकल्पातील गुंतवणूकदार हा त्या प्रकल्पा संदर्भात प्रवर्तक (प्रमोटर) समजला जाऊ शकतो का? हा महत्त्वाचा प्रश्न महारेरा प्राधिकरणापुढे एका प्रकरणात उद्भवला.
या प्रकरणाची थोडक्यात वस्तुस्थिती याप्रमाणे :

आकाराने मोठय़ा बांधकाम प्रकल्पात मूळ प्रवर्तक आणि गुंतवणूकदार दोघेही होते. मूळ प्रवर्तक आणि गुंतवणूकदार यांच्यामध्ये झालेल्या कायदेशीर कराराने गुंतवणूकदारास महत्त्वाचे निर्णय घेण्याचे किंवा रोखण्याचे अधिकार होते. गुंतवणूकदार या अधिकारांचा गैरवापर करून प्रकल्प प्रगतीस अडसर करत असल्याने त्यास प्रवर्तक घोषित करण्याकरता मूळ प्रवर्तकाने महारेरामध्ये तक्रार दाखल केली.

या प्रकरणात महारेराच्या संयुक्त खंडपीठाने आपल्या निकालात पुढील महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली. १. मूळ प्रवर्तक आणि गुंतवणूकदार यांच्यातील करारात गुंतवणूकदारास महत्त्वाचे अधिकार प्राप्त आहेत, ज्यायोगे तो प्रकल्प प्रगतीस संमती देऊ शकतो किंवा रोखू शकतो. गुंतवणूकदाराने गुंतवलेल्या पैशांच्या सुरक्षेकरता असे अधिकार असणे आवश्यकदेखील आहे. मूळ प्रवर्तक आणि गुंतवणूकदार यांच्यातील करारावर किंवा गुंतवणूकदाराचे वर्तन न्याय्य आहे की अन्याय्य यावर निकाल देण्याचा अधिकार महारेरा प्राधिकरणास नाही. प्रवर्तक या संज्ञेच्या व्याख्येनुसार बांधकाम करणारी व्यक्ती किंवा बांधकामास कारण ठरणारी व्यक्ती प्रवर्तक घोषित केली जाऊ शकते. या संज्ञेनुसार गुंतवणूकदारास प्रवर्तक ठरवता येईल का? एवढाच मर्यादित निर्णय महारेरा प्राधिकरण देऊ शकते. मूळ प्रवर्तक आणि गुंतवणूकदार यांच्यातील कराराचे अवलोकन केले असता बांधकाम प्रकल्पासंदर्भातील महत्त्वाच्या विशेषत: आर्थिक निर्णयांकरता गुंतवणूकदाराची संमती आवश्यक असल्याचे दिसून येते आहे.

साहजिकच गुंतवणूकदारास अशी संमती देण्या किंवा न देण्याने प्रकल्प प्रगतीस अप्रत्यक्षपणे नियंत्रित करता येणे शक्य असल्याने, गुंतवणूकदार बांधकामास कारण ठरणारी व्यक्ती आहे असाच निष्कर्ष काढणे क्रमप्राप्त असल्याचा निष्कर्ष महारेरा प्राधिकरणाने काढला आणि या प्रकल्पातील गुंतवणूकदारास प्रवर्तक घोषित केले. या निकालानुसार, मूळ प्रवर्तक हा बांधकाम प्रवर्तक तर गुंतवणूकदार हा गुंतवणूकदार प्रवर्तक ठरला आहे आणि त्यानुसार महारेरा प्रकल्प नोंदणीत आवश्यक बदल करण्याचे आदेश मूळ प्रवर्तकास देण्यात आलेले आहेत.

हा निकाल सरसकट सर्वच गुंतवणूकदारांना प्रवर्तक घोषित करणारा नाही. एखादा गुंतवणूकदार एखाद्या प्रकल्पाबाबत प्रवर्तक ठरू शकतो किंवा नाही हे त्यांच्यातील कराराच्या अटी व शर्तीवर अवलंबून असेल असेदेखील या निकालात स्पष्ट करण्यात आलेले आहे.
tanmayketkar@gmail. Com

मराठीतील सर्व वास्तुरंग ( Vasturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या