नीला अजित तावडे
मे महिन्यातले दिवस… उन्हाळ्यामुळे सारखी तहान तहान होते आहे… आमच्या वाडीतले जांबाचे झाड फळांनी लगडलेलं आहे… गच्च हिरव्या पानाआड दडलेल्या छोट्याछोट्या घंटाच चणू! अतिशय तजेलदार आणि तकतकीत असा किंचित हिरवट छटा असलेला पांढुरका रंग! साधारण मार्चपासून झाडाला मोहोर यायला सुरुवात… फुलं अगदी नाजूक, पांढुरकी, शिरिषाच्या फुलांसारखी लांब केसर असलेली पावडरच्या पफ सारखी… उंच झाड आणि मोठमोठ्या पानांची गर्दी यांमुळे तसे खालच्या माणसांचे सहज लक्षही जात नाही. पण आमचे घर दुसऱ्या मजल्यावर आणि स्वयंपाकघराच्या खिडकीलगतच फांद्या येत असल्यामुळे आम्हाला दिवसभर त्या फुलांचा मंद सुवास जाणवत असतो. मधमाशा फुलांभोवती रुंजी घालत असतात.

चिमणीपेक्षाही छोटे, पिवळ्या चोचीचे अतिशय चटपटीत, सतर्क असे पक्षी त्या केसरांच्या ओढीने येतात, पण गुपचूप येत नाहीत, चिवचिवाट करतात आणि आपण खिडकीतून पाहायला गेलो की तत्क्षणी उडून जातात, परत येतात, परत जातात अशी धावपळ, नव्हे उडाउडी चाललेली असते.
हळूहळू फुले सुकू लागतात… लगेच मागे बोराएवढे जांब दिसू लागतात. खारुताईंनी झाडांच्या ढोलींमध्ये आपले बिऱ्हाड मांडलेलेच असते. त्यांना खबर लागते आणि तोंडाने अखंड टिर्रटिर्र आवाज करत आपली झुपकेदार शेपटी हालवत या फांदीवरून त्या फांदीवर सरसरू लागतात. पहाटेला कोकिळ आणि खारींची जणू जुगलबंदी लागते. काय बोलत असतील त्या आपसांत? मधेच कावळा आपली बेसूर करकर त्यात घुसडतो. आणि पोपटांना विसरून कसे चालेल बरे? पण ते पठ्ठे सकाळी नऊ ते ११ च्या सुमारास नाश्त्याला येतात आणि तेही जांब चांगले पिकल्यावर!

तोवर मुलांच्या परीक्षाही संपलेल्या असतात. मग वानरसेना निघते मोहिमेवर. लाठ्याकाठ्यांनी झोडपून मिळतील तेवढे अर्धेकच्चे जांब तोंडात आणि खिशात कोंबतात. शेजारच्या आजीबाई ओरडल्या की ही पोरं पळ काढतात.

आज मात्र एक अनोखं नाट्य घडलं या जांबाच्या झाडावर. सकाळी ९-१० ची वेळ झाली नि पोपट येऊ लागले. पानाआड दडलेले जांब त्यांना बरोबर दिसतात. पण आपल्याला मात्र पानांआड बसलेला पोपट अजिबात दिसत नाही. कारण जांबाची पाने आणि हिरवा रंग अगदी पोपटासारखाच. निसर्गाच्या या करामतीनं आपण थक्क होतो.

तर काय सांगत होते की, एक पोपट येऊन जांबाच्या वरच्या फांदीवर बसून त्यानं बांकदार चोचीने टचकन् एक जांब देठासकट तोडला, थोडावेळ घंटेसारखा हालवला. या आमच्या पोपटाला वरून लाल, पण खालच्या बाजूने काळी आणि थोडी रुंद अशी गळापट्टी होती. शेपूटही चांगली लांब होती. त्याच्या पाठोपाठ दुसरा पोपट आला. याला गळापट्टी नव्हती आणि चणही लहान यावरून हे त्याचे पिल्लू असावे असा तर्क केला. आईच्या चोचीतला तो जांब पाहून या महाशयांच्या तोंडाला (की चोचीला) पाणी सुटले आणि आईने स्वत: कुरतडून त्याच्या चोचीत थोडा तुकडा भरवण्याआधीच यांनी आख्खा जांब हावरटपणाने आपल्या चोचीत पकडला आणि खायला सुरुवात केली. पण कसले काय, महाशयांच्या घशात अडकलेला घास काही पुढे सरकेना. तेव्हा जीव घाबराघुबरा झाला. तोंडातून च्यों च्यों असा केविलवाणा आवाज काढला आणि त्याने आईकडे पाहिले. मला तर एखाद्या लहान बाळाने ‘आई आई’ हाक मारावी असंच ते सर्व दृश्य पाहून वाटलं. आईनं त्याच्या चोचीत घालून जास्तीचा जांबाचा तुकडा बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्या पोराचं मान मागे-पुढे करणे काही थांबत नव्हतं. आता पोपटीणही मोठमोठ्यानं ओरडू लागली. म्हणाली असावी, “चल तुला आता डॉक्टरकडेच नेते.” पण ते पिल्लू काही हलेना, उडेना. इतक्यात काय गंमत झाली, आमच्या खारुताई ‘काय गडबड चाललीय’ म्हणून आपली झुपकेदार शेपूट हलवत तिथे आल्या आणि आपल्या शेपटीचा पदर बांधत या पिल्लू पोपटाच्या चोचीतला जांब आपल्या अणुकीचदार दातांनी कुरतडला आणि सूरकन् पळाल्या.
पोपटीणबाई ‘थँक्यू’ म्हणेपर्यंतही थांबल्या नाहीत.