आतापर्यंत आपण विद्युत आगीमागील विविध कारणे समजून घेतली. मात्र प्रत्यक्षात अनेक आगींचे मूळ एखाद्या मोठ्या बिघाडात नसून, एका लहानशा आणि दुर्लक्षित दोषात असते – सैल जोडणी किंवा खराब टर्मिनेशन. ही जोडणी सुरुवातीला निरुपद्रवी वाटते, पण हळूहळू तापत राहते, स्पार्किंग निर्माण करते आणि अचानक आग लागते. कोणताही मोठा आवाज, ट्रिपिंग किंवा स्पष्ट इशारा न देता ही आग घडते, म्हणूनच सैल जोडणीला विद्युत आगींचे सर्वात सामान्य पण अत्यंत धोकादायक कारण मानले जाते. या लेखात आपण सैल जोडणी कशी तयार होते, ती आग कशी लावते आणि ती कशी टाळता येईल हे समजून घेणार आहोत.
सदोष वा सैल जोडणी (Loose Connections) आणि अयोग्य टर्मिनेशन्स (improper termination) ही विद्युत आगीची धोकादायक कारणे आहेत. अनेक आग लागण्याच्या तपासांमध्ये असे आढळते की आगीची सुरुवात एका लहान, सैल जोडणीपासून झाली असते, जी हळूहळू तापत गेली आणि आजूबाजूच्या ज्वलनशील वस्तूंना आग लागली. दुर्दैवाने, असे दोष गंभीर घटना घडेपर्यंत लक्षात येत नाहीत.
प्रत्येक विद्युत जोडणी मजबूत यांत्रिक पकड (firm mechanical grip) आणि कमी विद्युत प्रतीकार (resistance) देण्यासाठी अपेक्षित असते. जेव्हा जोडणी सैल (loose connection) होते, तेव्हा त्या ठिकाणी प्रतीकार (resistance) वाढतो. प्रतीकार (resistance) वाढल्यामुळे विद्युत प्रवाह (current) वाहताना त्या ठिकाणी स्थानिक (localized) उष्णता निर्माण होते. कालांतराने ही उष्णता इन्सुलेशन ( insulation) खराब करते, कंडक्टर कमकुवत करते आणि स्पार्किंग किंवा तप्त संपर्क ( glowing contact) निर्माण करते, जे आग लागण्याचे स्त्रोत ठरतात.
सैल जोडणी ( loose connection) प्रामुख्याने स्विचेस, सॉकेट्स, डिस्ट्रीब्युशन बोर्ड्स, MCBs, कॉन्टॅक्टर्स, स्टार्टर, मीटर्स आणि पॅनल बसबार्सच्या टर्मिनल्सवर आढळते. तसेच जंक्शन बॉक्समधील केबल जॉइंट्स, स्प्लायसेस आणि टर्मिनेशन्स येथेही ती सामान्यपणे दिसते. कंपन, तापमानातील बदल (thermal expansion) किंवा लोडमधील सतत बदल यांमुळे ही ठिकाणे अधिक कमजोर बनतात.
खराब टर्मिनेशनचे एक प्रमुख कारण म्हणजे लग्स (lugs) आणि फेरूल्स (ferrules) यांचा अभाव किंवा चुकीचा वापर. मल्टी-स्ट्रँड वायर थेट टर्मिनलमध्ये घातल्यास स्ट्रँड्स असमान पसरतात आणि योग्य संपर्क होत नाही. अनेकदा केबल्स किंवा वायर योग्य जॉइंटिंग किट किंवा कनेक्टर न वापरता जोडल्या जातात. कालांतराने स्ट्रँड्स तुटतात, ऑक्सिडेशन होते आणि प्रतिकार अधिक वाढतो. योग्य प्रकारे दाबून जोडलेले (crimp) केलेले लग्स आणि फेरूल्स समान संपर्क दाब देतात आणि दीर्घकालीन स्थिरता सुनिश्चित करतात.
टर्मिनल योग्य प्रकारे घट्ट न करणे हे आणखी एक सामान्य कारण आहे. कमी घट्ट केल्यास जोडणी कालांतराने सैल होते. अतिशय जास्त घट्ट केल्यास कंडक्टर किंवा टर्मिनल खराब होऊ शकते, ज्यामुळे संपर्क तुटतो. योग्य टॉर्क (torque) योग्य साधनांनी लावणे अत्यावश्यक आहे, परंतु घाई किंवा प्रशिक्षणाच्या अभावामुळे हे अनेकदा दुर्लक्षित होते.
निकृष्ट दर्जाच्या साहित्याचाही मोठा वाटा असतो. कमी दर्जाचे लग्स, कनेक्टर्स, टर्मिनल ब्लॉक्स आणि स्क्रू लवकर गंजतात, स्प्रिंग प्रेशर गमावतात आणि विद्युत भारावर ( on electric load) निकामी होतात. दमट, धुळीच्या किंवा गंजकारक वातावरणात ही समस्या अधिक वेगाने वाढते आणि जोडण्या लवकर खराब होतात.
तात्पुरत्या किंवा वारंवार केल्या जाणाऱ्या जोडण्या अत्यंत धोकादायक असतात. घरे, कार्यालये, दुकाने आणि उद्योगांमध्ये अनेकदा तात्पुरते जोडले जातात. तेही योग्य टर्मिनेशनशिवाय. प्रत्येक नवीन जोडणीमुळे जोड (joint) निकामी वा कमकुवत होतो. कालांतराने साधी वाटणारी जोडणी उच्च प्रतीकार असलेला उष्णता निर्माण करणारे ठिकाण बनते.
सैल जोडण्या (loose connections) विशेषतः धोकादायक असतात कारण त्या लगेच संरक्षण उपकरणे खंडित (trip) करत नाहीत. विद्युत प्रवाह (current) मर्यादेत राहू शकतो, पण उष्णता हळूहळू वाढत राहते किंवा अधूनमधून ठिणगी (sparking) निर्माण होत राहते. ही शांत उष्णता किंवा स्पार्किंग इन्सुलेशन कार्बनाइज करते आणि जवळच्या ज्वलनशील वस्तूंना आग लावते.
याची काही दृश्य लक्षणे (visible signs) म्हणजे इन्सुलेशनचा रंग बदलणे, जळका वास येणे, दिवे लुकलुकणे (flickering lights), चरचर आवाज (crackling sound) येणे, तसेच टर्मिनल्स किंवा प्लग पॉइंट्स गरम होणे. या विद्युत धोक्याची चिन्हांकडे (warning signs) दुर्लक्ष करणे ही गंभीर चूक आहे. नियमित तपासणी आणि प्रतिबंधक देखभाल (preventive maintenance) अत्यावश्यक आहे.
सैल जोडणी आणि खराब टर्मिनेशन्स ही प्रामुख्याने खराब कारागिरीमुळे निर्माण होतात. कुशल तंत्रज्ञ, योग्य साहित्य, योग्य साधने आणि नियमित तपासणी यांमुळे मोठ्या प्रमाणावर विद्युत आगी टाळता येऊ शकतात.
पुढील लेखात आपण उत्सवी प्रकाशयोजना याबद्दल चर्चा करू, आणि अनियंत्रित लोड वाढ कशी विद्युत प्रणालीला अग्निधोक्यात रूपांतरित करते ते पाहू.
तात्पुरत्या जोडण्या टाळा -आग टाळा.
ajitnkulkarni@yahoo.com
(लेखक वीजविषयक सल्लागार आहेत.)
