|| अ‍ॅड. तन्मय केतकर

नवीन परिपत्रक

महारेरामधील प्रकरणे निकाली निघण्यास होणारा विलंब मुख्यत: सुनावणी तहकूब झाल्याने होत होता, तसेच ऑनलाइन सुनावणी सुरू झाल्यानंतर सुनावणीदरम्यान संदर्भ म्हणून वापरलेली कागदपत्रे शोधून त्याचे अवलोकन करणेदेखील अडचणीचे ठरत होते. या दोन मुख्य समस्यांवर उपाययोजना करण्याचा प्रयत्न या नवीन परिपत्रकाद्वारे करण्यात आलेला आहे.

बदलत्या परिस्थितीनुरूप विविध परिपत्रकांद्वारे कालसुसंगत बदल करण्याचे धोरण महारेरा प्राधिकरणाने सुरुवातीपासूनच राबविलेले आहे. त्याच अनुषंगाने दिनांक ०८ सप्टेंबर २०२१ रोजी महारेरा प्राधिकरणाने रेरा तक्रार सुनावणी प्रक्रियेत बदल करणारे नवीन परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

नवीन परिपत्रकानुसार, प्रकरण सुनावणी तहकुबीबाबत- १. कोणत्याही पक्षकाराला दोनपेक्षा जास्त वेळा प्रकरणाची सुनावणी तहकूब करून मागता येणार नाही. २. तसेच अत्यंत रास्त कारण असल्याशिवाय सुनावणी तहकूब होणार नाही. ३. वकील इतरत्र व्यस्त असल्याच्या कारणास्तव सुनावणी तहकूब होणार नाही. ४. वकील आजारी असल्यास, अन्य वकील नियुक्ती अशक्य असल्याचे सिद्ध झाल्याशिवाय सुनावणी तहकूब होणार नाही. ५. पक्षकार किंवा वकिलाची तयारी नसल्याच्या कारणास्तव सुनावणी तहकूब होणार नाही, असे महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत.

नवीन परिपत्रकानुसार, सध्याप्रमाणे ऑनलाइन सुनावणी सुरूच राहणार आहे. मात्र, एखाद्या प्रकरणात महारेरास प्रत्यक्ष सुनावणी आवश्यक वाटल्यास तशी प्रत्यक्ष सुनावणी ठेवता येणार आहे.

नवीन परिपत्रकानुसार आता ऑनलाइन प्रकरणांसोबतच, सुनावणीच्या तारखेच्या किमान सात दिवस आधी कन्विनियंस डॉक्युमेंट सेट महारेरा कार्यालयात प्रत्यक्ष (ऑफलाइन) जमा करणे बंधनकारक आहे. या कन्विनियंस डॉक्युमेंट सेटमध्ये पहिले पान वकीलपत्र किंवा प्राधिकृत प्रतिनिधीचे नियुक्तीपत्र आणि त्यानंतर सुनावणीमध्ये संदर्भाकरिता वापरण्यात येणारी कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. मात्र या कन्विनियंस डॉक्युमेंट सेटमधील कागदपत्रांची एकूण संख्या २० पेक्षा अधिक असू नये असेदेखील स्पष्ट करण्यात आलेले आहे. या कन्विनियंस डॉक्युमेंट सेटला पानांचे अनुक्रमांक देणेदेखील आवश्यक आहे. महारेरामधील प्रकरणे निकाली निघण्यास होणारा विलंब मुख्यत: सुनावणी तहकूब झाल्याने होत होता, तसेच ऑनलाइन सुनावणी सुरू झाल्यानंतर सुनावणीदरम्यान संदर्भ म्हणून वापरलेली कागदपत्रे शोधून त्याचे अवलोकन करणेदेखील अडचणीचे ठरत होते. या दोन मुख्य समस्यांवर उपाययोजना करण्याचा प्रयत्न या नवीन परिपत्रकाद्वारे करण्यात आलेला आहे. या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास प्रकरणे जलद गतीने निकाली निघून तक्रारदारांना त्याचा फायदा होईल, अशी आशा आहे.

tanmayketkar@gmail.com