ॲड. तन्मय केतकर
बांधकाम व्यवसायाचे स्वरूप लक्षात घेता, बांधकाम पूर्ण न झालेल्या बहुतांश प्रकल्पांचे काम हे ग्राहकांकडून वेळोवेळी मिळालेल्या पैशांतूनच करण्यात येते. प्रामाणिकपणे काम केल्यास यात विकासक आणि ग्राहक कोणाचेही नुकसान नाही. मात्र पैसे घेऊन काम न करण्याची काही प्रकरणे घडल्याने नवीन रेरा कायद्यात कलम ४ आणि नियम ५ मधील तरतुदीने, ग्राहकांचे पैसे स्वतंत्र खात्यात ठेवणे आणि कामाच्या प्रगतीच्या, सनदी लेखापाल, वास्तुविशारद आणि अभियंता यांच्या प्रमाणपत्र सादरीकरणानंतरच ते पैसे काढण्याचे बंधन विकासकांवर घालण्यात आले होते.
दिनांक ७ जून २०१७ रोजीच्या परिपत्रकाने महारेरा प्राधिकरणाने या तरतुदीत काहीशी सूट देऊन, स्वतंत्र खात्यातून पैसे काढण्याकरता प्रमाणपत्र सादरीकरणाऐवजी केवळ स्वसाक्षांकित घोषणापत्र देण्याची तरतूद करण्यात आली. या परिपत्रकाने मूळ कायद्यातील अत्यंत महत्त्वाच्या ग्राहकहिताच्या तरतुदीपासून विकासकांस सूट देण्यात आल्याने, ग्राहकांच्या पैशांच्या वापरावरील बंधने कायद्यात असूनही प्रत्यक्षात नसल्यासारखी अवस्था झाली होती.
दिनांक २८.१२.२०२१ रोजीच्या परिपत्रक ३९ नुसार महारेरा प्राधिकरणाने या संदर्भातील मूळ कायद्यातील मूळ तरतूद पुन्हा अमलात आणलेली आहे. या नवीन परिपत्रकानुसार आता प्रत्येक विकासकास प्रत्येक प्रकल्पातील स्वतंत्र खात्यातून पैसे काढण्याकरता सनदी लेखापाल, वास्तुविशारद आणि अभियंता यांची प्रमाणपत्रे बॅंकेत आणि महारेरा प्राधिकरणाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या सुधारणेच्या अनुषंगाने महारेरा विनियम (रेग्युलेशन) मध्येदेखील आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. हे परिपत्रक तातडीने अमलात येणार असून, या परिपत्रकाने दिनांक ७ जून २०१७ रोजीचे परिपत्रक क्र. ३ रद्द केल्याचेदेखील स्पष्ट करण्यात आलेले आहे.
ग्राहकांचे पैसे हे त्यांनी गुंतवलेल्या प्रकल्पाकरताच वापरले जाणे हे ग्राहकहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्याकरताच मूळ कायद्यात उपरोक्त तरतूद करण्यात आलेली होती. मध्यंतरी दिनांक ७ जून २०१७ रोजीच्या परिपत्रकानुसार, या तरतुदीपासून सूट मिळाल्याने, ग्राहकांच्या पैशांबाबत असलेली सुरक्षितता काहीशी धोक्यात आलेली होती. आता नवीन परिपत्रकाने कायद्यातील मूळ आणि ग्राहकहिताची तरतूद पुन्हा प्रत्यक्षात अस्तित्वात येणार आहे, ही ग्राहक आणि त्यांनी गुंतवलेल्या पैशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निश्चितच समाधानाची बाब आहे.
tanmayketkar@gmail. Com
