इंटीरिअर डिझायिनगचं काम सुरू करण्याआधी प्लॅिनग आणि डिझायिनगची बठक पक्की असावीच लागते, पण याबरोबरच इतरही अनेक गोष्टी, शक्यता विचारात घ्याव्या लागतात. एखाद्या वास्तूत (घर, ऑफिस, दुकान वगरे) काम सुरू केल्यावर काही जागा विशेषत: कॉर्नर्स, बीम्स, कॉलम्स नजरेआड करून चालत नाही. या अशा जागा असतात, ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर मेहनतीने केलेल्या इंटीरिअरला परफेक्ट लूक मिळत नाही. काही तरी चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. म्हणूनच असे कॉर्नर्स, कॉलम्स, बीम्स यांनासुद्धा खास इंटीरिअर टच देणं आवश्यक आहे. कोणत्याही वास्तूत (इमारत, घर, दुकान) बीम्स, कॉलम्स नाहीत असं होऊच शकत नाही. त्या आधारावरच वास्तू उभ्या राहातात आणि त्यानंतर स्लॅब, िभती, खिडक्या, दरवाजे बांधले जातात. साहजिकच हे तयार करत असताना कॉर्नर्स किंवा खाचे तयार होत असतात. ते अपरिहार्य आहे, तर कधी कधी फíनचरच्या मांडणीमुळे कॉर्नर्स निर्माण होतात. उदाहरणार्थ- वॉर्डरोब किंवा सीटिंग अॅरेंजमेंटच्या मांडणीत कॉर्नर्स किंवा खाचे हमखास तयार होतात. मग अशा वेळी या जागासुद्धा विशिष्ट पद्धतीने सजवणं गरजेचं असतं आणि ही सजावटदेखील इतर सजावटीशी मिळतीजुळती किंवा एकसंध असावी लागते. एखादा कॉलम किंवा कॉर्नर कसा सजवायचा हे तिथल्या इतर वस्तूंवर, सजावटीवर अवलंबून असतं. समजा दिवाणखान्यात एखादा कॉलम आलाय किंवा कॉर्नर आहे, तर त्याला सजावटीच्या दृष्टीने काय ट्रीटमेंट द्यायची हे ठरवावं लागतं. म्हणजे असं की, दिवाणखान्यात शोभेच्या वस्तूंची गर्दी नसेल, तर अशा कॉलमला किंवा कॉर्नरला स्पेशल टच द्यावा किंवा ही जागा वेगळ्या रंगाने रंगवून (खोलीला जो रंग आहे त्यापेक्षा वेगळा, पण मेळ खाणारा. खोलीची रंगसंगती लाइट असेल तर कॉलम किंवा कॉर्नरला गडद रंग द्यावा.) तिथे एखादं पेंटिंग किंवा वॉल हँिगग लावावं. या ठिकाणी वारली पेंटिंगसुद्धा सुरेख दिसतं. ग्लास शेल्फ बसवून तिथे फोटो फ्रेम्स, फ्लॉवर पॉट्स, शोभेच्या वस्तू ठेवता येतील. या पद्धतीची सजावट नको असेल तर या जागेच्या भिंतींना वेगळं टेक्श्चर करून ही जागा उठावदार करता येते. दोन-तीन रंगांची रंगसंगती करूनही या जागेला सजवता येतं. या ठिकाणच्या फॉल सीिलगलाही वेगळी ट्रीटमेंट द्यायला हरकत नाही. इथे स्पॉट लाइट्स किंवा हँिगग लॅम्प, फ्लोअर लॅम्पनी ही जागा प्रकाशित करता येते. वॉल पेपर लावून ही जागा वेगळी, आकर्षक भासवता येते. हा पर्यायसुद्धा अनेकांना नेहमीचाच (कॉमन) वाटतो. अशा वेळी डेकोरेटिव्ह किंवा नॅचरल टाइल्स लावूनही या जागेचं सौंदर्य वाढवता येतं. एखादा कॉर्नर आकाराने मोठा मिळत असेल (घर किंवा ऑफिस कुठेही) आणि तुम्हाला जर का फिश टॅंकची आवड असेल तर अतिशय कल्पकतेने इथे फिश टॅंकची रचना करता येते. असा कॉर्नर वेगळा, उठावदार व सुंदर दिसतो. कधी कधी कॉर्नर जिथे निर्माण होतो त्या दोन िभतींपकी एका िभतीत कॉलम येतो. अशा वेळी तिथे वेगळ्या आकाराचा खाचा तयार होतो. या खाच्याचा आकार कमी-जास्त असतो. त्यानुसार तिथे सजावट करावी लागते. तिथे जर व्यवस्थित जागा मिळत असेल तर छोटंसं कपाट करायचं, का ती जागा मोकळी ठेवून काचेचे शेल्फ देऊन शोभेच्या वस्तू ठेवायच्या हे पर्याय निवडता येतात.  
पुस्तकप्रेमींसाठी तर या जागा म्हणजे पर्वणीच आहेत. अशा लोकांच्या वास्तूतील कॉर्नर्स पुस्तकांच्या शेल्फनी मस्त सजवता येतात. यातून त्यांचं पुस्तकप्रेमही दिसून येतं आणि कॉर्नर्सचा सही उपयोगही होतो. घर आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी अशी रचना खूप सुरेख दिसते. या ठिकाणी पुस्तकांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
वैयक्तिक खोल्यांमधले कॉर्नर्स, कॉलम्स आपल्या आवडीनिवडींचा विचार करून उत्तमरीत्या सजवू शकतो. पुस्तकं, स्वत: काढलेले फोटोज्, पेंटिंग्ज, रूम मोठी असेल तर एखादं छोटेखानी कपाट, संगीताची आवड असेल तर आवडीच्या सीडीज्, तबला-डग्ग्याची छोटी प्रतिकृती, तसंच अॅण्टिक वस्तू, नृत्याची आवड असेल तर त्या संदर्भातल्या वस्तू अशा नानाविध कल्पनांनी ही जागा आपण सजवू शकतो. तज्ज्ञ व्यक्तीकडून या जागा कशा सजवाव्या, या संदर्भातल्या कल्पना जाणून घ्याव्यात. अनेक पर्यायांतून आपल्या आवडीचा पर्याय निवडून या दुर्लक्षित जागांना एक अर्थपूर्ण लुक देता येतो.