ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा नजरेसमोर ठेवून त्यांची खोली किंवा त्यांचं घर सजवावं लागतं. इथेही नियोजन आणि सुंदरता हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात.
को णत्याही घराची गृहसजावट करताना घरात वयस्कर व्यक्ती आहेत का, त्यांची संख्या किती, त्यांचं वयोमान, काही आजार असे असंख्य प्रश्न विचारात घेणं महत्त्वाचं असतं. कारण त्यांच्या वयोमानानुसार त्यांच्या गरजा या इतरांपेक्षा निश्चितच वेगळ्या असतात. त्यांच्या वयाचा विचार करता, घरातला त्यांचा वावर हा अधिक आरामदायी, कमी श्रमाचा कसा करता येईल, याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं.
सगळ्यात प्रथम मुलं, नातवंडं यांच्या सोबत एकाच घरात राहणाऱ्या आजी-आजोबांसाठी ते घर कसं आरामदायी करता येईल ते बघूया. इथेसुद्धा घराचं आकारमान अतिशय महत्त्वाचं ठरतं. जर वन बीएचके असेल तर जसं आपण आपल्या मुलांसाठीच्या आवश्यक गोष्टींसाठी जागा तयार करतो, तसंच ज्येष्ठांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी करणं गरजेचं ठरतं. ज्येष्ठांसाठी त्यांचं स्वत:चं असं एक कपाट किंवा स्वतंत्र, छोटेखानी वॉर्डरोब असावा. त्यात त्यांचे कपडे, आवश्यक कागदपत्र, वैद्यकीय कागदपत्रं, औषधं इ. व्यवस्थित ठेवता येतील असा वॉर्डरोब असावा. घरात त्यांना चटकन मिळतील अशा ठिकाणी आवश्यक त्या वस्तू ठेवाव्यात. जसे की, महत्त्वाचे फोन नंबर्स, रोज घ्याव्या लागणाऱ्या गोळ्या, पेन, कागद इ. या वस्तू तुम्ही हॉल, किचन, बेडरूम या तिन्ही ठिकाणी सहज ठेवू शकता. मुलांच्या स्टडी टेबलसमोर सॉफ्ट बोर्ड असेल तर तिथे एका बाजूला आजी-आजोबांसाठी महत्त्वाच्या गोष्टी- जसं की गोळ्यांच्या वेळा, फोन नंबर्स लिहून ठेवता येतील. घरातल्या फ्लोअर टाइल्स या गुळगुळीत नसाव्यात. यामुळे काही अपघात घडण्याची शक्यता असते. जर संपूर्ण घराच्या टाइल्स बदलणं शक्य नसेल तर घरातला जो रोजचा वावरण्यातला भाग आहे त्याठिकाणी गालिचा किंवा दरीज् अंथरावी. घरातल्या ज्येष्ठांना पुस्तकांची आवड असेल तर त्यांना सहजपणे हाताशी लागतील अशा ठिकाणी पुस्तकांची मांडणी करावी.
घर जर मोठं असेल आणि ज्येष्ठांसाठी स्वतंत्र खोली मिळत असेल तर त्यांच्या गरजांनुसार त्या खोलीत नियोजनबद्ध सजावट करणं खूप व्यवस्थित जमून येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजी-आजोबांच्या खोलीत सामानाची अडगळ असू नये. तिथला वावर जास्त सुटसुटीत असायला हवा. फíनचर आवश्यक इतकंच असावं. इथल्या खुच्र्या, बेड यांची उंची योग्य प्रमाणात असावी. उतारवयात सांधेदुखीच्या त्रासाने अनेक जण त्रस्त असतात. अशा वेळेस त्यांना बसताना, उठताना त्रास होणार नाही अशातऱ्हेने बठकीची रचना असावी. ज्येष्ठांच्या खोलीला लागून बाथरूमची सोय असणं आवश्यक आहे. घरात डीम लाइटची व्यवस्था केलेली असावी. त्यांच्या खोलीतलं फ्लोअिरग निसरडं नसावं. प्लिम्बग, ड्रेनेज याविषयीच्या तांत्रिक गोष्टी नीट तपासून घ्याव्यात. इलेक्ट्रिक बोर्ड, वायर्स हे चांगल्या प्रतीचे वापरलेले असावेत. नियमितपणे याची तपासणी केली जावी. कपाटं, दरवाजे, खिडक्या यांच्या कडय़ा व्यवस्थित असाव्यात.
बेडशेजारी छोटेखानी कपाट असावं. जिथे त्यांची रोजची औषधं, कागद, पेन, छोटी डायरी, चष्मा, फोन, टेबल लॅम्प या वस्तू ठेवता येतील, ज्या त्यांना सहज हाताशी मिळतील. इथेही सॉफ्ट बोर्ड असावा. त्यावर औषधांसंबंधित आवश्यक त्या सूचना, महत्त्वाचे फोन नंबर्स कागदावर लिहून तो कागद बोर्डवर नीट लावलेला असावा. म्हणजे घरातील इतर सदस्य जेव्हा त्यांच्या सोबत नसतात तेव्हा त्यांची कोणत्याही कारणाने गरसोय होणार नाही.
मुलं परदेशी आणि त्यांचे पालक इथे भारतात हे चित्र आज सर्रास पाहायला मिळतं. अशा वेळेस मुलांनी आपले आई-वडील एकटे राहणार असतील तर वरील सोयी घरात आवर्जून करून घ्याव्यात. त्यांच्या रोजच्या वापरातल्या वस्तू, घरातल्या इतर वस्तू जसं की, स्वयंपाकघरातील भांडी, खिडक्यांचे पडदे, उश्या, चादरी इ. नियमित लागणाऱ्या वस्तूंची मांडणी योग्य रीतीने केलेली असली पाहिजे. खूप खाली किंवा खूप उंचावर या वस्तू ठेवलेल्या नसाव्यात. त्यांचे काही छंद असतील उदा. पुस्तकं, गाणी, संगीताची आवड, बागकाम, तर त्यासाठी घरात नक्कीच एखादी तरी जागा असावी.
वयस्कर व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन किंवा शक्य असल्यास त्यांच्याशी विचारविनिमय करून सजावट केली तर ते अधिक चांगलं. मग ती एखादी खोली असो किंवा स्वतंत्र घर असो, ते त्यांच्यासाठी छान, आरामदायी आणि वावरायला सुटसुटीत असायला हवं.