वाडा वस्ती

बदलत्या काळाच्या नवसंकल्पनेनुसार तसेच आर्थिक स्तर उंचावल्याने वाडा संस्कृती आता इतिहासजमा होतेय, तरी वाडय़ाच्या वातावरणातून आधुनिक, स्वयंपूर्ण निवासात गेलेले रहिवासी ‘गुजरा हुवाँ जमाना’ म्हणत त्या वाडय़ाचे जुने दिवस आठवून हळवे होतात.

बदलत्या काळाच्या नवसंकल्पनेनुसार तसेच आर्थिक स्तर उंचावल्याने वाडा संस्कृती आता इतिहासजमा होतेय, तरी वाडय़ाच्या वातावरणातून आधुनिक, स्वयंपूर्ण निवासात गेलेले रहिवासी ‘गुजरा हुवाँ जमाना’ म्हणत त्या वाडय़ाचे जुने दिवस आठवून हळवे होतात. कारण वाडा संस्कृतीत आधुनिक सुविधा नव्हत्या, पण आज दुर्मीळ होत चाललेला जिव्हाळा, परस्परातील एकोपा आणि संवाद या वाडा संस्कृतीनेच जोपासला होता. वाद घालून संवाद साधणारी माणसं या वाडय़ाच्या वातावरणातूनच लहानाची मोठी झाली..
प्राथमिक अवस्थेतील मानवाने अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी निवारा म्हणजेच घराची गरज भागवताना स्वसंरक्षणाला महत्त्व दिलेय. कारण ज्ञात-अज्ञात शत्रूपासून तसेच अनाकलनीय नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यावर त्याचा भर होता. हजारो वर्षांच्या स्थित्यंतरातून प्रवास करताना माणसाला थोडंफार स्थैर्य लाभल्यावर आता त्या घराच्या बांधकामाला शास्त्रीय जोड लाभून ते स्थापत्यशास्त्र म्हणून जगभर मान्यता पावलंय. गरजेनुसार बांधकामाचा विकास साधताना आपल्या निसर्गदत्त बुद्धिमत्ता, कल्पकतेने या शास्त्रातूनच वास्तुकला, कमानकला, स्थापत्यकलांचा उगम झाला.
या उपरोक्त कलांचा आविष्कार महाराष्ट्रातील बऱ्याच ऐतिहासिक पाश्र्वभूमीच्या नगरामध्ये वावरताना दिसतो. इतकेच नव्हे तर त्यातील ‘वाडा’ स्वरूपाची बंदिस्त घरउभारणी ही काही पुरातन शहरांची ओळखच झाली आहे. सुमारे ६० वर्षांपूर्वीपर्यंत खान्देश, मराठवाडा, विदर्भ या इतिहासकालीन प्रदेशात आजही अल्प प्रमाणात ‘वाडा’ स्वरूपाचे बांधकाम आढळते. तर पेशवेकालीन पाश्र्वभूमीच्या पुणेनगरीतला वाडे संस्कृतीचा बाज हीच त्याची ओळखच होऊन गेली.
आधुनिक वास्तुकलेचा चेहरा धारण करण्याआधी पुण्याच्या बऱ्याच मोहलुमात ज्या पेठा होत्या (उदा. नारायण पेठ, गंज पेठ, सदाशिव पेठ, सोमवार ते रविवार पेठ) त्यातील काही वास्तूंना सुरक्षित वाडय़ांचे कोंदण होते. यातील काही वाडय़ांच्या ऐतिहासिक पाश्र्वभूमीमुळे तो सारा मोहल्ला ओळखला जायचा. लोकमान्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला गायकवाड वाडा हा त्याचा जिता-जागता दाखला आहे. पेशवाईच्या अखेरच्या पर्वापासून ज्या तालेवार कुटुंबांनी ही वाडा निवास संस्कृती रुजवली त्यांच्या नावांनीच हे वाडे ओळखले जात आहेत. उदा. नातूवाडा, सरदारवाडा, बापटवाडा, गोखलेवाडा इ.
सामाजिक-आर्थिक स्तरावर आधारित आपल्याकडे वास्तुउभारणी दोन प्रकारांत विभागली गेली. सर्वसामान्य नोकरदार वर्गासाठी प्राथमिक गरजा भागविणारी गृहव्यवस्था तर आर्थिक, उच्च वर्गासाठी स्वतंत्र, ऐस-पैस वाडा स्वरूपाची राहण्याची परिपूर्ण व्यवस्था.
पुण्यासहित अन्य ऐतिहासिक शहरातील अनेक खणांच्या घरांना वाडय़ामध्ये दर्शनी भागी मधोमध चौक, (त्या मधोमध बहुधा तुळशी वृंदावन) फरशीयुक्त अंगण, पुढे व मागे एक दोन मजली इमारती तर काही वाडय़ांना चौफेर सोपे, ओसऱ्या असायच्या. या वाडय़ातील दुमजली-तीनमजली इमारतींतून अनेक मध्यमवर्गीय कुटुंब पिढय़ान् पिढय़ा वास्तव्याला होती. वाडा संस्कृतीच्या बांधकामाच्या प्रारंभी धनाढय़, गर्भश्रीमंत कुटुंबांनी आपल्या परिवारासाठी ऐसपैस वाडे बांधून आपले ऐश्वर्य जपले होते. त्याची देखभाल करण्यासाठी त्यांच्या दिमतीला आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळही असायचे. त्याकाळी भल्यामोठय़ा वाडय़ात एकाच कुटुंबाचं वास्तव्य असायचं. स्वातंत्र्योत्तर काळात राहाणीमानाच्या संकल्पना आणि जीवनशैली बदलल्याने भल्यामोठय़ा वाडय़ातील प्रशस्त भाग स्वत:कडे ठेवून उर्वरित जागा अन्य गरजू कुटुंबीयांना भाडय़ाने उपलब्ध करून देण्याची पद्धती अस्तित्वात आली.
वाडय़ातील निवास व्यवस्थेमध्ये बहुतांशी मध्यमवर्गीय नोकरदार मंडळींचे वास्तव्य असायचे. त्यांच्या प्राथमिक गरजा भागवणाऱ्या सामायिक सुविधांमुळे तेथील रहिवाशांमध्ये आपोआप एकोपा निर्माण झालेला असायचा. या सामायिकपणामुळे परस्परांविषयी जिव्हाळा, आपलेपणा (कधी तरी झगडाही) असायचा आणि संकटसमयी परस्परांच्या मदतीला धावून जाणं हे गुणविशेष प्रकर्षांने जाणवायचे. या सामायिकतेमध्ये वाडय़ातील प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृह, पाणीपुरवठा करणारे नळ, प्रशस्त अंगण, आगमन-निर्गमनासाठी एकच जिना यांचा समावेश असायचा.
वाडय़ाच्या चौफेर भिंतींसहित, जोत्यापर्यंत बांधकाम मजबूत दगडांचे असायचे. त्यावर चुन्याचे प्लॅस्टर असलेल्या भिंती उभारताना त्या आत बाहेरून दीड-दोन फूट जाडीच्या असत. वाडय़ातील सदनिकांच्या खिडक्या, दरवाज्यांसाठी टिकाऊ लाकडांचा वापर व्हायचा. वाडय़ातील पहिल्या, दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी इमारतीच्या भिंतीतूनच अथवा अंगणातूनच सामायिक लाकडी जिने असायचे. अनेक वर्षे जिन्यातून माणसांची अव्याहत वर्दळ असूनही हे जिने जुने झाले तरी सुरक्षित असायचे.
तसेच लहानमोठय़ा वाडय़ांना आगमन-निर्गमनासाठी एकच भला मोठा दरवाजा असायचा. हा दरवाजा रात्रीचा बंद करण्याची पद्धती होती. या एकाच दरवाज्यामुळे वाडय़ाची सुरक्षाही सांभाळली जायची. ५०-६० वर्षांपूर्वी वाडय़ातील फक्त पुरुष वर्गच नोकरी-व्यवसायासाठी दिवसभर वाडय़ाबाहेर पडत असे. या सुरक्षिततेमुळे घरी असलेला ज्येष्ठ नागरिक वर्ग निर्धास्तपणे वामकुक्षी घेत असे.
सुखवस्तू, एकत्र कुटुंबजीवन शैली जगणाऱ्या धनाढय़ लोकांनीच असले प्रशस्त वाडे उभारलेले दिसतात. त्यांचं बांधकाम करताना परिसरातील सहज उपलब्ध होणाऱ्या दगड, विटा, लाकूड या बांधकाम साहित्याचा वापर करण्यावर त्यांचा भर होता. वाडे उभारताना दैनंदिन जीवनावश्यक सोयीबरोबर संरक्षण हा घटक महत्त्वाचा धरला गेलाय. वाडा स्वरूपाच्या गृहरचनेची कल्पना अस्तित्वात येण्याआधीदेखील राज्यकर्त्यांनी बांधलेले किल्ले तसेच गढी स्वरूपाच्या बांधकामात संरक्षण हा प्रधान हेतू होताच. या सर्व बांधकाम प्रकारात येण्या-जाण्यासाठी एकच दरवाजा हे साधम्र्य दिसते.
असे आढळते की ‘वाडा’ स्वरूपाचे बांधकाम भौगोलिकदृष्टय़ा उंचावरील सधन प्रदेशात झाले आहे. पश्चिम प्रांतातील कोकणभूमीत वाडे दिसत नाहीत तर वाडय़ाच आढळतात..
‘वाडा’ निवास व्यवस्थेत सुरुवातीस काही भाग धान्यकोठी असायच्या, तसेच बाळंतिणीची खोली, देवघरासाठी काही जागा आरक्षित असायची. वाडय़ाच्या एकमेव प्रवेशद्वारातून आगमन होताच एखादे छोटेखानी मंदिर किंवा भिंतीच्या कोनाडय़ात देवाच्या मूर्तीला खास करून जागा असायची. तसेच वाडय़ाच्या पहिल्या-दुसऱ्या मजल्यावरील सज्जे उभारणी म्हणजे हवा प्रकाशाच्या सोयीबरोबर परिसराचे बाह्य़दर्शन घडवणारी जागा होती.
भलेभक्कम वाडय़ासाठी पत्थराचे बांधकाम करताना बैलघाणीत मळलेल्या चुन्याचा उपयोग होत असे, कारण त्या काळी बांधकामासाठी सिमेंट ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. तर जवळजवळ सर्वच वाडे त्या कुटुंबाच्या नावाने त्यांना प्राप्त झालेल्या हुद्दय़ासह ओळखले जात  (उदा. सरदारवाडा, सुभेदारवाडा, इनामदारवाडा, देशमुखवाडा इ.).
औद्योगिकीकरण-शहरीकरणापाठोपाठ विस्तारणाऱ्या पुण्यासारख्या शहरातून वाडा संस्कृती आता इतिहासजमा होतेय. वाडे नामशेष होऊन त्या जागी आता अत्याधुनिक, स्वयंपूर्ण, टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. मात्र जुन्या वाडय़ांच्या नावांनीच नवीन गृहसंकुल, परिसर ओळखला जातोय. जसे शहरातील नवीन नावं धारण केलेल्या रस्त्यांना जुन्या नावांनीच अद्याप ओळखले जाते.. ठाणे-मुंबईतही काही वाडे काल-परवापर्यंत आपलं अस्तित्व टिकवून होते. उदा. ठाण्यातील पेशवेकालीन सरदार बिवलकरांचा वाडा, जोशीवाडा तर मुंबईतील मराठी वस्तीमधील नाना शंकरशेठ यांचा वाडा इ. पुण्यातील वाडय़ांच्या मानाने त्यांची संख्या नगण्य असेल, पण हे वाडे म्हणजे गतइतिहासाचे मापदंडच आहेत.
बदलत्या काळाच्या नवसंकल्पनेनुसार, तसेच आर्थिक स्तर उंचावल्याने वाडा संस्कृती इतिहासजमा झाली तरी वाडय़ाच्या वातावरणातून आधुनिक-स्वयंपूर्ण निवासात गेलेले रहिवासी ‘गुजरा हुवाँ जमाना’ म्हणत वाडय़ाचे जुने दिवस आठवून हळवे होतात. कारण वाडा संस्कृतीत आधुनिक सुविधा नव्हत्या, पण आज दुर्मीळ होत चाललेल्या जिव्हाळा, एकोपा आणि संवाद या वाडा संस्कृतींनीच जपला होता. ..वाद घालून संवाद साधणारी माणसं या वाडय़ाच्या वातावरणातूनच लहानाची मोठी झाली. पुण्यासारख्या वाडे संस्कृतीच्या शहरांनी शांतता, सुरक्षितता एकोपा सांभाळत सामाजस्वास्थ्याची जपणूक केली होती. त्याच वाडय़ांना फ्लॅट संस्कृतीचा चेहरा लाभला. त्याचा परिणाम सामाजिक स्वास्थ्यावरही झालाच. वाडे पाडून नवीन स्वयंपूर्ण इमारतीच्या तळमजल्यावरील व्यापारी तत्त्वावरील जागांमुळे सभोवतालचा सारा परिसर आवाजासह, वायू प्रदूषणांनी ग्रासला आहे..
वाडय़ाच्या बाळबोध, सुसंस्कृत वातावरणातून वाढलेली संस्कारक्षम पिढी आपला उत्कर्ष साधण्यासाठी देश-परदेशात कुठेही गेली तरी त्यांची नाळ मूळच्या वाडय़ांशीच जुळलेली असते. आठवणींवर स्वार झालेले त्यांचे संवेदनशील मन वाडय़ांनी बदललेल्या नवीन रूपडय़ाकडे काही केल्या आकर्षित होत नाही.. पण हे वास्तव आता स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही..

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mansion residential home