मे महिन्यात चाळीत आइस्क्रीम करण्याचा दिवस मुक्रर केला जात असे. अर्थात एखादा रविवार किंवा अन्य सुट्टीचा वार पाहिला जाई. आइस्क्रीम बनविण्यासाठी आइस्क्रीम पॉट लागतो, तो भाड्याने किंवा कोणाकडे खासगी असेल तर आणायचा.
तो दिवस उजाडला की आइस्क्रीम बनविण्यासाठी लागणारी सामग्री मिळविण्याची लगबग सुरू होत असे. त्या काळी दूध फक्त सरकारी दूध सेंटरवर विक्रीसाठी उपलब्ध असे आणि तेसुद्धा हवे तेवढे नाही. प्रत्येक कुटुंबाला सरकारने नेमून दिलेल्या कोट्याइतकेच. त्यामुळे आइस्क्रीम बनविण्यासाठी बर्याच प्रमाणात लागणारे दूध कसे मिळवायचे याचे मोठे प्लानिंग करावे लागत असे. नाना क्लृप्त्या लढवाव्या लागत. बर्फाच्या फॅक्टरीतून बर्फ आणायचा. काळे मीठ- ते मात्र कुठेही सहज विकत मिळत असे.
आइस्क्रीम पॉट म्हणजे एक लाकडाची बादली, त्या बादलीच्या बरोबर मधोमध धातूचा अर्थात तो ॲल्युमिनिअमचा एक उभा डबा. या उभ्या आकाराच्या ॲल्युमिनिअमच्या दंडगोल डब्याच्या तळाशी बरोबर मध्यभागी असणार्या एका धातूच्या पॉइंटरवर, लाकडी बादलीच्या तळावर बसवलेल्या खोबणीत बसविला असल्यामुळे तो वेगात फिरू शकतो. या उभ्या डब्याच्या आणि लाकडी बादलीच्या मधल्या पोकळीत बर्फाचे लहान तुकडे घालून ती पोकळी चांगली खच्चून भरून टाकायची, त्यात काळे मीठ भरायचे, त्यांनी बर्फ वितळण्याची प्रक्रिया मंदावते आणि बर्फ अधिक काळ टणक स्वरूपात टिकून राहतो. आइस्क्रीम पॉट फिरवताना, बाजूचा बर्फ कमी होऊ लागला की त्यात अजून भर घालत राहायची. या उभ्या धातूच्या भांड्याच्या झाकणाच्या वर, चक्राकार दाते असतात, आणि ते चक्राकार दाते फिरवील असे दुसरे चक्राकार दाते असलेले हँडल बाहेरच्या लाकडी बादलीला घट्ट बसेल अशी व्यवस्था केलेली असते.
डब्याच्या आत फिरेल अशी धातूची चापटी रवी झाकणाला आतल्या बाजूने जोडलेली असते. त्या डब्यात साखर घालून गोड केलेले, गरम करून थंड केलेले दूध घालायचे, त्यात आंब्याचा रस किंवा व्हॅनिला, केशर वा अन्य कुठला तरी स्वाद आणि असल्यास सुक्या मेव्याचे तुकडे घालायचे. झाकण बंद करून, हँडल फिरवायला सुरुवात करायची. प्रथम प्रथम अगदी सहज फिरणारे हँडल डब्यातल्या दुधाचे घट्ट असे आइस्क्रीम होत जाईल तसतसे फिरवायला जड जड येऊ लागते. तेथे फिरवणार्याच्या ताकदीचा कस लागतो. बाहेर मे महिन्याचा मुंबईतील घामाघूम करणारा उकाडा आणि इतके श्रम केल्यानंतर बशीभर मिळणार्या आइस्क्रीमसाठी पॉट सतत फिरवत राहणे मोठे कष्टाचे काम असायचे. हे ताकदीचे प्रयोग सुरू असताना, सर्वांची तोंडे जरा सैलच सुटलेली असायची. बाजूला नुसताच बघत उभा असणारा कोणी तरी, फिरवणार्यांच्या ताकदीवर विनोद करायचा आणि फिरवणारा त्याला सडेतोड उत्तर द्यायचा, पुढच्या खेपेला तू बस फिरवायला म्हणून आव्हान द्यायचा. पॉट फिरवणे अगदी कठीण झाले की हँडलपासून खालचा डबा मोकळा करायचा, आतला पंखा बाहेर काढायचा. त्याला लडबडलेले आइस्क्रीम चमच्याने काढून, आजूबाजूला, हातातल्या पंख्याने स्वत:ला वारा घेत, हातात रिकाम्या बश्या, वाट्या, चमचे घेऊन बसलेल्यांना वाढायचे आणि मग डब्यात तयार झालेले आइस्क्रीम काढून तेही वाटायचे.
या आइस्क्रीम समारंभातील सर्व भागीदार रहिवाशी आणि आइस्क्रीम पार्टीसाठी खास आलेली पाहुणे मंडळी पोटभर आइस्क्रीम खाऊन अगदी तृप्त व्हायचे. कोणी किती बश्या, किती वाट्या आइस्क्रीम हादडले त्याचा हिशोब व्हायचा. दाढदुखीमुळे कोणाला तरी त्यामानाने कमीच आइस्क्रीम खाता आले, त्याची हुरहूर लागलेली असायची. कोणा दमेकरीला, ‘यांनी मागितले तरी आइस्क्रीम देऊ नका’ म्हणून त्याची बायको सर्वांना तंबी देऊन गेलेली असायची, आणि तोसुद्धा एखाद्या समजूतदार गुणी मुलासारखा जेमतेम अर्धी बशीच आइस्क्रीम खाऊन उठायचा.
दुसऱ्या दिवशी साफसूफ केलेला आइस्क्रीम पॉट जिथून आणलेला असेल तेथे सायकलवरून पोहोचवला जायचा. नंतर काही दिवस त्या आइस्क्रीमच्या आठवणी आणि हिशोब यांच्या चर्चा चाळीत रंगायच्या आणि पुढल्या वेळी आइस्क्रीम करायला दुसर्यांचे घर बघा हो, म्हणून त्या घरची गृहिणी सांगायला विसरायची नाही. असे असले तरी पुढल्या वर्षीही कोणाच्या तरी घरी चाळीत उन्हाळ्यात सांघिक आइस्क्रीम पार्टी व्हायचीच.
gadrekaka@gmail
