सर्व सामान बांधून झाले. आतापर्यंत स्वच्छ, सुंदर वाटणाऱ्या घरात किती भयंकर पसारा होता हे सांगूनही खरे वाटत नव्हते. कचरा सगळा झाडला आणि घर ओकेबोके वाटू लागले. हॉलमध्ये झडलेल्या चर्चा, थंडीच्या दिवसात गॅलरीत बसून वाफाळलेली कॉफी घेत घालवलेली दुपार, उन्हाळ्यातली रंगीत संध्याकाळ आणि पावसाच्या सोबतीने मनात साठवलेला निसर्ग.. हे सारेच सुटणार म्हणून वाईट वाटत होते.
दोन पाटांच्या भिंतींनी उभे केलेले घरकुल..
मांडलेली भातुकली अशी रंगते.. अशी रंगते
आणि केव्हा एकदा पेटाऱ्यात मिटून जाते
इंदिरा संतांच्या ‘भातुकली’ कवितेमधील घरकुल दोन पाटांच्या भिंतींच्या आधारे उभे राहते आणि रंगलेली भातुकली पुन्हा एकदा पेटाऱ्यात मिटून जाते. खेळ मांडला आणि पाट उचलून मोडीत काढला असे सगळे सोपे असते तर किती बरे झाले असते नाही?
घर फिरले की घराचे वासेही फिरतात अशी आपल्याकडे एक म्हण आहे. हाच अनुभव गेल्या काही दिवसांत आला. कंपनी सोडल्यामुळे कंपनीने दिलेला फ्लॅट सोडणे क्रमप्राप्तच होते. ‘घर पाहावे बांधून’ असे म्हणतात, पण आम्हाला मात्र ‘घर पाहावे बदलून’ असे म्हणायची वेळ आली. वाणसामानाच्या दुकानातून रिकाम्या गोणी मागून आणल्या. घरातले सामान बांधायला सुरुवात केली आणि असे वाटले की नुसते कपडे आणि भांडी भरली की झाले. पण जसे जसे सामान भरायला सुरुवात झाली तसे तसे ‘वाढता वाढता वाढे’ या  उक्तीचा अनुभव येऊ लागला.
पलंगाच्या बॉक्समध्ये मुलींची लहानपणीची खेळणी, त्यांचे लहानपणीचे कपडे, विज्ञान, गणित आणि भाषेची प्रत्येक वर्षी जपून ठेवलेली पुस्तके. कारण ही पुस्तके केव्हाही कामी येतात. मुली आता कॉलेजला आहेत तरी सगळे काही जपून ठेवले. शालेय पुस्तकांव्यतिरिक्त मराठी साहित्य, हिंदी हास्य कविताऐं, सुधा मूर्ती, रवींद्रनाथ टागोर, हॅरी पॉटर, व्हॅम्पायर डायरी, टेल मी व्हाय, जवाहरलाल नेहरूंनी इंदिरा गांधींना लिहिलेली पत्रे, वेगवेगळे कोश असा मोठा स्पॅन होता. नेहमीच्या वापरातल्या चादरी, उशा, गाद्याही.. याव्यतिरिक्त पाहुण्यांसाठी राखून ठेवावे म्हणून प्रचंड साठा बाहेर आला. त्याची चांगली चार गाठोडी तयार झाली. दुसऱ्या बॉक्समधून तर हेरिटेज खजिना बाहेर आला. घरी संगीताची आवड असल्याने आजोबांच्या काळातला स्पूल्सवाला टेपरेकॉर्ड प्लेयर, पिन खराब झाली आणि दुसरी मिळत नाही म्हणून निकामी झालेला रेकॉर्ड प्लेयर, नंतरच्या काळात आलेला, पण आता कालबाह्य झालेला टेपरेकॉर्डर, त्यासोबतचे दोन स्पीकर्स, नव्वदीच्या दशकात आलेला व्हिडीयो कॅसेट टेपरेकॉर्डर आणि आता कार्यरत असलेला सीडी प्लेयर अरे बापरे.. केवढी ही जंत्री! त्याचप्रमाणे डेस्कटॉप, सीपीयू, कीबोर्ड यासोबतच नवऱ्याला ऑफिसकडून मिळालेला लॅपटॉप, मुलींना प्रेझेंटेशनसाठी लागणारा लॅपटॉप, त्या प्रत्येकाचे चार्जर्स, यूकॉर्ड, एक्स्टेंशन कॉर्ड याचा फाफटपसारा त्याचप्रमाणे अगदी पूर्वीचा हौशीने घेतलेला लेन्सचा मॅन्युअल कॅमेरा, त्यानंतरचा साधा कॅमेरा, व्हिडीओ कॅमेरा व आताचा डिजिटल कॅमेरा, सोबतच व्हिडीओ कॅमऱ्यात शूट केलेल्या असंख्य कॅसेट्स, त्यांचे सीडीत केलेले रूपांतर. या सर्व वस्तू बघितल्यावर लक्षात आले की, आपण या सर्व बदलांचे साक्षीदार आहोत आणि मनाला खूप समाधान वाटले.
गुजरातमधील भूजवरून आवडीने घेतलेल्या म्यानातल्या दोन तलवारी, मोराचा घुंगरू असलेला अडकित्ता, काश्मीरवरून घेतलेला शिकारा, अहमदाबादवरून आणलेला गांधीजींच्या आश्रमातील चरखा, कुलू-मनालीवरून घेतलेल्या गरम शाली, तिथल्या स्त्रिया डोक्याला बांधतात ते रंगीत स्कार्फ, आग्रा बघायला गेलो असता मुमताज महलच्या आठवणीचा संगमरवरी ताजमहाल, चेन्नईवरून मित्राने हौसेने पाठवलेला वेट ग्राइंडर म्हणजेच रुब्बू, कॉफी करायचे पर्कोलेटर, आसामच्या काझीरंगाच्या आठवणीचा लाकडी एकिशगी गेंडा, म्हैसूरवरून औषधी म्हणून आणलेल्या रक्तचंदनाच्या बाहुल्या, तिरुपतीवरून आणलेली लेपाक्षीची लाकडी खेळणी, गोव्यावरून आणलेली पितळेची मंगेशाची मूर्ती, भोपाळवरून मुलींसाठी हौशीने आणलेल्या मण्यांच्या पस्रेस.. ओहोहो! इथे तर सगळा भारत एकवटला होता. हा सगळा पसारा खराब होणार नाही आणि फुटणार नाहीत या हेतूने नीट बांधून ठेवला होता. या भारताला कुठे टाकणार? टाकायचा जीवही होत नव्हता. त्यामुळे बांधून घेतला.
स्वयंपाकघरातही असाच सगळा सावळागोंधळ होता. पणजोबांच्या काळातील त्यांनी वापरलेल्या चिनी मातीच्या डिशेस, कपबशा, भांडी. ही भांडी पणजींनी मग आजींनी आणि मग सासूबाईंनी जपून ठेवली म्हणून मग मीही ठेवली. पणजीच्या काळातले तांब्या-पितळेचे हंडे, घागरी, चहाची भांडी, पानसुपारीचे नक्षीचे तबक यापासून ते खलबत्ता, जाते, सूप, नारळखोवणी ते आताच्या गॅस, मायक्रोवेव्ह, मिक्सपर्यंत सर्वच हजर होते.
माळ्यावर तर आनंदीआनंद होता. माळ्यावरचा पसारा पाहून माझी पक्की खात्री झाली की आपण बाजारात जाऊन वस्तू खरेदी करून आणतो ते नवीन अडगळ विकत घ्यायलाच जातो. फुटक्या डोळ्यांची बाहुली नि पाय तुटलेल्या टेडी पासून ते दरवर्षी शाळेत खेळात व सांस्कृतिक कार्यक्रमात मिळालेल्या मेडल्स, ट्रॉफीजपर्यंत हारीने रचले होते. फक्त त्यातील काही गोष्टी मात्र हेरिटेज होत्या. उदाहरणार्थ, पणजोबांचे शिसवी लाकडाचे दौत टाक ठेवायला खाच असलेले डेस्क, कागदपत्र ठेवायची लाकडी व टिनाची पेटी, नागपूरला तान्ह्या पोळ्याचे महत्त्व म्हणून मुलींच्या बालपणी आवडीने तयार करून घेतलेले चाकांचे रंगीत लाकडी बल अशा अनेक वस्तू होत्या. यातली खेळणी लहान मुलांच्या खेळणी केंद्राला भेट म्हणून दिली तरी निम्मा पसारा बाकी होता. तो सर्वच बांधून घेतला.
सर्व सामान बांधून झाले. आतापर्यंत स्वच्छ, सुंदर वाटणाऱ्या घरात किती भयंकर पसारा होता हे सांगूनही खरे वाटत नव्हते. कचरा सगळा झाडला आणि घर ओकेबोके वाटू लागले. या घरात आले तेव्हा मुली लहान होत्या, त्यांचे बोबडे बोल ऐकत, शाळेचा अभ्यास, परीक्षा या सगळ्या घडामोडीत दिवस कसे भुर्रकन उडून गेले कळलेच नाही. हॉलमध्ये झडलेल्या चर्चा, बेडरूममध्ये घालवलेले हळवे क्षण, स्वयंपाकघर हे तर कायमच प्रयोगशाळा होते. थंडीच्या दिवसात गॅलरीत बसून वाफाळलेली कॉफी घेत घालवलेली दुपार, उन्हाळ्यातली रंगीत संध्याकाळ आणि पावसाच्या सोबतीने मनात साठवलेला निसर्ग हे सारेच सुटणार म्हणून वाईट वाटत होते.
गेली सोळा वष्रे हा आस्वाद घेत होतो, पण आता जास्तच खंत वाटत होती. निघते वेळी काही राहिले का म्हणून चक्कर टाकली तर अरेच्चा! वृंदावनातली तुळस डोलून डोलून विचारत होती मला कसे विसरलीस? पण तिच्याकडे पाहिल्यावर वाईट वाटले. कारण इथून इतक्या लवकर जावे लागेल असे वाटले नव्हते. त्यामुळे तिला सिमेंटने पक्के केले होते. त्यातली तुळस खूप मोठी झाली होती, त्यामुळे उपटून नेणेही कठीण होते. जबरदस्तीने नेले तर तुळस मरायची भीती होती. शेवटी तिला मनोभावे नमस्कार केला आणि सांगितले, तुझी काळजी घेणारी कुणीतरी माझ्यासारखी लवकरच येईल. तिला पाणी घालण्याची व्यवस्था केली. आणि तिच्यासोबतच घराचादेखील निरोप घेतला. शेवटी मनात विचार आला, आता या जागेतून दुसरीकडे जायचे, पुन्हा नव्याने रुळायचे. जुन्या घराशी जुळलेले सूर विसरून नवीन बंदिशी बांधायच्या हे सोपे नसते. नवीन घरात आलो, सामानाची बांधाबांध, पुन्हा जुळवाजुळव या सर्व प्रक्रियेला दोन दिवस लागले. रात्री सारेच निवांत झाले. मुली थकूनभागून झोपल्या. त्यांच्या शांत व थकलेल्या चेहऱ्याकडे पाहताना विचारांचे काहूर उठले. यासुद्धा लग्न होऊन सासरी जातील, काही दिवसांनी रुळतीलही, पण एका जागेवरून दुसऱ्या जागी रुजण्याचा संक्रमण काळ त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठीसुद्धा किती कठीण असेल?

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
ditch that glass of ice cold water during summer
उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पीत आहात? आजचं सोडा ही वाईट सवय, तज्ज्ञांनी सांगितले कारण…
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा