scorecardresearch

सोयी-सुविधांनी युक्त अंबरनाथ-बदलापूर

निसर्गसंपन्न अशी अंबरनाथ-बदलापूर ही शहरे लोकांची स्वप्नातली घरे उपलब्ध करून देण्यात आघाडीवर आहेत. अनेक सोयी-सुविधांनी युक्त असलेली ही शहरे लोकांच्या पसंतीस उतरत आहेत.

सागर नरेकर
निसर्गसंपन्न अशी अंबरनाथ-बदलापूर ही शहरे लोकांची स्वप्नातली घरे उपलब्ध करून देण्यात आघाडीवर आहेत. अनेक सोयी-सुविधांनी युक्त असलेली ही शहरे लोकांच्या पसंतीस उतरत आहेत.
मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेले कल्याण पल्याडचे चौथ्या मुंबईतील महत्त्वाचे शहर म्हणून अंबरनाथची ओळख आहे. उद्योगाचे शहर म्हणूनही या शहराला ओळखले जाते. मराठीबहुल असलेले अंबरनाथ नैसर्गिकदृष्टय़ाही संपन्न शहर आहे. पूर्वेतील बहुतांश भाग झाडांनी व्यापला असून पश्चिमेतील आयुध निर्माणीमुळे शहराचा मोठा भाग हिरवागार आहे. त्यासह शहराच्या दोन्ही बाजूंना डोंगररांगा आहेत. शहरात सध्याच्या घडीला विविध प्रकारची विकासकामे वेगाने होत आहेत.
ठाणे जिल्ह्यची ओळख असलेल्या प्राचीन शिवमंदिराचा भारतीय पुरातत्व खात्यातर्फे जिर्णेद्धार होतो आहे. तर आसपासच्या परिसराचे सुशोभिकरण केले जाणार आहे. त्यामुळे अंबरनाथचे शिवमंदिर देशभरासाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. शहरात खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शुटिंग रेंज उभारण्यात आले आहे. मुंबई आणि पुण्यात ज्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शुटिंग रेंजची उभारणी करण्यात आली आहे, त्याच दर्जाचे शुटिंग रेंज अंबरनाथ शहरात आहे. या शुटिंग रेंजमध्ये प्रशिक्षण घेतलेले अनेक खेळाडू जागतिक स्पर्धामध्ये सहभागी झाले आहेत आणि होत आहेत.
अंबरनाथ शहर येत्या काही वर्षांत महापालिकेमध्ये रूपांतरीत होणार आहे. त्यामुळे शहरात महापालिकेच्या दर्जाच्या सोयी सुविधा उभारल्या जात आहेत. प्रशासकीयदृष्टय़ा वाढत्या शहरांचा कारभार सुरळीत करण्यासाठी सध्या सुसज्ज अशा प्रशासकीय इमारतीचे काम सुरू आहे. सांस्कृतिक शहर असलेले अंबरनाथ शहर शैक्षणिकदृष्टय़ाही संपन्न आहेत. अंबरनाथ शहरात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आहेत.
वाहतूक आणि दळणवळणाच्या सर्वच प्रकारच्या साधनांनी अंबरनाथ शहर जोडले गेले आहे. अंबरनाथ शहराच्या विस्तारीत पाले भागात अर्थात नवीन अंबरनाथमध्ये त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळते आहे. अंबरनाथ शहरात वेगाने पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत. राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो स्थानक, अत्याधुनिक रूग्णालये, विस्तारीत रस्ते, मुबलक पाणी, मार्के टप्लेस, शाळा, सभागृह अशा अनेक सुविधा येथील शहरात आजच्या घडीला उपलब्ध होणार आहेत. अंबरनाथपासून नवी मुंबई, मुंबई, ठाणे अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपले आहे.
* वाहतूक साधने
अंबरनाथमध्ये सध्या रेल्वे, रस्ते, उपरस्ते आणि महामार्ग आणि जलमार्गाना जोडणारे रस्ते यांची चांगली व्यवस्था आहे. ५० ते ७५ किलोमीटरच्या परिघात ठाणे, कल्याण, नवी मुंबई, मुंबई विमानतळ, जेएनपीटी तसेच अलिबाग, इगतपुरी अशी व्यवसायासाठी अत्यावश्यक ठिकाणे येतात.
अंबरनाथमधून एनएचएआयतर्फे या रस्त्याला जोडणारा एक फाटा (स्पर) प्रस्तावित जिथून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ फक्त २७ किलोमीटर अंतरावर येईल. मुंबई, नाशिक वडोदरा, जेएनपीटी अलिबागचा प्रवास सुलभ होईल. ७०० किलोमीटर लांबीचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग या दोन मोठय़ा शहरांतील प्रवासाचा वेळ १० तासांनी कमी करणार आहे आणि हा रस्ता अंबरनाथपासून केवळ १० किलोमीटरवर आहे.
१३५० किलोमीटर लांबीचा डीएमएफसी म्हणजे दिल्ली मुंबई फ्रेट कॉरीडॉर हा रेल्वेमार्ग राजधानी दिल्लीला जेएनपीटीशी सहज जोडू शकेल. हा प्रस्तावित रेल्वेमार्ग अंबरनाथ बदलापूरपासून फक्त १५ किलोमीटर अंतरावर आहे.
१२६ किलोमीटर लांबीचा विरार ते अलिबाग हा रस्ता आणि रेल्वे असलेला मल्टीमोडल कॉरीडॉर वडोदरा स्परला समांतर धावेल आणि वाहतुकीची भक्कम पर्यायी व्यवस्था निर्माण करेल.
या रस्त्यांव्यतिरिक्त पाईपलाईन रस्त्याचा विस्तार, केडीएमसी रिंग रोड, २८ किलोमीटरचा दहिसर मुरबाड रस्ता, व प्रस्तावित बुलेट ट्रेन यांना जोडणाऱ्या रस्त्यांचाही समावेश आहे.
मेट्रो १४ ही अंबरनाथसाठी महत्त्वाची ठरणारी मेट्रो आहे.
कल्याण खोणी तळोजा, कल्याण मेट्रो, भिवंडीमार्गे येणारी मेट्रो ५, पनवेल टिटवाळा, ठाणे शीळ फाटा, तुर्भे पाली आणि निअवली मार्गे ठाण्याला जाणारी मेट्रो १४ अशा विविश मेट्रो मार्गाद्वारे अंबरनाथ विकास परिसराला जवळ आणण्याची योजना प्रस्तावित आहे.
• पर्यटन उद्योग
हे क्षेत्र निसर्गरम्य असल्याने इथे पर्यटनासाठी जंगलवाटा, मनोरे, करमणुकीचे खेळ असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. येथील अंबरनाथ महोत्सव आपली सांस्कृतिक ओळख राखून आहे. या व्यतिरिक्त मलंगगडासारखी काही स्थळे विकसित केली जात आहेत. शिवमंदिर, चिखलोली धरण दुर्गाडी किल्ला वगैरे पर्यटनाची आकर्षण केंद्रे ठरतील.
जलद, सुनियोजित विकास
• एकनाथ शिंदे
नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री, ठाणे.
अंबरनाथ-बदलापूर शहरात गेल्या काही वर्षांत वेगाने नागरीकरण झाले आहे. नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास वेगवान करण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रामुख्याने अंबरनाथमधील अंतर्गत रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी देण्यात आला आहे. तसेच या दोन शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्यासाठी स्पेनच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करण्यासाठी १४४ कोटींचा निधी अपेक्षित असून, त्यापैकी ७३ कोटी एमएमआरडीए आणि १८ कोटी अंबरनाथ नगरपालिकेकडून तर ५ कोटी ५० लाख रुपये बदलापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत. तर उर्वरित ५० कोटी पीपीपी तत्वावर उभारण्यात येतील. याशिवाय अंबरनाथ शहराचे भूषण असलेल्या शिवमंदिराच्या सुशोभीकरण कामासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून ४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हजार वर्षांचा शिवमंदिराचा वारसा जतन करत त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठीदेखील प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय संपूर्णपणे लोकल सेवेवर अवलंबून असलेला हा भाग रस्तेमार्गाने मुंबईच्या जवळ आणण्यासाठी भविष्यात तो मेट्रोने जोडणेदेखील प्रस्तावित आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत या भागाचा जलद, पण सुनियोजित विकास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चाकोरीबद्ध विकासातून बाहेर पडण्याचा प्रयत्न
• डॉ. प्रशांत रसाळ
मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका.
अंबरनाथ शहर भविष्यातील महापालिका आहे. त्यामुळे नळ, गटार आणि पायवाटा या चाकोरीबद्ध विकासकामातून बाहेर पडून विकास करण्याचा प्रयत्न आहे. अंबरनाथ शहरात पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे केली जात आहेत. मुंबई नंतर अंबरनाथ शहर राहण्यायोग्य व्हावे यादृष्टीने सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य, शैक्षणिकदृष्टय़ा महत्त्वाचे प्रकल्प उभारले जात आहेत. रस्ते वाहतूक, दळणवळणाची साधने उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
समाधानी वास्तव्याची हमी
• प्रवीण पटेल
उपाध्यक्ष, अंबरनाथ-बदलापूर बिल्डर असोसिएशन (राज ग्रुप)
अंबरनाथ आणि बदलापूर शहरामध्ये पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होतो आहे. येथील रस्ते सिमेंटकाँक्रीटचे केले जात आहेत. रेल्वेसेवाही स्थानिकांच्या प्रवासाचे प्रमुख माध्यम आहेच, त्यात लवकरच मेट्रो मार्गाची भर पडणार आहे. दोन्ही शहरांमध्ये पाण्याची मुबलक सुविधा आहे. इतर अनेक प्रकल्प नागरिकांच्या समाधानात भर घालणार आहेत. परवडणारी घरे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये फक्त अंबरनाथ-बदलापूर शहरात उपलब्ध आहेत. ही या शहराची वैशिष्टय़े आहेत. त्यामुळे येथे वास्तव्यास येणाऱ्या आणि राहणाऱ्यांना समाधानी आयुष्य जगता येते आहे.
मूलभूत पायाभूत सुविधा
• योगेश गोडसे
मुख्याधिकारी, कुळगाव,बदलापूर नगरपालिका.
सुखकर, मोकळे आणि सुटसुटीत अशी बदलापूर शहराची ओळख आहे. या शहराची एक वेगळी संस्कृती आहे. उद्याने, मैदाने यांचा समावेश असलेले बदलापूर लहान मुले, खेळाडू, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा असलेले शहर आहे. तसेच ते सुरक्षितही आहे. शहरात पाणीपुरवठय़ाची मुबलक उपलब्धता असून, पाणीपुरवठा योजना अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. शहरातील सुमारे ८५ टक्के रस्ते काँक्रीटचे करण्यात आले आहेत. बदलापूर शहर राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, रेल्वेने जोडले गेले शहर आहे. भविष्यात ते मेट्रोनेही जोडले जाईल. रेल्वेची तिसरी-चौथी मार्गिका पूर्ण झाल्यास त्याचा या शहराला फायदा होईल. बदलापूर रेल्वे स्थानकही विकसित होत आहे. कुळगाव- बदलापूर नगरपालिका सॅटिस प्रकल्प उभारते आहे. भविष्यात बदलापूर शहर महापालिका म्हणून पुढे येईल. त्यासाठी मूलभूत पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न कायम राहील. परवडणाऱ्या शहरांच्या यादीत बदलापूर शहर अग्रस्थानी आहे. शहरामध्ये नाटय़गृह आणि इतर सुविधा येत्या काळात उभारल्या जातील.
परवडणारी घरे
• अजय ठाणेकर
अध्यक्ष, अंबरनाथ-बदलापूर,बिल्डर असोसिएशन.
अंबरनाथ-बदलापूर शहरांसाठी विकासाचे एक ध्येय ठेवण्यात आले आहे. शासनाचे धोरण आणि त्या माध्यमातून होणारी विकासकामे ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ‘अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशन’चा प्रयत्न आहे. अंबरनाथ, बदलापूर शहर सध्या अन्य शहरांशी चारही बाजूंनी जोडले जाते आहे. मेट्रो मार्गामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी या शहरांशी थेट शहर जोडले जाईल. ऐरोली-काटई महामार्गामुळे बदलापूर मुंबई अंतर कमी होईल. तळोजा मार्गामुळे नवी मुंबई विमानतळ अवघ्या काही मिनिटांतच येणार आहे. नाशिक महामार्ग गाठण्यासाठी नव्या रस्त्यांचा वापर होईल. विरार-अलिबाग कॉरिडॉरमुळे थेट गुजरातकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडता येईल. शहरात पाण्यासाठी यापूर्वीच ५० दशलक्ष लिटर आरक्षण मिळविण्यात आले आहे. त्याची योजनाही प्रस्तावित आहे. शहरात नवनव्या संकल्पनांवर गृहसंकुले उभारली जात आहेत.
वास्तव्यासाठी सर्वोत्तम पर्याय
• किसन कथोरे,आमदार, मुरबाड (बदलापूर)
भविष्याचा विचार करून बदलापूर शहरातील विकास प्रकल्पांचे नियोजन केले आहे. बदलापूर शहर हे अनेक राष्ट्रीय महामार्गाना जोडण्यात आले आहे. कांजूरमार्ग शीळफाटा मार्गे बदलापूर अशी मेट्रो रेल्वे प्रस्तावीत आहे. बदलापूर शहरासाठी मुबलक पाणी पुरवठय़ाची तजवीज करण्यात आली आहे. शहराची नव्याने पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आहे. दहिवली, भोज, कांजगांव, आंबेशिव, ढोके- दापिवली आदी वेशीवरच्या गावांमध्ये रिंगरूट मार्ग प्रस्तावित आहे. भविष्यात बदलापूर शहराची स्वतंत्र महापालिका झाल्यास अडचण होणार नाही, यादृष्टीने नियोजनही सुरू आहे. त्यामुळे मुंबई महानगर परिसरात वास्तव्यासाठी बदलापूर हा सर्वोत्तम पर्याय आहे.
भारतात महानगरांचा विकास झपाटय़ाने करण्यावरभर आहे. त्याचवेळी त्याच्या जवळ असलेली छोटी छोटी उपनगरे, शहरेसुद्धा विस्तारत आहेत, त्यांचा विकास होतो आहे. जशी मुंबई विस्तारत गेली त्याप्रमाणे आजूबाजूच्या नवी मुंबई आणि ठाणे शहराचा विकास झपाटय़ाने झाला. अजूनही मुंबईजवळची उपनगरे वेगाने वाढत आहेत. या विकासातले अतिशय महत्त्वाचे शहर आहे बदलापूर. या क्षेत्रात विकासाला पूरक ठरेल असे वातावरण आणि पायाभूत सुविधा सध्या नियोजित केल्या आहेत. म्हणूनच २०३१ पर्यंत बदलापूरचा भरीव, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.
कॉंक्रिट रस्त्यांचे जाळे मुंबई आणि उपनगरांशी जोडणारी मेट्रो, शहराच्या चारही बाजूंना असलेले राज्य महामार्ग, दोन राष्ट्रीय महामार्गाची पायाभरणी, मुबलक पाणी, निसर्गसंपन्न वातावरण आणि अत्याधुनिक सुविधांमुळे बदलापूर शहर गेल्या काही वर्षांत महानगरांच्या रांगेत आला आहे. याच कारणांमुळे मुंबई, उपनगरातून बाहेर पडलेला रहिवासी बदलापूर शहराला आपल्या स्वप्नातल्या घरासाठी निवडू लागला आहे. ही शहरे महानगरांकडे लवकरच वाटचाल करत असताना येथील हिरवाई टिकवून आहेत. पर्यटनाच्या दृष्टीनेही या शहरांमध्ये सुविधा उभारल्या जात असून त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील नागरिकांनी आता या शहरांकडे मार्गक्रमण सुरू केले आहे.
पश्चिमेला टाहुलीची डोंगररांग तर पूर्वेला वाहणारी उल्हास नदी या नैसर्गिक संपदेत बदलापूर शहराचे स्थान आहे. बदलापूर शहरात वृक्षांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हिरवेगारपणा शहरात पाहायला मिळतो. नैसर्गिक संपदेसोबतच या शहरांचा विकासही गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने झाला आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांत रस्ते निर्मितीला मोठय़ा प्रमाणावर वेग आला. स्थानिक नगरपालिका, एमएमआरडीए, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या मदतीने शहरात विविध रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून अनेक रस्ते प्रगतीपथावर आहेत. बदलापूर शहरातील जवळपास ९० टक्के रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केले गेले आहे. त्यामुळे पावसाळय़ात काही अपवाद वगळता रस्त्यांना खड्डय़ाचा वेढा पडत नाही. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे. बदलापूर शहर राज्यमार्गानी जोडले गेले आहेच. त्यात आता नव्या महामार्गाची भर पडणार आहे. बदलापूरपासून अवघ्या साडेतीन किलोमीटरवर असलेल्या अंबरनाथजवळून अलिबाग विरार महामार्गाची उभारणी केली जाते आहे. मुंबई, कोकण आणि थेट गुजरातला जोडण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. बदलापूर शहराजवळून जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) ते बडोदा हा महामार्ग जातो आहे. या मार्गामुळे इतर महामार्गावरचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नक्कीच वाहतुकीचा वेग वाढून त्याचा सर्वच वाहतुकीला फायदा होणार आहे. बदलापूर आणि अंबरनाथ अशा दोन्ही शहरांमध्ये लवकरच मेट्रोची पायाभरणी होणार आहे. दोन्ही शहरांमध्ये तीन ते चार मेट्रो स्थानके उभारली जाऊ शकतात. त्यासाठी एमएमआरडीएच्या स्तरावर काम सुरू आहे. शहरात सुरू असलेला पहिल्या बावळण तथा वर्तुळाकार रस्ता कात्रप-शिरगाव येथे प्रगतीपथावर आहे. हा रस्ता शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ठरतो आहे. या ठिकाणी दररोज शेकडो नागरिक फेरफटका मारण्यासाठी, विरंगुळा म्हणून येत असतात.
बदलापूर शहराला मुंबईशी जोडणारी रेल्वे सेवा महत्त्चाची आहे. कल्याणपासून बदलापूपर्यंत रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे कामही प्रगती पथावर आहे. हे काम झाल्यास कल्याणच्या पुढे बदलापूपर्यंत नव्या लोकल सेवा सुरू होण्यास मदत होईल. गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या मधे चिखलोली स्थानकाची निर्मिती प्रगतीपथावर आहे. या स्थानकासाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून येत्या दोन वर्षांत स्थानकाची उभारणी करण्याचा मानस आहे. त्यामुळे वाहतुकीचे असंख्य पर्याय येथील रहिवाशांना उपलब्ध होणार आहेत.
वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्यात महानगरांची दमछाक होते आहे. मात्र बदलापूर शहर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. बदलापूर शहराला उल्हास नदीवर असलेल्या बॅरेज बंधाऱ्यातून पाणी पुरवठा होतो. बदलापूर शहराच्या भविष्याचा विचार करून येत्या ५० र्वष पुरेल इतक्या पाण्याची तरतूद यापूर्वीच केली गेलेली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी हे पाणी तिथून उचलणे शक्य होणार आहे. अधिकचे पाणी उचलण्यासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. शेजारी असलेल्या भोज धरणाचा पाणीसाठीही बदलापूर शहरासाठी आरक्षित आहे. दोन लहान धरणे बदलापूर शहराजवळ उभारणीचा प्रस्तावही प्रक्रियेत आहे. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत शहराच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे.
मनोरंजन आणि पर्यटनाच्या बाबतीतही बदलापूर शहरात अनेक पर्याय आहेत. शहरात नव्याने उभारले जात असलेले स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक हे पर्यटनाचे नवे केंद्र ठरू शकते. शहरामध्ये मोठय़ा संख्येने उद्याने आहेत. शहराच्या वेशीवर बदलापूर गावात निसर्ग उद्यान केंद्र विसकीत केले जाते आहे. उल्हास नदी किनारा सुशोभित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहराला लाभलेली उल्हासनदी एक पर्यटन केंद्र आहे. शहराच्या वेशीवर अनेक शेतघरे, रेसॉर्ट आणि विसावा घेता येतील असे पर्याय उपलब्ध आहेत. काही किलोमीटर अंतरावर बारवी धरण क्षेत्र आणि जंगल आहे. मूळगावचे खंडोबा मंदिर, नेरळ, माथेरान, टिटवाळा अशी अनेक पर्यटनस्थळे शहरापासून काही अंतरावर आहेत.
बदलापूर शहर काटई कर्जत राज्यमार्गामुळे केंद्रस्थानी आले आहे. हा राज्यमार्ग शहराच्या विकासासाठी राजमार्ग ठरला आहे. या राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूंनी विविध आस्थापने, हॉटेल, कंपन्या, फ्रेंचायझी आल्या आहेत. कल्याणशहराच्या पल्याड न पाहिल्या जाणाऱ्या अनेक फ्रेंचायझी बदलापूर शहरात आल्या आहेत. मॅकडॉनल्ड, केएफसी, पिझ्झा हट, डोमिनोज यांसारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या शाखा याच राज्यमार्गावर आहेत. सोबतच स्थानिक खाद्यसंस्कृतीची झलक दाखवणाऱ्या अनेक हॉटेलचे पर्याय बदलापुरात आहेत. खरेदीचे अनेक पर्याय बदलापूर शहरात उपलब्ध आहेत. डीमार्ट, पटेल मार्ट, रामकृष्ण मार्ट, ट्रेंड्स, मॅक्स असे मॉल संस्कृतीतील खरेदीचे पर्यायही शहरात आहेत. अनेक वाहनांचे, सोने विक्री करणारी नामांकित मंडळीही शहरात आल्या आहेत.
बदलापूर शहरात खेळाडू आणि क्रीडापटूंसाठीही अनेक पर्याय गेल्या काही वर्षांत उपलब्ध झाले आहेत. बदलापूर अत्याधुनिक जिमखाना पालिकेच्या माध्यमातून हेंद्रेपाडा येथे उभारण्यात आला आहे. याच भागात विविध खेळांची मैदाने एकाच ठिकाणी विकसीत करण्यात आली आहेत.
शहरवासीयांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी प्रयत्न
• डॉ. बालाजी किणीकर
आमदार, अंबरनाथ.
अंबरनाथ शहराचा सर्वार्थाने विकास केला जातो आहे. शहरांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात आहे. शहराला स्वत:चे चिखलोली धरण आहे. शहरात कनिष्ठ दर्जाचे न्यायालय उभे झाले आहे. रुग्णालय, शाळा, महाविद्यालय अशा अनेक सुविधा शहरात यापूर्वीच आहेत. खेळाडूंसाठी क्रीडा संकुल, तरणतलाव, जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज अंबरनाथ शहरात उभे करण्यात आले आहे. शहरातील रस्ते काँक्रीटचे करण्यात आले आहेत. शहरात दोन उड्डाणपूलांना मंजुरी मिळाली असून, शहरातील वाहतूक व्यवस्था अडथळेमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. पालिकेच्या माध्यमातून अनेक उद्याने, मनोरंजनाची साधने विकसित केली जात आहेत. या सर्वाचा शहरातील रहिवाशांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी फायदा होतो आहे.

मराठीतील सर्व वास्तुरंग ( Vasturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nature rich ambernath badlapur with facilities dream houses thirty five few kilometers away amy

ताज्या बातम्या