‘आणि वसंत पुन: बरहला’ हे पुस्तक आहे जागतिक असंतोषाच्या जननीचं- रेचेल कार्सन हिचं साहित्यिक चरित्र. तिने लिहिलेल्या पुस्तकाला गेल्या वर्षी ५० र्वष पूर्ण झाल्यानिमित्त लक्ष्मण लोंढे यांनी लिहिलेलं. या पुस्तकातून तिच्या घराविषयीच्या कल्पना, तिची राहती घरं यांचं सुंदर शब्दचित्र उलगडलं आहे. त्याविषयी..
‘स्पिं्रगडेल’ या लहानशा गावातलं तिचं घर छानच होतं. अर्थात ‘रेचेल कार्सन’चं घर म्हटल्यावर घराच्या अंतर्भागापेक्षा घराचा परिसर बघणं जास्त महत्त्वाचं! छोटंसं गाव म्हटलं म्हणजे निसर्गाची जवळीक आलीच. पण हिच्या घराजवळूनच ‘अ‍ॅलेघनी’ नावाची नदी वाहते. त्या नदीच्या काठावर एका छोटय़ाशा टेकडीवर तिचं घर आहे. नदीच्या पलीकडे वळणावळणाने गेलेला रस्ता आणि त्या पलीकडे घनदाट जंगल. मुलांचं वेळ घालवण्याचं ठिकाण म्हणजे नदीकाठ आणि तिथे सापडणारे छोटे-छोटे शिंपले, शंख गोळा करणे. मग तिचं विचारचक्र सुरू होई. असे किती जीवजंतू असतील? कधीपासून ही नदी वाहते?
त्यांच्या घराला लागूनच ६५ एकरांची त्यांची जमीन होती. फारसं उत्पन्न नव्हतं तरी कोंबडय़ा, गुरंढोरं, सफरचंद असं उदरनिर्वाहाचं साधन होतं. एकूणच निसर्ग असा तिच्या जीवनात मिसळलेला होता. जेमतेम १५०० वस्तीचं लहानसं गाव- तिथे हायस्कूलही नव्हतं. स्वस्त अशा ट्रॉलीतून पलीकडच्या गावात जाऊन तिने शिक्षण घेतलं. आई-वडिलांसोबतच ८-१० वर्षांनी मोठी दोन भावंडं आणि ती राहत.  घरामागच्या अंगणात नीरव शांतता असते असं इतरांप्रमाणेच तिलाही वाटे. पण एक दिवस ती रात्री बॅटरीच्या प्रकाशात अंगणात हिंडली. झाडंझुडपं, माजलेलं गवत, जमिनीवर पडलेले लाकडाचे ओंडके यांचं तिनं केवळ तासभर निरीक्षण केलं आणि तिचं हे मत पूर्णत: बदललं. तिला जाणवलं इथे आवाजाचा प्रचंड कोलाहल आहे. ही रात्र शांत निवांत नाहीच. उलट इथे भक्ष्य आणि भक्षक यांचा जीवघेणा खेळ चालू आहे. प्रत्येक जण कमालीचा सावध आहे. आपल्यावर कोणी झडप घालेल का याची काळजी, तर दुसरा बेसावध कधी होतो आणि मी झडप कधी घालतो ही लालसा एकीकडे! विश्रांती नाहीच. निसर्गाशी केलेल्या या संवादातूनच तिचं नातं निसर्गाशी जुळलं. रेचेल एकलकोंडी, अबोल होती. पण सर्व चेतन-अचेतनांबद्दल तिला ओढ होती. ती माणूसघाणी नव्हती म्हणूनच सगळ्या कुटुंबाची जबाबदारी तिने आस्थापूर्वक पार पाडली. ८३ वर्षांची आई आणि बहिणीचा ५ वर्षांचा नातू यांना तिने उतारवयातही प्रेमानं सांभाळलं..
पदवी, पदव्युत्तर शिक्षण कमाई करत करत केलं. इंग्लिश वाङ्मयाचा अभ्यास आणि जीवशास्त्राचा गाढा व्यासंग यामुळे एक अद्भुत रसायन तयार झालं, ज्यामुळे तिच्या हातून अमूल्य लेखन झालं!
त्या वेळी अमेरिकेतही वैज्ञानिक म्हणून स्त्रियांना नेमत नसताना तिने आपली गुणवत्ता एवढी वाढवली की सरकारी ऑफिसमध्ये ‘वैज्ञानिक’ पदाची नोकरी मिळाली. या नोकरीच्या अनुषंगाने ती लेख लिहू लागली, रेडिओवर वर्षभर मालिका सादर करू लागली. शास्त्रशुद्ध, काटेकोर, माहितीची बैठक न सोडता, अतिशय रसाळ भाषेत ती निसर्गाची ओळख, त्याच्याशी आपले नाते सांगू लागली. यातूनच तिची ‘समुद्रा’वरची तीन पुस्तकं प्रसिद्ध झाली. त्यामुळे विज्ञान, वैज्ञानिकांच्या बंदिस्त वर्तुळापुरतं मर्यादित न राहता ते जनसामान्यांपर्यंत पोहोचलं. या पुस्तकानं तिला अफाट लोकप्रियता मिळाली.
‘सागरा’वरच्या पुस्तकात तिचा अभ्यास तर होताच, पण त्याला तिने अनुभवाचीही जोड दिली. सागर जणू तिचा सखा, प्रियकर बनला आणि ती त्याची प्रेयसी! आणि मग तिने आपलं नवं घर समुद्रकिनाऱ्यावरच बांधलं.
‘जिथे सागरा धरणी मिळते’ तो प्रदेश अजबच असतो. किनाऱ्याचं हे जग अतिशय प्राचीन आहे. अब्जावधी र्वष समुद्राच्या लाटा धरतीला धडका मारतात. एकाच वेळी तिथे निरामय शांती आणि विलक्षण खळबळ अनुभवास येते. दर सहा तासांनी तिथली परिस्थिती बदलते. भूमीने सागराला जास्तीत जास्त मागे रेटणं आणि सागराने भूमीवर आक्रमण करणं या क्रियेतून क्षणोक्षणी ताणतणाव निर्माण होत राहतो. अशा या कायम अस्थिर परिस्थितीत राहणारे प्राणी कसे कणखर असतील? कसे नवनव्या संघर्षांला तोंड देत असतील? पण तरीही असंख्य सजीव, वनस्पतींनी लक्षावधी र्वष पिढय़ान् पिढय़ा आपला संसार बहरत ठेवला आहे. खडकांना पोखरून, मेलेल्या माशांच्या हाडांतून, वाहत आलेल्या लाकडी ओंडक्यांतून त्यांनी आपली घरं थाटली आहेत. यामुळेच तिला सागरकिनारा प्रत्येक वेळी नवा वाटे, नवा अर्थ प्रतीत होई, जगण्याची उमेद देई.
तिच्या या नव्या घराचा प्लॉट समुद्राला अगदी लागून होता. शिवाय तिला छोटासा खासगी किनाराही मिळणार होता. या प्लॉटमधून एक छोटी नदी वाहत येऊन समुद्राला मिळत होती. हा समुद्रकिनारा खूप खडकाळ होता आणि भरतीच्या वेळी सगळे खाचखळगे पाण्यानं भरून जात. त्यातच छोटे छोटे जीव राहत. त्यांच्यासाठी सागरी पक्ष्यांच्या फेऱ्या सुरू होत. शिवाय तिच्या प्लॉटवर ‘स्प्रुस’ आणि ‘फरची’ झाडी होती. त्यावरही पाखरांची घरटी होती. ही निसर्गाची आरास म्हणजे रेचेलसाठी स्वप्नभूमीच होती. तिने वर्षभरातच तिच्या आवडीप्रमाणे एक टुमदार घर बांधून घेतलं. हे घर ‘मेन’ राज्यात ‘साऊथ पोस्ट’ गावच्या ‘शिपस्कॉट उपसागरा’च्या किनाऱ्यावर आहे. एका कातळावर हे घर आहे. चार-सहा पायऱ्या उतरताच किनाऱ्यावरची वाळू पायाला स्पर्श करते इतका जवळ तिचा सखा! या दुमजली घरात पश्चिमेला रेचेलचं शय्यागृह आहे. सागरात जाणारा सूर्य तिला ‘बाय’ करून जायचा. जुलै १९५३ मध्ये रेचेलने तिच्या ह्य़ा स्वप्नभूमीत प्रवेश केला.
‘कर्टिस बॉक’ हे रेचेलच्या साहित्याचे चाहते. त्यांच्या वडिलांनी एक खासगी अभयारण्य केलं होतं. ती कल्पना रेचेलला खूप भावली. आपल्या घराजवळची सगळी किनारपट्टी घेऊन तिथे आपणही असं उद्यान बनवावं असं तिला वाटलं. पक्ष्यांना आकर्षित करतील अशा वनस्पतींनी युक्त. तिथे मध्यभागी एक उंच मनोरा बांधावा म्हणजे त्याच्या आसऱ्याला अनेक पक्षी येतील, आपली घरटी बांधतील, त्यांची अखंड किलबिल असेल, मग आपणही त्याला ‘सिंगिंग टॉवर’ असं नाव देऊ. फुलं, फळं, पक्षी, सागरकिनारा आणि तिथेच आपलं घर! मात्र या बागेचं तिचं स्वप्न खरं होऊ शकलं नाही. कारण तिच्या हातून त्याहूनही खूप महत्त्वाचं कार्य नियतीला घडवायचं होतं.
समुद्रावर तिने लिहिलेल्या ज्ञान देणाऱ्या आणि रसाळ, ललित शैलीच्या पुस्तकांनी तिला प्रसिद्धी आणि पैसा मिळालाच, पण त्यामुळे तिच्या संघर्षमय जीवनाला स्थैर्य प्राप्त झालं. अस्तित्वाला अर्थ आला आणि जनसामान्यांमध्ये ‘विज्ञानाची गोडी लावणारी’  अशी कीर्तीही मिळाली. रेचेलनं ‘सायलेंट स्प्रिंग’ लिहून वास्तव मांडलं. पण जाणकार शास्त्रज्ञांनी ठोस भूमिका घेतली नाही. काही ‘पुरेसा पुरावा नाही’ असं गुळमुळीत म्हणाले. तर काहींनी, ‘आमचं काम रसायन शोधून काढणं, कोण कसा वापर करतो हे नाही. ते सिद्ध करण्याची जबाबदारी ज्याला धोका वाटतो त्याची, आमची नाही.’- असं म्हटलं. तर उद्योजकांच्या मिंध्या शास्त्रज्ञांनी तर सर्वात जबरदस्त जीवघेणे विषारी हल्ले करून विरोध केला. काहींनी तिला कम्युनिस्ट तर काहींनी मांजरं, पक्षी, प्राणी यांची बाजू घेते म्हणून अघोरी पंथाची ठरवलं.
विश्वात आपल्याला राहायला सुयोग्य अशा पृथ्वी या एकमेव ग्रहावर मानव केवढे अत्याचार करत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी द्यावा लागणारा लढा स्थानिक नसून वैश्विक आहे, याची प्रखर जाणीव तिने करून दिली. आपण कसकसली विषं किती बेजबाबदारपणे प्राणिमात्रांच्या अन्नसाखळीत मिसळतो याची अनेक उदाहरणं तिने दिली. पूर्वी ज्या तळ्यावर हजारो पक्षी यायचे तिथे फक्त ३० जोडय़ा आल्या. आणि त्यासुद्धा वांझ ठरल्या. कृत्रिम रासायनिक पदार्थ बनवून केवळ दोन दशकं झाली पण ही मानवनिर्मित रसायनं उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंतच्या पाण्यात आणि अगदी आईच्या दुधातही पोहोचली आहेत, याची भयप्रद जाणीव तिने करून दिली. पण फक्त धोकेच न दाखवता त्यावरचे उपायही सांगितले. प्राणी-कीटक यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून जैविक उपायांची माहिती करून दिली. त्याचबरोबर शासनाच्या कर्तव्याचीही जाणीव करून दिली.
अशी ही रेचेल आपल्या घराच्या पायऱ्या उतरून समुद्रावर जाई. पाण्यात पाय भिजवी. इथे वाळूचा किनारा कमी आहे. खडकच जास्त. त्यावर बसे. किनाऱ्यावरचे कीटक, घिरटय़ा घालणारे पक्षी न्याहाळी. समुद्र हाच तिचा विरंगुळा होता. पण विरोधकांचे हल्ले आपल्या लेखणीने-वाणीने परतवणाऱ्या रेचेलला कॅन्सरने गाठलं. शेवटी शेवटी किनाऱ्यावर जावं, सागराला स्पर्श करावा हेही होईना. मग आपल्या घराच्या अंगणात आरामखुर्चीत बसून ती सागराची गाज ऐके, लाटांच्या रूपाने तोही आपल्याला भेटायला उत्सुक आहे असं तिला वाटे, त्याचा तो खारा ओला वास ती हुंगून घेई. स्थलांतर करणारे पक्षी, फुलपाखरं जशी निसर्गाला कुठलाही दोष न देता शांतपणे दूरदेशी जातात त्याप्रमाणे तीही १४ एप्रिल १९६४ रोजी आपल्या राहत्या घरातून दूरच्या प्रवासाला गेली- पण परत न येण्यासाठी! जाताना सर्व चेतन-अचेतन सृष्टी तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होती. आपणही त्यात सामील होऊ या.