– मंजू याज्ञिक
व्याजदर हे नेहमीच गृहनिर्माण मागणीवर प्रभाव टाकतात. विशेषतः भारतासारख्या देशात- जिथे घरखरेदीसाठी गृहकर्ज हा प्रमुख वित्तपुरवठ्याचा मार्ग आहे. रेपो दरातील कपात ही केवळ एक आर्थिक धोरणात्मक बदल नसून, ती आर्थिक वाढीस चालना देण्याचा, ग्राहकांचा आत्मविश्वास बळकट करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. निवासी रिअल इस्टेटच्या दृष्टीने पाहता, कमी व्याजदर हे गृहनिर्माण मागणीला गती देणारा प्रमुख घटक आहे.
रेपो दर कपातीचा सर्वात तात्काळ परिणाम म्हणजे घरखरेदी अधिक परवडणारी होणे. कर्जावरील व्याजदर कमी झाल्यास मासिक हप्ता (EMI) कमी होतो, ज्यामुळे घर खरेदीदारांची संख्या वाढते. प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांसाठी, अगदी थोडीशी व्याजदर कपातदेखील कर्जपात्रता आणि खरेदीशक्ती मोठ्या प्रमाणात वाढवू शकते. हा आर्थिक आणि मानसिक सकारात्मक परिणाम अनेक संभाव्य खरेदीदारांना प्रत्यक्ष व्यवहाराकडे वळवतो.
कमी व्याजदरांमुळे घरमालकीचे दीर्घकालीन मूल्यही अधिक आकर्षक ठरते. रिअल इस्टेट हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय असल्याने कर्जाचा कमी बोजा एकूण परताव्यात सुधारणा करतो. भारतात घरमालकी ही आर्थिक सुरक्षितता आणि सामाजिक स्थैर्याशी जोडलेली असल्याने अनुकूल व्याजदरांचा काळ घर खरेदीची इच्छा अधिक बळकट करतो.
याशिवाय, कमी व्याजदर संपूर्ण व्यवहारात सकारात्मक वातावरण निर्माण करतात. रिअल इस्टेट क्षेत्राचा बांधकाम, सिमेंट, स्टील, बँकिंग आणि गृहसजावट अशा अनेक उद्योगांशी जवळचा संबंध आहे. गृहनिर्माण मागणी वाढल्यास या सर्व क्षेत्रांमध्ये रोजगारनिर्मिती आणि आर्थिक क्रियाशीलतेला चालना मिळते. विकसकांनाही कमी कर्जखर्चाचा फायदा होऊन प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक वेगाने करता येते, ज्यामुळे उत्तम घरांचा पुरवठा आणि वेळेवर ताबा देणे शक्य होते.
गेल्या दशकात या क्षेत्रात मोठे बदल झाले असून, नियामक सुधारणांमुळे पारदर्शकता वाढली आहे आणि संघटित व विश्वासार्ह विकसकांचा वाटा वाढला आहे. आजचे घरखरेदीदार हे अधिक सजग, माहितीपूर्ण आणि दीर्घकालीन फायदा यावर लक्ष केंद्रित करणारे आहेत.
मुंबईसारख्या शहरांमध्ये, विशेषतः उत्तम नियोजन असलेल्या आणि मजबूत पायाभूत सुविधा असलेल्या निवासी भागांमध्ये, कमी व्याजदरांमुळे मागणी वाढू शकते. आजचे खरेदीदार केवळ किंमत पाहत नाहीत, तर उत्तम कनेक्टिव्हिटी, मोकळी जागा आणि आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त अशी घरे शोधत आहेत. परवडणारी किंमत आणि उत्तम दर्जाचे जीवनमान यामुळे घरांनी अधिक मागणी येते.
मध्यम उत्पन्न गट आणि प्रीमियम गृहनिर्माण विभागांवरही याचा वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. मध्यम गटात परवडणारी किंमत खरेदीदारांची संख्या वाढवते, तर प्रीमियम गटात कमी व्याजदरांमुळे ग्राहक मोठ्या घरांकडे किंवा अधिक चांगल्या ठिकाणी स्थलांतर करण्यास प्रवृत्त होतात. कोविड-१९ नंतर घरांच्या पसंतीत मोठे बदल झाले असून, अधिक जागा, आरामदायी सुविधा आणि एकात्मिक समुदायांना प्राधान्य दिले जात आहे. अनुकूल व्याजदर या प्रवृत्तीला अधिक बळ देतात.
गुंतवणुकदारांच्या दृष्टीनेही कमी व्याजदर महत्त्वाचे ठरतात. पारंपरिक निश्चित उत्पन्न साधनांवरील परतावा कमी झाल्यास लोकांचा घर घेण्याकडेही कल वाढतो. परिणामी बाजारात गुंतवणूकदारांचा सहभाग वाढतो आणि मागणीही वाढते. तथापि, गृहनिर्माण मागणीवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांमध्ये व्याजदर हा एकमेव घटक नाही. पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती आणि शहरीकरण हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांमध्ये होणारी गुंतवणूक, सुधारित कनेक्टिव्हिटी आणि नव्या निवासी पट्ट्यांचा विकास यांमुळे घरखरेदीसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत.
रेपो दर कपात गृहनिर्माण मागणी आणि क्षेत्रीय वाढीसाठी प्रभावी प्रेरक ठरू शकते. ती एकमेव घटक नसली तरी परवडणारी किंमत, सकारात्मकता आणि मागणी यांना चालना देण्यात तिची महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
(लेखिका नहार ग्रुप उपाध्यक्ष आणि NAREDCO महाराष्ट्रच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.)

