‘वास्तुरंग’ (२२ नोव्हेंबर) मधील अरुण मेळेकर यांचा ‘रानी की बाव’ हा माहितीपूर्ण लेख वाचला व एका अज्ञात ऐतिहासिक स्थळाची सविस्तर व छान माहिती मिळाली. उत्तर प्रदेशातील दिल्ली-आग्रा इ. शहरातील प्रेक्षणीय स्थळांची उदा. ताजमहाल, लालकिल्ला वगैरे भारतातच काय जगभर प्रसिद्ध आहे. तेथील सौंदर्य पाठय़पुस्तकातूनही वाचायला मिळाले. या स्थळांना भेट देण्यासाठी हजारो परदेशी येऊन गेले व अजूनही येतात. परंतु ‘रानी की बाव’ व तिचे अंतर्गत सौंदर्य वाचल्यावर गुजरातचेही महत्त्व जाणवते. पतीने आपल्या पत्नीवरील प्रेमापोटी करोडो रुपये खर्च करून बांधलेली स्मारके अजरामर होऊन त्यांना ऐतिहासिक महत्त्व लाभले. एका सत्ताधीशाने बांधलेले ‘यमुनाकाठी ताजमहाल’ याचा अजूनही सर्वत्र उदोउदो होत आहे, पण एका सत्ताधीशासाठी म्हणजेच भीमदेव राजाच्या पत्नीने- राणी उदयामतीने पतीची आठवण म्हणून पतिप्रेमापोटी उभारलेली वास्तुशिल्पाची उत्कृष्ट नमुना म्हणून ‘रानी की बाव’ मात्र फार प्रख्यात झाली नाही. हाही पुरुषप्रधान संस्कृतीचा त्या काळचा नमुना म्हणावा का?
युनेस्कोच्या कतार येथे झालेल्या निवडसत्रात जागतिक वारसा यादीत या वास्तूचे नाव व महत्त्व समाविष्ट झाल्यावर ती आज प्रकाशात आली, हे राणी उदयामती हिचे भाग्यच म्हणायचे. ही सातमजली दगडी विहीर हा वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना तर आहेच, पण आपले पूर्वज सत्ताधीश जलव्यवस्थापनात किती निपुण व दूरदर्शी होते याचे उत्तम उदाहरण आहे. या सातमजली विहिरीचे बांधकाम परिसरातील दगडांनीच उभे केले आहे व ही कलाकृती निर्माण करताना भक्कमपणाबरोबरच, सौंदर्यशाली वास्तुकलेचेही एक अनोखे दर्शन घडते याचे नवल वाटते व याचे सारे श्रेय वास्तुशास्त्रज्ञाबरोबरच त्यावेळच्या मगारांनाही देणे उचित ठरेल. या विहिरीच्या अंतर्भागाची रचना वाचताना व तेथेही सुरक्षेसाठी केलेली अनेक खांबांची उभारणी, त्यावरील धार्मिक पाश्र्वभूमीची कलापूर्ण शिल्पाकृती आजही पाहावयास मिळते. म्हणजे त्या वेळच्या शिल्पकारांचे कसब निश्चितच लाजबाब आहे.
राणी अहिल्याबाई होळकरांनीही प्रजेसाठी अनेक सुखसोयी केल्या. विहिरीही बांधल्या, पण भीमदेवराजाची आठवण म्हणून त्याच्या पत्नीने उदयामतीने बांधलेली ‘राणी की बाव’ म्हणजे फक्त जलसंवर्धनाचे स्थळच नव्हे तर निसर्गशक्तीचे ऋण मानणाऱ्यांचे त्याला धार्मिक अधिष्ठानही नक्कीच आहे.
पृथ्वीच्या गाभ्यातील एक अप्रतिम सौंदर्य, पुरातन तसेच आधुनिक कालातील विहिरीमध्ये ‘रानी की बाव’ ही सम्राज्ञी म्हणून गणली गेली तर नवल नाही. या अप्रतिम वास्तुशिल्पाची ओळख करून दिल्याबद्दल आभार.
– शुभदा कुळकर्णी, कुर्ला.

मन हळवे झाले
‘वास्तुरंग’मधील घरांवरचे लेख मला खूप आवडतात. शोभा तुंगारे यांचा ‘तांबडीचं घर’ हा लेख खूप छान होता. हा लेख वाचताना ते घर आणि आजूबाजूचा परिसर डोळ्यांसमोर उभा राहिला. पण एक गोष्ट शोभाताईंनी सांगितली नाही, की हे सुंदर घर सोडून त्या पुन्हा मुंबईला आल्या. इतके सुंदर घर त्यांनी का सोडले? घर सोडण्याची रुखरुख हा लेख वाचताना
मलाही जाणवली. अशा सुंदर घराचे मनोज्ञ मनोगत वाचताना मन खूप
हळवे होते.
– गणेश मंजलकर