– ज्ञानेश्वर गावडे
मनाला भावणारे लेख
‘वास्तुरंग’मधील डॉ. शरद काळे यांचा ‘नकोत नुसत्या भिंती’ सदरातील ‘रेशमी घरटे’ हा लेख आणि मनोज अणावकर यांची ‘रंग वास्तू’चे सदरातील ‘ज्येष्ठालय’ ही कथा (की सत्यकथा!) दोन्हीही अतिशय भावले.
‘रेशमी घरटे’मधील जुनी पिढी व नवी पिढी यातील वैचारिक बदल आणि भावनिक बदल फार चांगला मांडला आहे. फक्त घरांना असणाऱ्या भिंती आता मनांनाही आल्या ही खंत त्यातून व्यक्त झाली आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा मंत्र जपण्याचा सल्लाही छान पद्धतीने त्यांनी दिला आहे.
शेवटच्या परिच्छेदामधला हसतमुख चेहऱ्याचा उल्लेख फारच आवडला. खरंच दुर्मुखलेल्या चेहऱ्याने वावरणे आणि सतत सगळ्यांवर आरडाओरड करीत बोलणे असा स्वभाव असणाऱ्या व्यक्तींनी हे वाचून वागण्यात बदल केला तर ते किती चांगले होईल. घरातील वातावरणात नक्कीच फरक पडेल.
‘ज्येष्ठालय’ ही कथा तर मनाला चटका लावणारीच आहे. घरातल्या स्त्रियांनी विशेषत: सासू-सुनेने दोन-दोन पावले मागे सरकून एकमेकींना समजून घेतले तर कदाचित मंगलाताईंवर आला तसा प्रसंग येणार नाही. अर्थात, याला अपवाद सासू-सुना असतात- आहेत. मात्र शेवटी मुलाची मानसिक अवस्था जाणून त्याला आपली गरज आहे हे समजून घेऊन ज्येष्ठालयातून घरी यायलाही तयार होतात, मनात कोणताही किंतू न धरता! पश्चात बुद्धी म्हणून का होईना दोघींनाही आपल्या वागण्यातील चूक उमगलीच, मात्र तेव्हा फार- म्हणजे फारच उशीर झाला होता. कथा मनाला चटका लावणारी- हृदयस्पर्शी आहे.
– ज्योत्स्ना परचुरे, घाटकोपर (पूर्व).