निलेश दिलीप जाधव
‘सर्वज्ञ’, ए ४३/८ या घरानं खूप काही दिलं, आत्मविश्वास, प्रतिष्ठा, मानसन्मान आणि अनेक आशीर्वाद. या वास्तूला विसरता येणं अशक्यच आहे. ते घर मनाच्या हळव्या कोपर्‍यात कायम वास्तव्यास राहील… मी असेपर्यंत. हे घर खर्‍या अर्थानं उभं राहिलं आई-बाबांच्या मागे- त्यांच्या आई-वडिलांसारखं एक कुटुंब होऊन…

काका (म्हणजे आमचे आजोबा) गेल्यानंतर वर्ष-दीड वर्षात आम्ही म्हणजे आई-बाबा, मी आणि नमू… असे आम्ही चौघे नवी मुंबईतल्या वाशीत शिफ्ट होतोय असं अचानक समजलं. दादाची दहावी होती म्हणून तो येणार नव्हता. आम्ही आमचं वाशीतलं नवं घर पाहायला सहज गेलो तेव्हा शशी काकांचे मित्र कदम काका तेथे राहत होते. त्यांची मोठी मुलगी गौरी वर्षाची असेल- मागच्या दरवाज्यात खेळत होती. तो दरवाजा आडवा- दोन भागांत विभागलेला होता. खालचा भाग बंद करून वरचा भाग उघडा ठेवण्याची सोय असलेला… मला नवलच वाटलं. पण तो दरवाजा कायम माझ्या लक्षात राहिला… त्या वेळी या घरात आपण पुढची ४० वर्षं वास्तव्य करणार आहोत याची पुसटशी कल्पनाही मनाला शिवली नाही. पुढे त्या घराचा व्यवहार झाला. आम्ही लहान असल्यानं या गोष्टी आमच्यापर्यंत आल्या नाहीत. तसा संबंधही नव्हता म्हणा! कारण मी होतो चौथीत. घराचे आर्थिक व्यवहार, कागदपत्रं असं काही समजण्याचं वयही नव्हतं ते. फक्त आपल्याला नवीन घरात राहायला जायचंय हीच भावना होती.

खरं तर आतापर्यंत एकत्र कुटुंबात वाढत असताना मधेच हे काय? याचं कारण उमगलं नाही आणि कोणाला विचारावंसंही वाटलं नाही. असो. तो दिवस आजही अगदी तसाच आठवतो… अणुशक्तीनगरमधून ५०१ नंबरची बस पकडून वाशी ब्रिजवरून हवा खात आम्ही भव्य अशा वाशी डेपोत आलो. आई-बाबा, मी, भाऊ, आईचे वडील, दीपक, अजून कोण ते नीटसं आठवत नाही, पण आम्ही पाच-सहा जण होतो. काका काही कारणास्तव येऊ शकले नाहीत (हे सगळं घडलं ते काका जाण्याच्या   काही दिवस आधी. या घरात ते येऊच शकले नाहीत. या घराला त्यांचे पाय लागले नाहीत हे खरे!) बसमधून वाशीत प्रवेश करताना भरपूर गर्द हिरवी झाडं… त्याकाळचं सुंदर, सुटसुटीत असं वाशी आजही आठवतं. मग रिक्षा असूनसुद्धा वाशीहून तुर्भेला चालत घरी आणलं गेलं त्याचा कंटाळा आला आणि त्याच दिवशी गणेशपूजनही झालं. मग घराचं रंगकाम… हा एक मोठा सोहळा… त्या वेळी मी बाबांबरोबरच कायम असे. मग बळीरामभाई, पवार काका, बाबा, बाबांचे अन्य मित्र अशा सगळ्यांनी मिळून घराला रंग दिल्याचं आठवतंय.

‘ए ४३/८’ हे आमचं नवं नेटकं घर… घराला पुढे छान जागा… तिथं कट्टा करून भरपूर झाडं, रातराणीच्या झाडांची कमान, तगर, काही शोभेची झाडं… घराच्या मागेही भरपूर जागा… विशेष म्हणजे स्वत:चं हक्काचं शौचालय, बाथरूम, सुटसुटीत स्वयंपाकघर… मधे छोटा हॉल, लोखंडी खिडक्या वर कॉमन गच्ची- तिथं सहज जाता येत असे. सगळं कसं स्वप्नवत वाटावं असं घर… मी अनेकदा टिळकनगरच्या ‘३७’ मध्ये सगळ्यांना सांगे की, आम्ही बंगल्यात राहायला गेलोय… खरंच हे घर माझ्यासाठी बंगल्यापेक्षा कमी नव्हतंच म्हणा!

दिलीप जाधव, ए ४३/८ सेक्टर २१, तुर्भे… हा आता आमच्या हक्काच्या घराचा पत्ता… आमच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली. तेव्हा आमच्याबरोबर काही दिवस नानी आली होती. मग काही दिवसांनी ती पुन्हा चेंबूरला गेली. ती वरचेवर आमच्याकडे येई. ती आधार होती आमचा. मग बर्‍याचदा मोठी आई (घाटल्यातली) नानीबरोबर महिनोन्महिने असायची. नंदा आत्या, गुलाब मावशी बरेच जण वरचेवर राहायला यायचे. खेळतं घर वाटे, अगदी नंदनवन… मज्जा येत असे. पण बाबांची मात्र नोकरीसाठी धावपळ होत असे. वाशीहून कुर्ला डेपो हे अंतर लांब होतं, पण त्यांचे बेस्टमधले अनेक मित्र जवळच राहायला होते. जसे पिंगळे काका. (आल्या पहिल्या दिवसापासून ते आजतागायत आमच्या सोबत आहेत. आता फोनवर बोलणं होतं, कारण आता ते त्यांच्या गावी असतात.)

आमच्या शाळेची सोय करताना बाबांची पुरती धावपळ झाली. नमूची ज्युनिअरपासूनच सुरुवात असल्याकारणाने तिला लगेच घराजवळील  ICL monami या शाळेत प्रवेश मिळाला. आणि मला  IES New Bombay High School Vashi मध्ये. तो कसा तो बाबांनाच माहीत. कारण शाळा खूप मोठी होती. या शाळेनं मला अनेक चांगल्या गोष्टी दिल्या…

शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेशही नव्हता. मी पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घालून शाळेचा पहिला दिवस भरला. बाबांना म्हणाले की, गडद निळ्या रंगाची पॅन्ट आहे. बाबा म्हणाले, थोडाच फरक आहे, आज चालून जाईल. असा बुजलेला शाळेचा पहिला दिवस आणि त्यात भरपूर पाऊस… पावसात काहींच्या पॅन्ट भिजल्यामुळे तो गडद निळा रंग मला काळाच दिसला… ही आपली माझ्या मनाची समजूत.

इयत्ता पाचवीत शाळेच्या दुसर्‍या दिवशी आई शाळेत सोडायला आली होती, कारण आम्हाला तुर्भे येथून बसनं शाळेत यावं लागायचं. आई गेटबाहेर उभी राहून इतर पालकांच्या गर्दीत ‘तू आत जा’ असं सांगत होती. तेव्हापासून मी इतके पालक शाळेत सोडायला येतात हे प्रथमच पाहत होतो (टिळकनगरला शाळा घराजवळ होती, त्यामुळे आम्ही एकटेच शाळेत चालत जात असू), मला आनंद झाला की आता रोज आई शाळेत सोडायला- न्यायला येईल. शाळा सुटली. बाहेर आलो. बाहेर पालकांची ही गर्दी मुलांना न्यायला… मी आपला आईला शोधतोय… सगळे मित्र घरी गेले, मी आपला थांबून राहिलो. आईला बस मिळाली नसेल असं वाटलं.

बराच वेळ झाला तरी आई आली नाही. मग मी ठरवलं, एकला चलो रे… सहसा मी रस्ता विसरत नाही. मी चालत- दोन किमी असेल- घरी पोचलो तेव्हा वाशी मोकळीढाकळी मस्त होती. गर्दी तिला शिवलीसुद्धा नव्हती. घरी पोचलो. आई घरीच काम करत होती. मी म्हटलं, ‘आली नाहीस न्यायला?’ ती अगदी सहज म्हणाली, ‘‘मला माहिती आहे तू एकटा येशील.’’ त्या दिवशी आईनं मला माझ्या आयुष्यातला पहिला आत्मविश्वास दिला… मग नवी मुंबईत स्थिरावलो. आता नवीन गाठ पडली ती तिथल्या पावसाशी. इथला पहिला पाऊस म्हणजे वाह… अजूनही त्या पावसाचा आवाज कानात भरून राहिला आहे. एकदा घरात पाणी शिरलं- चक्क कंबरेपर्यंत… हे आमच्यासाठी जरा नवीनच होतं. नमू लहान होती, घरात लोखंडी कॉट होती, सगळं सामान कॉटवर ठेवलं. पुढे अनेक वर्षं पावसाळ्यात हा क्रम चालू राहिला… अगदी २००० पर्यंत. अशा वेळी स्टोव्हवरचा चहा आणि पाण्यातून चालत जाऊन बेकरीतून आणलेला कडक पाव… हाच आमचा ब्रेकफास्ट आणि समजा जर पाणी ओसरलंच तर जेवण… बाबा कामावर असायचे… पण आई सोबत असायची, त्यामुळे कायम तिचा आधार आणि मनात तिनं पेरलेला आत्मविश्वास… तिच्याबरोबरचे पावसातले अनेक किस्से आजही आठवतात… रेशनच्या रांगेतले… मज्जा असायची.

आई-बाबांना माणसांची, नातेवाईकांविषयी खूप आपुलकी… त्यामुळे सतत घरात कोणी ना कोणी असायचंच. घर भरलेलं असायचं. अनेकदा जेवणावळी व्हायच्या. बाबा कामावर जाताना मटणवाल्याला सांगून जायचे. मग मी जाऊन ते घेऊन यायचो. साफ करून आईला द्यायचो. त्या वेळी अजून एक आकर्षण होतं ते घरातल्या नळाला भरपूर पाणी… बापरे, चोवीस तास भरभरून पाणी…

या घरातले हे दिवस पटकन सरत गेले. मग दादा पुण्याहून वाशीला आमच्यासोबतच राहायला आला. मी शाळा संपवून कॉलेजला गेलो. नंतर २००१ साली आमच्या घराची पुन्हा बांधणी करून त्यावेळच्या अत्याधुनिक पद्धतीनं खाली हॉल, किचन, वर जायला घरातून जिना, वर दोन बेडरूम आणि स्वतंत्र गच्ची… असा ‘सर्वज्ञ’ या घराचा पुन्हा जन्म झाला. घरात स्वत:चा फोन आला, हा एक नवीन आनंद. मग आम्ही नोकरीला लागलो, लगेचच दोन वर्षांत दादाचं लग्न झालं. पुढे दोन वर्षांनी माझं लग्न झालं. मग सिद्धीपाठोपाठ समा आली. बायको उषा आणि मी लहानपणापासूनच शेजारी-शेजारीच राहायला होतो, त्यामुळे उषानं हे सर्व दिवस पाहिलेत. मग नमूचं लग्न झालं.

नमूचा वाढदिवस… घरातील पहिली मुलगी. वाशीला आल्यापासून लग्न होईपर्यंत नमूचा वाढदिवस आणि दिवाळीचं एकत्र जोरदार सेलिब्रेशन असे. नानी खास गजरा घेऊन येणार… बाबा फक्त तिच्याच वाढदिवसाला मेलोडी चॉकलेटचं मोठं पॅकेट आदल्याच दिवशीच आणून ठेवत. मग सगळे चेंबूरवरून यायचे. नमूच्या मैत्रिणी गोळा व्हायच्या… या घरात असा जंगी कार्यक्रम व्हायचा, जुन्या घरात खेळायला भरपूर मुलं आणि जागा… बाबा खास रंगपंचमीला रात्री नमूसाठी पाण्यानं भरून टबभर फुगे ठेवायचे. असे छोटे छोटे आनंद होते या घरी…

अनेक गणपती डेकोरेशन्स, कॉलेजची कामं, रात्र रात्र जागून घरात पसारा करून ठेवलेला आठवतो, खरं तर त्या घरात माझी कला बहरली, त्या विभागातून केलेल्या गणपती डेकोरेशन्सना पुरस्कार मिळाले आणि माझी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण झाली.

पुढे २ ऑगस्ट २००७ रोजी सीवूड्स, नेरुळला मी माझ्या स्वत:च्या घरी शिफ्ट झालो. २०१० मध्ये पुन्हा टिळकनगरला नवीन घरी आलो. पण शनिवार-रविवार नेहमी वाशीतल्या घरी जात असे. स्वत:चं घर झालं तरी या घराशी नाळ कधी तुटली नाही. दादानंही पनवेल आणि आता उलवे येथे घर घेतलं… तरीही हे घर एक अनामिक आधार होताच आम्हा सगळ्यांचा.

आम्ही आपापल्या प्रपंचात, व्यवसायात व्यग्र झालो आणि अचानक आई आणि बाबांची वयं आणि आजारपणं वाढली. एकूणच बदल हवा होता. दादालाही त्याच्या नव्या घरी जायची ओढ लागलेली होती आणि बाबांनी काळजावर दगड ठेवून हे घर विकण्याचा निर्णय घेतला. आता घरातून एक एक सामान शिफ्ट करताना बाबांचे डोळे भरलेले मी पाहिलेत. पण त्यांच्या या भावनांवर काळ हेच उत्तर आहे असं वाटतं. ४० वर्षांचा सहवास होता या घराचा. आई-बाबांचे कष्ट या घरानं पाहिलेत. आयुष्यात प्रत्येक गोष्ट किंवा माणसं आपण आपल्याबरोबर नेत नसतो. प्रत्येक गोष्टीचा एक प्रवास त्या काही कालमर्यादेइतकाच असतो.

लवकरच सगळे उलव्याच्या घरी शिफ्ट होतील… मी नसेन त्या दिवशी… कारण मला या घराचा विरह सहन होणार नाही कदाचित. मी जुनं घर पाडतानाही गेलो नाही, कारण मला ते बघवणारही नव्हतं.

‘सर्वज्ञ’, ए ४३/८ या घरानं खूप काही दिलं, आत्मविश्वास, प्रतिष्ठा, मानसन्मान आणि अनेक आशीर्वाद. या वास्तूला विसरता येणं अशक्यच आहे. ते घर मनाच्या हळव्या कोपर्‍यात कायम वास्तव्यास राहील… मी असेपर्यंत. हे घर खर्‍या अर्थानं उभं राहिलं आई-बाबांच्या मागे- त्यांच्या आई-वडिलांसारखं एक कुटुंब होऊन…

घर रिकामं करताना मी सगळ्यांना सांगितलं की, आठवणीनं तिथल्या वास्तुपुरुषाला- जो मी पुरलाय नमस्कार करा. कारण इतकी वर्षं मी तो कुठे पुरलाय हे फक्त मलाच माहीत होतं. आजन्म कृतज्ञ राहीन या वास्तूचा आणि तिथल्या वास्तुपुरुषाचा…

आम्ही आपापल्या प्रपंचात, व्यवसायात व्यग्र झालो आणि अचानक आई आणि बाबांची वयं आणि आजारपणं वाढली. एकूणच बदल हवा होता. दादालाही त्याच्या नव्या घरी जायची ओढ लागलेली होती आणि बाबांनी काळजावर दगड ठेवून हे घर विकण्याचा निर्णय घेतला. आता घरातून एक एक सामान शिफ्ट करताना बाबांचे डोळे भरलेले मी पाहिलेत. पण त्यांच्या या भावनांवर काळ हेच उत्तर आहे असं वाटतं. ४० वर्षांचा सहवास होता या घराचा. आई-बाबांचे कष्ट या घरानं पाहिलेत.

nileshjadhavartist@gmail.com