जेव्हा विद्युत आग लागते, तेव्हा सर्वसाधारणपणे दिले जाणारे कारण म्हणजे ‘शॉर्ट सर्किट’. मात्र हा शब्द खूपच व्यापक अर्थाने वापरला जातो आणि शॉर्ट सर्किट व आग यामधील प्रत्यक्ष संबंध अनेकांना समजत नाही. त्यामुळे आगीचे खरे कारण सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. या गोंधळामुळे अनेकदा चुकीचे निष्कर्ष काढले जातात आणि प्रतिबंधक उपाय प्रभावी ठरत नाहीत.

जसे पाणी कमी किंवा अजिबात प्रतिकार नसलेल्या मोकळ्या मार्गाने वाहते, तसाच विद्युत प्रवाहही वागतो. विद्युत प्रणाली सामान्य स्थितीत असताना, ज्या वेळी विद्युत प्रवाह असलेल्या (Live) तारांचा परस्पर संपर्क होतो किंवा त्या अर्थिंगच्या (Earth) संपर्कात येतात, तेव्हा असामान्य स्थिती (sparking) निर्माण होते. असे इन्सुलेशन खराब होणे, सैल जोडणी(loose connection), यांत्रिक बिघाड (equipment failure) , ओलावा, किंवा वायरिंग जुने होणे यामुळे घडते. अशा स्थितीला शॉर्ट सर्किट म्हणतात.

शॉर्ट सर्किटमध्ये विद्युत प्रवाहाला अतिशय कमी प्रतिकाराचा मार्ग मिळतो आणि अचानक मोठ्या प्रमाणात प्रवाह वाहू लागतो. वीज स्वतः जळत नाही. मात्र शॉर्ट सर्किटदरम्यान निर्माण होणारी अती उष्णता आणि ठिणग्या आग लागण्यास कारणीभूत ठरतात. ही उष्णता किंवा ठिणगी जर इन्सुलेशन, प्लास्टिक, लाकूड, धूळ, कापड यांसारख्या ज्वलनशील पदार्थांच्या संपर्कात आली तर आग लागते.

शॉर्ट सर्किटचे प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात. पहिला प्रकार म्हणजे ‘डेड शॉर्ट सर्किट’- ज्यामध्ये तारा थेट एकमेकांच्या संपर्कात येतात आणि अतिशय जास्त प्रवाह निर्माण होतो. योग्य रितीने डिझाइन व संरक्षित केलेल्या प्रणालींमध्ये स्विचगिअर त्वरित कार्यरत होऊन वीजपुरवठा खंडित करते आणि आग टळते.

दुसरा प्रकार म्हणजे ‘मर्यादित शॉर्ट सर्किट’- ज्यामध्ये प्रवाह तुलनेने कमी असतो. संपर्क क्षेत्र खूप लहान असल्यामुळे किंवा प्रतिकार पूर्णपणे कमी नसल्यामुळे संरक्षण उपकरणे त्वरित कार्यरत होत नाहीत. अशा स्थितीत लहान ठिणग्या आणि तीव्र स्थानिक उष्णता निर्माण होते. ही स्थिती अधिक धोकादायक असते, कारण संरक्षण कार्यरत होण्यापूर्वीच आजूबाजूच्या ज्वलनशील पदार्थांना आग लागू शकते.

दैनंदिन विद्युत प्रतिष्ठापनांमध्ये (establishments) शॉर्ट सर्किटची अनेक प्रत्यक्ष उदाहरणे आढळतात. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विद्युत तारांचे इन्सुलेशन खराब झाल्यास त्या तारा एकमेकांना किंवा धातूच्या पाईपला (metal conduit) स्पर्श करू शकतात. स्विचबोर्डमधील सैल (loose) टर्मिनल्समुळे अधूनमधून संपर्क तुटतो (connection) आणि ठिणग्या (sparking) निर्माण होतात. केबल्सचे नुकसान झाल्यास उघडे विद्युत प्रवाहित कंडक्टर एकमेकांना लागून शॉर्ट सर्किट होऊ शकते. मीटर रूम, बाहेरील जंक्शन बॉक्स किंवा बाहेरील लाईट फिटिंगमध्ये पाणी शिरल्यास लाईव्ह वायर अर्थींगशी(earthing) संपर्कात येते. जुने सिलिंग फॅन, एअर कंडिशनर, फ्रिज किंवा लाईट फिटिंगमध्ये कालांतराने अंतर्गत इन्सुलेशन फेल होते. योग्य टर्मिनेशन, लग्स किंवा ग्लॅंड न वापरता घेतलेल्या तात्पुरत्या वायरिंगमुळे तारा हलतात आणि ठिणग्या (sparking) निर्माण होतात. ट्रान्सफॉर्मर, मोटर आणि पंप यांच्या आतल्या इन्सुलेशनमध्ये बिघाड झाल्यासही शॉर्ट सर्किट होऊ शकते.

हेही वाचा

शॉर्ट सर्किटदरम्यान निर्माण होणाऱ्या ठिणग्या (sparking) किंवा आर्कचे (arcing) तापमान हजारो अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. क्षणिक आर्कसुद्धा पीव्हीसी इन्सुलेशन, धूळ, कापूस, कापड, ग्यास किंवा ज्वलनशील वायूंना पेटविण्यास पुरेसा असतो. अनेक विद्युत आगी भिंतींच्या आत, स्विचबोर्ड किंवा पॅनेलमध्ये न महिती पडता सुरू होतात आणि कोणतीही पूर्वसूचना देत नाहीत. म्हणूनच शॉर्ट सर्किटकडे केवळ ट्रिपिंगची घटना म्हणून पाहू नये किंवा दुर्लक्षित करू नये. प्रत्यक्षात ते एक प्रज्वलन स्रोत (Ignition Source) आहे. ते मोठया आगीत रूपांतरित होऊ शकते.

पुढील लेखात आपण विद्युत आगीचे आणखी एक महत्त्वाचे, पण कमी लक्षात येणारे कारण- ओव्हरलोडिंग आणि ओव्हरहीटिंग- समजून घेणार आहोत, जे अनेकदा ठिणग्या(sparking) किंवा आवाजाशिवाय घडते. लहान दोषही धोकादायक ठरू शकतात. विजेचा सन्मान करा.

अजित न. कुळकर्णी
(लेखक वीजविषयक सल्लागार आहेत.)

ajitnkulkarni@yahoo.com