शं. रा. पेंडसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घर हे दगडामातीचं असतं, पण जिवंत माणसांपेक्षाही ते आपल्याला जास्त माया लावते. आयुष्यभर कधीही न विसरणारे संस्कार करते. माझा जन्म श्रीवर्धन येथे याच घरात झाला. त्यामुळे श्रीवर्धन गावाबद्दल आणि आमच्या त्या घराबद्दल मला नेहमीच आपुलकी वाटत आली आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात श्रीवर्धन-जंजिरा संस्थानचा एक तालुका होता ही ओळख आज जरी लोक विसरले असले, तरी श्रीवर्धन हा पेशव्यांचं गाव ही ऐतिहासिक ओळख अजूनही कायम आहे. पेशव्यांच्या वाडय़ाचा कमरभर उंचीचा जोता अजूनही त्याची साक्ष देतो. आज पेशव्यांचा पुतळा आणि स्मारक इतिहासाच्या खुणा दाखवते.

अशा इतिहासप्रसिद्ध गावातल्या डोंगरपाखडीत (हल्लीच्या गणेशआळीत) हे आमचे घर होतं. साधारण एक ट्रक सहज जाईल इतका रुंद प्रवेश दरवाजा होता. आत शिरलं की अदमासे दहाबारा फूट रुंदीचे आणि तीस एक फूट लांबीचे अंगण होते. या अंगणावर पत्र्याचा मंडप होता. या अंगणाचा डावीकडील भाग विविध प्रकारच्या आणि मापाच्या लाकडी फळ्यांनी भरलेला असे, कारण त्या काळात काकांचा लाकडाचा व्यापार होता. उजवीकडचं अंगण शेणानं सारवलेलं असे आणि अंगणातच चार माणसं बसतील असा एक आणि दोन माणसांचा एक असे कोचासारखे लाकडी कोच ठेवलेले होते. एक आरामखुर्ची आणि दोन खुच्र्या गोलात ठेवलेल्या होत्या आणि या सर्वाच्या मधे एक लाकडी स्टूल असे ज्यावर घासूनपुसून चकचकीत केलेला पान सुपारीचा पितळी डबा असे. येणारा पाव्हणा काकांची वाट पाहत निर्धास्तपणे पानविडय़ाचा समाचार घेत बसे.

अंगणातून घरात प्रवेश करण्याकरिता खालच्या भागात पूर्ण लाकडाचा तर वरच्या भागांत पितळी सळ्या असलेला दरवाजा होता. या दरवाजातून आपण अंगणाला समांतर असलेल्या, घराचा भाग असलेल्या पडवीत प्रवेश करतो. या लांबलचक पडवीत उजव्या भागात शिसवी लाकडाचा सात-आठ मुलं बसतील असा झोपाळा होता. याच झोपाळ्यावर बसून आम्हा मुलांचा गाण्यांच्या भेंडय़ाचा कार्यक्रम रंगायचा, पण सायंकाळी सुरुवातीला ‘शुभंकरोती कल्याणम्’ आणि रामरक्षा म्हटल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम करायला मुभा नव्हती.

पडवीच्या डाव्या भागात सटरफटर सामान आणि माडीवर जाण्याकरिता लाकडी जीना होता. ही माडी म्हणजे लाकडी फळ्या ठोकून केलेला एक मजला होता. या मजल्यावर एक पलंग, दोन खुच्र्या आणि पाच-सहा माणसं बसू शकतील अशी एक सतरंजी घातलेली असे. पत्ते खेळायला किंवा तबलापेटीच्या साथीवर भजने म्हणायला ही चांगली जागा होती. पडवीमधून घरात जाण्यापूर्वी छोटीशी ओटी होती. तिथं लाकडी सुंभानी विणलेली बाज (कॉट) असे त्याच्यावर काथ्याची गादी असे. आजी वा आत्या तिथं बसलेल्या असायच्या, नाही तर त्यांचा राबता स्वयंपाकघरात असे.

ओटीवरून चार फूट रुंदीच्या भक्कम दरवाजातून आपला प्रवेश प्रशस्त माजघरात होत असे. माजघरातल्या उजव्या कोपऱ्यांत एक देवघर होतं. देवघरात तिन्ही बाजूला अनेक देवतांच्या तसबिरी होत्या. मुख्य पूजा करायचे देव भव्य चांदीच्या ताम्हणात असत. त्यांची रोज सकाळी विधीवत पूजा होत असे. सायंकाळी निरंजन आणि उदबत्ती लावली जाई.

भोजनाची पंगत या माजघरातच बसे. बसायला पाट असत. ताट-वाटी पंचपात्र, तांब्या असा सरंजाम असे. कधी पंगत मोठी असली की केळीचे पान आणि द्रोण यामध्ये पदार्थ वाढले जात. माजघराला काटकोन करून चिंचोळे असे स्वयंपाकघर होतं. चार चुली आणि वेल यावर स्वयंपाक होई. जळणाकरिता लाकूडफाटय़ाचे व्यवस्थित तुकडे केलेले असत.

स्वयंपाक घरातून एक दरवाजा घराच्या बाहेर पडे. तेथून विहिरीवर जाणे सोपे होते. विहिरीवर हात रहाट होता. एकीने हातरहाटाने पाणी काढून हंडा वा कळशी भरायची आणि दुसरीने भरलेली कळशी वा हंडा पायऱ्या चढून स्वयंपाक घरात आणायचा अशी श्रमविभागणी असे. पण हे काम करताना मला कधी घरातली पुरुष मंडळी दिसली नाही किंवा पुरुष असूनसुद्धा मी हे काम केल्याचे मला आठवत नाही. तो काळच तसा होता. दुसरं काय म्हणायचं?

माजघरातल्या डाव्या हाताच्या कोपऱ्यांत असलेल्या एका खोलीचा उल्लेख राहून गेला. तिला काळोखाची खोली असं म्हणत. खरं म्हणजे ती बाळंतपणीची खोली होती. गावातील तेव्हा बहुतेक प्रसूती सुईणी घरातच करीत असत. अशावेळी कोपऱ्यातील अंधेरी खोली कायम याकरिता राखून ठेवलेली असे. प्रसूतीनंतर तीन एक महिने बाईचं वास्तव्य या अंधाऱ्या खोलीतच असे.

माजघरातून एका दरवाजाने थोडं खाली उतरत एका चिंचोळ्या पडवीनामक भागात प्रवेश होई. इथं कांडण्याकरिता वा कुटण्याकरिता एक दगडी खल कायम जमिनीत पुरलेला असे. यात लाकडी मुसळ्याने छोटय़ा प्रमाणात कांडण करता येत असे. शिवाय पापड लाटण्याकरिता ही चिंचोळी पडवी फार उपयुक्त होती. कारण पापडाचे डांगर (भिजवलेले पीठ) कुटण्याकरिता दगडी खलाचा उपयोग होई.

ही चिंचोळी पडवी एका दरवाजाने पार केली की आपण घराच्या मागील दारी येतो. मागील दारी नारळीच्या झापानी चारी बाजू झाकतील असं एक न्हाणीघर येतं. अंगणात पेटलेल्या चुलीवर पाणी उकळत असत. अर्ध्या बादलीत गरम पाणी घेऊन अर्धी बादली थंड पाणी ओतून सोसेल अशा पाण्याने तिथं स्नान करायचं.

खरं म्हणजे या घरात माझं वास्तव्य फार थोडा काळच झालं. माझे वडील प्रथम जंजिरा संस्थानाच्या आणि नंतर महाराष्ट्र सरकारच्या नोकरीत होते. त्यामुळे दरवर्षी त्यांची बदली होई. पण गौरीगणपती, दिवाळी आणि उन्हाळ्याची सुट्टी या काळात आम्ही सर्व भावंडे आवर्जून श्रीवर्धनला जायचो. ठाण्याहून आतेभावंडेही यायची- अशी १२-१५ शाळकरी मुले एकत्र यायचो. त्या काळात एकत्र राहण्याचे, सकाळी उठल्यावर प्रथम तोंड धुऊन ‘वक्रतुंड महाकाय’, सायंकाळी दिवे लागणीला शुभंकरोती आणि रामरक्षा म्हणण्याचे जे संस्कार या घराने दिले ते आज ५०-६० वर्षांनंतरही कायम आहेत.

आम्ही सर्व भावंडे उच्चशिक्षित होऊन जगभर पांगले गेलोत. कधीतरी आतेभावाचा शिकागोहून फोन येतो की ‘एकदा गावाला यायचे आहे रे.’ त्या झोपाळ्यावर बसून उंच झोके घेत रामरक्षा म्हणायची आहे’, तर न्यूझीलंडहून बहीण म्हणते, ‘अरे, सकाळच्या न्याहरीच्या वेळेचा तो गुरगुटय़ा (कण्हेरीसारखा) भात, सोबत पापड, लोणचं आणि झणझणीत मेतकुटाबरोबर जेवायची इच्छा होते आहे.’

खरं म्हणजे घर हे दगडामातीचं असतं, पण जिवंत माणसांपेक्षाही ते आपल्याला जास्त माया लावते. आयुष्यभर कधीही न विसरणारे संस्कार करते. आज आमचे ते घर विकले गेले असले तरी त्याने घडविलेले संस्कार कधीही पुसले जाणार नाहीत. इतक्या वर्षांत अनेक घरात राहिलो, पण माझे घर म्हणून म्हटले की मन:चक्षुसमोर उभे राहते ते गावचे माझे घर.

भोजनाची पंगत या माजघरातच बसे. बसायला पाट असत. ताट-वाटी पंचपात्र, तांब्या असा सरंजाम असे. कधी पंगत मोठी असली की केळीचे पान आणि द्रोण यामध्ये पदार्थ वाढले जात. माजघराला काटकोन करून चिंचोळे असे स्वयंपाकघर होतं. चार चुली आणि वेल यावर स्वयंपाक होई. जळणाकरिता लाकूडफाटय़ाचे व्यवस्थित तुकडे केलेले असत.

अंगणातून घरात प्रवेश करण्याकरिता खालच्या भागात पूर्ण लाकडाचा तर वरच्या भागांत पितळी सळ्या असलेला दरवाजा होता. या दरवाजातून आपण अंगणाला समांतर असलेल्या, घराचा भाग असलेल्या पडवीत प्रवेश करतो. या लांबलचक पडवीत उजव्या भागात शिसवी लाकडाचा सात-आठ मुलं बसतील असा झोपाळा होता.

shankarpendse@yahoo.in

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrivardhan house village nature life ysh
First published on: 11-12-2021 at 01:45 IST