मैत्र

या सगळ्या मित्रांच्या सुखद सहवासाचा आणि त्यांनी मिळून वेळोवेळी सादर केलेल्या वाद्यवृंदाचा आनंद घेत असतानाच अलीकडे या झाडावर कावळ्याने घरटे केलेले दिसले आणि खूप वाकून पानाआड लपलेल्या त्या घरटय़ात पाहिल्यावर पिल्लाला भरवणारी आई दिसली. आई आणि बाळ – मग ते …

या सगळ्या मित्रांच्या सुखद सहवासाचा आणि त्यांनी मिळून वेळोवेळी सादर केलेल्या वाद्यवृंदाचा आनंद घेत असतानाच अलीकडे या झाडावर कावळ्याने घरटे केलेले दिसले आणि खूप वाकून पानाआड लपलेल्या त्या घरटय़ात पाहिल्यावर पिल्लाला भरवणारी आई दिसली. आई आणि बाळ – मग ते कावळ्याचं का असेना, एक परिपूर्ण दृश्य असतं, हे नव्याने लक्षात आलं.
पाहुणे म्हणावे, तर ते कधी घरात आले नाही. पण घराबाहेर राहूनच त्यांनी एवढा जीव लावला की खिडकीशी आमचा मुक्काम वाढतच गेला.
हे हवेहवेसे वाटणारे पाहुणे, म्हणजे आमच्या तिसऱ्या मजल्यालगतच्या सोनमोहोराच्या झाडावर बागडणारे विविध पक्षी. हे झाड आमच्या खिडकीच्या उंचीवर आलेलं लक्षात आलं तेच मुळी या मित्रांच्या विविध आवाजांमुळे. सकाळी जाग येते तीच मुळी, कधी दयाळच्या शिट्टीने, कधी चिमुकल्या सूर्यपक्ष्यांच्या कूजनाने, कधी भारद्वाजाच्या आळवणीने तर कधी तांबटच्या टुकटुकीने. या सर्वाच्या जोडीला कोकीळ पक्ष्याचे मंजुळ कुहू आहेच.
या माझ्या मित्रांमुळे लिफ्ट नसलेल्या बिल्डिंगमधलं तिसऱ्या मजल्यावरचं हे घर चक्क मित्रमंडळींच्या हेव्याचा विषय झालंय. अंधेरीसारख्या गजबजलेल्या उपनगरातील वीरा देसाई मार्ग येथील घरात आम्हाला हे आनंदनिधान गवसलंय.
कधी पानगळीने निष्पर्ण झालेल्या, कधी हिरव्यागार पानांनी आच्छादलेल्या, तर कधी पिवळ्याधमक फुलांनी डवरलेल्या आणि अंगाखांद्यावर एक मधुमालतीची वेल मिरवणाऱ्या या सोनमोहोरावर अगणित पक्ष्यांची ये-जा असते. झाडावर शेंगा असतात, तेव्हा पोपट थव्यांनी येतात. एक पाय फांदीवर घट्ट रोवून दुसऱ्याने शेंग चोचीजवळ नेऊन ती फोडून त्यातले दाणे खाणारं पोपटाचं ध्यान मोठं दर्शनीय असतं. कर्कश आवाज काढून ते बंधुजनांना आवतणही देत असतात.
भारद्वाजांची जोडी दिसणं भाग्याचं असलं तरी आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच! कधी दोन, कधी चार तर कधी एकदम सहा भारद्वाज झाडावर दिसतात. कावळ्याला पळवून लावणारा हा आक्रमक पक्षी.
बुलबुल नेहमी जोडीने येतात. त्यांच्या शेपटीवर लाल ठिपका असतो, हे आम्हाला माहीत होतं. पण एकदा डोळ्याजवळ लाल ठिपका असलेला बुलबुलही दिसला. त्याला फी िूँी‘ी िबुलबुल म्हणतात असं कळलं.
शीळ घालून दयाळ आम्हाला खिडकीशी बोलावतो. दुभंगलेल्या शेपटीचा काळा कुळकुळीत कोतवाल, लांब चोच, काळं डोकं आणि मोरपंखी निळ्या शरीराचा खंडय़ा, फांदी-फांदीवर चिमुकला पिसारा पसरत सतत नाचणारी नाचण, साधा पिवळा हळद्या आणि पंखावर काळं डिझाइन असणारा पिवळाधमक त्याचा जोडीदार. चिमुकले हिरवे, किंचित केशरी पोट असणारे शिंपी हे सगळे मधून मधून दर्शन देणारे. त्यामुळे सतत वाट बघायला लावणारे लोभस मित्र. तांबट मात्र जवळजवळ रोजचा पाहुणा, कुठेतरी पानाआड लपून टुकटुक करत जणू ‘मी कुठे? मला शोध’ असं म्हणत अवचित समोर येऊन बसणारा. पंखावर सुंदर डिझाइन असणाऱ्या घारीच्या पिल्लाला मात्र कावळा हुसकून लावतो. झाडापलीकडे असलेल्या पाणथळ जागेत बागडणाऱ्या बगळ्यांपैकी एखादा पांढराशुभ्र बगळा कधीतरी झाडाच्या शेंडय़ावर मान उंच करून बसलेला आढळतो.
अलीकडे एकदा एका पक्ष्याने आम्हाला काळजीत टाकलं होतं. साधारण घुबडाच्या आकाराचा, बाकदार चोच आणि हिरवे-पिवळे भेदक डोळे असणारा हा पक्षी करडय़ा रंगाचा होता आणि हातात पांढरा रंग घेऊन शिंपडावा असे पांढरे ठिपके मिरवत होता. हा झाडावर येऊन बसायला लागला आणि आमच्या इतर मित्रांनी जणू झाडावर बहिष्कारच टाकला. आम्ही हताश होऊन बघत असतानाच एक दिवस कावळ्यांनी मनावर घेतलं आणि हळूहळू आपली संख्या वाढवत त्याच्या आजूबाजूला, खाली-वर बसत त्याला उडवून लावलं आणि झाड इतर पक्ष्यांसाठी मोकळं झालं. नेहमी ज्याचा उगीचच राग येतो, तो कावळाही मला त्या क्षणी सुहृद वाटला.
या सगळ्या मित्रांच्या सुखद सहवासाचा आणि त्यांनी मिळून वेळोवेळी सादर केलेल्या वाद्यवृंदाचा आनंद घेत असतानाच अलीकडे या झाडावर कावळ्याने घरटे केलेले दिसले आणि खूप वाकून, पानाआड लपलेल्या त्या घरटय़ात पाहिल्यावर पिल्लाला भरवणारी आई दिसली. आई आणि बाळ, मग ते कावळ्याचं का असेना, एक परिपूर्ण दृश्य असतं, हे नव्याने लक्षात आलं.
तिसऱ्या मजल्यावरच्या घराच्या एका बेडरूमची ही खिडकी. दुर्बिणीशिवाय नुसत्या डोळ्यांनी दिसणारं हे वैभव. कधी कधी, आपण पक्षी अभयारण्यात आहोत की काय असं वाटायला लावणारं. अनेक प्रकारचे आवाज करून खिडकीशी आम्हाला साद घालणाऱ्या या मित्रांमुळे चहाचं पाणी उकळून अर्ध झालं किंवा व्यायाम अध्र्यावरच सोडला, हे नित्याचंच झालंय.
ज्यांना आपण मूक म्हणतो अशा सजीवांनी आम्हा दोघा पती-पत्नींमधला संवाद वाढवायला मात्र मदत केलीय.
आणि हो, शहरांमधून आपल्या चिऊताई गायब झाल्यात असं ज्यांना वाटतं त्यांनी आमच्या घरची वाट धरावी. या सर्व रंगीबेरंगी जगात चिवचिवाट करत त्या ठळकपणे आपलं अस्तित्व जाणवून देत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sparrow true friends

ताज्या बातम्या