‘रिक्षावाल्याला पाचपाखाडी सांगा. तिथे सरस्वती इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. त्याच्या अगदी जवळ आम्ही राहतो. शाळेजवळ आलात की कोणालाही आमच्या सोसायटीचं नाव विचारा. गेटमधून आत आलात की दोन इमारती दिसतील. त्यातली पहिली मोठी इमारत सोडायची, दुसरी छोटी आमची. तिथे तळमजल्यावरच आमचा ब्लॉक आहे. सोसायटीचं नाव लक्षात ठेवा म्हणजे सहज सापडेल. याऽऽ वाट बघते.’

ओळखीच्या धाग्यांची वीण घट्ट बसली, ‘नाते जुळले मनाशी मनाचे’ की घरी येण्याचं आग्रहाचं आमंत्रण असं दिलं जातंच. घरबरोबर सापडावं म्हणून पत्ता हवाच. एखाद्या नियंत्रण पत्रिकेच्या नकाशात कार्यस्थळाचा मार्ग बाणांनी दाखवलेला असतो आणि तो मार्ग थांबतो इच्छित स्थळाशी. तसाच पत्ता थांबतो आपल्या घराच्या नावाशी. पत्ता लिहिताना आपलं नाव लिहिलं की लगेच आपण घराचं नाव लिहितो. मग इतर परिसराच्या खाणाखुणा. लहान मूल बोलायला लागलं की आधी स्वत:चं नाव सांगायला शिकतं आणि त्या पाठोपाठ आपलं राहाण्याच्या ठिकाणाचं म्हणजे घराचं नाव त्याला पाठ होतं. कोणी पाहुणे घरी आले की कौतुकानं ही टेप लावण्याचा परिपाठच असतो. इतकं घराच्या नावाशी आपण चिकटलेले असतो.

आयुष्यात घर घेण्यातच इति कर्तव्यता असते. मग तो बंगला असेल तर दुधात साखरच. मग त्याचं बारसं करण्याचे वेध लागतात. मराठीत घराला समानार्थी असलेले शब्द मनात तरंगतच असतात. एखादी व्यक्ती अतिशय भावनिक असते. ‘आपल्या वडिलांनी पै पै जमवून प्लॉटची खरेदी केलेली आहे. त्याची खूप इच्छा होती घर बांधण्याची. बांधकामाला सुरुवात झाल्यावर ते जातीने रोज चक्कर टाकायचे. परंतु घर पूर्ण झालेलं बघायला ते राहिले नाहीत’, या पाश्र्वभूमीवर वडिलांचे नाव घराला देण्याचा निर्णय घेतला जातो. मग रघुनाथ सदन, नारायण निवास, मनोहर महल, सदानंद सदन अशा नावाने वडिलांच्या स्मृतींशी घर जोडले जाते. कधी बालपणी वडिलांचे छत्र गमावल्याने घराची सूत्र आईच्याच हातात पाहिलेली असतात. अशावेळी मातृप्रेम उफाळून आल्याने सीताविहार, सिंधुस्मृती, जानकी निवास, राधा सदन असे नामाभिमान करत जन्मदात्रीचे ऋण व्यक्त केले जाते. कधी जोडप्याने जोडीने हाडाची काडं करत घर उभे केलेले असते. परस्परातील सहयोगाने ते मूर्तरूपास आलेले असते. अशा वेळी तृप्ती, समाधान, सुयश, स्वावलंबन, साफल्य असं सूचक नाव घराला अर्थपूर्ण वलय देत असते. एखादी तरल कवीमनाची जोडी दोघांच्या नावातील अर्धाअर्धा भाग एकत्र करून जोडनावाने घरावर प्रेमाची पाखर घालत असते. मधुस्मिता, मधुमालती, जानकीनाथ, भवानीशंकर, देवलीला, मिलिंदमीरा, रजनीकांत अशी ही हातात हात घालून केलेली अर्धी अर्धी भागीदारी, कधी- कधी घराचा निर्णय व्हायला आणि संसार वेलीवर अंकुर फुटायला किंवा कळी उमलायला एकच गाठ पडते. मग काय दोन्ही बारशी ‘एकच’ नावाने. विनाकारण आवडतं नाव दिलं जात. संध्या, विकास, छाया, श्री च्या दुडदुड पावलांनी घर दुमदुमन जातं. आपला वयाचा दाखला, बाळाच्या प्रगतीशी जोडत राहतं. केवळ भगवंताची कृपा होती म्हणून घर दृष्टीस पडलं, अशी श्रद्धा लक्ष्मीनिवास, श्री साईकृपा, कृष्णकुंज, प्रभुकुंड, अंबिकादर्शन अशा नावाना जन्म देतो. कोणी सरळसोट आडनावाच्या पाटय़ा लटकावून झटपट मोकळा होतो. ‘आड’ वाटा धुंडाळण्याची तोशिष मनाला दिली जात नाही. सोळंकी सदन, कामथेभुवन, लेले बंगला, साठेवाडी, वैद्य बंगला, पोस्टमनचं काम सोपं करून टाकतात. एखाद्या प्रथितयश कलाकाराच्या बंगल्याच्या नावातच त्याचे कलाप्रेम, त्याचे कलाविश्व अभिमानाने डोकवत राहतात. नादब्रह्म, दौलत, भैरवी, स्वरश्री, पंचवटी, चित्रांगण अशी नावे जाणाऱ्या-येणाऱ्याला ‘क्षणभर’ थांबायला लावतात. स्मृतींची पाने फडफडत राहतात.

बंगला असला की नाव ठेवण्यात व्यक्तीस्वातंत्र्य असतं. चाळ किंवा भाडय़ाचं घर असलं की सर्व हक्क मालकाच्या स्वाधीन. मग ती ‘बटाटय़ाची चाळ’, ‘आनंदाश्रम; लक्ष्मीनिवास मांडवीकर वाडी असते. वाडा असेल तर तो गोरेवाडा, साठेवाडा, फडके वाडा, सुभेदार वाडा होतो. चाळी, वाडय़ा यांचे स्थित्यंतर होत, सहकारी सोसायटय़ा उभ्या राहिल्या. सभासदांनी एकमुखाने नावाला पसंती देण्याची प्रथा चालू  झाली. प्रगती, पूर्वा, शोभना, रूबी, सोपान, जीवनतारा, लोकमान्य, रघुवीर, मेघदूत, चंद्रनगर, गिरीराज, आधार, आम्रपाली इत्यादी नावाचं नाव. काहीही असलं तरी नावातून एक साधेपणा, मराठमोळी संस्कृती झिरपत राहिली.

कालचक्राला गती मिळाली. बंगल्याचा रुबाब, ऐट कायम राहिल, पण ‘घेई कुशीत माते’ म्हणत चाळींनी हलकेच डोळे मिटले. ‘बिना सहकार नही उद्धार’ म्हणत घरांचे ताडमाड उंच टॉवर झाले. नावापुढे टॉवरची उपाधी लावत ते आपली उंची नावातून प्रकट करू लागले. यशवंत टॉवर, नीळकंठ टॉवर, गौतम टॉवर, रौनक टॉवर. लांब दांडय़ाच्या फुलांनी एकत्र येऊन ‘बुके’ करावा, तसं उंच उंच टॉवर्सनी एकत्र कोंडाळ केलं. सगळ्या सुखसोयींनी युक्त असं स्वतंत्र जगच निर्माण झालं. भौतिक रूपात बदल झाल्यावर नावात होणारच ना! मराठी माध्यमाच्या शाळांच्या जागी इंग्रजी माध्यमाच्या शाळा याव्यात, तसे मोठमोठे ‘कॉम्प्लेक्स’ उभे राहिले. बोलीभाषेत जशी मराठी इंग्रजी सरमिसळ होऊ लागली, तशी ‘घरां’च्या नावातही होऊ लागली. श्रीजी आर्केड, सुमित एन्क्लेव्ह, पारिजात गार्डन, कोणार्क रिजन्सी, स्वस्तिक पार्क. मराठीत दिसण्याऐवजी काही नावं इंग्रजीत झळकू लागली. बदललेल्या जीवनशैलीची अभिव्यक्ती करत राहिली. सेंटर पॉइन्ट, रहेजा गार्डन, अ‍ॅकोलेड त्यात इंग्रजी फुले फुलू लागली. सुरुवातीला ओळख पटली नाही, दुरावा वाटला, ‘तोंड’वळणी पडणं कठीण गेलं. कालाय तस्मै: नम: म्हणत या बदलाशी ‘गट्टी’ होत गेली कारण आपली नाळ आपल्या ‘घरा’शी जुळलेली असते ना म्हणून.