स्ट्रक्चरल ऑडिटचा नेमका नमुना कसा हवा, त्या अहवालात कोणकोणते मुद्दे तपशीलवार यायला हवेत, याविषयी अलीकडेच प्रॅक्टिसिंग इंजिनीअर्स, आर्किटेक्ट्स अ‍ॅण्ड टाऊन प्लॅनर्स असोसिएशनने ‘स्ट्रक्चरल ऑडिट : की टू सेफ लिव्हिंग’  या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केलं होतं.  या चर्चासत्रातील महत्त्वाच्या मुद्दय़ांविषयी..
आपण आपल्या वयाची पंचेचाळिशी गाठली की, ज्याप्रमाणे ठरावीक काळानंतर संपूर्ण आरोग्य तपासणी करून घेतो, त्याप्रमाणे इमारतीच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी वेळोवेळी करून घेणं आवश्यक आहे. यालाच आपण ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ असं म्हणतो. हे स्ट्रक्चरल ऑडिट दर दहा वर्षांनी करून घेणं हे आता कायद्यानेही बंधनकारक आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात इमारती पडल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या. अशा अपघातांमध्ये होणारी जीवित आणि वित्तहानी आपल्याला टाळायची असेल, तर इमारतीतले दोष या स्ट्रक्चरल ऑडिटच्या माध्यमातून शोधून काढून त्यावर त्वरित उपाय करायची गरज आहे. त्या दृष्टीने सध्या अनेक स्ट्रक्चरल इंजिनीअर अशा प्रकारचं स्ट्रक्चरल ऑडिट करायचं काम करताना दिसतही आहेत. मात्र, अशा स्ट्रक्चरल ऑडिटचा नेमका नमुना कसा हवा, त्याच्या अहवालात कोणकोणते मुद्दे तपशीलवार यायला हवेत, काँक्रीटच्या आणि त्यातल्या सळ्यांच्या कोणकोणत्या चाचण्या यासाठी कराव्या लागतील, याबाबत माहिती देण्यासाठी अलीकडेच ‘पीएटा’ अर्थात, ‘प्रॅक्टिसिंग इंजिनीअर्स, आíकटेक्ट्स अ‍ॅण्ड टाऊन प्लॅनर्स असोसिएशन’ या संस्थेनं मुंबईत वांद्रे इथे ‘स्ट्रक्चरल ऑडिट  : की टू सेफ लििव्हग’ अर्थात ‘स्ट्रक्चरल ऑडिट : सुरक्षित आयुष्याची गुरुकिल्ली’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केलं होतं. संस्थेचे अध्यक्ष व वास्तुरचनाकार शिरीष सुखात्मे, माजी अध्यक्ष वास्तुरचनाकार प्रवीण कणेकर यांच्यासह आयआयटी मुंबईचे प्रा. डॉ. के. एम. बजोरिया, मुंबई अग्निशमन दलाचे उपमुख्य अग्नी अधिकारी सुनील नेसरीकर, अनेक टोलेजंग इमारतींची संरचना करणारे स्ट्रक्चरल इजिनीअर गिरीश द्रवीड यांनी स्ट्रक्चरल ऑडिट नेमकं कसं करायचं आणि त्याच्या अहवालात कोणकोणते मुद्दे येणं आवश्यक आहे, याबाबत तपशीलवार माहिती दिली. याबरोबरच मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर त्या इमारतीचं फायर ऑडिट करणारे स्ट्रक्चरल इंजिनीअर डॉ. हिमांशू राजे यांनी फायर ऑडिट कसं करावं याबाबत तपशीलवार माहिती दिली. अ‍ॅडव्होकेट अतुल तुंगारे यांनी इमारत दुर्घटना घडल्यानंतर आणि त्या घडू नयेत यासाठी कोणत्या कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाऊ शकते, याची माहिती दिली. तर सहकारी संस्थांचे प्रतिनिधी चंद्रु थडानी यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांची याबाबतची भूमिका विषद केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एस. के. मुखर्जी यांनीही मार्गदर्शन केलं.
इमारती पडल्या की सर्वसाधारणपणे एक चौकशी समिती नेमली जाते. ही समिती इमारतीच्या कोसळलेल्या भागाची पाहणी करून तो पडण्यामागची कारणं शोधते. इमारतीचा कोणता भाग अवैध होता का, हे पाहण्यासाठी इमारतीचे मूळ आराखडे तपासून बघितले जातात. इमारत बांधून पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र (कम्प्लिशन सर्टििफकेट) देणारा वास्तुरचनाकार आणि इमारत भक्कम असल्याचं प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टििफकेट) देणारा स्ट्रक्चरल इंजिनीअर अर्थात संरचनाकार अभियंता कोण होता याची विचारणा केली जाते. पण याचबरोबर जी इमारत पडलेली असते, ती तीस-पस्तीस किंवा त्याहूनही अधिक जुनी असेल, तर इमारतीच्या वयानुसार तिची परिस्थिती खराब होत जाते. अनेकदा ही बाब लक्षात न घेता किंवा इमारतीची संरचनात्मक सुरक्षितता विचारात न घेता त्यातले रहिवासी नूतनीकरण करताना त्यांना हवे तसे बदल करतात, ही गोष्ट चौकशी समिती बऱ्याचदा लक्षात घेत नाही. कधी कधी इमारत पूर्ण कोसळली असेल, तर मूळ आराखडय़ांसोबत इमारत अशा प्रकारे कोणते बदल आराखडय़ाबाहेर जाऊन केले होते, ते तपासताही येत नाही. थोडक्यात, संरचनात्मकदृष्टय़ा इमारत सुरक्षित असली पाहिजे, हे पाहण्याची जशी वास्तुरचनाकार आणि संरचना अभियंत्यांची जबाबदारी असते, तशीच त्यात रहाणाऱ्या रहिवाशांचीही असते, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. पण यामध्ये राहणारे सगळेच रहिवासी, हे नेहमीच वास्तुरचनाकार किंवा स्थापत्य अभियंते नसतात. म्हणून गृहनिर्माण संस्थांच्या सचिव, अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना वास्तुसुरक्षेच्या दृष्टीनं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, असं वाटतं. पण एकूणच अशा प्रशिक्षणांना गांभीर्यानं घेतलं जाणार नाही, हे पाहता ते सक्तीचं केलं जावं. याच प्रशिक्षणात स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट याबाबतही मार्गदर्शन करण्याची गरज आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणं आवश्यक आहे. ते असे-
सर्वप्रथम इमारतीचा संरचनात्मक आराखडा तयार करून त्यावर विविध मजल्यांवरचे बीम, कॉलम, स्लॅब इत्यादी गोष्टी अनुक्रमांकासह दाखवाव्यात.
मग इमारतीची कसून तपासणी करून विविध कॉलम, बीम, स्लॅब, सज्जा, पोटमाळे इत्यादी संरचनात्मक भागांवर कुठे भेगा किंवा तडे दिसत आहेत का, याविषयी बारीक पाहणी करावी. तसंच कुठे पाण्याचा पाझर अथवा गळती दिसत असेल, तर त्याचीही नोंद करावी. याशिवाय कुठे झाडे किंवा पालवी उगवलेली दिसत असेल, तर तेही नोंदवून घ्यावे. कारण ती तिथेच उगवू शकते जिथे पाण्याचा पाझर आहे.
अशा प्रकारे इमारतीतले सर्व दोष शोधून काढल्यानंतर त्याची कारणे शोधावीत.
या दोषांवर कोणते उपाय करता येतील, याविषयी विचार करावा.
स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर त्याचा अहवाल तयार करताना त्यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश असला पाहिजे-
यामध्ये दोषांची कारणं शोधण्याच्या दृष्टीने गृहनिर्माण संस्थेविषयी माहिती, इमारतीचा संरचनात्मक प्रकार, तिचे वय इत्यादींबाबतची माहिती लिहिणे आवश्यक आहे.
वर उल्लेख केल्याप्रमाणे इमारतीचे संरचनात्मक आराखडे आणि इमारतीतले दोष त्यांच्या जागांसह नमूद केले पाहिजेत.
ते दूर करण्याच्या दृष्टीनं कोणते उपाय करणार तेही या अहवालात तपशिलात यायला हवे. सळ्या गंजल्या असतील, काँक्रीटला तडे गेले असतील किंवा हवामानातली आर्द्रता आणि विशेषत: समुद्रानजीक असलेली खारी हवा यामुळे सळ्या गंजण्याची किंवा काँक्रीटचा पृष्ठभाग काळा पडण्याची (काबरेनेशन) प्रक्रिया घडली असेल, तर त्याबाबतची माहिती उपयांच्या प्रक्रियांसह तपशीलवार द्यायला हवी.
काँक्रीटवर काही चाचण्या केल्या जातात. काँक्रीटची किती ताकद सध्या शिल्लक आहे ते तपासून पाहण्यासाठी रिबाउंड हॅमर नावाचे उपकरण वापरतात. पण या उपकरणाद्वारे मिळालेल्या अनुमानावर पूर्णपणे विसंबून राहता येत नाही. उदाहरणच द्यायचं झालं, तर फायर ऑडिट करताना जर हे उपकरण वापरलं, तर आगीमुळे काँक्रीटचा पृष्ठभाग हा अधिक कठीण होतो, पण त्याची ताकद मात्र कमी झालेली असते. असं असताना पृष्ठभागाच्या काठीण्यावरून त्याच्या ताकदीचा अंदाज बांधणारं हे उपकरण दिशाभूल करू शकतं. पण जास्त बिनचूक निदान करायचे असेल, तर अल्ट्रासोनिक उपकरण वापरून काँक्रीटची सध्याची घनता किंवा सच्छिद्रता तपासून बघता येते. याला नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेिस्टग असं म्हटलं जातं. याशिवाय काँक्रीटचा काही भाग नमुना म्हणून काढून घेऊन (कोअर टेस्ट), त्याची ताकद तपासली जाते. करोजन मीटर या उपकरणामुळे सळ्या किती गंजल्या आहेत, ते समजू शकतं. यावरून इमारतीच्या संरचनात्मक भागांची वजन तोलून धरण्याची क्षमता नेमकी किती उरली आहे, ते समजू शकतं. अशा विविध चाचण्या केल्यानंतर इमारत कितीशी धोकादायक आहे किंवा नाही, ते समजू शकतं.
शेवटी इमारत दुरुस्तीकरता सांगितलेले उपाय केलेत तर किती खर्च येईल आणि ते उपाय केल्यानंतर इमारतीचं आयुष्य आणखी किती वर्षांनी वाढू शकेल, याविषयीची माहितीही संरचनात्मक अभियंत्यांनी अशिलांना देणं गरजेचं आहे.
इमारतीचं आगीपासून रक्षण करण्याचं काम हे पॅसिव्ह आणि अ‍ॅक्टिव्ह अशा दोन पद्धतींनी केलं जातं. पॅसिव्ह पद्धत किंवा उपाय याचा अर्थ इमारत बांधत असतानाच आगीपासून अधिक काळपर्यंत संरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं आणि आग अधिक पसरू नये यासाठी बांधकामातच काळजी घेणं होय. अग्निरोधक यंत्रणा आणि उपकरणांची उभारणी आणि प्रत्यक्ष आगीच्यावेळी करायचे उपाय यांचा समावेश अ‍ॅक्टिव्ह उपायांमध्ये होतो.
आपण ज्या इमारतीत राहतो तिथली केवळ सदनिका किंवा गाळा आपला नसतो, तर ती संपूर्ण इमारतच माझी आहे, ही भावना निर्माण झाली आणि त्या दृष्टीने जर इमारतीच्या सुरक्षेची काळजी घेऊन वेळीच उपाय केलेत तर इमारतीबरोबरच
आपलंही आयुष्य आणि एकूणच जगणं सुरक्षित होईल. म्हणूनच स्ट्रक्चरल ऑडिट ही सुरक्षित आयुष्य जगण्यासाठीची एक गुरुकिल्ली आहे.