शं. रा. पेंडसे
त्याकाळात सारे पाण्याचे व्यवहार रहाटाच्या पाण्यावर अवलंबून असत. दरदिवशी ताजे प्यायचे पाणी रहाटा चालू असेल त्यावेळांत भरून ठेवावे लागे. पुरुषांच्या आणि मुलांच्या अंघोळी द्रोणींतल्या पाण्यावर होतं, पण त्याकरिता रहाट चालू असेपर्यंत या अंघोळी उरकाव्या लागत. स्त्री वर्गाच्या अंघोळी साठवलेल्या पाण्याने वा हातरहाटाने पाणी खेचून होतं, पण त्याला कष्ट पडत.
मी काही आपल्याला एखादं कोडं घालत नाही, तर पन्नास साठ वर्षांपूर्वी कोकणात नारळीपोफळीच्या बागेला (कोकणात त्याला वाडी म्हणतात) पाणी देण्याकरिता म्हणजेच वाडीशिंपण्याकरिता (त्याला शिंपणे काढणे असे म्हणतात) ज्याचा उपयोग व्हायचा त्या रहाटाविषयी सांगणार आहे. रहाट, लोटे, रहाटाचा बेले, द्रोणी हे सारे शब्द आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. रहाट म्हणजे काय रे भाऊ? असं मुंबई-पुण्यातल्या एखाद्या पोट्टय़ाने विचारलं तर ते दाखवायला चित्र तरी उपलब्ध असेल काय याबद्दल माझ्या मनात शंका आहे. घरोघरी इलेक्ट्रिकचे पंप विहिरीवर बसविले गेल्याने रहाटाचा बैल दाखवायला एखादं चित्रही उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे.
दिवसातून एक वेळेला किंवा जरुरीप्रमाणे एक दिवसाआड वाडीला पाणी देण्याचा ‘शिंपणे काढणे’ हा विधी संपन्न होत असे. वहिरींतून पाण्याचा उपसा करायला रहाटावर मातीच्या लोटय़ांची माळ असे. रहाट चालू केला की विहिरीत डुबलेले पाण्यांनी भरलेले लोटे पुढे जात एका ठरावीक ठिकाणी ते रिकामे होत हे चक्र चालूच राही आणि लोटय़ांनी उपसलेले पाणी एका द्रोणीत येऊन पडे. तेथून पत्र्याच्या पुढे जाई आणि दांडय़ाने वा पाटाने प्रत्येक झाडाला दिले जात असे. प्रत्येक झाडाभोवती मातीचे वाफे असत. वाफा भरला की मातीच्या छोटय़ा बंधाऱ्यांनी पाणी तेथे जाणे बंद होई. शिंपणे काढणाऱ्या गडय़ाचे यावर पूर्ण लक्ष असे.
रहाटावर जी लोटय़ांची माळ असे त्यातले लोटे मातीचे असत, भट्टीत टाकून तयार केलेले असत. तरीसुद्धा काही लोटे फुटत आणि त्या ठिकाणी दुसरे लोटे रहाटावर चढवावे लागत. आमच्या श्रीवर्धन गावात प्रत्येक घरामागे एक नारळी-पोफळीची बाग असे. वाडी असे. हेच तर उत्पन्नाचे साधन. नारळ आणि सुपारी ही बऱ्यापैकी उत्पन्न देतात. केळी, गैरी आंबे, साधे आंबे, फणस, अननस, पेरू, चिकू ही पण उत्पन्न देतात. काही घरांच्या मागील परस दारांत एक मांडव बांधलेला असतो. या मांडाववर वेली सोडलेल्या असतात. दुधी, लाल भोपळा, तोंडली, कार्ले यांच्या वेलीवरची परसदारची भाजी आणि लाल जास्वंद, पांढरी तगर ही घरचीच देवाच्या पुजेची फुले मिळू शकतात. शहरांत आणि काही सुधारलेल्या खेडय़ात आता घराघरांतून नळ आलेले आहेत. त्यामुळे गृहिणींची केवढी मोठ्ठी सोय झालेली आहे.
त्याकाळात सारे पाण्याचे व्यवहार रहाटाच्या पाण्यावर अवलंबून असत. दरदिवशी ताजे प्यायचे पाणी रहाटा चालू असेल त्यावेळांत भरून ठेवावे लागे. पुरुषांच्या आणि मुलांच्या अंघोळी द्रोणींतल्या पाण्यावर होतं, पण त्याकरिता रहाट चालू असेपर्यंत या अंघोळी उरकाव्या लागत. स्त्री वर्गाच्या अंघोळी साठवलेल्या पाण्याने वा हातरहाटाने पाणी खेचून होतं, पण त्याला कष्ट पडत. आमचे शेजारी वासुअण्णा बरोबर पहाटे पाचला रहाटाला बैल लावीत. तो रहाटाचा आवाज सर्वाना बरोबर उठवीत असे. गजराची घडय़ाळे कुणाकडेच नव्हती. वासुअण्णांनी रहाटाला बैल लावला म्हणजे पहाटेचे पाच वाजले हे नैसर्गिक घडय़ाळ. आजीच्या जवळ घडय़ाळ कसले तसे घडय़ाळ वासुअण्णांकडे होते आणि हे पाण्याचे व्यवहार विनातक्रार उरकत असत.
एक दिवस मात्र गंमत झाली. घरातील बायका माणसे म्हणत होती वासुअण्णाने हे मुद्दामच केलं. वासुअण्णांची कुणी चेष्टा मस्करी केली की तो असं काहीतरी करतो. पण तसं काहीच झालं नव्हतं. त्या दिवशी पहाटेची गोष्ट. वासुअण्णा उठला आणि नेहमीप्रमाणे त्याने रहाटाला बैल लावला. रहाटाचा आवाज म्हणजे उठण्याचा गजर. एक एक जण उठायला लागला. सगळी कामं सुरू झाली. प्यायचं पाणी भरून झालं. मागच्या दारचा साठवणाचा हौदही भरून झाला. दादांची, मोठय़ा भावाची अंघोळही झाली. मुलांच्या अंघोळीचे ऊनपाणी केव्हाच संपले. पुरुषांच्या अंघोळीही झाल्या आणि बायका एक एक जणी तयारी करू लागल्या.
दादा म्हणालेसुद्धां, ‘आज कामं काय भराभर झाली. सगळय़ांच्या पाठीस काय वाघ लागला की काय?’ तेवढय़ात रहाटाचा बैल थांबला. ‘‘अहो, आज झुंजुमुंजुसुद्धा झालं नाही. उजेडाची तिरीपसुद्धा कुठं दिसत नाही आणि हा वासुअण्णा रहाटाचा बैल सोडून बसला आहे.’’ इति आजी.
दादा म्हणाले, ‘‘त्याचं शिंपणं संपल्यावर तो कशाला बैलाला नुसता फिरवील?’’
आजी म्हणाल्या, ‘‘आज इतक्या लवकर शिंपणं संपलंच कसं?’’
कुणीतरी म्हटलं, ‘‘घडय़ाळात किती वाजलेत बघा. दादांनी घडय़ाळ बघितलं तर साडेचार वाजले होते. ‘‘हत मेल्यांनो, या वाश्याने रात्री तीन वाजताच रहाटाला बैल लावला होता की काय? नेहमी शिंपण्याकरिता दीड तास लागतो. आता साडेचार वाजले आहेत! म्हणजे रात्री तीनला वासुअण्णानी रहाट चालू केला!’’
म्हणजे गंमतच केली की नाही?
इतक्यात वासुअण्णाच त्यांच्या घरी आले. दादांची क्षमा मागत ते म्हणाले, ‘‘दादासाहेब, मी मुद्दाम केलं नाही. तुम्हा थोर माणसांची काय थट्टा करायची? नेहमीप्रमाणे मी उठलो. मी घडय़ाळात बघत नाहीच. सरळ रहाटाला बैल लावला. मला वाटलं नेहमीप्रमाणे पाच वाजले आहेत. चूक माझीच आहे.’’
परत परत वासुअण्णा दादांची क्षमा मागत होते. दादांनी वासुअण्णांना जवळ ओढले आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाले, ‘‘अरे, झालं गेलं गंगेला मिळालं.’’
आजीबाईंकडे वळून दादा म्हणाले, ‘‘फर्मास चहा बनवा आता. या अण्णांना चांगला दोन कप चहा द्या.’’
अशा गमतीजमती तिथं नेहमीच होत. घटकाभर करमणूक दुसरं काय? नाहीतरी या मंडळींच्या करमणुकीकरिता त्यावेळी दूरदर्शन किंवा व्हॉट्स-अॅप होतेच कुठे?