scorecardresearch

स्वयंपाकघरातील विठोबा

पाटय़ा-वरवंटय़ाची जोडी नुसती अन्नपूर्णादेवीचीच मदत करत नसे, तर घरात कोणाला दुखलेखुपले की झाडपाल्याची औषधे ठेचून, रगडून प्रथमोपचाराचे कार्यही करत असे. आरोग्याच्या दृष्टीने म्हणाल,

स्वयंपाकघरातील विठोबा

पाटय़ा-वरवंटय़ाची जोडी नुसती अन्नपूर्णादेवीचीच मदत करत नसे, तर घरात कोणाला दुखलेखुपले की झाडपाल्याची औषधे ठेचून, रगडून प्रथमोपचाराचे कार्यही करत असे. आरोग्याच्या दृष्टीने म्हणाल, तर घरातील बायकांना वेगळा व्यायाम करण्याचीही गरज भासत नव्हती. पाटय़ावर वाटण वाटण्यासाठी श्रमाची गरज असे. त्यामुळे वाटणाची पंधरा मिनिटे पाटा-वरवंटा त्यांचा छान व्यायाम करवून घ्यायचा.

पाटय़ा-वरवंटय़ाची जोडी दिसायला काळी कुळकुळीत- जणू विठोबा-रखुमाई! पाटय़ाचा आकारही मंदिरासारखा किंवा कौलारू घरासारखा. वरवंटाही अगदी लांबट गरगरीत. पूर्वी प्रत्येकाच्या घरात त्यांच्या ऐपतीनुसार किंवा आवडीनुसार पाटय़ा-वरवंटय़ाचे छोटे किंवा मोठे आकारमान ठरलेले असायचे.
उरणमधील नागांव (मांडळ आळी) या गावातले माझे बालपण. लहानपणी या पाटय़ा-वरवंटय़ाचा बराच सहवास लाभला आहे. अगदी कळत नव्हते तेव्हा, बालपणात म्हणाल तर कुठलातरी पाला वाडीतून आणायचा आणि पाटय़ावर वाटून ती मेंदी आहे का, रंग येतो का ते पाहायचे, कारण मेंदीची पानेच तेव्हा ओळखता यायची नाहीत. काही दिवसांनी मेंदीच्या पानांचा शोध माझ्या बालदृष्टीस लागला आणि त्यावर मी माझ्या इवल्याशा बोटांनी मेंदीचा पाला रगडू लागले. तेव्हा खरे तर वरवंटा हातात यायचा नाही. जड असल्याने फार कष्टाने तो उचलून घ्यायचा. कधी कधी ठेचताना हाताची बोटे वरवंटय़ाखाली सापडायची. कळ यायची पण मेंदीचा रंग ती कळ सुसह्य करायचा. रंग येण्यासाठी त्यात काथ, िलबूरसही वाटायला घेत असत. मेंदीचा पाला वाटत असतानाच हात लाल होऊन जायचे. आताच्या बाजारी मेंदीपेक्षा तो वाटलेल्या मेंदीचा सुगंध, रंगच काही और असे.
आई पाटय़ावर वाटण वाटायची. ते पाहात असताना मलाही अनुकरण करावेसे वाटे. वरवंटा धरण्याइतपत हातात बळ आले तेव्हा कधीतरी चटणी वाटायला घ्यायचे. चटणीत कैरी / हिरवी चिंच किंवा करवंद, खोबऱ्याचे तुकडे किंवा खरवडलेले खोबरे, जाड मीठ, मिरची घ्यायचे. पहिले खोबऱ्याचे तुकडे ठेचायचे, मग त्यावर मिरची, कैरी / हिरवी चिंच किंवा करवंद, मीठ टाकून सगळे एकत्र ठेचायचे. मग ते सर्व जिन्नस पाटय़ाच्या खालच्या बाजूला घेऊन वरवंटय़ाने घसपटून वाटत वरच्या भागावर न्यायचे. एकदा वाटून चटणी बारीक व्हायची नाही. मग परत वरचे वाटण खाली घेऊन अजून एकदोनदा वाटून ही चटणी बारीक वाटायची. ही चटणी आठवूनच तोंडाला पाणी सुटते.
भाजी आणि मासे, मटणाच्या रश्शाचे वाटणही या पाटय़ावर वाटल्याने अगदी चविष्ट लागायचे. भाजी आणि माशांसाठी खोबरे, मिरच्या, आले, लसूण हे सगळे एकत्र वाटून वाटण केले जायचे, मटणासाठी, चवळी, छोले या भाज्यांसाठी आले-लसूण असे वेगळे वाटण केले जायचे, तर अजून अख्खे कांदे आणि सुक्या खोबऱ्याची वाटी चुलीत भाजून दोघांचे एकत्र
वाटण केले जायचे. भाजलेले सुके खोबरे ठेचताना मध्येच एखादा तुकडा तोंडात टाकायचा छंद होता मला. मग त्या खोबऱ्याची अप्रतिम चव वाटण कमी व्हायला कारणीभूत असायची. चुलीत भाजल्याने कांदा-खोबरे काळे झालेले असे. त्यामुळे हातही काळपट व्हायचे. मला गंमत वाटायची ती वाटण करून झाल्यावर आई जे पाटय़ा-वरवंटय़ाला लागलेले
वाटण पाण्याने काढायची त्याची. अर्धी वाटी वगरे पाणी
वरवंटा पाटय़ावर ठेवून प्रथम वरवंटा तेवढय़ाशा पाण्यात धूत असे. मग तेच पाणी पाटय़ाच्या सर्व दिशांनी हातानं सरकवून वाटण गोळा करत ज्या बशीत वाटणाचा गोळा ठेवलेला
असे, त्याच वाटीत ढकलत असे. मी याचे नंतर अनुकरण
करू लागले.
उन्हाळ्यात चिंचा तयार होऊन काटळून (चिंचेतील बिया काढणे) झाल्या की त्याचे आई-आजी मीठ लावून गोळे करत असत. चिंचेच्या गोळ्यांसाठी जाडय़ा मिठाचा वापर करतात. हे जाडे मीठ आई-आजी पाटय़ावर जाडसर वाटायच्या. मीपण हे मीठ वाटताना पाटय़ावर मिठात हात घालून लुडबूड करायचे. पाटय़ावरच्या खरडलेल्या मिठाचा तो खरखरीत स्पर्श कोवळ्या हातांना टोचणारा, पण सुखकारक वाटायचा. याच पाटय़ावर आई-आजी चिंचेचे गोळे वळायच्या.
साबुदाण्याच्या खिचडीसाठी किंवा इतर कशासाठी लागणारा शेंगदाण्याचा कूट पाटय़ावर छान भरडून निघत असे. थोडा जाडसर कूट असेल तर अजून मजा यायची. भरडताना भाजलेल्या शेंगदाण्यांचा येणारा खरपूस वास त्या पाटय़ालाही काही काळ बिलगून राही.
दिवाळीत साठय़ाच्या करंज्या करतानाही करंजीचे पीठ कुटण्यासाठी पाटय़ा-वरवंटय़ाचा उपयोग केला जायचा. अजून उपयोग व्हायचा तो म्हणजे पापडाचे पीठ कुटण्यासाठी. हे काम भाऊ किंवा वडील किंवा आजूबाजूची एखादी दणकट बाई करायची. कारण हे ताकदीचे काम असायचे. पण सगळ्याच कामात लुडबुडण्याची सवय असल्याने मीपण मध्येमध्ये बिचाऱ्या पिठावर घाव घालायचा प्रयत्न करायचे. पण फार कठीण काम आहे, हे समजून पाय मागे घ्यायचे. पापडाचे घट्ट मळलेले पीठ कुटून कुटून घेऊन ते जरा मऊ व्हायचे. मग त्याच्या लाटय़ा करून त्याचे पेढे, म्हणजे छोटे गोळे कापून पापड केले जायचे.
घरात कधी अक्रोड, बदाम सापडले की ते जाऊन पाटय़ावरच वरवंटय़ाने फोडायचे, झाडावर येणारे गावठी बदामही लाल होऊन झाडावरून पडले, की ते आणून पाटय़ावर फोडून त्यातली बी, म्हणजे गर खायचा. या बदाम फोडण्याने पाटा लाल लाल होऊन जात असे. पण पाटय़ाला चिकटलेला चिमूटभर गर खाण्यानेही परमानंद मिळत असे.
ही पाटय़ा-वरवंटय़ाची जोडी नुसती अन्नपूर्णादेवीचीच मदत करत नसे, तर घरात कोणाला दुखलेखुपले की झाडपाल्याची औषधे ठेचून, रगडून प्रथमोपचाराचे कार्यही करत असे. आरोग्याच्या दृष्टीने म्हणाल, तर घरातील बायकांना वेगळा व्यायाम करण्याचीही गरज भासत नव्हती. पाटय़ावर वाटण वाटण्यासाठी  श्रमाची गरज असे. त्यामुळे पंधरा मिनिटे पाटा-वरवंटा छान व्यायाम करवून घ्यायचा.
पूर्वी या पाटय़ा-वरवंटय़ाचा धाकही असे घरोघरी. राग आला, की पाटय़ावर ठेचून काढेन/आपटेन, वरवंटा घालेन डोक्यात/टाळक्यात अशा धमक्या घराघरातून ऐकू यायच्या.
पाटय़ाचा भरपूर वापर झाला की पाटय़ाची टाकी, म्हणजे धार कमी होत असे. आठवडय़ातून किंवा पंधरा दिवसांतून एकदातरी त्या काळी पाथरवट किंवा पाटय़ाला टाकी लावणारे दारावर येत असत. त्यांची ‘टाकीये’ अशी हाक ऐकू आली की आई त्यांना बोलवून पाटय़ाला टाकी लावून घेत असे. ही टाकी लावणारा एक लोखंडी जाड तासणी पाटय़ावर ठेवून त्यावर हातोडीने ठकठक करत ठोकून गाळलेल्या जागा भरायच्या तुटक रेषांप्रमाणे पूर्ण पाटय़ावर टाकीच्या रेषा ठोकत. हे बघताना मला तसे करण्याची फार इच्छा होई. मी कधीतरी खेळ म्हणून आमच्या घरातली तासणी घेऊन हातोडय़ाने तासणी पाटय़ावर ठोकायचा प्रयत्न करायचे. पण पाटा फार शिस्तीचा कडक होता. ज्याचे काम त्यानेच करावे, या तत्त्वाचा. माझ्यासाठी कधी कधी त्याने नरमाई म्हणून घेतली नाही आणि मला कधी एका शब्दाचीही गाळलेल्या जागेची रेषा बनवता आली नाही.
वयोवृद्ध पाटा कुटुंबाची सेवा करून करून मधून झिजायला लागायचा. पण तो आपले कार्य शेवटपर्यंत सोडत नसे. स्वत:ला मधून खड्डा पडला, तरी खालच्या किंवा वरच्या बाजूने चांगले वाटण करून गृहिणीला आधार देत असे.
धार्मिक कार्यातही पाटय़ा-वरवंटय़ाला घरच्या थोरामोठय़ांप्रमाणेच अगदी मानाचे स्थान असते. बारशात पाटय़ावरच पाचवीचे पूजन केले जाते. पिठाचे दिवे, मोदक, थापटय़ा, लाटय़ा ठेवून पाचवी पुजली जाते. बारशाला बाळाला पाळण्यात घालण्यापूर्वी वरवंटय़ाला कापड गुंडाळून, चेन घालून बाळाप्रमाणे नटवूनथटवून, त्याला पाळण्यात झोपवून, त्याचे लाड केले जातात. मग ‘गोिवद घ्या, माधव घ्या’च्या पहिल्या राऊंडला या वरवंटय़ाला बाळाप्रमाणे अलगद उचलून, खालीवर करून नामकरणाच्या विधीतही समाविष्ट केले जाते.
अशी ही पाटय़ा-वरवंटय़ाची जोडी आता नामशेष होत चालली आहे. त्याची जागा आता स्वयंपाकघरात ओटय़ावर मिक्सरने घेतली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात गरजच आहे या उपकरणाची. पण मला अजूनही त्या पाटय़ा-वरवंटय़ाचे फार आकर्षण आहे. म्हणून आमच्या पडवीत मी अजून हा पाटा-वरवंटा जतन करून ठेवला आहे. वर्षांतून एकदोनदा तरी वेळ मिळेल तेव्हा आणि लहर येईल तेव्हा मी या पाटय़ा-वरवंटय़ावर वाटण वाटते. साठय़ाच्या करंजीचे पीठही मी दिवाळीत या पाटय़ा-वरवंटय़ावर कुटते. असे पीठ कुटताना किंवा वाटण वाटताना या स्वयंपाकातील विठोबासोबत बालपणात, रम्य वातावरणात गेल्यासारखे वाटते.

मराठीतील सर्व लेख ( Vastu-lekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या