चिऊचं घर मेणाचं

पर्यावरणप्रेमी घर आणि जीवनशैली साकारायची तर सातत्याने कल्पक प्रयत्नांची कास धरायला हवी. कल्पकता जितकी महत्त्वाची

पर्यावरणप्रेमी घर आणि जीवनशैली साकारायची तर सातत्याने कल्पक प्रयत्नांची कास धरायला हवी. कल्पकता जितकी महत्त्वाची तितकंच सातत्य, हे मनावर कोरून घ्यायला हवं. चिऊचं घर साकार करणारे तीन कानमंत्र..
गेले वर्षभर चाललेल्या या लेखमालेमधून पर्यावरणस्नेही घरासाठीच्या अनेक कल्पना, सहज करता येण्याजोगे लहान मोठे बदल, काही जीवनशैलीशी निगडित बदल आणि अनेक स्वत:चे अनुभव, प्रयोग याविषयी मी लिहीत आलो. मी स्वत: हे सारं करताना खूप मजा घेतो. सतत काहीतरी बदल माझ्या घरात, आयुष्यात घडत राहणं मला गरजेचं वाटतं. नव्या वाटा चोखाळताना काही ठिकाणी आपण अडखळतो, कधी चुकतो. मात्र या सगळ्या प्रवासात अस्सल अनुभव मिळतो. गेली काही वर्षे सातत्याने अनुभवल्याने, पाहिल्याने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासारख्या अनेकांशी संवाद साधत राहिल्याने मला खूप काही मिळत गेलं. या प्रवासाचं सार म्हणा हवं तर, पर्यावरणस्नेही घरांसाठी तीन कानमंत्र मी आज तुम्हाला सांगणार आहे.
जाणते व्हा !
आयुष्य ही नेहमी बदलणारी, घडणारी, मोडणारी, पुढे चालत राहणारी गोष्ट आहे; किंबहुना असायला हवी. घराचंही तसंच. साहजिकच नव्या बदलांसाठी आपण सतत सज्ज असायला हवं. हे बदल माहीत असायला हवेत. पर्यावरणस्नेही पर्याय हे अनेकदा नवनव्या संशोधनांमधून आपल्यासमोर येत असतात. त्याविषयी सातत्याने, जागरूक राहून वाचलं-पाहिलं पाहिजे. अनेकदा आपल्या आजूबाजूला अनेक व्यावसायिक प्रदर्शनं भरतात – बांधकाम, प्लॅस्टिक, मोटारी, गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू – एक ना अनेक या प्रदर्शनांतून नवनव्या तंत्रांविषयी आपल्याला माहिती मिळत जातेच, शिवाय अनेक कल्पना सुचायला मदत होते.
अशाच एका बांधकाम व्यावसायिकांच्या प्रदर्शनात माझ्या मत्रिणीला एका गृह प्रकल्पाची माहिती मिळाली, ज्यामध्ये काही पर्यावरणस्नेही रंग, बांधकामाची तंत्र, घरात लागणारी उपकरणं वापरली होती. तिने त्या सगळ्यांची इत्थंभूत माहिती घेतली आणि तिच्या जुन्या घरात नवीनीकरणावेळी त्यातल्या अनेक गोष्टी अमलात आणल्या. पाण्याची बचत करणारे नळ, अनेक र्वष टिकणारे रंग आणि वाफेचा उपयोग करून सफाई करणारं यंत्र यांचा अवलंब तिने केला.
मीदेखील नुकताच अशा एका प्रदर्शनाला जाऊन आलो आणि तिथे मला रोजच्या केर वगरे काढायच्या कामासाठी एक उपयुक्त पर्याय मिळाला. आज शहरात अनेक घरांत अगडबंब व्हॅक्यूम क्लीनर्स असतात. माझ्या घरातही वाकून झाडू-कुंच्याने केर काढण्यापेक्षा यंत्रानेच केर काढला जातो. मात्र या दोन्हींचा सुवर्णमध्य साधणारं कुंच्यासारखं ‘झाडून घेणारं’ मात्र व्हॅक्यूम क्लीनरसारखं बिन कष्टाचं, तरीही खूपच कमी वीज वापरणारं यंत्र मला सापडलं. किंमत कमी, विजेचा वापर कमी आणि कष्टही कमी असा हा विजेवर चालणारा स्वीपर मला न भावला तरच नवल.
पेर्ते व्हा
पर्यावरणस्नेही गोष्टींचा प्रचार आणि प्रसार ही गोष्ट फारच महत्त्वाची आहे. आपण स्वत: अनुभवलेलं, करून पाहिलेलं असं काही इतरांसोबत वाटून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्याला गवसलेलं गुपित इतरांसोबत वाटल्याने आपल्या विचारांचा प्रचार-प्रसार तर होतोच, मात्र पर्यावरणस्नेहामध्ये अपेक्षित असलेला परिणामही लवकर साधता येऊ शकतो.
मी स्वत: वृत्तपत्रांतून तुमच्याशी संवाद साधतो. आपल्यापकी अनेक वाचकांनी मला पत्र लिहून वेळोवेळी कळवलं की मी लेखांतून मांडलेल्या किंवा त्यांना पटलेल्या विषयांवर त्यांनी शेजारी, मित्र-मत्रिणी, नातेवाईक यांच्याशी संवाद साधला. त्यांची मतं, विचार आणि मुख्य म्हणजे वागणूक बदलण्याकरता प्रयत्न केले. ई-कचऱ्याविषयीच्या लेखानंतर अनेक वाचकांनी मला हे लिहून कळवलं, की त्यांनी अनेक घरांतून हा ई-कचरा सामायिक जागी जमा करून मग त्याची सुरक्षित विल्हेवाट लावणाऱ्या कंपनीला तो गोळा करण्याकरता बोलावलं. याप्रयत्नांमध्ये रवींद्र मराठे या वाचकाचं पत्र लक्षात राहण्याजोगं होतं. मला या लेखाविषयी प्रतिक्रिया कळवतानाच त्यांनी लिहिलं होतं की, मी शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून ई-कचरा जमा करण्याविषयी काम सुरू केलं आहे; तेव्हा आता तो गोळा करू शकणाऱ्या कंपनीचा संपर्क मला कळवा.
मुंबईतल्या सहकारी भांडारचे  संचालक विनय आध्ये यांनी मुंबईभर पसरलेल्या त्यांच्या सुपर मार्केट्समधून टेट्रा पॅक्सच्या पुनर्वापराविषयी जनजागृतीकरता चालवल्या जाणाऱ्या मोहिमेविषयी लिहून कळवलं होतं. त्यांच्या सुपर मार्केट्समध्ये रिकामे पॅक्स गोळा करण्याकरता खास सोय केलेली आहे. शिवाय या मोकळ्या पॅक्सच्या बदल्यात ग्राहकांना काही खास प्रोत्साहनपर सवलतीही या दुकानात देण्यात येतात. या सगळ्याचा परिपाक म्हणजे सहकारी भांडार सहज पुनर्वापरायोग्य असे हे पॅक्स मोठय़ा संख्येने दररोज ग्राहकांकडून गोळा करत आहे. या माध्यमातून तब्बल पाच लाखांच्या वर पॅक्स पुनर्वापराकरता गोळा केल्याचं त्यांनी लिहून कळवलं होतं. विचार करा, सहकारी भांडारने ही जनजागृती केली नसती तर हे पाच लाख पॅक्स कचऱ्यात टाकले गेले असते आणि प्रदूषणात भरच पडली असती.
 कर्ते व्हा
पर्यवारणस्नेही जीवनशैलीमध्ये ‘केल्याने होत आहे रे, आधि केलेचि पाहिजे’ याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याला उत्तम माहिती आहे, त्याविषयी आपण बोलतोही, मात्र त्याचा अवलंब करत नाही तर बदल कसा बरं घडून येईल? फटाक्यांपासून प्रदूषण होतं ही माहिती, त्याविषयी जागृतीच पुरेशी नाही. फटाक्यांचा वापर कमी किंवा न केल्यानेच तर खरी बदलाची सुरुवात होईल, हे आपण लक्षात घ्यायला हवं.
अनेकदा आपला विचार असा असतो की शिवाजी हवा पण शेजाऱ्याघरी. ही वृत्ती सोडून आपल्या घरापासून काही नियमांची अंमलबाजवणी सुरू केली पाहिजे. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा तर सोसायटीमध्ये ठराव मांडून, चर्चा झडून, महापालिकेकडून प्रस्ताव येऊन, कायदा होऊन मग सगळ्यांनी केलं तर मी केल्याने काही फायदा होईल असा विचार करता कामा नये. एकटय़ाने मी असा कचरा वेगळा केल्याने काय फरक पडणार, सगळ्यांची साथ मिळायला हवी असा नकारात्मक विचार न करता मी सुरुवात तर करतो, बाकीचे येतीलच मागाहून अशी मनाची तयारी करायला हवी.
शिवाय, अनेकदा उलटंही दिसून येतं. कायद्याने झालेले बदल नाममात्र पाळले जातात. मुंबई-ठाण्यात प्रत्येक नव्या इमारतीकरता पर्जन्यजल-संवर्धनाची सोय हवी हा नियम कागदावर उत्तम पाळला जातो, मात्र गच्चीतून पाणी वाहून आणणाऱ्या पाइपच्या पुढे याची अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाही. बदल कागदावर नाही, तर प्रत्यक्षात आले तरच चिऊचं घर मेणाचं, असं म्हणता येईल.
वाचकहो, ‘चिऊच्या घरा’तून निरोप घेताना हे तीन कानमंत्र तुम्हाला सांगायला पाहिजेत असं मला मनापासून वाटलं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, प्रत्येक लेख प्रसिद्ध झाल्यावर जशी ‘आम्ही हे करतो’ अशा धाटणीची अनेक पत्रं यायची. सोबतच ‘तुम्हाला बरं सुचतं हे सगळं, आम्हाला कसं सुचावं’ अशा स्वरूपाची पत्रंदेखील यायची. काही फक्त ‘लेख झक्कास’ हे कळवणारी तर काही ‘लिहायला काय जातंय, करायला किती कष्ट असतात’ असा सूर असलेली पत्रंही यायची. हे कानमंत्र या सगळ्याच वाचकांसाठी, कारण मला खात्री आहे की या कानमंत्रांच्या आधारे तुमची घरंदेखील खूप खास, अगदी चिऊच्या मेणाच्या घरासारखी टिकाऊ आणि आनंददायी होतील.
पर्यावारणस्नेही जीवनशैलीमध्ये ‘केल्याने होत आहे रे, आधि केलेचि पाहिजे’ याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याला उत्तम माहिती आहे, त्याविषयी आपण बोलतोही. मात्र त्याचा अवलंब करत नाही तर बदल कसा बरं घडून येईल? फटाक्यांपासून प्रदूषण होतं ही माहिती, त्याविषयी जागृतीच पुरेशी नाही, तर फटाक्यांचा वापर कमी किंवा न केल्यानेच खरी बदलाची सुरुवात होईल, हे आपण लक्षात घ्यायला हवं.
(समाप्त)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Three wise counsel for environment friendly homes