वास्तुसौंदर्य : अंतर्गत मालमत्तेचे शास्त्रीय व्यवस्थापन

आपल्या घरात अनेकदा ‘वस्तू छोटी पण महत्त्व मोठं’ असं अनुभवायला येतं. लहान-लहान वस्तूंचा संचय आपल्याकडून अनेकदा अनपेक्षितपणे होत असतो. काही वेळा फारशा गरजेच्या न वाटणाऱ्या अशा अनेक वस्तू आपण घरात साठवत असतो.

आपल्या घरात अनेकदा ‘वस्तू छोटी पण महत्त्व मोठं’ असं अनुभवायला येतं. लहान-लहान वस्तूंचा संचय आपल्याकडून अनेकदा अनपेक्षितपणे होत असतो. काही वेळा फारशा गरजेच्या न वाटणाऱ्या अशा अनेक वस्तू आपण घरात साठवत असतो. त्यापैकी काहींची गरज जर कधी काळी भासलीच तर त्यावेळेला त्या वस्तू नेमक्या सापडत नाहीत. असं का होत असावं बरं? कारण फक्त एक आणि एकच आहे; ते म्हणजे घरात आणलेली वस्तू फारशी लागणारी नाही असं गृहीत धरून डाव्या-उजव्या हाताने कोठे तरी ठेवली जाते आणि मग हवी तेव्हा ती सापडत नाही. यासाठी घरात असलेल्या आणि नव्याने आणल्या जाणाऱ्या प्रत्येक लहान-मोठय़ा वस्तूंची जागा निश्चित केलेली असणे आवश्यक असते. काही वस्तू तर ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ या स्वरूपाच्या असतात.
शिडी, घोडा, उंच स्टूल: घरातील पोटमाळ्यावरील वस्तू काढण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी, सीलिंग फॅनच्या सफाईसाठी, उंच बसविलेल्या टय़ूबलाईट बदलण्यासाठी किंवा त्यांच्या साफ-सफाईसाठी अशा अनेक कामांसाठी उंच स्टूल, घोडा किंवा शिडीची गरज भासते. परंतु असे काम अवघ्या काही मिनिटांतच पूर्ण होत असते, असे काम काही रोजच्या रोज करावे लागत नाही. अशा वेळेस या नेहमी न लागणाऱ्या वस्तू कोठे ठेवाव्यात, असा मोठा प्रश्न असतो. आधुनिक डिझाइनच्या फोल्डिंगच्या उंच स्टूलचा वापर करून हा प्रश्न सोडविता येईल. काम झाल्यावर ते फोल्डिंगचे स्टूल बाल्कनीच्या किंवा टेरेसच्या कोपऱ्यात ठेवता येऊ शकते.
रेनकोट, छत्री: वर्षभरात केवळ पावसाळ्यात लागणारे रेनकोट, छत्री एरवी कोठे ठेवावेत, असा प्रश्न असतो. मुख्य म्हणजे हे दोन्हीही पावसाळ्याचा मौसम संपल्यानंतर स्वच्छ धुवून, कोरडे करून, उन्हात वाळवून, प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून, घडी करून ठेवून द्यावेत म्हणजे त्याचा वापर परत हवा तेव्हा नव्याने करता येऊ शकतो. शक्यतो सिझनल वेअर्स ज्या ठिकाणी किंवा ज्या कपाटात ठेवण्याची सोय केलेली असेल त्याच ठिकाणी या वस्तूदेखील ठेवाव्यात. यामुळे त्या वस्तूंना वास येत नाही किंवा बुरशी लागत नाही. तसेच त्या ठेवण्याची एकच एक जागा निश्चित केली की त्या वस्तू लगेच हाती लागतात. अशा वस्तू ठेवण्यासाठी घरातील पॅसेज वाईड असेल तर त्या ठिकाणी किंवा बाल्कनी अथवा टेरेसवर अथवा लिव्हिंग रूममध्येच एखाद्या कोपऱ्यात इतर डिझाइन्सला साजेसे असे एखादे वॉल युनिट बनवून घ्यावे.
आकाशकंदील व लाईटच्या माळा: या वस्तूदेखील वर्षांतील अवघे सहा-आठ दिवस वापरल्या जातात. आकाशकंदील व लाईटच्या माळा आणि हे बसविण्यासाठी आवश्यक वायर्स, होल्डर्स, बल्ब इत्यादी सर्व अ‍ॅक्सेसरीज वर्षभर सांभाळून ठेवाव्या लागतात. त्यांचा देखील एक अशी जागा निश्चित केलेली असणे आवश्यक आहे. यासाठीदेखील एखाद्या पोटमाळ्यावरील कप्प्यात व्यवस्थित वर्तमानपत्रात अथवा पिशवीत गुंडाळून त्या ठेवल्या तर आयत्या वेळेस शोधाशोध करावी लागणार नाही. काही वेळा या लाईटच्या माळा सण-वार अथवा धार्मिक कार्यक्रमासाठी वापरण्याची गरज भासल्यास घरातल्या माळा सापडत नाहीत म्हणून नवीन आणाव्या लागणार नाहीत. अनाठायी होणारा खर्च व त्रास दोन्ही वाचेल.
इलेक्ट्रीकल अ‍ॅक्सेसरीज, मोबाईल चार्जर्स: हल्ली घरातील प्रत्येकाकडे मोबाईल असतो. त्यामुळे कुटुंबातल्या सदस्य संख्येइतकीच संख्या मोबाईलची आणि त्याच्या चार्जर्स व इतर अक्सेसरीजची. इतके सारे होत नाही तर दिवसाआड तर वापरावेच लागते. त्या मोबाईल्सचे बॉक्सेस व त्या सोबत आलेले माहितीपत्रक, पुस्तिका वगैरे हे सर्वदेखील ठेवणार कोठे, हा एक मोठा प्रश्नच असतो. त्या अनुषंगाने त्या सर्वासाठी सेपरेट पॉवर सप्लाय, कनेक्शन सर्वच असावं लागतं. याशिवाय घरातील अनेक लहान सहान वस्तू की ज्या इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या असतात, त्या सर्वाच्या वायर्स, अ‍ॅक्सेसरीज हेदेखील सर्व सांभाळून ठेवावे लागते. या सर्वाची सोय अगोदर म्हटल्याप्रमाणे पॅसेजमधल्या किंवा टेरेस अथवा बाल्कनीतल्या एखाद्या वॉल युनिटमध्ये करावी.
सीझनल फूटवेअर्स: प्रत्येक सीझनसाठी आपल्याला काही ना काही वेगळं हवंच असतं. शिवाय पार्टीवेअर्स, कॅज्युअल्स वेअर, ऑफिस वेअर्स, स्पोर्स्ट वेअर्स अशा अनेक व्हरायटीजचे कलेक्शन आपण घरातील प्रत्येकजण करत असतो. घर तिघांचे अशी परिस्थिती असणाऱ्या घरातसुद्धा प्रत्येकी जर निरनिराळे सहा ते आठ जोड असतील तर सर्वाचे मिळून एकूण दोन डझन जोड जमा होतील, त्यांची ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल. या व्यतिरिक्त शू पॉलिश, शू पॉलिश ब्रश, क्रीम, इनर सोल्स, शूज लेस इत्यादी इतरही वस्तू ठेवण्याचा विचार करावा लागतो आणि तोदेखील नेहमीच्या शू रॅक, शू कॅबिनेट व्यतिरिक्त निराळा असावा लागतो.
पूजेचा चौरंग: रोजच्या पूजेसाठी वापरला न जाणारा चौरंग की जो केवळ काही ठराविक धार्मिक कार्यापुरताच किंवा ठरावीक पूजेपुरताच वापरला जातो. तो ठेवण्याची एक निश्चित अशी जागा नक्की करावी लागते. त्याचवेळी त्याच्या पावित्र्याचा विचारही होणे गरजेचे असते. अर्थातच कोणत्याही एखाद्या लॉफ्टवर तो ठेवता येऊ शकतो.
टूल कीट: घरातील छोटी-छोटी रिपेअर्सची कामेसुद्धा आपण स्वत:च करत असतो. त्यासाठी लागणारे छोटेसे टूल-कीट फार उपयोगाचे ठरते. सोबत थोडे खिळे, स्क्रू यांचा साठादेखील असणे गरजेचे असते. या टूल-कीटमध्ये प्रामुख्याने स्क्रू ड्रायव्हर, लहान हॅमर, हॅक्सो ब्लेड, टेस्टर, पंच इत्यादी वस्तू आवश्यक असते. हे सर्व एकत्रितपणे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पॅसेजमध्ये, बाल्कनी अथवा टेरेसवरील वॉल कॅबिनेटमध्ये ठेवण्याची व्यवस्था करावी. अर्थात या सर्व वस्तू ज्या कप्प्यात ठेवल्या जातील, त्याला दरवाजा व कुलूप लावण्याची सोय असावी जेणेकरून या वस्तू लहान मुलांच्या हाती लागणार नाहीत.
फोटोंचे अल्बम्स: कुटुंबातील प्रत्येकाच्या बालपणापासून काढलेल्या असंख्य फोटोंचे जतन एक साठवण म्हणून खरं तर आठवण म्हणून ठेवायचे असतात. त्या फोटोंची व्यक्तीप्रमाणे विभागणी करून प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र अल्बमची सोय करून ते घटनापटाच्या क्रमाने तारीख-वार-वेळ सर्व विचारात घेऊन त्यावर आवश्यक ती कॅप्शन्स लिहून प्रत्येकाच्या रूम्समध्ये स्वतंत्रपणे ठेवण्याची व्यवस्था करावी. या सोबतच काही कार्यक्रमादरम्यान तयार करण्यात आलेल्या काही व्हिडिओ सीडीज-डीव्हीडीजदेखील ठेवण्याची व्यवस्था असावी.
किचेन्स होर्ल्डर: हल्ली घरातील प्रत्येकाकडे घराच्या किल्ल्यांचा एक सेट असावा लागतो. कारण प्रत्येकाच्या शाळा-कॉलेज, नोकरी, व्यवसाय या सर्वाच्या वेळा निरनिराळ्या असतात. त्यामुळे घर सोडण्याच्या तसेच परत घरी येण्याच्या वेळाही कधी एक असतील असं नाही. त्यामुळे या किल्ल्यांचे सेट्स, प्रत्येकाच्या गाडय़ांच्या किल्ल्या, ऑफिसच्या किल्ल्या अशा अनेक किल्ल्या ठेवण्याची एक निश्चित जागा आणि तीही अत्यंत सुरक्षित अशी असणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी दाराच्या मागे, भिंतीवर, कपाटाच्या पॅनेलवर या पैकी एखाद्या ठिकाणी तसेच लहान मुलांचा हात पोहोचणार नाही, अशा उंचीवर किचेन्स होल्डर्स बसवून घ्यावेत. यात काही कस्टममेड तर काही रेडिमेड हवे तसे हव्या त्या रंगात, आकारात, वेगवेगळ्या प्रकारात, निरनिराळ्या आकर्षक डिझाईन्समध्ये आणि तेही अतिशय स्वस्तात मस्त किचेन होल्डर्स मिळतात.
स्टेशनरी: घरातील ऑफिस मॅनेजमेंट हीदेखील अत्यंत महत्त्वपूर्ण असते. छोटय़ा स्टेशनरीमध्ये, स्टेपलर मशीन, पंचिंग मशीन, गम बॉटल, गमिंग टेप, सेलो टेप, टाचण्या, स्टेपलर पीन्स, फाईल्स, पेन्स, पेन्सिल, इरेजर्स अशा अनेक वस्तूंची जागा शक्यतो लिव्हिंग रूममध्ये एखाद्या वॉल युनिटमध्ये निश्चित केलेली असावी. अनेकदा कुरिअर स्लीपवर सही करण्यासाठी पटकन पेनसुद्धा सापडत नाही. दरमहा येणारी विविध बिलेदेखील व्यवस्थित फाईलला त्वरित लावली जात नाहीत. परंतु, एकदा या जागा निश्चित केल्या गेल्या की, या कामात आपोआपच शिस्त येऊ लागेल आणि त्रास कमी होत जाईल.
टपाल, कुरिअर: लिव्हिंग रूममधील वॉल कॅबिनेटमध्ये टपाल, कुरिअर तारीख-वार लावून ठेवण्याची व्यवस्था केलेली असेल तर घरात आलेले टपाल, कुरिअर ज्याच्यासाठी आले आहे त्याला वेळेवर मिळू शकेल. मुख्य म्हणजे ते वेळेत ज्या त्या व्यक्तीला मिळाले म्हणजे त्याचे महत्त्व वाढेल व कळेल. काम झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणे अथवा ते जपून ठेवणे हे सर्वार्थाने त्याच्या कंटेंट्सवर ठरते. त्याचप्रमाणे घरी आलेल्या निमंत्रण, आमंत्रणपत्रिका या कार्यक्रम होईपर्यंत तरी ठराविक ठिकाणी, ठराविक पद्धतीने ठेवाव्या लागतात. कार्यक्रमानंतर त्याचे काय करायचे हे ठरवणेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. या सर्वाचाच संचय करण्याची खरं म्हणजे फार गरज नसते.
छोटय़ा मूर्ती अथवा देवांचे फोटो: अनेकदा आपल्याला भेटवस्तू रूपाने देवादिकांच्या छोटय़ा मूर्ती तसेच फोटो मिळत असतात. या सर्वाचा संग्रह एक दिवस इतका मोठा होऊन जातो की, त्याचं काय करायंच हाच मुळी मुख्य प्रश्न असतो. त्यातही सर्व वस्तूंचे
आकार, आकारमान, स्वरूप, रूप हे अगदीच भिन्न असते. भेटवस्तू असल्यामुळे त्या टाकूनही देता येत नाहीत. त्याचबरोबर त्यात देवादिकांचे प्रमाण अधिक असल्याने धार्मिक भावना व पावित्र्य दोन्ही सांभाळावे लागते. या वस्तूंच्या आकारमानानुसार त्या वेगवेगळ्या रूम्समध्ये काचेच्या ओपन शेल्फवर डिस्प्ले कराव्यात. यातून सर्वच साध्य करता येऊ शकेल, त्यांचा चांगला वापरही केला जाईल.
ग्लासवेअर्स भेट रूपाने मिळालेले: अनेकदा लग्नकार्य, समारंभ, दिवाळी भेट अशा अनेक कारणाने भेट रूपाने मिळालेल्या ग्लासवेअर्स कोठे व कसे ठेवावेत? याचा विचार इंटिरिअर करताना केला पाहिजे. त्यापैकी काही वस्तू कीचन अथवा डायनिंग रूममध्ये वॉल कॅबिनेटमध्ये शो-पिसप्रमाणे डिस्प्ले करता येतील, तर काही नेहमी न लागणारे लॉफ्टवर नीट कागदामध्ये बांधून ठेवून देता येतील. या काचसामानाच्या बाबतीत जरा जास्त काळजी घ्यावी लागते. या प्रकारचे सामान लहान मुलांच्या सहजासहजी हाती लागणार नाही याची योग्य ती काळजी घ्यायला हवी.
आपल्या घरात अगदी पीन टू पियानो अशा असंख्य वस्तूंचा संचय आपण करत असतो किंवा आपल्याकडून अनाहूतपणे केला जात असतो. प्रत्येक वस्तूची कमी-अधिक प्रमाणात कधी ना कधी तरी गरज भासतेच आणि म्हणून या सर्व लहान-मोठय़ा अंतर्गत मालमत्तेचे शास्त्रीय व्यवस्थापन तेही इंटिरिअर डिझाइनच्या माध्यमातून केले जाणे जरुरीचे असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tips to organise household things

ताज्या बातम्या