‘रेशमी घरटे’मध्ये आज प्रसिद्ध गायिका डॉ. वरदा धारप-गोडबोले यांच्या घराविषयी..

मी कॉलेजमध्ये असताना एक वर्ष अ‍ॅन्युअल डेला मला कसलं तरी बक्षीस मिळणार होतं म्हणून त्या कार्यक्रमाला अगदी उत्साहात हजर राहिले होते. साहजिकच इतर कुणाकुणाला काय काय बक्षिसं मिळतायत याच्याकडेही लक्ष होतंच. एकेक बक्षिसं जाहीर होत होती, दिली जात होती. अशातच ‘विद्याभूषण’ ट्रॉफीसाठी ‘वरदा धारप’ हे नाव पुकारलं गेलं. एक सोज्वळ चेहेऱ्याची, कुठलाही अभिनिवेश नसलेली मुलगी ट्रॉफी घ्यायला स्टेजवर आली. तिच्याबद्दल सांगताना संस्कृत आणि शास्त्रीय संगीत अशा दोन्ही विषयांत तिला उत्तम गती असल्याचं निवेदिकेने सांगितलं. बक्षीस मिळालेली इतर अनेक मुलं-मुली त्या कार्यक्रमात होती, पण तरीही वरदा धारप हे नाव, तो चेहरा आणि संस्कृत-शास्त्रीय संगीत हे कॉम्बिनेशन माझ्या उगाचंच लक्षात राहिलं. त्यानंतर अनेक वर्षांनी दूरदर्शनवर ट2ॅ2 कार्यक्रमात तोच चेहरा दिसला आणि मग ‘स्वरदा संगीतालया’च्या माध्यमातून आमची प्रत्यक्ष भेट-ओळख झाली. त्यातून वरदाताईंचा पुढचा प्रवास समजला. त्यांनी संस्कृत घेऊन बी.ए. केलं. त्यात त्यांना मुंबई विद्यापीठाचं सुवर्णपदक मिळालं, शिवाय त्यांनी संगीतात एम.ए. करतानाही उत्तम गुण मिळवले. २०१३ मध्ये गांधर्व महाविद्यालयाची डॉक्टरेट त्यांना मिळाली. लीलाताई शेलार, पं. ए. के. अभ्यंकर (किराणा घराणं), पं. यशवंत महाले (आग्रा घराणं), पं. मधुकरबुवा जोशी (ग्वाल्हेर घराणं), पं. अजय पोहनकर, डॉ. सुशीलाताई पोहनकर यांच्यासारख्या श्रेष्ठ गुरूंकडे गाणं शिकण्याची संधी त्यांना मिळाली, माणिक वर्मा यांच्याकडून नाटय़संगीत शिकण्याचं भाग्यही लाभलं. कदाचित त्यामुळेच ‘बालगंधर्व’ या चित्रपटातलं ‘नाथ हा माझा’ हे नाटय़पद वरदाताई इतकं सुंदर गाऊ  शकल्या! ‘रेशमी घरटे’मध्ये आज प्रसिद्ध गायिका डॉ. वरदा धारप-गोडबोले यांच्या घरी जाऊ या.

Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
Shiv Sena Shinde campaign song
Video: ‘बाळासाहेबांच्या प्रसिद्ध डायलॉगने सुरुवात, उबाठावर टीका, मोदींचे आवाहन’, शिंदे गटाचे प्रचार गीत प्रसिद्ध
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”

ठाण्यातल्या अत्यंत गजबजलेल्या नौपाडा भागात त्यांची ‘वसंतऋतू’ सोसायटी असली तरी आवारात बरीच शांतता आहे! गोखले रोड किंवा ए. के. जोशी शाळा इतकी जवळ असतानाही त्यांच्या घरात फारसे आवाज येत नाहीत. वरदाताई आधी पाचपाखाडीतल्या ‘विधाता’ सोसायटीत रहात होत्या. नुकत्याच म्हणजे जूनमध्ये त्या वसंतऋतूमध्ये राहायला आल्या आहेत. दोन बीएचकेच्या या जागेत त्यांचे सासू-सासरे ५०-५५ वर्ष राहतायत. सहा महिन्यांपूर्वी सासरे निवर्तल्यावर सासूबाईंच्या सोबतीसाठी वरदाताई आणि कुटुंबीय आता तिथेच राहायला आलेत. तळमजल्यावरची घरं जरा काळोखी असतात, तिथे फारशी प्रायव्हसी नसते, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे आवाज असतात असे तळमजल्यावरच्या घरांविषयी सर्वसाधारण अनुभव असतात. पण वरदाताईंचं घर मात्र याला अपवाद आहे. घरात गेल्याबरोबरच भिंतींचा पांढरा स्वच्छ रंग प्रसन्नतेचा अनुभव देतो. एका बाजूला सोफा, छोटंसं वॉल युनिट आणि दुसऱ्या बाजूला आटोपशीर डायनिंग टेबल, खुर्च्या असं अत्यंत माफक फर्निचर असल्यामुळे हॉल एकदम मोठा, मोकळा वाटतो. वरदाताईंना घरात जास्त सामान, डेकोरेटिव्ह वस्तू असलेल्या आवडत नाहीत. त्यांना घर नेहमी स्वच्छ लागतं. त्यामुळे कमीत कमी वेळेत स्वच्छ होतील अशा वस्तू, फर्निचर यांना त्यांची जास्त पसंती आहे. वॉल युनिटमध्येही अनेक स्पीकर्सच्या जोडीला त्यांनी फक्त एक ‘शो-पीस’ ठेवलाय, तोही पारदर्शक काचेचा असल्यामुळे दिसायला छान आणि स्वच्छ करायला सोपा असाच आहे. वॉल युनिटच्या समोरच्या भिंतीला सोफा-कम-बेड आहे. तो टिपिकल सोफा-कम-बेडसारखा न दिसता आकर्षक दिसावा असं त्याचं डिझाईन आहे. फॉल्स सीलिंग, मंद दिवे असलं काही वरदाताईंना अजिबात आवडत नाही. घरात स्वच्छ आणि भरपूर उजेड असलेला त्यांना आवडतो. त्यामुळे घराला नेहमी पांढरा रंग देण्यासाठी त्या आग्रही असतात. घराच्या भिंती शक्यतो मोकळ्या ठेवण्याकडे त्यांचा कल आहे. त्यांच्या हॉलमध्येही फक्त एकाच भिंतीवर, अलीकडेच गुरुपौर्णिमेला त्यांच्या एका शिष्येने दिलेली ‘वारली पेंटिंग’ची फ्रेम आहे. हॉलच्या खिडक्या आणि मधलं पार्टिशन बंद केलं की हॉल ‘साऊंड प्रूफ’ होतो. वरदाताईंना रियाजासाठी ते फारच सोयीचं पडतं. त्यांचा मुलगा प्रथमेश ‘लॉ’च्या पहिल्या वर्षांला आहे, त्यालाही अभ्यासाच्या दृष्टीने एक स्वतंत्र खोली म्हणून हॉलचा उपयोग होतो.

हॉल आणि स्वयंपाकघर यांना जोडणारी भिंत थोडी काढून तिथे त्यांनी मार्बल आणि त्यावर वॉलपेपर लावून घेतलाय. त्यामुळे त्याला छान फील आलाय. त्याच पार्टिशनची मागची बाजू स्वयंपाकघरात आहे, तिथे स्टोअरेज केलंय. ती कपाटं आणि ओटय़ाखालच्या ट्रॉलीज यात त्यांचं सगळं किचन सामावलंय. किचनमध्ये वरची कपाटं त्यांनी मुद्दामच केली नाहीयेत. मुळातच छोटी असलेली स्वयंपाकघरं त्यामुळे आणखीन छोटी वाटतात असं त्यांचं मत आहे. स्वयंपाकघराला लागूनच दोन बाजूंना दोन बेडरूम्स आहेत. एक खोली आजींची आहे. दुसऱ्या बेडरूममध्ये ऐसपैस डबलबेड आणि सुटसुटीत कपाटं आहेत. या बेडरूमला लागून पूर्वी अर्धवर्तुळाकार ओपन बाल्कनी होती, आता ती आयताकृती करून बंदिस्त करून घेतलीय. त्यामुळे वॉश बेसिन, वॉशिंग मशीन, छोटी कपाटं तिथे करता आली. रात्री शांतपणे पुस्तक वाचत किंवा लॅपटॉपवर काही काम करत बसायचं असेल तर बाल्कनीत एक छोटं फोल्डिंग टेबल आणि नाईटलॅम्पची सोय केलीय.

एखाद्या गायिकेच्या घरी गेल्यावर तानपुरे किंवा हार्मोनियम कुठे आहे याची उत्सुकता असते. वरदाताईंचे तानपुरे पूर्वी घरी असत, आता मात्र ते ‘स्वरदा संगीतालया’त असतात. २०१४ मध्ये त्यांनी ठाण्यात स्वरदा संगीतालय सुरू केलं. तिथे गायन, शास्त्रीय नृत्य, तबला यांचं प्रशिक्षण दिलं जातं. त्या आधी म्हणजे १५ डिसेंबर २०१३ मध्ये त्यांनी संगीताच्या प्रसारासाठी ‘स्वरदायिनी’ या ट्रस्टची सुरुवात केली. वरदाताईंचे पती संदेश गोडबोले ‘रेमंड’मध्ये सीनियर मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांनाही संगीतकलेची आवड आहे. ते ज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांच्याकडे तबल्याचं शिक्षणही घेतायत.

सूरमणी पुरस्कार, आचार्य रातंजनकर पुरस्कार असे अनेक पुरस्कार आणि स्कॉलरशिप्स मिळवणाऱ्या डॉ. वरदा गोडबोले यांच्याशी गप्पा, त्यांचं स्वच्छ सुटसुटीत घर आणि त्यांच्या हातचा छानसा चहा या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी एक छान अनुभव ठरल्या. त्यांच्या आवाजातला गोडवा कानांत साठवतच मी त्यांचा निरोप घेतला.

अंजली कुलकर्णी-शेवडे anjalicoolkarni@gmail.com