scorecardresearch

आखीव-रेखीव : घराचे नूतनीकरण आणि आपण

नूतनीकरण करणं हे अजिबातच सोपं काम नाही. बऱ्याचशा एजन्सीज् या कामात गुंतलेल्या असतात.

आखीव-रेखीव : घराचे नूतनीकरण आणि आपण

कविता भालेराव kavitab6@gmail.com

‘घर पहावे बांधून’ असं जे म्हटलं जातं त्यापेक्षाही ‘घराचे नूतनीकरण पहावे करून’ हे जास्त महत्त्वाचं वाटतं.

घराचे नूतनीकरण (रिनोवेशन) करणे हे एक मोठे दिव्य काम असते.. इतक्या गोष्टी त्यात असतात आणि बऱ्याच वेळा ते कटकटीचंही वाटू शकतं. घराचं नूतनीकरण करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायला लागते. घर संपूर्णपणे नवीन करण्याचा प्रवास हा खूप छान प्लानिंग केलं आणि खूप विचारपूर्वक त्याच्यावर काम केलं तर तो फार आनंददायक ठरू शकतो.

हा प्रवास सुंदर करण्याकरिता काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले तर त्याचे रिझल्टही आपल्याला उत्तम मिळतात.

५ जेव्हा आपण नूतनीकरण करायचं ठरवतो तेव्हा आपल्याला नक्की काय करायचं आहे हे पहिलं ठरवायला लागतं. थोडक्यात काय, तर तुम्हाला फक्त फर्निचर बदलायचं आहे की संपूर्ण घरातलं सिव्हिल कामही करून त्याचबरोरब फर्निचरही बदलायचं आहे या दोन्ही गोष्टींमध्ये काय नक्की करायचं याचा विचार आधी करायला लागतो.

* जर आपल्याला ही कामं करायची आहेत आणि आपण जर त्याच घरात राहणार असू, तर हे काम करणं हे फार कठीण असतं. त्यामुळे शक्यतो  सिव्हिल काम आणि फर्निचरचं काम करायचं असेल आणि जवळपास भाडय़ानं घर मिळालं तर ते नेहमीच सोयीचं ठरतं; पण बऱ्याचदा असं होतं की, छोटय़ा कालावधीकरिता आपल्याला घर मिळत नाही. त्या वेळेला तर आपल्याला सिव्हिल कामाचं प्लानिंग हे फारच व्यवस्थित करावं लागतं.

* नूतनीकरण करणं हे अजिबातच सोपं काम नाही. बऱ्याचशा एजन्सीज् या कामात गुंतलेल्या असतात. त्यामुळे आपण एखाद्या तज्ज्ञाची मदत घेणे योग्य ठरते. तज्ज्ञ म्हणजे ‘गुगल’ नव्हे. एखाद्या इंटिरिअर डिझायनरला नेमून हे काम करून घेणे अतिशय सोयीस्कर ठरते. इंटरनेट, आजूबाजूच्या लोकांनी दिलेले सल्ले, त्यांनी केलेली त्यांच्या घराची कामे जाऊन बघणे या सगळ्याने मार्गदर्शन होते, पण आपल्या घराची गरज वेगळी असते हे मनात पक्के करा. आपल्यालाही थोडे पैसे वाचवून काम करून घेता येईल, हा दृष्टिकोन अतिशय चुकीचा आहे. या गोष्टी तुमची दिशाभूल करू शकतात. प्रत्येकाच्या घराचा प्लॅन वेगळा असतो. प्रत्येकाच्या घराची गरज वेगळी असते, त्यामुळे आपण यासाठी जर एखाद्या तज्ज्ञाला नेमले तर आपले काम हे सोयीचे, व्यवस्थित आणि सुकर त्याचबरोबर अतिशय सुंदर होते.

* बऱ्याचदा एक गैरसमज असतो की, तज्ज्ञांना नेमले तर कामाचा खर्च वाढतो. कधीकधी बजेटच्या बाहेर काम जाते, पण या सगळ्यामध्ये आपणही जर पहिल्यापासून आपल्या बजेटचे नीट प्लािनग केले आणि आपल्याला काय पाहिजे याची पूर्ण कल्पना डिझायनरला दिली, तर त्यांना त्यानुसार काम करून घेता येते. एकदा आपण जर का डिझायनरला पूर्ण काम सोपवले तर त्याच्या मार्गदर्शनाखालीच आणि आपल्या गरजेनुसारच काम करून घेणे सोयीचे ठरते. वेळ मिळेल तेव्हा इंटरनेटवर सìफग करणे, वेगवेगळ्या लोकांची घरे शोधणे, नवीन नवीन मटेरियल बघत बसणे या सगळ्यांनी वेळ वाया जातो आणि बजेटही वाढत जाण्याची शक्यता असते.

आपण एकदा का डिझायनरवर काम सोपवलं असेल तर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून काम केल्याने रिझल्टही उत्तम मिळतात.

* डिझायनरचे सिलेक्शन अतिशय काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. तुमच्या ओळखीच्या व्यक्तींनी कोणी काम करून घेतलं असेल आणि तुम्हाला ते पटलं असेल तर तुम्ही त्याच्याकडून करून घेऊ शकता. थोडं इंटरनेटवर जाऊन तुम्ही सìफग करून, व्यवस्थित मीटिंग करून, त्यांचे कामाचे फोटो पाहून त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही डिझायनर फायनल करू शकतात.

* डिझायनर फायनल झाल्यानंतर त्याच्याशी आपल्या बजेटबद्दल मोकळेपणाने बोलणे आवश्यक असते. बऱ्याचदा असा अनुभव आहे की, क्लायंट बजेटबद्दल मोकळेपणे बोलत नाही, त्यामुळे जरा गोंधळ होण्याची शक्यता असते. जेव्हा एखादा डिझायनर कोटेशन बनवतो तेव्हा ते एक स्टँडर्ड मटेरियल मनात पकडून कोटेशन बनवत असतात. हे बेसिक कोटेशन असते आणि समोरच्याला म्हणजेच क्लायंटला बऱ्याचदा असे वाटते की, हे आपल्या बजेटच्या बाहेर जाते आहे. किंवा खूपच कमी होते आहे. या दोन्ही शक्यता असतात. त्या वेळेला आपण जर आपल्या बजेटची पूर्ण कल्पना डिझायनरला दिली तर त्यानुसार कोटेशन व्यवस्थित तयार करता येते आणि त्यामध्ये तुमचं काम व्यवस्थित होते. माझा असा अनुभव आहे की, जे लोक कपडय़ाच्या दुकानात जातानाही आपण किती किंमतीचा ड्रेस घेणार हे ठरवतात, ते लोक लाखो रुपयांचं काम करण्याच्या आधी बजेट काय असेल ते ठरवत नसतील? मग त्यात लपवण्यासारखं काय आहे?

* कामाचे स्वरूप आणि आपल्याला नक्की काय पाहिजे आहे ही एकदा सगळी माहिती डिझायनरला दिल्यानंतर त्याच्याबरोबर बसून टाइमलाइन ठरवणे, त्यानंतर तुमची गरज त्यांना केव्हा आहे याची नीट माहिती करून घेणे, यानुसार काम अतिशय योग्य वेळेत पूर्ण होते. त्याचबरोबर डिझायनर तुम्हाला त्याच्या फीमध्ये कोणत्या कोणत्या सव्‍‌र्हिसेस देणार आहे हे व्यवस्थित लिहून घेणे. एक छोटंसं अ‍ॅग्रीमेंट बनवणे हे खरं तर सोयीचं असतं.

* एकदा का आपलं डिझायनरबरोबर व्यवस्थित बोलणं करून, जेव्हा खरोखर आता कामाला सुरुवात करणार असतो त्या वेळी काही काळजी घेणं गरजेचं असतं.

जसे- तुम्हाला नूतनीकरण करायचे आहे ना? मग तुम्हाला पूर्ण सिव्हिल काम करायचं आहे की नुसतंच फर्निचर करायचं आहे, याव्यतिरिक्त तुम्हाला तुमचं जुनं सामान वापरायचं आहे का याची पूर्ण यादी बनवणे.

* बजेट ठरवताना आपण त्या बजेटमध्ये घरावर होणारा खर्च, डिझायनरची फी, टॅक्सेस हे तर धरतोच, पण याशिवाय जर आपण सगळे इलेक्ट्रॉनिक उपकरण नवीन घेणार असू तर त्याचीही तरतूद करणे आवश्यक असते.

* काम सुरू झाल्यानंतर शक्यतो घरातल्या एकाच व्यक्तीने जर डिझायनरबरोबर संवाद ठेवला तर काम सुरळीत होतं. शंभर वेळा वेगवेगळ्या जणांनी फोन करून वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या तर डिझाईन बनवायला वेळ लागतो. त्याच्यात बदल होत जातात आणि डिझाईन बनवायला जर वेळ लागला तर पर्यायाने तुमचे काम हे उशिरा संपणार असते.

घराचे नूतनीकरण करणे हा एक अतिशय सुंदर प्रवास आहे. या प्रवासात आपल्याबरोबर खूप माणसे सहभागी असतात. ही सहभागी झालेली माणसं जशी आपल्या घरातली असतात तशी ती बाहेरचीही असतात. ती बाहेरची असली तरी ते तुमचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता मेहनत घेत असतात. त्यामुळे हा प्रवास सगळ्यांना जर धरून केला तर फार सुंदर होतो आणि अभूतपूर्ण होतो. त्याचा एक वेगळाच आनंद काम पूर्ण झाल्यावर मिळतो. त्यामुळे जेव्हा रिनोव्हेशन करतो तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की, या प्रक्रियेत भरपूर लोक आहेत. कधी समस्या, कटकटी येतील, पण रिनोव्हेशन पूर्ण झाल्यावर जे सुंदर घर डोळ्यांसमोर येते तेव्हा मन आनंदून जाते.

प्रत्यक्षात काम सुरू होणार असेल तर घ्यायची काळजी..

* जर का आपल्याला सगळ्या घराचे नूतनीकरण करायचे नसेल आणि फक्त एकाच रूमचे करायचे असेल, तरीही काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, जर का फक्त लिव्हिंग रूमची सजावट करायची असेल तर आपल्याला त्याच्या लेआऊटचा विचार करायला लागतो, कारण आजकाल लिव्हिंग आणि डायनिंग हे एकच असते. त्यामुळे तुम्ही जर फक्त बठकीपुरता भाग डिझाईन करायचा ठरवला, नवीन करायचा ठरवला, तर ते काम झाल्यानंतर डायनिंगचा भाग हा जुना वाटू शकतो. तेव्हा प्लॅनिंग करताना त्या रूमचे लोकेशन हे लक्षात घेऊन तुम्हाला प्लािनग करावे लागते.

* प्रत्येक रूमनुसार आपल्या गरजा ठरवणे, त्या लिहून काढणे, कशा पद्धतीचे स्टोरेज अपेक्षित आहे हे लिहून काढणे.. कारण लिहिल्याने गोंधळ होत नाही. बऱ्याचदा कामांमध्ये इतक्या गोष्टी कमी-जास्त- पुढे-मागे होतात, की आपण विसरून जाऊ शकतो. त्यामुळे आपण जर गोष्टी व्यवस्थित लिहून काढल्या आणि वेळोवेळी त्या जर डिझायनरला अपडेट करत राहिलो तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो.

* मटेरियल निवडताना करताना शक्यतो दिवसाउजेडी- दुपारी असे जावे. अंधारात मटेरियलचे रंग वेगळे दिसतात. त्यामुळे जर शक्यतो आपल्याला सुट्टी काढून जाता आलं तर त्याचा फायदा तुम्हालाच होतो. आपण दुकानात गेलो ना, की ते दुकान म्हणजे जादूची नगरी असते. एवढय़ा व्हरायटी, एवढे डिझाईन्स आपल्याला प्रत्येक गोष्टीचे मिळत असते, की आपल्याला मोह टाळणे कठीण होऊन बसते. प्रत्येक वेळेला वस्तू निवडताना आपल्या डिझायनरबरोबर आपण काय बजेट या गोष्टीसाठी ठरवले आहे याची चर्चा करूनच ती वस्तू विकत घ्यावी.

*     घराचे नूतनीकरण करताना घरातील प्रत्येक सदस्याच्या वयाचा विचार हा झाला पाहिजे. त्यानुसारच महत्त्वाच्या गोष्टींच्या जागा ठरवता येतात व याबरोबरच उंचीदेखील लक्षात घेतली पाहिजे. तसेच घरात कोणी वयोवृद्ध माणसं आहेत का, लहान मुलं की एखादी अपंग व्यक्ती.. या साऱ्यांचा विचार करून घराचे डिझाईन करणे आवश्यक असते.

*     प्रत्येक गोष्टीचे डिझाईन कायम करण्याच्या आधी आपल्याला नक्की कोणत्या पद्धतीचे फर्निचर हवे आहे, त्यांची स्टाईल माहीत करून घेणे आवश्यक असते. जसे- जुन्या पद्धतीचं की नवीन पद्धतीचं फर्निचर. त्यानंतर त्याचं फिनिशिंग कसं हवं यावर डिझाईन अवलंबून असतं.

*     याशिवाय जर आपण सिव्हिल काम करणार असू तर घरात लावणाऱ्या फरशांची पद्धत, रंग व त्यांचे टेक्श्चर कोणतं हवं हे ठरवणं, तसंच बाथरूमची निवड करणं, त्याच्या फिटिंग्ज्ची निवड करताना डिझायनरबरोबर आपलाही सहभाग असणं आवश्यक असतं.

*     रंगाचंही तसंच असतं. घरात सात-आठ माणसे राहत असतील तर सात-आठ प्रकारचे रंग हे नक्कीच आपण वापरत नाही. त्यामुळे आपल्या घरात येणाऱ्या नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा विचार करून त्यानंतर आपण कुठल्या पद्धतीचं फर्निचर निवडतोय, त्याचा रंग कोणता आहे, या सगळ्याचा विचार करून एक रंग किंवा दोन रंग ठरवणं आवश्यक असतं. नाहीतर गोंधळ उडतो.

*     फर्निचर, रंग याचबरोबर आपण पडदे, कुशन कव्हर, बेडशीट, शोभेच्या वस्तू यांच्यासाठीही एक बजेट ठेवणे आवश्यक असते. यामुळेच घराच्या सौंदर्यात भर पडते.

*     आज-काल एक नवीन तंत्रज्ञान विकसित झालं आहे. सहज शक्य असेल किंवा बजेटमध्ये जर का बसत असेल असेल तर हे तंत्रज्ञान आपल्या घरात वापरणे हे अतिशय सोयीचे ठरते.

*     वेळोवेळी काम सुरू झाल्यानंतर वेळोवेळी डिझायनरसोबत साइटला भेट देणं आवश्यक असतं. याचबरोबर रोज साइटवर जाऊन काहीही नवीन बघायला मिळत नसते, त्यामुळे शक्यतो या भेटींचा एक कालावधी नंतरच ठरवणं आवश्यक असतं. ते दहा दिवसांनी, पंधरा दिवसांनी असं ठरवावं. या वेळेस तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे काही गोष्टी तयार झालेल्या दिसतात आणि तुम्हाला त्या घराचा आकार तयार होत असतो याची कल्पना यायला सुरुवात होते. आपण रोज जर साइटवर गेलो तर कामगारांवर दबाव राहील आणि लवकर काम होईल, असा एक सार्वत्रिक गैरसमज आपल्याला बघायला मिळतो.

*     एकदा जर का आपण तज्ज्ञांना काम दिलं असू तर आपण स्वतंत्र सूचना करू नये. त्यामुळे आपलंच नुकसान होत असतं. याचबरोबर जर शक्य असेल तर आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांना पूर्ण घराचे काम झाल्यावरच घरी बोलावणे आवश्यक. प्रत्येकाचे सल्ले हे जर आपण ऐकून घरात काम करायला लागलो तर अंतिमत: नुकसान तुमचंच असतं.

*     आपण जरी एक टाइमलाइन ठरवली तरी कधीकधी काही अचानक समस्या उद्भवतात. काही गोष्टींमुळे किंवा अडचणींमुळे कामाची वेळ किंवा कामाच्या वेळेचे गणित हे लांबू शकते. त्यामुळे हे लक्षात घ्यायला हवे, काम करणारी माणसे आहेत, रोबोट नाहीत. हे लक्षात घेऊन जर आपण त्या कामाकडे पाहिले तर त्या कामाचा आनंद मिळतो.

(इंटिरियर डिझायनर)

 

मराठीतील सर्व लेख ( Vastu-lekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.