बंगल्यांमध्ये व प्रीमियम फ्लॅट्समध्ये  एक वेगळी डायनिंग रूम असते. पण छोटय़ा फ्लॅट्समध्ये (यात २ बीएचके/ ३ बीएचकेही आले.) स्वतंत्र डायनिंग रूम बनवणे अशक्य असते. या फ्लॅट्समध्ये डायनिंग रूमचे रूपांतर डायनिंग एरियामध्ये होते. हा एरिया फ्लॅट्सच्या एकंदरीत प्रशस्तपणावर अवलंबून असतो. साधारणपणे हा एरिया ७० ते १०० चौ. फूट इतका असतो. या एरियावर आपल्या डायनिंग टेबलचा आकार ठरतो. जर एरिया थोडा मोठा असेल तर डायनिंग टेबल बरोबरच डायनिंग युनिटही बनवता येते. घरातील सगळे सदस्य एकत्र बसू शकतील इतके मोठे डायनिंग टेबल असावे, पण डायनिंग एरिया लहान असेल व घरातील सदस्यांची संख्या जास्त असेल तर अडचण निर्माण होते. डायनिंग एरिया लहान असूनही, कुटुंब मोठे आहे म्हणून मोठय़ा डायनिंग टेबलचा दूराग्रह करू नये. असे करणे घरातील सहज वावरास मारक ठरते. काही घरात वरचेवर पाहुणे जेवावयास असतात. अशा वेळेस मोठे डायनिंग टेबल गरजेचे आहे; पण काही घरात अट्टहासाने मोठे डायनिंग टेबल घेतले जाते. कारण कधी कधी पाहुणे येतात. वर्षांतून एखाद दोन वेळा जर पाहुणे येणार असतील तर त्या पाच दिवसांकरता वर्षांचे उर्वरित ३६० दिवस मोठय़ा  डायनिंग टेबलमुळे होणारी गैरसोय सहन करण्यात काहीच अर्थ नाही. अशा वेळेस कन्व्हर्टेबल डायनिंग टेबलचा पर्याय योग्य ठरतो. कन्व्हर्टेबल डायनिंग टेबल म्हणजे अशा प्रकारचे टेबल- जे गरज भासल्यास २ / ४ आसनी किंवा ४ आसनांचे ६/८ आसने करता येतात. अशा प्रकारची डिझाइन्स आपल्याला चांगल्या फर्निचर शोरुम्समध्ये पाहता येतील.

डायनिंग टेबलचा आकार ठरवल्यानंतर डायनिंग टेबलच्या डिझाइनकडे लक्ष द्यावे. सर्वप्रथम त्याचा आकार ठरवावा. हा आकार चौरस, आयत, षटकोन, गोल, लंबगोल यापैकी कोणताही असू शकतो. चौरस व आयताकृती टेबलांना सभोवताली जास्त  मोकळी जागा लागत नाही. तसेच या आकाराची टेबलं भिंतीला टेकवूनही ठेवता येतात. उर्वरित आकारांचं मात्र असं नाही. या आकारांना सभोवताली जास्त मोकळी जागा लागते. तसेच ही टेबलं भिंतीस टेकवून ठेवता येत नाहीत. अर्थातच डायनिंग टेबलचा आकारही डायनिंग एरियाच्या क्षेत्रफळावर व मांडणीवर अवलंबून असतो. बहुतांश  वेळेस डायनिंग एरियामधूनच पॅसेज जात असतो. हा पॅसेज लिव्हिंग रूम + डायनिंग एरियाला आतील रुम्सशी जोडतो. त्यामुळे या पॅसेजसाठी लागणारी जागा सोडूनच डायनिंग टेबल असावे. हा पॅसेज सहज वावरता येईल इतका मोठा (रुंदीने) असणे गरजेचे आहे. कारण हा पॅसेजच घरातील सर्वाधिक वावराची व महत्त्वाची जागा आहे.

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
pune rain marathi news, pune unseasonal rain marathi news
पुण्यात हलकापाऊस; दुचाकी घसरण्याच्या घटना
Demolition of Shiv flyover delayed again due to examinations Mumbai
मुंबई: परीक्षांमुळे शीव उड्डाणपुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

डायनिंग टेबल हे लाकूड, मेटल, स्टोन, ग्लास अशा विविध मटेरियल्सने बनवले जाते. सर्वाधिक डायनिंग टेबल्स ही लाकडात बनवली जातात. मेटल म्हणजेच स्टील किंवा रॉट आर्यनमध्येही टेबल्स बनवली जातात. काही वर्षांपूर्वी धातूची डायनिंग टेबल्स खूप खूप लोकप्रिय होती. पण आता पुन्हा लाकडी टेबल्सची चलती आहे. दगडी टेबल्सही बहुधा बंगल्यांमध्ये व मोठय़ा प्रीमियम फ्लॅट्समध्ये वापरली जातात. कारण ती टेबल्स खूप मोठी व जड असतात. या कारणामुळे ती सहज हलवता येत नाहीत. टेबल टॉप्सही वेगवेगळ्या मटेरियल्समध्ये बनवले जातात. जसे की लाकूड, काच स्टोन, काचेचे टेबल टॉप्स हे सगळ्यात जास्त वापरले जातात. ही काच या प्रकाराची असते. ही काच सहज फुटत नाही व जरी फुटली तरी त्याचे बारीक बारीक तुकडे होत नाहीत. जेणेकरून अपघातामुळे होणारी भयंकर इजा टळते. अर्थात डायनिंग टेबल विकत घेताना टॉपची काचेची खात्री करून घ्यावी. टेबल टॉप खाली आणखी एखादी शेल्फ असल्यास खूप उपयुक्त ठरते. या शेल्फवर छोटय़ा छोटय़ा गोष्टी ठेवता येतात. या गोष्टी शक्यतो डायनिंग टेबल वापरण्याच्या काळापुरत्याच ठेवाव्यात. कारण डायनिंग टेबलचा टॉप काचेचा असल्यास शेल्फवर ठेवलेल्या गोष्टी सहज दृष्टीस पडतात. डायनिंग टेबल हे सहज साफ करता येण्याजोगे असावे. म्हणजेच सांभाळण्यास सहज असावे. आवड म्हणून भारतीय बनावटीचे, कलाकुसरीचे डायनिंग टेबल जर घेतले तर त्यात खूप धूळ साचते व ती साफ करण्यास कर्मकठीण होऊन बसते. हल्ली सगळ्याच  ठिकाणी धुळीचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात जाणवतो.

डायनिंग टेबलच्या खुच्र्या या अर्थातच डायनिंग टेबलला सोजशा असाव्यात. खुर्चीचे आसन जितके महत्त्वाचे तितकाच पाठ  टेकण्यासाठीचा भागही महत्त्वाचा आहे. म्हणजे आसन बसावयास जसे आरामदायी असावे तसेच पाठीमागचा भाग हा  पाठ टेकण्यास आरामदायी असावा. या भागावरील डिझाइनमध्ये पाठीला टोचणारे काहीही नको. डिझाइनर खुच्र्या विकत घेण्याच्या नादात कोणत्याही प्रकारे खुर्चीचा आरामदायीपणा कमी व्हायला नको.

सगळ्यात जास्त विकली जाणारी डायनिंग टेबल्स ही आयताकृती, लाकडी व काचेचा टॉप असलेली असतात. डायनिंग टेबल हे घरी सुताराकरवी बनवून न घेता शोरुममधून प्रत्यक्ष पाहून विकत घ्यावी. कारण शोरुमच्या टेबल्सचे  फिनिश जास्त चांगले असते. शोरुम मात्र खात्रीचे असावे. जेणेकरून माल चांगल्या प्रतीचा वापरला जाईल. आपण शोरुममध्ये जाऊन आपल्या आवडत्या डिझाइनचे डायनिंग टेबल, आपल्या गरजेनुसार बनवून घेऊ शकतो. इम्पोर्टेड डायनिंग टेबल मात्र जशी आहेत तशीच विकत घ्यावी लागतात. टेबल महत्त्वाचे आहेच, पण त्यावर ठेवल्या जाणाऱ्या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. फ्रुट बोल, कोस्टर्स, टिशू पेपर होल्डर, सॉल्ट अँड पेपर डिस्पेनसर्स, टेबल मॅटस्, कँडल स्टँडस् टूथपिक होल्डर या टेबलवर ठेवल्या जाणाऱ्या गोष्टीही काळजीपूर्वक निवडाव्यात. हे डायनिंग टेबल व या सगळ्या गोष्टी आपल्या इंटिरियरला मॅच करणाऱ्या हव्यात. एक टेबल व चार खुच्र्या मांडण्यापलीकडे विचार करणे गरजेचे आहे. केवळ उपयुक्तता लक्षात न घेता सौंदर्यात्मक दृष्टीही तितकीच महत्त्वाची आहे. उपयुक्तता ही गरजेची आहेच, पण कलात्मक दृष्टिकोन न ठेवल्यास कितीही महागडे डायनिंग टेबल जरी असले तरी ते ठोकळ्यासमान भासेल.

आपला डायनिंग एरिया, आपल्या घरची (कुटुंबाची) गरज, आपले बजेट, आपली आवड याचा पुरेपूर अभ्यास करून डायनिंग टेबल निवडल्यास ते पुरेपूर उपयुक्त व सुंदर असेल यात शंका नाही. या लेखात आपण डायनिंग टेबलची माहिती घेतली. पुढील लेखात आपण डायनिंग युनिटची माहिती घेऊया.

(इंटिरियर डिझायनर)

ajitsawantdesigns@gmail.com